25 February 2021

News Flash

तंत्रज्ञान : भारत के लिये ‘फौजी’

भारतीय गेम डेव्हलपमेंट कंपनी ‘स्टुडिओ एनकोअर प्रा. लि.’ने हा गेम विकसित केला आहे.

२४ तासांत गूगल प्ले स्टोरवरून तब्बल दहा लाख युजर्सनी हा गेम डाऊनलोड केला.

स्वप्निल घंगाळे – response.lokprabha@expressindia.com

पबजी या गेमवर भारतात बंदी घालण्यात आल्यानंतर अक्षयकुमारकडून ‘फिअरलेस अ‍ॅण्ड युनायटेड गार्ड्स’ अर्थात ‘फौजी’ या गेमची घोषणा करण्यात आली आणि हा बहुप्रतीक्षित गेम २६ जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताकदिनी उपलब्ध झाला. भारतीय गेम डेव्हलपमेंट कंपनी ‘स्टुडिओ एनकोअर प्रा. लि.’ने हा गेम विकसित केला आहे. लाँचिंगनंतर अवघ्या २४ तासांत या गेमने एक नवा विक्रम प्रस्थापित केला. २४ तासांत गूगल प्ले स्टोरवरून तब्बल दहा लाख युजर्सनी हा गेम डाऊनलोड केला.

गेमची पाश्र्वभूमी (गेमप्ले)

१५ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्या वेळी चिनी सैनिकांनी लोखंडी रॉड आणि काटेरी तारा लावलेल्या बांबूंच्या साहाय्याने भारतीय सैनिकांवर अचानक हल्ला चढवला होता, याच घटनेभोवती असलेला हा गेम आपल्याला खिळवून ठेवतो. गेम खेळताना आपल्याला या संदर्भातील स्टोरीबोर्ड अधूनमधून दाखवला जातो. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षांत बंदूक, रायफल यांसारख्या शस्त्रांचा वापर झाला नव्हता. या गेममध्येसुद्धा आपल्याला क्लब (सोटा), कुऱ्हाड आणि पाइप (भाल्यासारखे शस्त्र) अशीच  शस्त्रास्त्रे मिळतात. त्यांची नावेसुद्धा आक्रोश, प्रतिकार, अग्नी, देवरथ अशी आहेत. सध्या गेममध्ये सिंगल प्लेअर म्हणजेच कॅम्पेन-मोड हा एकच पर्याय उपलब्ध आहे, तर ‘टीम डेथमॅच’ आणि ‘बॅटल रॉयल’ (फ्री फॉर ऑल) हे दोन पर्याय लवकरच उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे कळते.

सिंगल प्लेअर मोड हा खेळायला अगदीच सहज सोपा आहे. यामध्ये आपल्याला तीन टप्पे दिलेले आहेत ज्यात फारसे काही बदल नाहीत. आपण हा गेम ‘कमांडर धिल्लोन’ या नावाने खेळतो. आपल्या सैन्यातील इतर सैनिकांचा छडा लावणे या आशयाभोवती हा गेम पुढे सरकतो. गेमप्लेमध्ये पुढे जाताना कमांडर ‘अपने भाईयों को बचाना मेरा फर्ज है’ किंवा स्वत: शहीद होताना काही वेळा ‘जय माताजी’ यांसारखे हिंदी समालोचन करतो. गेम सुरू असताना स्टोरीबोर्डवर काही कटसीन्स दिले आहेत तेदेखील हिंदी समालोचन आणि इंग्लिश सबटायटल्स अशा स्वरूपाचे आहेत. शत्रुपक्षातील सैनिकांच्या तोंडी इंग्रजी वाक्ये दिली गेली आहेत.

मुख्य लढाई

या गेममध्ये सध्या कॅम्पेन मोडमध्येच मिशन उपलब्ध आहे. गेममध्ये सध्या अतिशय सोप्पे असे तीनच कंट्रोल्स दिले आहेत. स्क्रीनच्या डाव्या बाजूला दिलेल्या डायलने आपण पुढे, मागे आणि डावीकडे अथवा उजवीकडे वळू शकतो आणि उजव्या बाजूला दोन बटन्स दिले आहेत त्यातील एक शत्रुपक्षातील सैनिकांना मारण्यासाठी, तर दुसरे शत्रूच्या हल्लय़ापासून बचाव करण्यासाठी आहे. बचाव करायचे बटन आपल्याला क्वचितच वापरावे लागते. सुरुवातीला आपला कमांडर केवळ लाथा आणि बुक्कय़ांनीच शत्रूवर हल्ला करत असतो; त्यातही कधी लाथेने प्रहार करावा तर कधी बुक्कय़ांनी हे प्लेअरच्या कंट्रोलमध्ये नसून गेमप्ले स्वत: ठरवत असतो, थोडक्यात, प्लेअरला अटॅक करायचे बटन सतत काहीशा वेगाने दाबत राहावे लागते, जे काही वेळानंतर कंटाळवाणे होऊन जाते. गेममध्ये सध्या उडी मारणे, खाली बसणे किंवा सरपटणे यांसारख्या हालचालीही नाहीत.

