News Flash

चर्चा : अनेक मृत्यूंची नोंदच नाही…

इंडियन एक्स्प्रेसचे अमिताभ सिन्हा यांनी एक्स्प्रेस एक्स्प्लेन्ड या उपक्रमाअंतर्गत डॉ. जमील यांच्याशी बातचीत केली होती. त्या चर्चेचा संपादित अंश...

आपण सगळ्यांनी सर्वप्रथम गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे लस घेतली म्हणजे संसर्ग होणार नाही असा दावा कोणत्याही लसनिर्मात्यांनी केलेला नाही.

डॉ. शाहीद जमील – response.lokprabha@expressindia.com

प्रसिद्ध विषाणूतज्ज्ञ डॉ. शाहीद जमील यांनी जनुकीय क्रमनिर्धारणासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘इन्साकॉग’ या संस्थेच्या प्रमुखपदाचा नुकताच राजीनामा दिला. त्याआधीच काही दिवस इंडियन एक्स्प्रेसचे अमिताभ सिन्हा यांनी एक्स्प्रेस एक्स्प्लेन्ड या उपक्रमाअंतर्गत डॉ. जमील यांच्याशी बातचीत केली होती. त्या चर्चेचा संपादित अंश –

एप्रिल-मे महिन्यात कोविड-१९चे रुग्ण का वाढले?

एप्रिल आणि मे हे दोन महिने किती भयानक होते हे कोविड रुग्णांचे वाढते आकडेच सांगताहेत. आता हा आलेख स्थिर झाला असला तरी तो खूप वरच्या पातळीवर जाऊन स्थिर झाला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आता तो खाली येण्याची चिन्हं दिसत असली तरी त्याबद्दल आत्ताच काही बोलणं हे खूप घाईगडबडीचं ठरेल. तो खरोखरच खाली येतो आहे का, हे बघण्यासाठी आपण थोडं थांबून वाट बघणं आवश्यक आहे. पण निदान आता तो तितका वर जात नाही आहे. एप्रिल महिन्यामधले आकडे पाचपट जास्त होते. ८० हजारापासून सुरुवात करून आपण चार लाखांपर्यंत पोहोचलो होतो. आता त्याचा उतार पाहिला तर त्याचा चढ ६० अंश होता असं लक्षात येतं. त्याच्या वाढीचा हा दर खूपच जास्त आहे. आता तरी आपण त्याची स्थिरपातळी (प्लॅटू) गाठली आहे ही एका अर्थाने चांगली गोष्ट आहे. पण ही स्थिरपातळी खूपच वरची आहे आणि त्यामुळेच आता हा आलेख आणखी वर जाऊ नये तर खाली यावा यासाठी आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल, सतर्क राहावं लागेल.

स्थिरपातळी (प्लॅटू) खूप वर गेली होती म्हणजे नेमकं काय?

पहिल्या लाटेच्या वेळी कोविड-१९च्या विषाणूचे जेवढे उत्परिवर्तक (व्हेरिअंट्स, म्युटंट्स) आढळले, त्यापेक्षा दुसऱ्या लाटेच्या वेळी किती तरी अधिक उत्परिवर्तक आढळत आहेत. आताच्या विषाणूची उपद्रव क्षमता बघितली तर पहिल्या लाटेच्या वेळचा विषाणू खूपच बरा होता असं म्हणावं लागेल. आता हा विषाणू बदलला आहे आणि त्यानेच रुग्णवाढीचा आलेख वर नेला आहे. पण सध्याची परिस्थिती एकटय़ा विषाणूमुळे उद्भवली आहे, असं मी अजिबात म्हणणार नाही. कोविड-१९च्या विषाणूला असं वागायला आपणच प्रवृत्त केलं आहे. संसर्ग करण्यास योग्य म्हणजे दुबळं शरीर सापडलं की विषाणू संसर्ग करणार. आपण त्याला फक्त पसरण्याची नाही, तर वेगाने पसरण्याचीदेखील संधी दिली. आणि त्यामुळे करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ आणि तीही वेगाने झाली. कोविड-१९चा विषाणू अजूनही पसरतो आहे, अजूनही संसर्ग करतो आहे, अजूनही इथे शारीरिकदृष्टय़ा दुबळे लोक आहेत. त्याच्या स्थिरीकरणाची पातळी जास्त का लांबली याची ही एक शक्यता आहे, असं म्हणता येईल. त्यातून हेदेखील लक्षात घ्यायला हवं की हा आलेख सहजपणे खाली येणार नाही. त्याचं स्थिरीकरण अगदी जुलै- ऑगस्टपर्यंत लांबेल अशी शक्यता आहे. आपण त्याच्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे.

