सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष रवी आणि हर्षल या प्रचंड ऊर्जादायक ग्रहांचा नवपंचम योग नवनिर्मितीला पोषक ठरेल. नव्या संकल्पना अमलात आणाल. त्यात सातत्य राखणे मात्र आपल्या हाती आहे. नोकरी-व्यवसायात मेहनतीने पुढे जाल. कष्टाचे चीज होईल. सहकारी वर्गासह आपुलकीचे नाते निर्माण होईल. वरिष्ठांच्या आदेशांचे काटेकोर पालन कराल. जोडीदाराची उन्नती बघून समाधान वाटेल. मुलांना योग्य मार्गदर्शन कराल. श्वसन आणि छातीचे आजार याबाबत वेळेवरच काळजी घेणे उचित ठरेल.

वृषभ चंद्र-नेपच्यूनचा केंद्र योग आपल्याला भावनिक पेचात पाडेल. योग्य निर्णय घेण्यासाठी सदसद्विवेक जागरूक ठेवावा लागेल. नोकरी-व्यवसायात कामाचे नियोजन करताना वेळेचे गणित संभाळाल. थोरामोठय़ांच्या भेटीगाठी उपयुक्त ठरतील. सहकारी वर्गाचे मत विचारात घ्याल. जोडीदाराची साथ मिळेल. मुलांच्या शिक्षणात तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभेल. थंड वातावरणातही शारीरिक उष्णता त्रासदायक ठरेल. पुरळ, फोड येणे असा त्रास होईल.

मिथुन चंद्र-नेपच्यूनचा नवपंचम योग हा अंत:स्फूर्ती देणारा योग आहे. कला, क्रीडा, नवनिर्मिती यासाठी साहाय्यकारी ठरेल. यशकारक बातमी मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा विश्वास खरा ठरवाल. सहकारी वर्ग कामात दिरंगाई करेल. विशेष लक्ष पुरवावे. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात नावलौकिक मिळवेल. कौटुंबिक वातावरण उत्साही असेल. मुलांना स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याचे स्वातंत्र्य द्याल. पाण्याचे फोड, त्वचेवर अ‍ॅलर्जी अशा प्रकारचे दुखणे सहन करावे लागेल.

कर्क चंद्र-मंगळाचा लाभ योग हा उत्साहवर्धक योग आहे. चांगल्या कामाची सुरुवात करणे आणि त्यात सातत्य राखणे ही महत्त्वाची बाब ठरेल. नोकरी-व्यवसायात मनाविरुद्ध घटनांचा स्वीकार करून कामावर लक्ष केंद्रित कराल. वरिष्ठ अधिकारी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडतील. सहकारी वर्गाला आपल्या मदतीची गरज भासेल. जोडीदाराची कामे लांबणीवर पडतील. सातत्य सोडू नका. त्वचा कोरडी होणे, पाय फुटणे, त्यातून रक्त येणे असे त्रास उद्भवल्यास काळजी घ्यावी.

सिंह गुरू-चंद्राचा युती योग हा मार्गदर्शक योग आहे. नव्या ओळखी होतील. नोकरी- व्यवसायात अधिकार गाजवाल. गुरूच्या पाठबळामुळे रखडलेल्या कामांना गती मिळेल. सरकारी कामे मार्गी लागतील. वरिष्ठ आपल्या कार्यपद्धतीला मान्यता देतील. सहकारी वर्गाकडून अपेक्षा पूर्ण होतील. जोडीदार त्याच्या कामकाजात व्यस्त असेल. एकमेकांना आधार द्याल. कौटुंबिक जबाबदारी नेटाने पार पाडाल. मुलांना यश मिळेल. युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

कन्या चंद्र-शुक्राचा युती योग हा कल्पना, संकल्पना साकार करण्यास पूरक योग आहे. कला क्षेत्रात चांगले काम कराल. नोकरी-व्यवसायात उत्तम नियोजन उपयोगी ठरेल. वरिष्ठांकडून वाहवा मिळवाल. काही कामे मात्र विनाकारण रखडतील. धीर सोडू नका. जोडीदाराचा पािठबा असल्याने प्रगतिकारक पावले उचलाल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. मुलांना मेहनत आणि सातत्याचे महत्त्व पटवून द्याल. रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवावे लागेल. लक्ष ठेवावे.

