बालदोस्तांसाठी कविता लेखन करणे हे म्हटले तर सोपे म्हटले तर अवघड काम कवी दिलीप साळगांवकर यांनी चिमण चारा या कवितासंग्रहातून केले आहे. या पुस्तकातील त्यांच्या कविता तब्बल ५० वर्षांपूर्वीच्या आहेत. परंतु, वयवर्षे तीन ते दहा या वयोगटातील आजच्या बच्चेकंपनीलाही ऐकायला, म्हणायला, वाचायला आवडतील अशा आहेत. ‘एबीसीडी’ आणि ‘चिन्या चिन्या’ या भारत-चीन युद्धाच्या पाश्र्वभूमीवरच्या कविता मात्र आजच्या काळात संदर्भहीन असून बच्चेकंपनीला ही कविता वाचताना युद्ध का झाले हे सांगावे लागेल. त्या बालहट्ट पुरविण्यातली मजा घरातले सगळेजण आनंदाने घेतात हे सांगणारी ‘मागण्या’ ही कविता आजच्या बच्चेकंपनीचे प्रतिनिधित्व नक्कीच करते. ‘धडे’ या कवितेतून बच्चेकंपनीला चांगल्या गोष्टींचा वस्तुपाठ सांगताना मास्तर किंवा टीचर मात्र त्याउलट वागतात असे कथन केले आहे. मोठी माणसे लहान मुलांना नेहमीच चांगले वागावे, चांगले बोलावे वगैरे सांगतात, परंतु स्वत: मात्र नंतर ते सोयीस्कररित्या विसरून जातात यावर धडे या कवितेतून नेमके बोट कवीने ठेवले आहे. ही कवितासुद्धा आजच्या बच्चेकंपनीला थेट आवडणारी आहे. आजच्या चिमुरडय़ांची निरीक्षणशक्ती, आकलनशक्ती जबरदस्त असली तरी ‘चिमण चारा’ या कवितासंग्रहातील बऱ्याच कविता आजच्या बच्चेकंपनीला आवडतील अशा तऱ्हेच्या आहेत. गुळगुळीत कागद आणि त्यावरील कृष्णधवल परंतु, सुबक चित्रांची साथ पुंडलिक वझे यांनी कवितांना दिली असून मुखपृष्ठावरील चित्रामुळे पुस्तक अतिशय आकर्षक झाले आहे. मुलांची मानसिकता ओळखून कवीने साध्या सोप्या शब्दांत केला असून यमके जुळविल्यामुळे काही अंशी काही कविता बडबडगीतांसारख्या गुणगुणता येतात. त्यामुळेच बच्चेकंपनीला हा बालमेवा आवडू शकेल.
चिमण चारा
कवी दिलीप साळगांवकर
प्रकाशक : नीता नीतीन हिरवे, संवेदना प्रकाशन,
चिंचवडगाव, पुणे – ३३
पृष्ठसंख्या : ३२
मूल्य : रु. ६०/-
संग्रहित लेख, दिनांक 1st May 2015 रोजी प्रकाशित
टाईमपास बालमेवा
बालदोस्तांसाठी कविता लेखन करणे हे म्हटले तर सोपे म्हटले तर अवघड काम कवी दिलीप साळगांवकर यांनी चिमण चारा या कवितासंग्रहातून केले आहे. या पुस्तकातील त्यांच्या कविता तब्बल ५० वर्षांपूर्वीच्या आहेत.
First published on: 01-05-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book chiman chara