मृतांची संख्या मोजण्याबाबत कोणत्या चुका होत आहेत?

हे स्पष्ट करण्यासाठी आपण आधी भारतातला नैसर्गिक मृत्युदर लक्षात घेऊ या. रोज किती लोकांचा नैसर्गिक मृत्यू होतो? जागतिक बँक तसंच इतर आस्थापनांना भारत सरकारने दिलेल्या २०१९ मधल्या आकडेवारीनुसार त्या वर्षी आपला मृत्युदर दरवर्षी एक हजार माणसांमागे ७.३ इतका होता. ही आकडेवारी प्रमाण धरून आपण रोजची नैसर्गिक मृतांची संख्या काढली तर ती येते २७ हजार ६००. आता करोनामुळे रोज चार हजार मृत्यू होत आहेत. नैसर्गिक मृत्यूंच्या तुलनेत ही संख्या फक्त १५ टक्के जास्त आहे. या एवढय़ाशा फरकामुळे दहनभूमी तसंच दफनभूमीवर फारसा ताण येण्याची शक्यता नाही. पण आपण प्रत्यक्षात पाहतो आहोत ते चित्र पूर्ण वेगळं आहे. आपल्या प्रियजनांना फक्त रुग्णालयात दाखल करण्यासाठीच नाही तर त्यांचं दहन तसंच दफन करण्यासाठीदेखील लोकांना रांगा लावाव्या लागत आहेत. त्या संबंधित व्यवस्थांवर कामाचा ताण येतो तेव्हाच हे घडू शकतं. अर्थात ही अंदाजित आकडेवारी आहे. दहन वा दफनभूमीच्या ठिकाणी त्यासाठी आणल्या जाणाऱ्या मृतदेहांची संख्या दुप्पट झाल्याशिवाय असा गोंधळ होणार नाही असं मला वाटतं. अशा सगळ्या परिस्थितीत तर्कदृष्टय़ा विचार केला तर पाच ते दहा पट मृत्यूंची नोंदच होत नसेल अशी शक्यता आहे. ती अजिबात नाकारता येत नाही. कारण एरवी नॉर्मल परिस्थितीतसुद्धा आपल्याकडे मृत्यूची नीट नोंद होत नाही. आपली मृत्यू नोंदणी व्यवस्थादेखील पुरेशी सक्षम नाही. आरोग्य व्यवस्थेवर ताण आलेला असल्यामुळे लोकांना कोविड-१९ची चाचणीदेखील करून मिळणं अवघड झालं आहे. अनेक मृत्यू असेही असतील की ज्यांची कोविड-१९ची चाचणीच झाली नसेल, त्यामुळे त्यांच्या मृत्यूची नोंद कोविडसंदर्भात होणार नाही. एखादी कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती हृदयविकाराचा झटका येऊन त्यामुळे गेली तर त्याचीही नोंद कोविड मृत्यूमध्ये न होता, हृदयविकाराने मृत्यू अशीच होईल. हा प्रकार देशभर सगळीकडेच सुरू आहे. कोविडग्रस्त मृत्यूंची संख्या यामुळेच कमी दिसते आहे, असं माझं मत आहे.

ही सगळी परिस्थिती कशी बदलेल?

