संक्रात आणि तिळगूळ ही आपली परंपरा, परंतु कालमानाप्रमाणे तीळ आणि गूळ एकत्र आणण्याच्या पद्धती बदलल्या. त्याचबरोबर विविध व्याधींच्या वाढलेल्या संख्येने त्याच्या होणाऱ्या उपयोगावर निर्बंध आले.

तीळ कोणी खाऊ  नये?

तीळ हे उत्तमपैकी पोषण करणारे वातनाशक असले तरी कफ-पित्तकार आहे. त्यात नवीन गुळाचा वापर करून लाडू तयार केल्यास हमखास कफ वाढवते. म्हणून मुलांना देताना त्यावर गरम पाणी द्यावे किंवा पाणी देऊ  नये. म्हणजे कफ वाढणार नाही. ज्या व्यक्तींना अजीर्ण झाले असेल त्यांनी तिळगूळ घेऊ  नये. गर्भार स्त्रियांनी तिळगुळाचे लाडू प्रमाणातच खावेत. ज्या स्त्रियांना अतिरक्तस्रावाचा त्रास आहे, त्यांनी तिळगूळ टाळावे. थंडी, छातीत दाह, जळजळ होणाऱ्या व्यक्तींनी तिळगुळाच्या लाडवापासून लांब राहावे. तिळाचे वैशिष्टय़ आहे की, तीळ वजन वाढवते आणि वजन कमीही करते. ज्यांना डोळ्यांची आग, डोके दुखणे, जुलाब, कोलायटिस, दमा आहे, अशांनी तिळगूळ अगदी अल्प घ्यावा. तिळाचे मेदधातूवर काम असल्याने मधुमेहींना उपयुक्त ठरताना दिसून येते. विशेष करून ज्या मधुमेही व्यक्तींमध्ये शुक्रक्षयाची लक्षणे आहेत, लघवीचे प्रमाण वाढले आहे, थकवा आहे अशांनी आवर्जून घ्यावे. त्यासाठी विशेष कृतीचा लाडू खावा.

तीळ कोणी खावे?

खरे तर काळे तीळ शुक्रवर्धक असल्याने श्रेष्ठ मानले जातात आणि त्या खालोखाल पांढरे तीळ, परंतु होमधान्य म्हणून अधिक मान्यता मिळाल्याने पांढऱ्या तिळाचा उपयोग जास्त होतो. ज्यांच्या शरीरात कोरडेपणा आहे, त्यांनी तिळगूळ घ्यावा. यामध्ये जुना गूळ वापरल्यास प्रशस्त. कारण नवीन गूळ कफ निर्माण करून भूक कमी करतो. गूळ स्वच्छ असावा, मलीन असल्यास रक्त, मांस, मेद, कफ आणि कृमी निर्माण करतो. संधिवाताच्या रुग्णांनी, मणक्याच्या विकारांनी ग्रस्त असलेल्यांसाठी तिळगुळासारखे औषध नाही. हाडे बळकट, जुळवण्याचे काम तिळगूळ उत्तम करते. ज्या स्त्रियांची पाळी जात आहे (मेनोपॉज) आणि ज्या स्त्रियांना, मुलींना पाळीमध्ये त्रास होतो, अशांसाठी तिळगूळ हे उत्तम औषध आहे. ज्या तरुण-तरुणी, स्त्री-पुरुषांचे केस गळतात, त्यांनी तीळ आणि तूप मधातून घ्यावा. निश्चित फायदा होईल. ज्या मुलांचे व व्यक्तींचे दात-हिरडय़ा अशक्त आहेत, त्यांनी कमी गूळ असलेले लाडू किंवा तीळ भाजून चावून खायला दिल्यास फायदा होतो. हिरडय़ा आणि दात मजबूत होतात. अर्धागवायू, मूळव्याध यावर तीळ उपयुक्त आहे. तिळगूळ बुद्धी वाढणारा असून मेंदूचे पोषण करतो. त्यात वेखंड, ज्येष्ठमध, अक्रोड टाकून वडी केल्यास परीक्षेसाठी उत्तम टॉनिक ठरते.

मधुमेहींसाठी तिळगूळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काळे तीळ असल्यास उत्तम, अन्यथा पांढरे तीळ घ्यावेत. जुना स्वच्छ गूळ (नेहमीपेक्षा १/४), मध, स्टिव्हिया पावडर (स्टिव्हिया ही वनस्पती साखरेपेक्षा १०० पट गोड असून त्यानुसार प्रमाण ठरवावे). वेलची, दालचिनी, किंचित खसखस हे सर्व एकत्र करून नेहमीप्रमाणे लाडू वळावेत. यात गूळ, मध न घालता ज्येष्ठमध आणि सुंठ टाकून वडी करावी. ही वडी वा लाडू दिवसातून दोन वेळा खाण्यास हरकत नाही. स्टिव्हियामुळे लाडू गोड होतो. पण साखर किंवा इतर घटक वाढत नाही. तीळ लघवीचे प्रमाण कमी करून इतर द्रव्यांबरोबर धातूंचे पोषण करून बल देतो आणि मूळव्याधी न वाढता उलट मेदधातूचा क्षय करतो.

वैद्य विक्रांत जाधव, नाशिक