सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com
कोल्हापूर-सांगली जिल्ह्य़ांत नदीकिनारी वसलेल्या गावांसाठी पूर ही काही नवीन बाब नाही. मात्र, यंदा हाहाकार माजला. महापुराने येथील सर्वच गावांना वेढले. काही छोटी गावे तर बुडालीच. या पुढच्या काळात पुराची तीव्रता सांगण्यासाठी २००५च्या ऐवजी २०१९चा संदर्भ दिला जाईल, एवढी गंभीर परिस्थिती उद्भवली. त्यामागच्या कारणांचा लेखाजोखा..

सांगली, कोल्हापूरमध्ये यंदा आलेला महापूर काही अतिवृष्टीमुळे आला नाही. जी गावे पाण्याखाली गेली, ज्या भागांनी प्रचंड नुकसान झेलले, तिथे अतिवृष्टीच काय पण अतिमुसळधार पाऊसदेखील झाला नव्हता. नद्यांच्या पात्रातील पाण्याच्या पातळीत झालेली वाढ, हे या पुराचे कारण होते. याला कर्नाटकातील अलमट्टी धरणाची वाढलेली उंची किंवा कृष्णेवर पुढे कर्नाटकात लगेचच बांधलेले हिपरग्गा धरण कितपत कारणीभूत आहे, हा वादाचा आणि चच्रेचा मुद्दा ठरू शकतो. त्यात राजकारणाचादेखील भाग असल्याने त्याला इतर अनेक फाटेदेखील फुटतील. पण या सर्वाच्या पलीकडे जाऊन काही महत्त्वाचे मुद्दे उरतात. त्यातील बहुतेक मुद्दे हवामानशास्त्र विभाग आणि या विभागाच्या नोंदींविषयी शासनदरबारी असलेल्या उदासीनतेसंदर्भात आहेत.

मुळातच या विभागाविषयीचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोन बाळबोध आहे. हा विभाग पावसाच्या नोंदीच्या आधारे अनेक बदल टिपतो. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे सुमारे १०० वर्षांच्या मान्सूनची माहिती आहे. त्यानुसार मान्सूनच्या स्वरूपात गेल्या १०० वर्षांत फारसा बदल दिसला नाही. पण गेल्या दोन वर्षांत त्यात बदल होत असल्याच्या नोंदी आहेत. सांगली-कोल्हापूरमधील महापुराच्या पाश्र्वभूमीवर या नोंदींतील बदल आणि त्यांचे परिणाम याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पश्चिम विभागीय केंद्राचे उप महासंचालक, कृष्णानंद होसाळीकर सांगतात, ‘पावसाच्या वितरणामध्ये जागानिहाय बदल दिसू लागला आहे. काही ठिकाणी प्रमाण बदलले आहे. त्याचबरोबर कालावधी, म्हणजे मान्सूनचे आगमन लवकर होणार की उशिरा यावर अभ्यास सुरू आहे. त्यातदेखील बदल दिसत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पावसाच्या तीव्रतेत बदल दिसून येतो.’ हवामानशास्त्र विभागाची ही निरिक्षणे महापुराच्या पाश्र्वभूमीवर महत्त्वाची ठरतात. पावसाचे आगमन, त्याची तीव्रता आणि वितरणातील बदल हे प्रकर्षांने जाणवावेत असेच आहे. या वर्षी ४०-५० दिवसांत मुंबईतील पावसाने मोसमातील सरासरी गाठली. जुल आणि ऑगस्टमधील पावसाचे प्रमाण पाहता संततधार पावसाचे दिवस कमी होते. पण अशा मंद व संततधार पावसाच्या नोंदी यापूर्वीच्या काळात दिसतात. त्याऐवजी गेल्या दोन वर्षांत अतिवृष्टीचे प्रमाण वाढले आहे. येत्या काळात त्याचा अधिक अभ्यास करावा लागेल, असे होसाळीकर सांगतात. केरळ व बिहारमध्ये पावसाच्या स्वरूपात मोठे बदल झाल्याचे हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीवरून दिसते. यंदा घाटमाथ्यावरील पावसाचे प्रमाण वाढले, पण ठरावीक काळातच ते अचानक वाढले. बडोदा येथे तर पाच ते सहा तासांत ५००  मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला. म्हणजेच पाऊस वाढला आहे, पण तो सतत न पडता दोन-तीन दिवसांच्या काळात कोसळतो. दुसरीकडे शेतीसाठी लागणारा पाऊस कमी झाला आहे. तीव्रता आणि जागानिहाय बदल अभ्यासण्यासाठी विशेष उपाययोजनांची गरज आहे, त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी लागेल. हवामानशास्त्र विभागाच्या नोंदी हे सारे टिपत असतात. पण यातून इतर यंत्रणा काय बोध घेतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. यंदाच्या सांगली-कोल्हापूर येथील महापुराची मीमांसा करताना लक्षात येते की हवामानशास्त्र विभागाच्या इशाऱ्यांतून यंत्रणांनी कोणताही बोध घेतलेला नाही. हवामानशास्त्र विभागाने जुलच्या तिसऱ्या आठवडय़ापासूनच घाटमाथ्यांवर काही ठिकाणी अतिवृष्टीचा (२०० मिमीपेक्षा अधिक)  इशारा दिला होता. मुंबईतील २६ जुल २००५ च्या पुराच्या आठवणी अद्याप ताज्या असल्यामुळे सर्वाचे या दिवसावर कायमच लक्ष असते. त्या सुमारास पावसाच्या प्रमाणात झालेला छोटासा बदलदेखील भीतीचे सावट निर्माण करतो. मात्र त्याच वेळी २७ जुलपासून घाटमाथ्यावर अतिवृष्टी होत होती याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही. राधानगरी, महाबळेश्वर येथील संततधारेमुळे धरणसाठय़ात वाढ होते. मग पाण्याचा विसर्ग वाढतो आणि नदीकिनारी वसलेल्या गावांना पुराचा फटका बसतो. कृष्णा पंचगंगा संगमाच्या परिसरात असा फटका बसण्यास १ ऑगस्टपासून सुरुवात झाली. या टप्प्यातील गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. येथूनच सुमारे २५ किमी अंतरावरील खिद्रापूर हे कृष्णा तीरावरचे महाराष्ट्रातील शेवटचे गाव. पूर वाढू लागला तसे कुरुंदवाड, नृसिंहवाडी, औरवाड, बुबनाळ अशा गावांमध्ये पाणी शिरले. घाटमाथ्यावर पावसाचा वेग कायम होता. त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढत राहिला. परिणामी पुराने महापुराचे अक्राळविक्राळ रूप घेतले.