आपला देश क्रिकेटवेडय़ा लोकांचा आहे. प्रत्येक उभरत्या क्रिकेटपटूला सांगितलेलं असतं की चेंडूवरून तुझी नजर हटवू नकोस. त्याच भाषेत सांगायचं तर आपण आपली नजर चेंडूवरून हटवली. सप्टेंबरमध्ये आलेल्या रुग्णवाढीच्या शिखरापासून ते फेब्रुवारीपर्यंतच्या पाच महिन्यात रुग्णसंख्या कमी होत होती. अगदी दसरा दिवाळीच्या आणि बिहार निवडणुकीच्या काळात संसर्गाचं प्रमाण कमी होतं. या सगळ्या काळात रुग्णवाढीचा आलेख खाली जात होता आणि तेव्हाच आपल्या नेत्यांनी असा विचार करायला सुरुवात केली, की आपण करोनावर विजय मिळवला आहे. पण तसं करताना आसपासची परिस्थिती बघण्याची गरज होती. आपल्या आधी रुग्णवाढीचं शिखर गाठलेल्या प्रत्येक देशाने दुसऱ्यांदा शिखर गाठलं होतं. त्यांच्याकडे आपल्याआधी दुसरी लाट आली होती, पण आपल्याला मात्र सतत हेच सांगितलं जात होतं की आपण करोनावर विजय मिळवला आहे. त्यामुळे आपण असं मानायला सुरुवात केली की आपण भारतीय कुणीतरी विशेष, वेगळे, स्पेशल आहोत. आपल्या लहानपणीच आपल्याला बीसीजीची लस मिळालेली असते. आपल्याकडे अनेकांना मलेरिया होऊन गेलेला असतो आणि त्यांनी क्लोरोक्वीन घेतलेलं असतं. भारतीय लोक का स्पेशल आहेत आणि त्यामुळे आपल्याकडचा रुग्णवाढीचा आलेख खाली कसा जातो आहे याबद्दलची विविध प्रकारची विधानं केली गेली. आता मागे वळून त्या आलेखाकडे बघितलं तर असं लक्षात येतं की पहिल्या लाटेच्या वेळी रुग्णवाढीचा आलेख खाली गेला. कारण तेव्हाचा विषाणू तेवढा प्राणघातक नव्हता आणि आपण कोविडवरच्या उपचारांचे सगळे नियम नीट पाळत होतो. या दोन गोष्टींमुळे बहुधा पहिल्या लाटेच्या वेळी आपल्याकडे रुग्णवाढीचा आलेख लवकर उतरणीला लागला. पण त्यानंतर काय झालं? तोपर्यंत डिसेंबर महिना आला आणि कोविडचे रुग्ण कमी होत गेले. आपण करोनावर मात केली आहे या गोष्टीवर विश्वास ठेवत लग्नसमारंभ, स्थानिक निवडणुका, राज्य पातळीवरच्या निवडणुका, धार्मिक समारंभ हे सगळं धुमधडाक्यात सुरू झालं. एकाच ठिकाणी खूप मोठय़ा संख्येने लोक गेळा झाले याचं कुंभमेळा हे उत्तम उदाहरण आहे. यातल्या बऱ्याच गोष्टी फेब्रुवारी-मार्च महिन्यात घडल्या. आता आपल्याला समजलं आहे की त्या काळात सर्वाधिक संसर्ग घडवणारे विषाणू उत्परिवर्तित होत होते. त्यातला पहिला विषाणू डिसेंबर महिन्यातच आपल्याला सापडला होता. पण तेव्हा त्याचं स्वरूप अगदीच सूक्ष्म होतं. त्यामुळे त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये तो पसरत गेला. आपलं सिक्वेन्सिंग वाढत गेलं तसतसा तो अधिकाधिक प्रमाणात सापडत गेला. मी असं म्हणेन की या दोन्ही गोष्टी एकत्र येत गेल्या. मला असं वाटतं की रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे आपण आत्मसंतुष्ट झालो. आणि या विषाणूसाठी ती अगदी योग्य वेळ होती. तेव्हाच त्याने बरोबर आपल्याला खिंडीत पकडलं. दुसरीकडे जानेवारी, फेब्रुवारीमध्ये जेव्हा आपल्याला लसीकरणासाठी वेळ होता, तेव्हा आपल्याकडे पुरेशा लोकांचं लसीकरण झालं नाही. तोपर्यंत फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवडय़ात आपल्याला दुसऱ्या लाटेचा तडाखा बसायला सुरुवात झाली होती. रुग्णसंख्या वाढत असताना आपलं लसीकरण मात्र फारच कमी म्हणजे जेमतेम पाच टक्के किंवा त्याहूनही कमी म्हणजे दोन टक्के झालं होतं.

