विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com
मेष एखादी नवीन कार्यपद्धती तुमचे लक्ष आकर्षित करेल. परंतु जुने ते सोने हे लक्षात ठेवा. व्यापारउद्योगात कामाचा वेग वाढविण्याकरिता नवीन तंत्राचा वापर करा. जुन्या ओळखींचा तुम्हाला उपयोग होईल. नोकरीच्या ठिकाणी कामाच्या वेळी काम आणि इतर वेळेस मजा असा तुमचा पवित्रा राहील. नव्या नोकरीच्या प्रयत्नात विलंब राहील. घरामध्ये वातावरणामध्ये चतन्य आणण्यासाठी छोटेखानी समारंभ ठरेल. आठवडय़ाच्या मध्यात धनलाभ होईल.
वृषभ प्रगती म्हटली की बदल आले. हे बदल करताना जो त्रास होतो तो सहन करावा लागेल. व्यापारउद्योगात अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यात बराच वेळ जाईल. सप्ताहाच्या मध्यात धनलाभ होईल. नोकरीच्या ठिकाणी वेगळ्या कामाच्या निमित्ताने संस्थेकडून तुमची निवड केली जाईल. घरामध्ये प्रत्येकाची अपेक्षा असेल की तुम्ही त्यांना मदत करावी. पण तुम्ही त्याला अपुरे पडाल. प्रॉपर्टी खरेदी करताना त्यासंबंधी पूर्ण माहिती मिळवा.
मिथुन ज्या वेळेस एखाद्या कामात तोचतोपणा येतो त्यावेळी तुम्हाला कंटाळा येतो. काहीतरी वेगळे मिळाले की तुम्ही खूश असता. या आठवडय़ात तुमची ही इच्छा पूर्ण होईल. धनप्राप्ती समाधानकारक राहील. नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाचे आणि वेगळे काम तुमच्यावर सोपवले जाईल. या कामामुळे तुमच्या बुद्धीला खाद्य मिळेल. घरामध्ये सगळ्यांचे हट्ट पुरविण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. पण ते न जमल्यामुळे चिडचिड होईल.
कर्क कामाच्या वेळेला काम आणि इतर वेळेला आराम असा या आठवडय़ात तुमचा पवित्रा असेल. त्यामुळे बरेच काम करूनही तुम्ही ताजेतवाने दिसाल. व्यापारउद्योगात नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे करावे ही कल्पना तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. पशाची आवक सुधारल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. नोकरीच्या ठिकाणी चालू असलेले काम वरिष्ठ अचानक बंद करून दुसरे काम देतील. घरामध्ये कामाच्या वेळेला सर्वाना तुमची आठवण येईल.
सिंह त्याच त्याच कामाचा प्रत्येकाला कंटाळा येतो त्याला तुम्ही अपवाद नाही. या आठवडय़ामध्ये तुमच्या कामात काहीतरी वेगळे असल्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. व्यवसायउद्योगात एखादा नवीन प्रयोग करून बघावासा वाटेल. पण त्यासाठी हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. नोकरीच्या ठिकाणी कामाचा तणाव भरपूर असेल. घरामध्ये शुभसमारंभ ठरेल. त्यानिमित्ताने वेगळ्या वातावरणाचा तुम्ही आनंद घ्याल.
कन्या स्वभावत: तुम्ही भित्रे आहात. पण या आठवडय़ामध्ये प्रगतीकरिता कामाच्या पद्धतीमध्ये काही बदल करायला तुम्ही तयार व्हाल. त्याचा तुम्हाला फायदा मिळेल. व्यापारउद्योगात जरी काही पसे विनाकारण खर्च झाले तरी त्यातून भविष्यामध्ये फायदा होईल. नोकरीत काहीजणांना बढतीचे योग संभवतात. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींचा सल्ला न पटल्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने काम कराल.
तूळ मनामध्ये आलेली इच्छा पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला चन पडणार नाही. वातावरणाची उत्तम साथ असल्यामुळे तुम्ही थोडेसे बेडर बनाल. व्यापारउद्योगात सर्व व्यवस्थित चालू असताना काही नवीन बदल करावेसे वाटतील. त्यामुळे चालू धंद्यामध्ये नुकसान होणार नाही, याची खबरदारी घ्या. नोकरदार व्यक्तींना एखाद्या नवीन नोकरीची ऑफर येईल. पण त्यांनी शक्यतो आहे ती नोकरी चालू ठेवावी.
वृश्चिक ग्रहमान थोडेसे कोडय़ात टाकणारे आहे. जे काम सरळ मार्गाने होत नाही ते वाकडय़ा वाटेने जाऊन पूर्ण करण्याची तयारी असते, या नीतीचा वापर करावा लागेल. व्यापारउद्योगात स्पर्धकांच्या हालचालींवर नजर ठेवा. नोकरीच्या ठिकाणी सत्तेपुढे शहाणपण नसते याची आठवण ठेवून वरिष्ठांच्या हो ला हो म्हणा. पूर्ण झालेले काम तपासून पाहा. घरामध्ये सगळ्यांची मूठ बांधणे थोडेसे कठीण होईल.
धनू तुमची रास द्विस्वभावी रास आहे. त्यामुळे या आठवडय़ात काहीतरी नवीन करावे असे तुम्हाला वाटेल. पण त्या नादात हातातले काम सोडू नका. नाहीतर ‘तेलही गेले तूपही गेले हाती लागले धुपाटणे’ अशी अवस्था होईल. व्यापारउद्योगात आठवडा थोडासा कंटाळवाणा आहे. नोकरीच्या ठिकाणी जे काम कराल ते मन लावून कराल. पूर्वी केलेले एखादे काम उपयोगी पडेल. घरामध्ये सगळ्यांची तंत्रे सांभाळावी लागतील.
मकर आठवडय़ाची सुरुवात थोडीशी कंटाळवाणी होईल. पण महत्त्वाची कामे आळस न करता सप्ताहाच्या मध्यापर्यंत पूर्ण करा. नंतर त्यामध्ये विलंब होईल. व्यापारउद्योगात प्रतिष्ठा टिकवण्यासाठी खर्च करणे अपरिहार्य होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाच्या पद्धतीत अचानक बदल करतील. पण सहकारी तुम्हाला सांभाळून घेतील आणि मदत करतील. घरामधल्या व्यक्तींशी एखाद्या तात्त्विक मुद्दय़ावरून उलट सुलट चर्चा होईल.
कुंभ तुमची नेहमीची कामाची पद्धत थोडीशी बदलली तर तुम्हाला त्याचे फायदे मिळतील. सभोवतालच्या व्यक्तींशी तडजोड करण्याची तयारी ठेवा. व्यापारउद्योगात काम थोडेसे कमी असल्याने पूर्वी लांबवलेल्या गोष्टींकडे लक्ष द्याल. आवश्यक असलेले निर्णय घेऊन फायद्याचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न कराल. नोकरीच्या ठिकाणी बरीचशी कामे आटोक्यात आणाल. घरामध्ये नवीन व्यक्तीच्या सहवासामुळे सगळ्यांचा आनंद वाढेल.
मीन काही कामे अशी असतात की ज्याचा आपल्याला ताबडतोब फायदा मिळत नाही. पण कालांतराने त्यातून आपल्याला काहीतरी मिळणार असते. असे काम तुम्हाला या आठवडय़ात करावे लागेल. व्यापारउद्योगात बाजारपेठेत आपली प्रतिष्ठा वाढावी यासाठी प्रयत्न करा. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या कामात तात्पुरता बदल करावासा वाटेल. घरामध्ये रुसवेफुगवे होतील.