मिलिंद बाबर
दक्षिण अमेरिका म्हणजे दंतकथांमुळे गूढतेची झालर लाभलेला प्रदेश. इथली सहल म्हणजे अनेक आश्चर्यकारक ठिकाणं पाहण्याची, मानवाच्या उत्क्रांतीतले काही टप्पे अनुभवण्याची, आपल्या पूर्वजांच्या स्तिमित करणाऱ्या क्षमतांचे पुरावे गोळा करण्याची संधी!
जगाचं हे दक्षिणी टोक. कायमची वस्ती असलेलं, जगातलं सर्वात दक्षिणेकडचं, शेवटचं गाव म्हणजे उसुआया. इथून पुढे दक्षिण ध्रुवापर्यंत फक्त आणि फक्त पाणीच आहे. ५०० वर्षांपूर्वी मॅगलन नावाच्या धाडसी दर्यासारंगाने, जगातला सर्वात मोठा- पॅसिफिक आणि दुसरा मोठा- अटलांटिक समुद्र यांचं जिथं मीलन होतं, तो मार्ग शोधला, परंतु तिथून फक्त तीन किलोमीटरवर असलेल्या उसुआयाला यायचं धारिष्टय़ काही त्याने केलं नाही. समोर दिसणारी भूमी हा सैतानाचा प्रदेश आहे अशी त्याची ठाम समजूत झाली होती. तो याच प्रदेशाला अंटार्क्टिका समजला.
अंटार्क्टिकामध्ये काळा सूर्य प्रकाशतो, झाडं वरून खाली वाढतात, बर्फ खालून वर पडतं आणि सोळा बोटांचे राक्षस आगीभोवती हैदोस घालतात, अशी त्याची समजूत होती. इथं त्याला आगीच्या ज्वाळांऐवजी फक्त धूरच दिसला होता, म्हणून त्यानं त्याला धुरांचा प्रदेश असं नाव दिल होतं. त्याच्या नंतर आलेल्या दर्यासारंगांनीही हीच सुरस आणि चमत्कारिक कथांची मालिका पुढे सुरू ठेवली. हत्तीला आपल्या पायांनी उचलून नेणारा राक्षसी रॉक पक्षी त्यांच्याच कल्पनांतून साकारला. डांटेसारख्या प्रसिद्ध चित्रकाराने या भूमीला हेल किंवा जळता नरक म्हणून चितारलं. पण प्रत्यक्षात हे जग अगदी वेगळं आहे.
उसुआयाला अंटार्क्टिकाचा गेट वे असं म्हणतात, कारण अंटार्क्टिकाला जाणाऱ्या सर्व बोटी इथूनच सुटतात. इथून आपण ऐतिहासिक बीगल चॅनलमधून बोट राइड घेतो. बीगल नावाच्या बोटीने सर्वात आधी या दोन महासागरांना जोडणाऱ्या सामुद्रधुनीतून प्रवास केला होता, म्हणून त्याला बीगल असं नाव पडलं. नोव्हेंबरमध्ये हजारो पेंग्विन अंटार्क्टिकाहून इथं प्रजोत्पादनासाठी येतात. सी लायन्सने खचाखच भरलेलं बेट पाहता येतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथला फारो लेस इक्लेअर्स (Faro les Eclaires) नावाचा दीपस्तंभ पाहायला मिळतो. जगाचा शेवट या दीपस्तंभापाशी होतो, असं मानलं जातं. कारण तिथं जमीन संपते आणि तिथून सलग दक्षिण ध्रुवापर्यंत पाणी आणि बर्फच आहे.
‘चॅरियट्स ऑफ द गॉड्स’ या पुस्तकात लिहिलेली सर्व रहस्यं पाहण्याची इच्छा अनेकांना असते. गूढ गोष्टींचा मागोवा घेताना तिथं नक्की काय घडलं असेल? खरंच का परग्रहवासी इथं येऊन गेले असतील? कोणी केली असतील ती राक्षसी बांधकाम? नाझकाच्या पठारावर बारा हजार फूट उंचीवर, जिथं विरळ हवेमुळे श्वास घेणंही जड जातं, तिथं बांधलेली ६० किलोमीटर लांब आणि १० किलोमीटर रुंद गंजक्या लोखंडाच्या रंगाची सरळ सपाट पट्टी म्हणजे, परग्रहवासीयांच्या विमानांची धावपट्टी असेल का? अँडीज पर्वतातल्या पॅराकस इथल्या डोंगरात कोरलेला महाकाय त्रिशूळ जवळपास १५ कि.मी. दूरवरूनसुद्धा सहज दिसतो. दोन हजार वर्षांपूर्वीच्या मानवाला प्राथमिक दगडी अवजारं वापरून एवढं अचूक, सुबक आणि महाकाय शिल्पं साकारणं शक्य होतं का? वाल्मीकी रामायणात पाताळ दिशेचं वर्णन करताना, सुग्रीव म्हणतो, पाताळ प्रदेशाच्या सीमेवर एक महाकाय त्रिशूळ दिसेल. पृथ्वीच्या दक्षिण प्रदेशातला हाच तो त्रिशूळ असेल का? तिवनाकु देवतेची लाल पाषाणात कोरलेली २४ फूट उंच आणि २० टनांची अतिभव्य मूर्ती पठारावर कशी आणली असेल? तिथं असा लाल पाषाण जवळपास कुठंच मिळत नाही. मग दूर कुठं तरी घडवलेली ती अतिभव्य मूर्ती इतक्या डोंगरकपारींतून जराही धक्का लागू न देता १२ हजार फूट उंचीवरील पठारावर आणलीच कशी? या मूर्तीच्या अंगावर सांकेतिक खुणांत कोरलेली माहिती आढळली. ती माहिती आधुनिक उपग्रह सिद्धांताशी तंतोतंत जुळते. अति प्राचीन काळी एक भला मोठ्ठा उपग्रह पृथ्वीभोवती २८८ दिवसांत ४२५ प्रदक्षिणा पूर्ण करीत असे. त्यात बिघाड झाला आणि त्याचा एक मोठ्ठा तुकडा आजही पृथ्वीभोवती फिरत आहे आणि तोच आपला चंद्रमा. हे खरे आहे का?
