सॅक, स्लीिपग बॅगबरोबरच ट्रेकिंगला जाताना अनेक वस्तू सोबत लागतात. त्यातील काही महत्त्वाच्या वस्तू आणि त्यांचा उपयोग पाहू या.
हायड्रेशन सिपर बॅक पॅक : पाण्याच्या बाटलीला पर्याय म्हणून सध्या हायड्रेशन सिपर बॅक पॅक वापरली जाते. ही बॅक पॅक खांद्यावर सॅकसारखी अडकवता येते किंवा ती सॅकमध्येही ठेवता येते. हायड्रेशन बॅगला तोटी लावलेली असते. त्यातून हवे तेव्हा पाणी पिता येते. पाणी पिण्याच्या सहजतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य ठेवता येते.
हेड टॉर्च : ट्रेकिंगचे साहित्य सहज उपलब्ध होऊ लागल्यामुळे आता सर्वच ट्रेकर्स हेड टॉर्च वापरू लागले आहेत. हेड टॉर्च आकाराने लहान व वजनाने हलक्या असतात. त्यामुळे त्या खिशात किंवा पाऊचमध्ये ठेवता येतात. हेड टॉर्च जलरोधक असतात. डोक्याला अडकवण्याची सोय असल्यामुळे हात मोकळे राहतात. खास करून पावसात व दुर्गम ठिकाणी ट्रेक करताना हेड टॉर्चचा जास्त फायदा होतो. हेड टॉर्चमध्ये असलेल्या वेगवेगळ्या मोड्समुळे गरजेप्रमाणे प्रकाश कमी-जास्त करण्याची सोय असते. हेड टॉर्चमध्ये एलईडी (Light Emitting Diodes) वापरले जातात. त्यांचे आयुष्य जास्त असते. काही टॉर्चमध्ये हॅलोजन व एलईडीचा वापर केलेला असतो. एलईडीचा प्रकाश जवळचे पाहण्यासाठी तर हॅलोजनचा प्रकाश लांबचे पाहण्यासाठी होतो.
वॉकिंग स्टिक : ट्रेकिंग करतानाही काठी म्हणजे वॉकिंग स्टिकचे साहाय्य घेतले जाते. त्यामुळे ट्रेक करताना गुडघ्यावर येणारा ताण कमी होतो. दुर्गम चढावर चढताना व उतरताना स्टिकमुळे शरीराचा तोल चांगल्या रीतीने सांभाळता येतो. आधुनिक स्टिक या अॅल्युमिनिअम अलॉय किंवा कार्बन फायबरपासून तयार केल्या जातात. त्यांचा आकार टेलिस्कोपिक असतो. त्यामुळे वजनाने त्या अतिशय हलक्या असतात. तसेच ट्रेकरच्या उंचीप्रमाणे त्या अॅडजस्ट करता येतात. वापरात नसताना त्या फोल्ड करून ठेवता येतात. काही स्टिकमध्ये शॉक एॅब्जॉर्बची रचना असते. स्टिकला असलेली मूठ हा एक महत्त्वाचा भाग असतो. हातावर व विशेष करून मनगटावर ताण येणार नाही किंवा तळहातावर फोड येणार नाहीत, अशी मूठ असावी.
गॉगल : ट्रेक करताना व विशेष करून हिमालयात ट्रेक करताना प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना त्रास होतो. सूर्याच्या अतिनील (Ultra Violet) किरणांमुळे विशेष करून हाय अल्टिटय़ूड ट्रेकमध्ये बर्फाळ टप्प्यांवरून जाताना यांचा त्रास जास्त होतो. गॉगल न वापरल्यामुळे अतिनील किरणांमुळे डोके दुखणे, डोळे ओढल्यासारखे वाटणे असे त्रास होतात. यासाठी योग्य गॉगल वापरावेत. हवा, धुळीकण, माती यांपासूनही गॉगल डोळ्यांचे रक्षण करतात. तुम्ही कोणत्या ठिकाणी ट्रेक करणार आहात, म्हणजे सूर्यप्रकाशाची तीव्रता किती असेल त्याप्रमाणे गॉगलची शेड व आकार निवडावा. गॉगल नाजूक वस्तू असल्याने वापरताना काळजी घ्यायला हवी.
स्विस नाइफ : एकाच नाइफमध्ये वेगवेगळ्या सोयी असणे हे स्विस नाइफचे वैशिष्टय़ आहे. श््रू३१्रल्ल७ कंपनीने तयार केलेल्या स्विस नाइफमध्ये ट्रेकिंगच्या वेळी उपयोगी पडणाऱ्या सोयी आहेत. हा नाइफ आकाराने छोटा असल्यामुळे तो सहज पाऊचमध्ये राहातो. ब्लेड, छोटी करवत, स्क्रू ड्रायव्हर, कात्री, बॉटल ओपनर असे अनेक टुल्स या नाइफमध्ये उपलब्ध आहेत. वापरानंतर नाइफ स्वच्छ करून, कोरडा करून नंतरच पाऊचमध्ये ठेवावा.
वेस्ट पाऊच : ट्रेक करताना लागणाऱ्या लहानसहान वस्तू ठेवण्यासाठी व त्या सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी या पाऊचचा वापर केला जातो. वेगवेगळे मटेरिअल वापरून तयार केलेले, विविध आकारातील व सोयी असलेले पाऊच बाजारात मिळतात. एक दिवसाच्या ट्रेकला वापरण्यासाठी छोटे पाऊच तर जास्त दिवसांच्या ट्रेक किंवा क्लायंबिंगला वापरण्यासाठी मोठे व जास्त कप्पे असलेले पाऊच मिळतात. किती दिवसांचा ट्रेक व कोणत्या वापरासाठी त्याचा उपयोग होणार आहे त्याप्रमाणे पाऊच निवडावा.
स्किन प्रोटेक्टर्स : ट्रेक करताना उन्हाशी संपर्क अपरिहार्य असतो. उन्हामुळे डोळ्यांवर ताण येणे, त्वचा काळवंडणे असे त्रास होतात. यापासून काही प्रमाणात बचाव करण्यासाठी टोपी वापरणे, आर्म स्लीव्हज् घालणे, स्किन क्रीम/लोशन वापरणे असे उपाय करता येतात.
अशोक पवार-पाटील – ashok19patil65@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 23rd Mar 2016 रोजी प्रकाशित
ट्रेकिंग गिअर्स : भटकंतीसाठी उपयुक्त साधने
सॅक, स्लीिपग बॅगबरोबरच ट्रेकिंगला जाताना अनेक वस्तू सोबत लागतात. त्यातील काही महत्त्वाच्या वस्तू आणि त्यांचा उपयोग पाहू या. हायड्रेशन सिपर बॅक पॅक : पाण्याच्या बाटलीला पर्याय म्हणून सध्या हायड्रेशन सिपर बॅक पॅक वापरली जाते. ही बॅक पॅक खांद्यावर सॅकसारखी अडकवता येते किंवा ती सॅकमध्येही ठेवता येते. हायड्रेशन बॅगला तोटी लावलेली असते. त्यातून हवे तेव्हा पाणी […]
Written by लोकसत्ता टीम

First published on: 23-03-2016 at 01:31 IST
मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appropriate tools for trekkers