महापूर येणार हे स्पष्ट दिसत होते. पण याची जाणीव यंत्रणांना कितपत झाली होती हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कृष्णा-पंचगंगा संगम परिसरातील किती गावांना महापुराच्या या वाढत्या तीव्रतेची पूर्वसूचना देण्यात आली होती, याचे उत्तर शोधल्यास ते नकारार्थीच असल्याचे दिसते. घाटमाथ्यावरील पाऊस कमी झाल्यानंतर गावांत शिरलेले पाणी मागे सरकले. तरीदेखील संगम क्षेत्रातील गावांमधील पाणी ओसरण्यास सांगली-कोल्हापूरपेक्षा अधिक काळ लागला.

आपत्ती नियंत्रण यंत्रणांनी आपत्ती येण्यापूर्वीच हालचाली करणे, आपत्तीचे स्वरूप कोणत्या टप्प्यात कोणत्या क्षेत्रात गंभीर रूप धारण करेल याचा अंदाज लावणे गरजेचे होते. पण येथे उलटाच प्रकार झाला. आपत्ती निवारण यंत्रणा या दुसऱ्या टप्प्यातील गंभीर स्वरूप धारण केलेल्या ठिकाणी आधी पोहोचल्या आणि सर्वात आधी पाण्याखाली गेलेल्या आणि सर्वात नंतर पाणी ओसरलेल्या ठिकाणांकडे नंतर पोहचल्या. हा उफराटा प्रकारच यंत्रणांच्या अभ्यासातील त्रुटी दर्शवितो.

गेल्या काही वर्षांत डेटा (माहितीसाठा) हे एक शास्त्र म्हणून विकसित होत आहे. प्रत्येक माणसाच्या खरेदी-विक्रीचा पॅटर्न कसा बदलतो याच्या नोंदीचा वापर मार्केटिंगसाठी, निवडणुकांत लोकसमूहाचे कल बदलवण्यासाठी केला जाऊ लागला आहे. निसर्गाशी निगडित घटनांबाबतही, असाच माहितीसाठा उपलब्ध आहे. महापुराच्या घटना, पावसाच्या नोंदी असे बरेच काही आपल्याकडे उपलब्ध आहे. मात्र त्याचा वापर आपत्ती निवारणासाठी करण्याचा, नुकसान टाळण्याचा विचार मात्र आपण अजूनही तितक्या गांभीर्याने केलेला नाही. विसर्गानंतर येणाऱ्या महापूरावर नियंत्रण ठेवणे यंत्रणांना शक्य असते. मात्र धरणाचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा भर धरण पूर्ण भरण्यावरच अधिक असतो. मुंबईत यंदा जुलच्या पहिल्याच आठवडय़ात एकाच दिवशी अतिवृष्टी झाली तेव्हादेखील जुलमधील द्वितीय क्रमांकाचा उच्चांकी पाऊस झाल्याचे कारण मुख्यमंत्र्यांनी दिले. अशा वेळी, २६ जुलच्या उच्चांकी पावसाच्या नोंदींतून आपण काय शिकलो याचं उत्तर टाळलं जातं. माहितीसाठय़ाचा वापर करून हजारोंचे प्राण वाचवल्याची घटना याच जूनमध्ये ओरिसाच्या किनाऱ्यावर घडल्याचे आपण पाहिले. फॅनी चक्रीवादळाच्या पाश्र्वभूमीवर हवामान विभागाच्या नोंदींचा आधार आपत्ती निवारणामध्ये दिसला होता. हेच चित्र महाराष्ट्रातील पावसाच्या बदलांच्या नोंदीचा वापर करताना दिसू शकले असते. पण ते झाले नाही, हाच या महापुराचा धडा आहे.