मेष तुमच्या सभोवतालचे वातावरण झपाटय़ाने बदलणार आहे. म्हणून दिसते तसे नसते या म्हणीची सतत आठवण ठेवा. व्यापार उद्योगात पैशावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात याची प्रकर्षांने जाणीव होईल. आर्थिक व्यवहारात काटेकोर राहा. नवीन सौदे झाल्यामुळे पूर्वीचे काही हितसंबंध संपुष्टात येण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये तुमचे प्रावीण्य आणि बुद्धिमत्ता याचा कस लागेल. इतरांवर अवलंबून राहू नका. नवीन नोकरी स्वीकारताना पगारवाढीपेक्षा कामाचे स्वरूप आणि संस्थेचे धोरण याला महत्त्व द्या.

वृषभ एकाच वेळी अनेक योजना आणि बेत तुमच्या मनात असल्यामुळे विचारांचे काहूर माजलेले असेल. कामाचा डोंगर पुढे असला तरी मधूनच मौजमजा करण्यासाठी मन बंड करून उठेल. व्यवसाय-उद्योगात ज्या व्यक्तीकडून तुम्हाला काम करवून घ्यायचे आहे, त्या व्यक्तीची मनधरणी करावी लागेल. नोकरीमध्ये सतत वरिष्ठांची टांगती तलवार असल्यामुळे कंटाळा येईल. कामात शॉर्टकट शोधून काढाल. घरामध्ये कर्तव्याला प्राधान्य द्यावे लागल्यामुळे विरंगुळेचे महत्त्व समजेल. एखादा छान कार्यक्रम ठरेल.

मिथुन ग्रहमान संमिश्र आहे. करियरमधील प्रगती वगैरे गोष्टी तुम्हाला उत्साही ठेवतील. परंतु घरातील प्रश्नांमुळे काही मर्यादा येतील. व्यापारीवर्गाला गिऱ्हाइकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. फक्त काम वेळेत करण्याकरता धावपळ करावी लागेल. कदाचित जादा भांडवलाची गरज भासेल. नोकरीमध्ये जे काम इतरांना जमत नाही, ते काम वरिष्ठ तुमच्यावर विश्वासाने सोपवतील. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये नातेवाईक, हितचिंतक तुम्हाला उत्स्फूर्तपणे साथ देतील. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे.

कर्क मानलं तर समाधान अशी तुमची परिस्थिती आहे. त्यामुळे कशात आनंद मानायचा आणि कशात नाही हे तुम्ही ठरवायचे आहे. सभोवतालच्या व्यक्तींकडून खूप साथ मिळण्याची अपेक्षा ठेवू नका. व्यापार-उद्योगात तुमच्या कामामध्ये सावधगिरी बाळगा. थोडेसे जरी गाफील राहिलात तरी स्पर्धकांना एखादी चांगली संधी उचलता येईल. नोकरीमध्ये आवडत्या कामापासून तुम्हाला लांब ठेवले जाईल. घरामध्ये तुमच्या चांगुलपणाचे कौतुक करून सर्वजण गैरफायदा घेतील. विद्यार्थ्यांना केलेल्या कष्टाचे फळ मिळेल.

सिंह तुमचा स्वभाव आग्रही आहे. एखादी गोष्ट तुमच्या मनामध्ये असली की ती पूर्ण करण्याकरिता तुम्ही काहीही करायला तयार होता. त्याचा फायदा तुमच्यापेक्षा सभोवतालच्या व्यक्तींनाच जास्त होतो. व्यापार-उद्योगातील कामकाज चांगले होईल. पण बरेचसे व्यवहार उधारीचे असतील. जोडधंद्यात पूर्ण केलेल्या कामाचे पैसे लांबण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये वरिष्ठ तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर बसवून तुमच्याकडून जास्त काम करून घेतील. घरामध्ये सर्व काही ठीक असेल.

कन्या ग्रहमान बदलले की सभोवतालची परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवून तुमच्या दृष्टीने जी महत्त्वाची कामे आहेत ती तातडीने उरका. त्यात आळस करू नका. व्यापार-धंद्यामध्ये जे पैसे मिळणार आहेत ते पदरात पाडून घ्या. नोकरीमध्ये नवीन पद्धतीचे काम समजायला वेळ लागेल. त्याकरता सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवा. घरामध्ये कोणतेही वादविवाद न वाढू देता त्यावर ताबडतोब तोडगा काढा. वृद्धांनी प्रकृतीचे पथ्यपाणी सांभाळावे.

