मानवी जीवनाचा इतिहास किती नृशंस आणि संहारक घटनांनी भरलेला आहे, याची प्रचीती हे पुस्तक वाचल्यावर येत़े बुद्धांपासून ते ख्रिस्त- गांधींपर्यंत अनेक महात्म्यांनी जगाला शांतीचे संदेश दिले, मानवाला युद्धापासून दूर नेण्याचे प्रयत्न केल़े परंतु, संघर्ष आणि स्पर्धा या सजीवांच्या अंगभूत गुणांमुळे युद्ध आणि शस्त्रांचे महत्त्व प्रत्येक काळात अनन्यसाधारणच राहिल़े प्रत्येक काळात मानवाने तत्कालीन उपलब्ध साधनांचा युद्धांसाठी उपयोग करून घेतला आहे आणि या आधुनिक काळातील विज्ञानाच्या प्रगतीचाही युद्धशास्त्रात आणि युद्धसाधनांच्या निर्मितीत प्रचंड उपयोग करून घेण्यात येत आह़े त्याविषयीचा सविस्तर लेखाजोखा लेखकाने पुस्तकात मांडला आह़े
‘युद्ध आणि माणूस’ हे प्रस्तावनेचे प्रकरण आटोपल्यानंतर लेखकाने थेट अणुबॉम्बलाच हात घातला आह़े ‘अणुबॉम्ब पडला तर?’ असेच या प्रकरणाचे नाव आहे आणि हे प्रकरण लेखकाने थेट भारताशी जोडले आह़े त्यामुळे ते वाचकाला थेट भिडत़े अणुबॉम्बची संहारक क्षमता, त्याच्या वापरामुळे उद्ध्वस्त झालेली दोन जपानी शहरे यांची माहिती प्रत्येकाला असत़े परंतु, त्या काळापेक्षाही कितीतरी संहारक अणुबॉम्ब आता बनवण्यात आले आहेत़ दुर्दैवाने भारताविरुद्ध त्यांना वापर झालाच, तर नेमके कोणत्या भीषण परिणामांना सर्वसामान्यांना सामोरे जावे लागेल, याबद्दल सभय उत्सुकता प्रत्येकाच्याच मनात असत़े त्याबद्दल सहज समजेल अशा भाषेत लेखकाने माहिती दिली आहे आणि पुढच्याच प्रकरणात अणुबॉम्ब संदर्भात शास्त्रोक्त माहितीही देण्यात आली आह़े
पुस्तकात अणुबॉम्बसोबतच जैविक अस्त्र, रासायनिक अस्त्रे यांचाही आढावा घेण्यात आला आह़े भारताकडील, अमेरिकेकडील क्षेपणास्त्रे, दहशतवाद्यांकडील शस्त्रास्त्रे यांचाही धावता लेखाजोखा येथे मांडण्यात आला आह़े हवाई आणि पाण्याखालील युद्धांसंदर्भातील काही गोष्टी लेखकाने सांगितल्या आहेत़ पण त्या काहीशा त्रोटक आहेत़ घरोघरी पोहोचलेली लष्करी संशोधने हे यातील एक नावीन्यपूर्ण प्रकरण आह़े लष्करी वापरासाठी झालेली संशोधने समाजाला कशी उपयुक्त ठरली, हे सांगण्याचा या प्रकरणात लेखकाचा प्रयत्न आह़े परंतु एक ‘रिटॉर्ट पाऊच’ अर्थात अन्नपदार्थ सुस्थितीत ठेवणारी पिशवी वगळता फारशी काही उदाहरणे लेखकाने या प्रकरणात दिलेली नाहीत़
‘आधुनिक युद्धकौशल्य’ असे या पुस्तकाचे नाव असल्यामुळे नव्या काळातील युद्ध लढण्याच्या तंत्रांबाबतचे पुस्तक असावे असा प्राथमिक समज होतो़ परंतु, पुस्तकाचा भर युद्धकौशल्यापेक्षा युद्धसाधनांवरच अधिक आह़े आधुनिक काळातील युद्धसाधनांचा ऊहापोह लेखकाने केलेला आह़े यातील प्रकरण एकेका लेखा इतक्याच उंचीचे आह़े त्यामुळे त्या-त्या विषयाची तोंडओळख, माफक पण सोदाहरण समीक्षा आणि त्या आधारे काढलेला किंवा वाचकांवर सोडलेला निष्कर्ष, असाच या आटोपशीर पुस्तकाचा प्रवास चालतो़ या प्रवासात वाचकाला सोबती करून घेण्यात लेखक खूपच यशस्वी झाला आह़े त्यामुळे प्रवास फारच रोचक झाला आह़े
पुस्तकाचे संपादन अधिक चांगले होणे अपेक्षित होत़े यात मुद्रणाच्या काही चुका राहिल्या आहेतच़ पण त्याबरोबरच अनेक संदर्भ आणि उदाहरणांची अनावश्यक, शब्दश: पुनरावृत्ती झाली आह़े वानगीदाखल जपानवरील अणुहल्ल्यात ठार झालेल्यांच्या संख्येचे आणि दयनीयतेचे उदाहरण घेता येईल़ या लहानसहान त्रुटी वगळता सर्वसामान्यांना आधुनिक संहारक शस्त्रास्त्रांची आणि भीषणतेकडे सुरू असलेल्या समाजाच्या वाटचालीची तोंडओळख करून देण्याचा लेखकाचा प्रयत्न बहुतांशी यशस्वी झाला आहे, असे म्हणता येईल़
‘आधुनिक युद्धकौशल्य’ , साकेत प्रकाशन , लेखक- निरंजन घाटे , पृष्ठे- १६० , मूल्य- १६०