तूळ चंद्र-शुक्राचा लाभ योग हा ममता, माया आणि स्नेहभावाला पूरक योग आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरी-व्यवसायात नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराल. वरिष्ठांच्या मागण्या पूर्ण करताना वैचारिक दमणूक होईल. परिश्रमाचे फळ मिळेल. मित्रमंडळाच्या साथीने आव्हान पेलाल. जोडीदाराची आर्थिक समस्या सुटेल. कुटुंब सदस्य कामानिमित्त प्रवास करतील. मुलांचे आकलन सुधारेल. डोळय़ांची विशेष काळजी घ्यावी. ताप व सर्दीचा त्रास औषधोपचार घेऊन आटोक्यात येईल.

वृश्चिक चंद्र-बुधाचा लाभ योग बौद्धिक प्रगती आणि आकलनशक्तीला पूरक आणि पोषक ठरेल. नवे विषय अभ्यासाल. नोकरी-व्यवसायात आर्थिक लाभ होतील. कामाचे स्वरूप बदलेल. वरिष्ठांच्या सूचनांकडे नीट लक्ष द्यावे. सहकारी वर्गासह वैचारिक मदभेद होतील. जोडीदाराच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. शब्दाने शब्द वाढवू नका. नवे संकल्प टिकवाल. श्वासाचे त्रास आणि सांधेदुखी अशा विकारांवर त्वरित इलाज करावा. वैद्यकीय सल्ला उपयोगी पडेल.

धनू चंद्र-गुरूचा लाभ योग अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणारा योग आहे. धीर सोडू नका. प्रयत्नात सातत्य राहू दे. नोकरी-व्यवसायात नव्या योजनांची आखणी कराल. सहकारी वर्गाचे साहाय्य मिळेल. वरिष्ठांकडून मान्यता मिळवताना अधिक ऊर्जा खर्ची पडेल. जोडीदार आपल्या कार्यातून कुटुंबाला हातभार लावेल. मुलांच्या स्वतंत्र वृत्तीचा अधेमधे आढावा घ्यावा. स्वातंत्र्य आणि स्वैराचारातील फरक त्यांना समजावून द्यावा. डोकेदुखी बळावल्यास उपचार घ्यावेत.

मकर शुक्र-नेपच्यूनचा लाभ योग आपल्या कलागुणांना वाव देईल. सादरीकरण चांगले कराल. नोकरी-व्यवसायात महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा होतील. कामाला गती येईल. कोर्ट कचेरीतील कामे मात्र लांबणीवर पडतील. जोडीदाराचा नव्या कार्यक्षेत्रात जम बसेल. कौटुंबिक वातावरणातील किल्मिषे दूर होतील. मुलांसाठी आर्थिक नियोजन करून ठेवाल. सामाजिक कार्यात हिरिरीने सहभागी व्हाल. सर्दी-पडसे आणि उष्णतेचे विकार बळावण्याची शक्यता आहे. घरगुती उपाय कामी येतील.

कुंभ गुरू-चंद्राचा केंद्र योग हा नव्या आशा निर्माण करणारा योग आहे. आपले ध्येय निश्चित कराल आणि त्याच्या दिशेने वाटचाल कराल. नोकरी-व्यवसायातील मेहनतीचे फळ मिळेल. वरिष्ठ वर्ग आपल्यावर हुकूम गाजवण्याचा प्रयत्न करेल. आपण आपल्या चोख कामातून त्यांना ठामपणे उत्तर द्याल. जोडीदारासह प्रवास योग आहेत. मुलांच्या बाबतीतील गैरसमज दूर होतील. मनमोकळय़ा गप्पा आवश्यक आहेत. इतरांच्या वागण्याचा त्रास करून घेतल्यास डोकं जड होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीन चंद्र-नेपच्यूनचा लाभ योग हा भावनिक तरंग उमटवणारा योग आहे. मानसिक स्थिती खंबीर असेल तर परिस्थितीशी सामना करणे सोपे जाईल. नोकरी-व्यवसायात रवीच्या साथीने विशेष ठसा उमटवाल. वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. प्रयत्नांना लगेच फळ मिळाले नाही तरी धीर सोडू नका. जोडीदाराच्या कामकाजाची व्याप्ती वाढेल. कौटुंबिक आधार मिळेल. मुलांना समाजोपयोगी छंद जोपासण्यास उद्युक्त कराल. शारीरिक उष्णता त्रास देईल.