पेशव्यांचे गुरू श्रीब्रह्मेंद्रस्वामी सन १७१०-११ साली देवाचे गोठणे गावी वास्तव्याला आले. त्यांना श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशव्यांनी हे गाव इनाम म्हणून दिले होते. राजाश्रय प्राप्त झाल्यामुळे श्रीब्रह्मेंद्रस्वामींनी या गावात असलेल्या श्रीगोवर्धनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि याच मंदिरात एक आगळीवेगळी परशुरामाची मूर्ती प्रतिष्ठापित केली. अंदाजे दोन फूट उंचीची तांब्याची ही मूर्ती दोन्ही हात जोडलेल्या स्थितीत आहे. डाव्या हाताच्या घडीत परशू खोचलेला दिसतो. परशुरामाची अशी मूर्ती अन्यत्र कुठे दिसत नाही. मंदिराचे पुजारी म्हणून पेशव्यांनी गणेश केशव आपटे यांना सनद देऊन त्यांची नेमणूक केली. धावडशी संस्थानामार्फत एक कमिटी नेमली असून देवालयाची व्यवस्था ती पाहते.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात दोन गोठणे नावाची गावे आहेत. एक आहे ‘दोनिवडे गोठणे’ आणि दुसरे हे, जिथे देवाची मंदिरे आहेत ते ‘देवाचे गोठणे.’ देवळाचा प्रकार फरसबंदी असून बकुळीच्या फुलांचा सडा इथे पडलेला असतो. मंदिराच्या भिंतीवर गंडभेरुंड या काल्पनिक पक्ष्याचे सुंदर शिल्प पाहायला मिळते. इथल्या दीपमाळेचा आकार अगदी वेगळा असून मंदिराच्या दारातच पोर्तुगीज घंटा टांगलेली पाहायला मिळते.

समस्त आपटे मंडळींचे हे मूळ गाव असल्याचे समजते. मंदिराच्या मागे असलेल्या दगडी मार्गाने माथ्यावर गेले की एक अप्रतिम कातळशिल्प आवर्जून पाहण्याजोगे आहे. इथल्या खडकामध्ये चुंबकीय क्षेत्र असल्यामुळे होकायंत्र ठेवले असता ते चुकीची दिशा दाखवते. हे इथले अजून एक निसर्गनवल होय. राजापूर-सोलगाव माग्रे इथले अंतर २५ किलोमीटर आहे. वर्षांचे बाराही महिने हिरवेगार असलेले निसर्गरम्य असे हे गाव आणि इथले मंदिर मुद्दाम जाऊन पाहिले पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ashutosh.treks@gmail.com