लसीच्या कमतरतेविषयी काय सांगाल?

महासाथीमध्ये तीन गोष्टींसाठी लस आवश्यक असते, त्या पाहता सरकारचा लसीकरणाचा कार्यक्रम अतिशय गांभीर्याने आखलेला होता, हे मान्यच केलं पाहिजे. कोणत्याही महासाथीमध्ये सगळ्यात प्राधान्याची गोष्ट असते ती म्हणजे फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून जे काम करत असतात, त्यांचं संरक्षण करणं. दुसरं म्हणजे मृत्युदर कमी करणं. आपल्याला हे माहीतच आहे की ६० वर्षांच्या पुढचे तसंच मधुमेह आणि इतर आजार असलेल्या लोकांना मृत्यूचा अधिक धोका असतो. तिसरं म्हणजे महासाथीच्या काळात लसीने महासाथ रोखण्याचं काम करणं अपेक्षित असतं. आपल्याकडे लसीकरण सुरू झालं तेव्हा आपल्या कानावर अनेक गोष्टी येत होत्या. त्यातली एक गोष्ट होती की आपण भारतीय लोक कुणीतरी स्पेशल आहोत आणि आपण करोनावर विजय मिळवला आहे. त्यामुळे साहजिकच अनेक लोकांनी असा विचार केला की चला, आता करोना तर गेला आहे. एरवी लस तयार करायला दहा दहा वर्षांहूनही जास्त काळ लागतो. तर मग केवळ वर्षभरात तयार केली गेलेली लस आपण कशाला उगीचच घ्यायची? कदाचित या लशीच्या पुरेशा चाचण्याही झाल्या नसतील. कदाचित ती पुरेशी सुरक्षितही नसेल. आमच्यासारखे अनेक जण लोकांना कळकळीने सांगत होते, की इतर लसींप्रमाणेच या लसीचीही सुरक्षिततेची चाचणी करण्यात आली आहे. त्यामुळे निर्धोकपणे लस घ्या. दुसरीकडे आपल्याला युरोपातून अशीही माहिती मिळत होती की ऑक्सफर्ड /अ‍ॅस्ट्रॉझिंकाच्या लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होताहेत. पण आपण या माहितीसंदर्भातल्या आकडेवारीकडे म्हणजे लस घेतल्यानंतर किती लोकांच्या रक्तात गुठळ्या तयार झाल्या या प्रमाणाकडे लक्ष दिलं नाही. लस घेतल्यानंतर रक्तात गुठळ्या होऊन मृत्यू होण्याचं प्रमाण किती होतं, तर दीड लाख ते तीन लाख ३० हजारात एक असं ते प्रमाण होतं. वीज पडून मृत्यू होण्याचं प्रमाण किती आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? तर ते आहे एक लाख ४० हजारात एक. म्हणजे लस घेऊन रक्तात गुठळ्या होऊन मरण्यापेक्षा वीज पडून मरण्याचा धोका जास्त आहे. तर आपल्याकडे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात प्रत्येकाने असा समज करून घेतला की आपण लस घेतली तर रक्तात गुठळी होऊन मरणारच आहोत. असं काही घडणार नाही, असं आपल्याकडे कुणीही स्पष्टपणे सांगितलं नाही. साठीच्या पुढच्या लोकांसाठी लसीकरण सुरू झालं तेव्हा माझ्या कुटुंबातच अनेकांना लस घ्यायची नव्हती. अनेकांचं आजही लसीकरण झालेलं नाही.