तूळ घटनाक्रम बदलला की माणसाला आपल्या विचारात बदल करणे भाग पडते. त्या वेळेला नियोजन वगैरे गोष्टी फक्त कागदावरच राहतात. व्यापार-उद्योगात ज्यांनी तुम्हाला मदतीचे आश्वासन दिले होते ते पाळले जाणार नाही. त्यामुळे पर्यायी विचार करणे भाग पडेल. नोकरीमध्ये जे काम तुम्हाला आवडत नाही, त्या कामावर वरिष्ठ तुमची नेमणूक करतील. त्यामुळे तुमचा मानसिक व शारीरिक तणाव वाढेल. घरामध्ये अनपेक्षित कारणांमुळे खर्च वाढतील. विद्यार्थ्यांनी नशिबावर अवलंबून राहू नये.

वृश्चिक पूर्वी ज्या कामात एक प्रकारचा तणाव निर्माण झाला होता, त्यातून बाहेर पडण्याचा तुमचा इरादा असेल. पण रोजच्या धावपळीमुळे ते शक्य होणार नाही. व्यवसाय-उद्योगामध्ये कामाचे प्रमाण जास्त असल्यामुळे इतरांना खूश ठेवून त्यांच्याकडून काम करून घ्यावे लागेल. जुने कंत्राट संपण्याची शक्यता आहे. जोडधंदा असणाऱ्यांनी झालेल्या कामाची वसुली वेळीच करावी. नोकरीमध्ये रात्र थोडी सोंगे फार अशी परिस्थिती असेल. घरामधल्या व्यक्तींच्या वागण्या-बोलण्यामुळे शांत राहा.

धनू जे काम चालू आहे त्यामध्ये विस्तार कसा करायचा या विषयी तुमच्या मनामध्ये विचार चालू असेल. परंतु त्या नादामध्ये नेहमीच्या कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नाही तर गिऱ्हाइकांची नाराजी ओढवेल. हातामधल्या पैशांचा योग्य कारणाकरताच वापर करा. नोकरीमध्ये वरिष्ठ एखादे आश्वासन देऊन तुमच्याकडून बरेच काम करवून घेतील. संस्थेच्या गरजेपोटी काही काळाकरता बदल होतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांनी घाईगडबड करू नये. विद्यार्थ्यांनी मित्रमैत्रिणींच्या नादी लागू नये.

मकर कष्टाला तुम्ही कधीही कमी पडत नाही. एखादे महत्त्वाचे उद्दिष्ट तुमच्यापुढे असल्यामुळे रात्रीचा दिवस करण्याची तुमची तयारी असेल. कारखानदारांकडे आर्थिक वर्षांकरता नवीन योजना असतील. पण त्यांनी चालू कामाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नये. नोकरीमध्ये वरिष्ठ मतलबाकरता तुमच्या मनाप्रमाणे काम हाताळण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला देतील. नवीन नोकरीच्या कामात विलंब होण्याची शक्यता आहे. नवीन जागा किंवा वाहन खरेदीचे विचार मनात डोकावतील. विद्यार्थ्यांनी त्यांचा दृष्टिकोन सावध ठेवावा.

कुंभ एका मोठय़ा संक्रमणाला सामोरे जायची तयारी ठेवा. त्यातून बाहेर पडण्यासाठी वादळामध्ये ज्या प्रमाणे लव्हाळी वाकून राहतात, त्याप्रमाणे तुम्हाला राहायचे आहे. व्यापार-उद्योगामध्ये ज्या गिऱ्हाइकांची कामे तुम्ही स्वीकारली असतील त्या कामांना तुम्ही प्राधान्य द्याल. उधारीपेक्षा रोखीच्या व्यवहाराकडे लक्ष ठेवा. नवीन आर्थिक वर्षांचे बेत तूर्त लांबवा. नोकरीमध्ये वरिष्ठांची आज्ञा शिरसावंद्य माना. घरामध्ये प्रत्येकजण आपल्या कामाला महत्त्व देईल. प्रकृतीकडे लक्ष ठेवा.

मीन काही महत्त्वाच्या आणि मोठय़ा बदलांची नांदी करणारे हे ग्रहमान आहे. व्यापार-उद्योगात काम भरपूर असेल. परंतु प्रत्येक गोष्टीवर देखरेख ठेवणे आवश्यक आहे. त्यात ढिलाई झाली तर केलेल्या कामाचे महत्त्व संपेल. जे पैसे मिळतील त्याचा विनियोग ठरलेल्या कामाकरताच करा. नोकरीमध्ये कितीही काम केले तरी ते वरिष्ठांना अपुरेच वाटेल. नवीन नोकरीसंबंधीचे विचार मनात येतील. घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या तुम्हाला हाताळाव्या लागतील.