विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

मेष आठवडय़ाची सुरुवात थोडीशी कंटाळवाणी होईल, पण एकदा कामाला लागल्यावर तुम्ही उत्साही बनाल. व्यापार-उद्योगातील जमा-खर्चाची बाजू समसमान राहील. नोकरीमध्ये अर्धवट कामे पूर्ण कराल. घरगुती समारंभामुळे दैनंदिनीत चांगला बदल होईल. २०१८ च्या सुरुवातीला तुमची ग्रहस्थिती खूपच चांगली होती.  पुढल्या वर्षांत प्रवेश करताना गुरू अष्टमस्थानात आहे. मर्यादा लक्षात घेऊन सर्व कार्यक्रम ठरवा.

वृषभ जे प्रश्न सामोरे येतील त्याला तोंड देण्याची तुमची तयारी असेल. व्यापार-उद्योगात नुकतेच एखादे काम पार पाडले असेल तर त्यातून तुम्हाला पसे मिळतील. जादा काम करून जादा पसे मिळवता येतील. घरातील व्यक्तीचे वागणे-बोलणे समजून घ्या. २०१८ सालाच्या सुरुवातीला  ग्रहमान खडतर होते. आता शनी जरी प्रतिकूल असला तरी इतर ग्रहांची तुम्हाला साथ आहे. त्यामुळे ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ असा पवित्रा ठेवा.

मिथुन तुमची रास द्विस्वभावी आहे. तुमचे विचार सतत बदलत असतात. पण या आठवडय़ात एकलव्याप्रमाणे काम केले तर त्याचे चांगले फळ मिळेल. व्यापार-उद्योगात आठवडय़ाचा मध्य लाभदायक ठरेल. नोकरदार व्यक्तींचा कामाचा वेग आणि जबाबदाऱ्या वाढणार आहेत. घरामध्ये एखादा शुभ समारंभ ठरेल आणि पार पडेल. २०१८ च्या सुरुवातीला तुमचे ग्रहमान चांगले होते. एप्रिल-मेपर्यंत तुमची महत्त्वाकांक्षा वाढत गेली.

कर्क ग्रह तुम्हाला अनुकूल आहेत. त्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेल्या कामामुळे नवीन ऑर्डर मिळवण्याची शक्यता आहे. आíथक बाजू सुधारण्याची लक्षणे दिसतील. नोकरीच्या ठिकाणी बराच काळ रेंगाळलेली कामे वरिष्ठ पूर्ण करण्याची शक्यता आहे. घरामध्ये कुटुंबीयांसह एखादा कार्यक्रम साजरा होईल.   नवीन वर्षांच्या सुरुवातीला तुमचे नवीन रूप इतरांना बघायला मिळेल.

सिंह ज्यांच्यावर तुम्ही विसंबून आहात, त्या व्यक्ती आयत्या वेळी तुम्हाला मदत करू शकणार नाहीत. व्यापार-उद्योगात नवीन योजना आखताना आपली लक्ष्मणरेषा ओलांडू नका. नोकरीच्या ठिकाणी संस्थेकडून मिळणाऱ्या सुखसुविधांचा गरउपयोग केला तर जास्त त्रास होईल. घरामध्ये प्रिय व्यक्तीच्या स्वास्थ्याविषयी काळजी वाटेल. मंगळाच्या अशुभ भ्रमणामुळे तुम्हाला खूप अडचणींना तोंड द्यावे लागेल.

कन्या दोन वेगवेगळ्या आघाडय़ांवर वेगवेगळे अनुभव देणारा आठवडा आहे. करिअरमध्ये तुमच्या इच्छा-आकांक्षा बुलंद असतील, पण घरामध्ये मात्र जबाबदाऱ्यांना तुम्हाला सामोरे जावे लागेल. व्यापार-उद्योगात काम बरेच मिळेल, पण उधारीचे व्यवहार जास्त असतील. नोकरीच्या ठिकाणी घाईगडबडीत चूक होणार नाही याची दक्षता घ्या. घरातल्या जबाबदाऱ्या वाढल्यामुळे  नाइलाजाने करिअरमधले लक्ष कमी करावे लागेल.