लशींचा तुटवडा का निर्माण झाला आहे?

ज्या देशांमध्ये मोठय़ा प्रमाणात लसीकरण झालं आहे, त्यांच्यावर आपण नजर टाकली तर असं दिसेल की या देशांनी २०२० च्या मध्यावरच लसीसाठीची मागणी नोंदवली होती. आपण ते केलं नाही. आपल्याकडे मोठमोठी लसनिर्मिती केंदं्र आहेत, पण त्या सगळ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत. खासगी क्षेत्र दानधर्मावर चालत नाही. लसनिर्मितीसाठीच्या आवश्यक सुविधा उभ्या करण्यासाठी आधी त्यांच्याकडे निश्चित मागणी नोंदवली जाणं आवश्यक असतं. नेमक्या या गोष्टीकडे आपण लक्षच दिलं नाही. त्यांच्याकडे आपली मागणी जरूर नोंदवली गेली, पण ती केव्हा तर २०२०च्या डिसेंबरमध्ये आणि २०२१ च्या जानेवारीमध्ये. उदाहरणार्थ सीरम इन्स्टिटय़ूटला कोव्ॉक्सकडून ३०० दशलक्ष डॉलर्स मिळाले. त्यामुळे त्यांना कोव्ॉक्स कार्यक्रमासाठी अमुक इतक्या लशी पुरवण्याची हमी द्यावी लागली. त्यांनी कोविडसाठीच्या लसींच्या निर्मितीसाठीची यंत्रणा उभी करण्यासाठी स्व:तचे २७० दशलक्ष डॉलर्स घातले. आणि आपल्या सार्वजनिक लस वितरण व्यवस्थेने डिसेंबर- जानेवारीपर्यंत त्यांच्याकडे साधी मागणीही नोंदवली नाही. ही मागणीच नोंदवली नसल्याने लसीचा पुरवठा झाला नाही. आपल्याकडे लसीचा अतिरिक्त साठा होता, आपण तेवढी निर्मिती करू शकतो हे आपण दाखवूनही दिलं. आपण ९५ देशांना ६६ दशलक्ष लशी दिल्या. आपल्या शेजारी देशांना साधारणपणे साडेदहा ते अकरा दशलक्ष लशी आपण फुकट वाटल्या. त्यामुळे देश म्हणून त्यावेळी आपली प्रतिष्ठा जरूर उंचावली. पण दुर्दैवाने आपण आपल्या गरजेकडेच लक्ष दिलं नाही. त्यामुळे आता लस आयात करण्याची वेळ आपल्यावर आली आहे. ही खरोखरच शोकांतिका आहे. सीरमला आपण ४०० दशलक्ष डॉलर्स दिले, भारत बायोटेकला २०० दशलक्ष डॉलर्स दिले, हे खरं आहे. त्यामुळे आता या दोन्ही संस्था त्यांच्याकडच्या लसनिर्मिती यंत्रणांचा विस्तार करत आहेत. पण त्यांच्याकडे लसनिर्मिती होऊन पुरवठा सुरळीत व्हायला जुलै उजाडेल असं दिसतं आहे.

लोकांना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोविडचा संसर्ग का होतो आहे?