जगातील सर्वात जास्त उंचीवर (१२ हजार ५०० फूट) असलेलं व व्यावसायिक दळणवळणासाठी वापरलं जाणारं टीटीकाका म्हणजे एक अति विशाल सरोवर! दुर्गम, उंच भागातला तो समुद्रच जणू. त्याचं रहस्य काय आणि ते कसं उलगडलं? दक्षिण अमेरिकेत फिरताना अशा अनेक गोष्टी आपल्या बुद्धीला वेगळा विचार करायला लावतात.
सात आश्चर्यापैकी रियो द जनेरिओचा ख्राईस्ट द रेडीमर हा डोंगरावरचा अतिभव्य पुतळा आणि तेरा हजार फुटांवरचा इंका संस्कृतीचा साक्षीदार माचू पिचू ही आश्र्चय पाहता येतात. पाण्याच्या आकारमानात आणि लांबीत जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेली अॅमेझॉन नदी, अॅमेझॉनचं जंगल आणि अॅमेझॉनचं खोरं पाहायला मिळतं. ईको पार्कमध्ये, नदीच्या काठी दोन दिवसांचा मुक्काम करून धकाधकीपासून दूर जाता येतं. जगात जेवढं गोड पाणी आहे, त्याच्या १७ टक्के पाणी एकटय़ा अॅमेझॉन नदीत आहे, असं सांगितलं जातं. अॅमेझॉन नदीच्या दोन मोठय़ा उपनद्या निग्रो आणि सोलेमोस. दोन्ही नद्यांच्या पाण्याचा रंग भिन्न. त्यांचा संगम मिटिंग ऑफ द वॉटर्स म्हणून ओळखला जातो. ते दृश्यही या सहलीत पाहता येतं.
नाझकाच्या पठारावरच्या गूढ आकृत्या आणि रेषा बघण्यासाठी मात्र हवाई उड्डाणच करावं लागतं. त्या रहस्यमय आकृत्या आणि रेषांच्या भव्यतेची कल्पना जमिनीवरून येऊ शकत नाही. चार ते पाच हजार वर्षांपूर्वी अगदीच प्राथमिक अवस्थेतील मानवाने हे दिव्य साकारलं असेल, हे आपल्या आजच्या आधुनिक मानवाच्या बुद्धीला नक्कीच पटणार नाही.
बोलिव्हियामधे युनी येथे जगातलं सर्वात मोठं मिठागर आहे. याला जगातला सर्वात मोठ्ठा आरसा असंही म्हणतात. ४० हजार वर्षांपूर्वी आटलेले मिनचीन सरोवर म्हणजेच आजचे युनीचे मिठागर. त्यावर चालणे म्हणजे एका प्रचंड मोठय़ा आरशावर चालल्यासारखे आहे. आजूबाजूच्या सर्व गोष्टींची प्रतिबिंबं इथं दिसतात. हा अनुभव अविस्मरणीय ठरतो. छायाचित्रणाची उत्तम संधी इथं मिळते. जगातला सर्वात मोठा महासागर प्रशांत महासागर आणि जगातील सर्वात लांब पर्वतरांग अँडीज त्यांच्या वळचणीतला मिरचीच्या आकाराचा देश चिली, हे सारं काही यात पाहता येतं. या टूरमधला एक अविस्मरणीय अनुभव म्हणजे पातागोनिया प्रांताला भेट. हिमनदीचं स्वर्गीय दृश्य पाहण्याची संधी इथं मिळते. नदीचं पाणी गोठून तयार झालेली ही ३० कि.मी. लांबीची हिमनदी!
मानवी कल्पनांच्या पलीकडची, आकलन क्षमतांना आव्हान देणारी अनेक आश्र्चय या सहलीत पाहता, अनुभवता येतात. पठडीतल्या पर्यटनापलीकडचं काही तरी भव्यदिव्य पाहायचं असेल, आयुष्याला व्यापून उरेल, असा अनुभव घ्यायचा असेल, तर या सहलीशिवाय पर्याय नाही.
response.lokprabha@expressindia.com