तूळ कोणाचा मूड कसाही असो, पण या आठवडय़ात तुम्ही एकदम आनंदी आणि उत्साही दिसाल. व्यापार-उद्योगात तुम्ही केलेल्या कामाची गिऱ्हाईकांकडून स्तुती ऐकायला मिळेल. नोकरीच्या ठिकाणी संस्थेकडून मिळणाऱ्या सर्व सवलतींचा फायदा घ्याल. २०१८ सालच्या सुरुवातीला तुमचे ग्रहमान चांगले होते, पण मार्च-एप्रिलनंतर तुमच्यात जे बदल घडले त्यामुळे तुमचे जीवनमान ढवळेल. काही जणांना स्थलांतर करावेसे वाटेल.

वृश्चिक गेल्या आठवडय़ात जी कामे अर्धवट राहिलेली होती, ती पूर्ण करण्याकरता हा आठवडा चांगला आहे. व्यापार-उद्योगात एखाद्या नवीन पद्धतीने काम करावेसे वाटेल. घरामध्ये दीर्घकाळ सहवास असणाऱ्या व्यक्तींशी ताटातूट होईल. त्यामुळे थोडासा कंटाळा येईल. २०१८ सालाच्या सुरुवातीला तुमची ग्रहस्थिती साधारण होती. पण मे महिन्यानंतर सर्व आघाडय़ांवर प्रगतीचा वेग वाढला. नवीन वर्षांत प्रवेश करताना उत्साही दिसाल.

धनू तुमचे घर आणि करिअर या दोन्ही आघाडय़ांवर तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे मनात विचारांचे काहूर माजले असेल तशा वेळी शांत राहा. व्यापार-उद्योगात जे काम कराल ते तुम्हाला जमते आहे याची खात्री करा. नोकरीत केलेले काम तपासून पाहा, त्यात चूक करू नका. घरामध्ये सर्वाशी अदबीने बोला. नवीन वर्षांत २०१९ प्रवेश करताना तुमची सत्त्वपरीक्षा होणार आहे. घाबरून न जाता धीराने उभे राहा. स्वत:ची मर्यादा सांभाळा.

मकर ग्रहमान तुमचा उत्साह वाढविणारे आहे. व्यापार-उद्योगात नवीन कामासंबंधी विचार करण्यात तुम्ही दंग असाल, पण हातातल्या कामात चालढकल करू नका. नोकरदार व्यक्तींनी सहकाऱ्याचे बोलणे ऐकावे, पण स्वत:च्या कामावर त्याचा परिणाम होऊ देऊ नये. घरामध्ये मोठय़ा व्यक्तीच्या जीवनातील शुभप्रसंग साजरा होईल. त्यात काटकसर करता येणार नाही. २०१९ सालात प्रवेश करतानाही तुमचा मूड चांगला असेल.

कुंभ ग्रहांचा तुम्हाला संदेश आहे की हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नका. व्यापार-उद्योगात प्रगतीचे एखादे नवीन दालन खुले होईल. नोकरीमध्ये मी म्हणेन ती पूर्वदिशा अशी तुमची स्थिती असेल. घरामध्ये रुसवेफुगवे होतील, पण नंतर त्याला चांगली कलाटणी मिळेल. २०१८ सालच्या सुरुवातीपासून गुरू आणि शनी या दोन मोठय़ा ग्रहांनी तुमच्या महत्त्वाकांक्षी स्वभावाला खतपाणी घातले गेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीन ग्रहमान तुमचा उत्साह वाढविणारे आहे. व्यापार-उद्योगात सध्याची कामाची पद्धत बदलावी लागेल. त्यातून तुमचा फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी बदलीचे वारे वाहू लागेल. चालू असलेल्या कामात प्रगती होईल. घरामध्ये सगळ्यांना तुमच्या वागण्या-बोलण्यामुळे एक प्रकारचा आधार वाटेल. नवीन वर्षांत तुम्ही आनंदी व उत्साही दिसाल. ज्या क्षेत्रात असाल तिथे नाव कमवू शकाल.