आपण सगळ्यांनी सर्वप्रथम गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे लस घेतली म्हणजे संसर्ग होणार नाही असा दावा कोणत्याही लसनिर्मात्यांनी केलेला नाही. त्यातून फक्त रोगाला प्रतिबंध केला जाईल. त्यामुळे लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही संसर्ग होतो आहे. कारण एकतर सध्या महासाथ सुरू आहे. प्रत्येकजण तिला सामोरे जातो आहे. कोविड १९ चा संसर्ग होणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. साधा खोकला झाला तरी लोक जाऊन आरटीपीसीआर चाचणी करत आहेत. एरवी सहसा असं होत नाही. त्यामुळे आधीच्या तुलनेत लस घेतल्यानंतरही संसर्ग होणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. पण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही ज्यांना संसर्ग होतो आहे त्यांच्याबाबतीत हा संसर्ग एक  तर खूप सौम्य आहे किंवा अशा रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. (ते असिम्प्टमेटिक आहेत) त्यामुळे त्यांचा संसर्ग घरातल्या घरात विलगीकरण करून आणि नेहमीची काळजी घेऊन नियंत्रित करता येऊ शकतो. एखाद्याने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि त्याला संसर्ग झाल्यावर रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे आणि ऑक्सिजन वगैरे द्यावा लागला आहे अशी उदाहरणं अतिशय दुर्मीळ आहेत. दोन्ही डोस घेतल्यानंतरही संसर्ग होऊ शकतो. यापुढेही तो होण्याची शक्यता आहे.

लसीकरणानंतर संसर्गाचं प्रमाण कमी झाल्याची उदाहरणं आहेत का?

इस्त्रायल, जर्मनी या देशांमध्ये खूप मोठय़ा प्रमाणात लसीकरण झालं आहे. ४० टक्के लोकांना दोन्ही डोस देऊन झाले आणि ५० ते ६० टक्के लोकांना पहिला डोस देऊन झाला असेल तरीसुद्धा आलेख खाली उतरायला सुरुवात होते. आपण या प्रमाणापासून खूप लांब आहोत. पण आपण एवढय़ा मोठय़ा प्रमाणात लसीकरण करू अशी अपेक्षा ठेवू या. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या काळात आपण दररोज ४० लाख लोकांना लस दिली. पण त्यानंतरच्या काळात हे प्रमाण उतरणीला लागून  सध्या आपण रोज वीस ते २५ लाख लोकांचं लसीकरण करू शकतो आहोत. ही संख्या पुरेशी नाही. करोनावर नियंत्रण आणण्यासाठी आपण दररोज ७५ लाख ते एक कोटी लोकांचं लसीकरण करण्याची गरज आहे.

नैसर्गिक उपचारांबाबत तुमचं मत काय?

अर्थातच योगाभ्यासामुळे तुम्ही निरोगी जीवनशैली जगू शकता. त्यातला श्वासोच्छ्वासाचा व्यायाम फुफ्फुसांची क्षमता वाढवतो. यामुळे एरवीही आपलं आरोग्य चांगलं रहायला मदत होते. सकस आहार, नियमित व्यायाम, योगाभ्यास केला, त्याबरोबरच प्रतिकारशक्ती चांगली असेल तर संसर्ग होण्याची शक्यता कमी असते. त्यातूनही झालाच तर तो फुफ्फुसापर्यंत जाण्याची शक्यता कमी असते. निरोगी राहण्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण उद्या कुणी मला विचारलं की संसर्ग झाल्यावर आम्ही या सगळ्या गोष्टी करू आणि करोनाच्या विषाणूवर मात करू तर मी त्याला दुजोरा देणार नाही.

प्रत्येक देशात आपल्याआधी दुसरी लाट आली होती, पण आपल्याला मात्र सतत हेच सांगितलं जात होतं की आपण करोनावर विजय मिळवला आहे.

जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आपल्याला लसीकरणासाठी वेळ होता. रुग्णसंख्या वाढत असताना आपलं लसीकरण फारच कमी म्हणजे जेमतेम दोन टक्के झालं होतं.

लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही ज्यांना संसर्ग होतो आहे त्यांच्याबाबतीत हा संसर्ग एक  तर खूप सौम्य आहे किंवा अशा रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2021 8:39 am

Web Title: corona virus many deaths are not recorded charcha dd 70
Next Stories
1 डावपेच : संयोगचिन्हाचा (-) अर्थ
2 दखल : मागोवा चक्रीवादळाचा
3 तंत्रज्ञान : कोविड कण्टेंटला डिजिटल सेन्सॉरशिप
Just Now!
X