सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष कुटुंबातील सदस्यांचे प्रश्न सोडवण्यास त्यांना मदत कराल. घटनेचा शांत डोक्याने, सर्वागाने विचार कराल. रागावर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवाल. शब्द जपून वापरा. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी सांभाळावीच लागेल. जोडीदारासह विचारविनिमय कराल. सहकारी वर्ग आपल्या मताप्रमाणे वागेलच असे नाही. जास्त मदतीची अपेक्षा न ठेवणे उत्तम! खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक! नवे निश्चय कराल.

वृषभ कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. वैचारिक चर्चा रंगतील. सणानिमित्त आप्तेष्टांच्या भेटीगाठी ठरवाल. हातून सामाजिक कार्य घडेल. मनाला समाधान मिळेल. डोक्यावरील अनेक जबाबदाऱ्यांपैकी एकेक जबाबदारी पूर्ण करत करत कामाचा बोजा हलका कराल. नवे संकल्प नेटाने राबवाल. नोकरी-व्यवसायात नव्या संकल्पना मांडाल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींवर मात कराल.

मिथुन भावनांना व्यवहाराची जोड देऊन काही निर्णय घ्यावे लागतील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आपल्या विशेष गुणांची छाप पाडाल. कामात सातत्य आणि निर्धार आवश्यक आहे. जोडीदाराची नाराजी प्रेमाने दूर कराल. अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागेल. जास्त वेळ खर्च करावा लागेल. तत्त्वज्ञानात मन रमेल. आपले मत परखड शब्दात न मांडता नरमाईने व्यक्त करावे लागेल. उष्णतेच्या विकारांपासून सावध राहा.

कर्क कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पैसा, वेळ आणि शक्ती खर्ची पडेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल, तसेच सहकारी वर्ग मदतीला धावून येतील. जोडीदाराला मानसिक ताणतणाव सहन करावा लागेल. अशा वेळी तो आपल्या सहकार्याची अपेक्षा करेल. अनेक गोष्टी एकाच वेळी सांभाळण्यासाठी मानसिक शक्ती वाढवाल. खंबीरपणे उभे राहाल. स्वत:च्या तब्येतीचीदेखील योग्य ती काळजी घ्याल.

सिंह दशमातील मंगळ कामकाजात अडचणी आणेल, पण त्यांवर मात करून कामे पूर्ण करण्यासाठीचे सर्व प्रयत्न कराल. नव्या जोमाने कामाला लागाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे म्हणणे आपल्याला मान्य नसले तरी ऐकून घ्यावे लागेल. सहकारी वर्ग मात्र आपल्या मताशी सहमत असेल. मित्रमंडळींकडून योग्य वेळी मदत मिळेल. लहान-मोठे प्रवासयोग संभवतात. कौटुंबिक वातावरण प्रयत्नपूर्वक शांत ठेवावे लागेल. योग्य काळजी घेतलीत तर आरोग्याची साथ मिळेल.

कन्या कौटुंबिक प्रश्नांवर विचारविनिमय करून, सर्वाचे हित लक्षात घेऊन शांतपणे उकल शोधाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा वचक-दरारा वाढेल. सहकारी वर्गाच्या साहाय्याने जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण कराल. लहानसहान गोष्टी जोडीदाराबरोबर शेअर करून मन हलके कराल. जोडीदार आपल्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेईल. वेळच्या वेळी तपासण्या करून आरोग्याची काळजी घ्याल.

तूळ कामातून येणारा ताणतणाव दूर करण्यासाठी स्वत:च्या आवडीनिवडींना प्राधान्य देऊन आपले छंद जोपासाल.  कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. कुटुंब सदस्यांकडून आनंद वार्ता समजतील. जोडीदार मनमोकळेपणे न बोलल्याने त्याच्याबद्दल गैरसमज होण्याच्या शक्यता आहेत. मनात अढी न ठेवता आपण विषयास वाचा फोडून गैरसमज दूर करावेत. प्रत्येक वेळी ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ हे उपयोगी पडत नाही. आरोग्य चांगले राहील.

वृश्चिक कुटुंबासाठी अतिरिक्त खर्च करावा लागेल. सणावाराच्या निमित्ताने नव्या वस्तूंची खरेदी कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारी वर्गाला लागणारी हरप्रकारची मदत आपण उत्स्फूर्तपणे कराल. जोडीदार त्याच्या क्षेत्रात चांगले कर्तृत्व गाजवेल. आपल्याला त्याचा अभिमान वाटेल. आप्तेष्ट, मित्र-मैत्रिणी यांच्या भेटीगाठी होतील. पित्तविकार आणि वातविकारांवर औषधपाणी घ्यावे.

धनू अनेक प्रकारची कामे, अनेक जबाबदाऱ्या यांमुळे डोक्यात वैचारिक गोंधळ होईल. एकेक कामे पूर्ण करत गेलात तर हा गोंधळ कमी होण्यास मदत होईल. सहकारी वर्ग आपल्या साहाय्याला धावून येईल. वरिष्ठांकडून कोणत्याही प्रकारच्या मदतीची अपेक्षा न ठेवणे हेच बरे! जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कौटुंबिक वातावरणातील तणाव हलका करणे आपली जबाबदारी आहे. विचारविनिमय करून यश मिळवाल.

मकर नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवास कराल. कामाव्यतिरिक्त आवडत्या गोष्टींमध्ये, छंदांमध्ये मन रमवाल. मित्र परिवाराचा सहवास लाभेल. जोडीदाराला समजून घ्यावे लागेल. कौटुंबिक वातावरण गढूळ होऊ न देता सामोपचाराने, विचारपूर्वक कृती कराल. वरिष्ठांची मर्जी राखाल. तसेच सहकारी वर्गाची मदत मिळेल. नव्या संकल्पना वरिष्ठांपुढे मांडाल. आपल्या बोलण्याचा प्रभाव पडेल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी उद्भवतील.

कुंभ विनाकारण कामे रेंगाळतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा मान ठेवून आपल्या मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागतील. सहकारी वर्ग आपल्या मदतीला धावून आला नाही तरी तो त्यांचा नाइलाज असेल. थोडे धीराने घ्यावे लागेल. जोडीदार आपली कुचंबणा समजून घेईल. आपल्या पाठीशी उभा राहून धीराचे चार शब्द सांगेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. अति विचार करून डोकं शिणवून घेऊ नका.

मीन नोकरी-व्यवसायात मान-अपमान बाजूला ठेवून वरिष्ठांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल. वेळप्रसंगी हाताखालच्या लोकांकडूनही दोन गोष्टी ऐकून घ्यायची तयारी ठेवा. कौटुंबिक वातावरण उत्साही ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. जोडीदार आपल्या कार्यक्षेत्रात अधिक व्यस्त असल्याने आपल्याला वेळ देऊ शकणार नाही. पाठीच्या मणक्याचे आरोग्य सांभाळावे. नियमित व्यायाम करावा.