आपल्या कमांडरच्या हातात शस्त्रे ही शत्रुपक्षातील सैनिकाला मारल्यावर मिळतात, परंतु ती शस्त्रे उदाहरणार्थ कुऱ्हाड, सोटा अथवा पाइप हे काही काळापुरतेच आपल्याकडे राहतात. जसजसे आपण नवीन शत्रू मारत पुढे सरकतो तसे शस्त्रांचे आयुष्यही संपत जाते. आपण स्वत:कडे एकावेळी दोनच शस्त्रे ठेवूशकतो. शत्रूला मारल्यावर त्याचे शस्त्र उचलणे अतिशय सोपे आहे, आपल्याला त्या शस्त्रावरून फक्त चालत पुढे जायचे असते. त्यानंतर ते आपल्या हातात येते. एकावेळी आपल्यावर एकापेक्षा जास्त शत्रूदेखील हल्ला करतात. त्या वेळी कोणत्या शत्रू सैनिकाला आधी मारायचे हेदेखील गेमप्ले स्वत: ठरवतो. लढाईच्या दरम्यान आपल्याकडील शस्त्रांचे आयुष्य संपले तर आपण परत लाथाबुक्क्यांनी प्रहार करत लढाई सुरू ठेवू शकतो. लढाईच्या दरम्यान म्हणजेच शत्रू समोर असताना एखादे शस्त्र उचलणे थोडे जिकिरीचे आहे. लढाईच्या दरम्यान आपल्या कमांडरची हेल्थ कमी झाली तर त्यासाठी गेमप्लेमध्ये काही ठरावीक अंतरावर शेकोटी लावून ठेवलेली असते, तिथे जाऊन बसल्यावर हेल्थ पूर्ववत होते. आपण एखादे शेकोटी लावलेले ठिकाण पार करून पुढे गेल्यावर शत्रूंनी केलेल्या हल्लय़ात आपले हेल्थ पॉइंट्स कमी झाले तरी आपण मागे येऊन त्या पार केलेल्या शेकोटीद्वारे आपले हेल्थ पॉइंट्स पूर्ववत करू शकतो.

ग्राफिक्स आणि व्हीएफएक्स

गेमप्लेमध्ये काहीसे वास्तवदर्शी ग्राफिक्स दिले गेले आहेत. गेम खेळताना आपण कोणत्या तरी दऱ्याखोऱ्यांतून जातोय असा अनुभव येतो. उच्च दर्जाचे ग्राफिक्स सेटिंग्ज असतील तर आपल्याला सैनिकांच्या चेहऱ्याचे आणि भोवतालच्या परिसराचे बारकावे अनुभवता येतात. व्हिज्युअल इफेक्ट्सबद्दल बोलायचं झाल्यास प्राथमिक स्वरूपाचे व्हीएफक्स गेममध्ये उपलब्ध आहे, त्यात सुधारणेला अजून बराच वाव आहे. गेममध्ये साऊंड इफेक्ट्स मात्र चांगल्या पद्धतीने वापरण्यात आले आहेत. गेम खेळताना कोठेही अडकत नाही किंवा हँग होत नाही, शिवाय काही लहानसहान त्रुटी सोडल्यास कोणत्याही अडचणी येत नाहीत.

सेटिंग्ज आणि पर्मिशन्स

गेमच्या सेटिंग्जमध्ये काही प्राथमिक पर्याय उपलब्ध आहेत, ज्यात गेमचा आवाज आणि पाश्र्वसंगीताचा आवाज कमी-जास्त करणे, सेन्सिटिव्हिटी आणि ग्राफिक्स कमीजास्त करणे एवढेच पर्याय आहेत. ग्राफिक्समध्ये आपल्याला ‘व्हेरी लो’ ते ‘अल्ट्रा’पर्यंत सहा पर्याय उपलब्ध आहेत. परमिशन्सबद्दल बोलायचं झाल्यास सध्या गेममध्ये फक्त इंटरनेटच्या परमिशन्स आणि स्टोरेज परमिशन्स या दोनच परवानग्यांचीच गरज आहे. हा गेम आपल्या फोनमधील संपर्क क्रमांक, एसएमएस, गॅलरी, गूगल अकाऊंट अथवा इतर सिंगल साइन ऑनच्या परवानग्या मागत नाही.

गेम स्टोअर आणि र्मचडाइजचे पर्याय

या गेममध्येदेखील गेमस्टोअरचा पर्याय आहे ज्यात आपण गेममधील कॉइन्स किंवा टोकन्स वापरून शस्त्र खरेदी करू शकतो किंवा कमांडरच्या स्किन्स खरेदी करू शकतो. गेममधील टोकन किंवा कॉइन्ससुद्धा आपल्याला खरेदी करता येतात ज्यांची किंमत १९ रुपयांपासून दोन हजार ९९९ पर्यंत आहे. या खरेदीतील २० टक्के रक्कम ‘भारत के वीर फाऊंडेशन’ला दिली जाणार आहे. मर्चन्डाइजच्या पर्यायामध्ये मोबाइल नंबरद्वारे नोंदणी करून आपल्याला काही कॉइन्स मिळतात आणि त्याव्यतिरिक्त आपण दिलेल्या पर्यायांतून ब्रॅण्ड फौजीच्या उत्पादनांची खरेदी करता येते.

सपोर्ट आणि कम्पॅटिबिलिटी

सध्या हा गेम फक्त अँड्रॉइड ८ (ओरिओ) आणि त्यापुढील ऑपरेटिंग सिस्टीम्समध्येच खेळता येणार आहे. म्हणजेच त्याआधीच्या अँड्रॉइड व्हर्जन्सवर तसेच अँड्रॉइड वन स्मार्टफोन्सवर हा गेम सध्या तरी खेळता येणार नाही. भविष्यात गेमचे लाइट व्हर्जनदेखील पाहता येऊ शकते. गेम साधारण ४६० एमबीचा असून पुढे गेमप्ले सेव्ह झाल्यावर तो एक जीबीपर्यंत जाऊ शकतो. हा गेम ‘आयओएस’वर कधी येईल याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नसल्याने आयफोन युजर्सना या गेमसाठी वाट पाहावी लागणार आहे.

एकंदरीत भारतात अशा प्रकारचा ‘अ‍ॅक्शन गेम’ विकसित केला जाणे आणि त्याची वास्तवदर्शी पाश्र्वभूमी अभिमानास्पद असली तरी तांत्रिकदृष्टय़ा किंवा बाजारात उपलब्ध असणाऱ्या इतर अ‍ॅक्शन गेम्स किंवा बॅटल रॉयल स्वरूपातील गेम्सच्या तुलनेत या गेममध्ये सुधारणेला अजून बराच वाव आहे. गेममध्ये सध्या फक्त एकच मोड आणि त्यातही फक्त लाथाबुक्क्यांचा मारा, नाही तर एकाच पद्धतीचा शस्त्रप्रहार असल्यामुळे जवळजवळ ३० मिनिटांचा गेमप्ले नंतर कंटाळवाणा होतो. गेमच्या शेवटी बॉस-फाइट आहे जी बहुतांश गेममध्ये खूपच उत्कंठावर्धक असते, पण ‘फौजी’मध्ये तीदेखील अगदी प्राथमिक स्वरूपाची ठेवली असल्यामुळे काहीशी निराशा होते. गेममध्ये येणारे कटसीन्स हे काही वेळा लक्ष विचलित करतात. त्यामुळे ग्राफिक्स आणि इतर वास्तवदर्शी कथा असणारा हा गेम मूळ लढाईमध्ये प्राथमिक स्वरूपाचा असल्यामुळे काहीसा अर्धवट राहिल्यासारखा वाटतो. भविष्यात या गेममध्ये जे उरलेले दोन पर्याय उपलब्ध होणार आहेत त्यात नवीन शस्त्रे अथवा रायफल्स, गेम प्लेअरसाठी अधिक कंट्रोल, चॅटचे पर्याय किंवा काही प्रमाणात व्हिज्युअल इफेक्ट्स दिल्यास हा गेम टक्कर देऊ शकेल, हे निश्चित!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2021 3:00 pm

Web Title: fau g fearless and united guards game tantradnyan dd70
Next Stories
1 राशिभविष्य : दि. ५ ते ११ फेब्रुवारी २०२१
2 ट्रम्पतात्यांना आणखी एक घरचा आहेर
3 स्वयंचीत!
Just Now!
X