आयपीएलच्या सातव्या पर्वाची सांगता झाल्यानंतर आता सर्वाचे लक्ष लागले आहे ते फुटबॉलच्या महासंग्रामाकडे. सांबा नृत्यावर ठेका धरत आता फुटबॉलचा आनंद जगभरातील तमाम चाहत्यांना लुटता येणार आहे. सर्वाधिक पाहिला जाणारा आणि श्वास रोखून धरणारा खेळ म्हणजे फुटबॉल. क्लब असो वा कंट्री, फुटबॉलच्या सामन्यांना नेहमीच गर्दी असते. १२ वर्षांनी कुंभमेळा भरतो, पण दर चार वर्षांनी येणाऱ्या या फुटबॉलच्या महाकुंभमेळ्याकडे फुटबॉलरसिक चातकाप्रमाणे वाट पाहात असतात. आता १२ जूनपासून फुटबॉलमय देश असलेल्या ब्राझील नगरीत हा कुंभमेळा भरणार आहे. पुढील एक महिना चित्तथरारक सामन्यांची अनुभूती घेता येणार आहे. रात्र रात्र जागवून, गरज पडल्यास अभ्यासाला किंवा कामाला दांडी मारून फुटबॉलचा हा थरार अनुभवण्याचे प्लान आखले जात आहेत.
विजेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या स्पेन, ब्राझील, अर्जेटिना, जर्मनी, नेदरलँड्स आणि अन्य संघांवर पैजा लागण्यासही सुरुवात झाली आहे. या वेळी स्पेन पुन्हा विजेतेपदावर नाव कोरणार का यजमान ब्राझील पाचव्यांदा विश्वचषक उंचावणार, लिओनेल मेस्सी सरस ठरणार का ख्रिस्तियानो रोनाल्डो, नेयमारची जादू घरच्या चाहत्यांना पाहता येणार, की जर्मनीचा संघ विश्वचषक घरी घेऊन जाणार, अशा चर्चा आता जोर धरू लागल्या आहेत. भारतातील तरुणाईमध्ये फुटबॉलची प्रचंड क्रेझ आहे. इंग्लिश प्रीमिअर लीग असो वा स्पॅनिश लीग, आपल्या लाडक्या हीरोंना पाहण्यासाठी परीक्षेच्या काळातही ही तरुणाई रात्र जागवून या सामन्यांचा आनंद लुटते. वेगवेगळ्या क्लब्समधून खेळणारे हे हीरो आता देशकर्तव्यासाठी एकत्र आले असतानाचा थरार काही औरच असणार आहे. फुटबॉलचा वर्ल्ड कप आला की तरुणांसोबत बच्चेकंपनी आणि मोठय़ांच्याही आनंदाला उधाण येते. १२ जून ते १३ जुलै आता संपूर्ण जग फुटबॉलमय होणार आहे. आता फिफा विश्वचषक स्पर्धेसंदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेऊ या.

यजमान देशाची निवड
वेगवेगळ्या उपखंडात फिफा विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्याची रोटेशन पॉलिसी असल्यामुळे ७ मार्च २००३मध्ये फिफाने २०१४ सालची स्पर्धा दक्षिण अमेरिकेत घेण्याचे जाहीर केले. १९७८ नंतर (अर्जेटिना) पहिल्यांदाच ही स्पर्धा दक्षिण अमेरिकेत खेळवण्यात येणार होती. या स्पर्धेच्या आयोजनाच्या शर्यतीत ब्राझील, अर्जेटिना आणि कोलंबिया हे देश होते. दक्षिण अमेरिकन फुटबॉल महासंघाने २००४मध्येच ब्राझीलला आपली पसंती दर्शवली होती. ब्राझील फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष रिकाडरे टेईक्सेरा यांनी १३ डिसेंबर २००६मध्ये आपली निविदा सादर केली. अर्जेटिनाच्या निविदेमध्ये फारसे तथ्य नव्हते. त्यातच ११ एप्रिल २००७मध्ये कोलंबियाने या शर्यतीतून माघार घेतल्यामुळे ब्राझील हा एकमेव देश संयोजनपदाच्या शर्यतीत राहिला होता. अखेर ३१ जुलै २००७ला ब्राझीलला संयोजनपदाचे हक्क मिळाले. सुरुवातीला २१ शहरांमध्ये सामन्यांचे आयोजन करण्याचे निविदेत म्हटले होते. त्यानंतर १८ शहरांची निवड करण्यात आली. आता रिओ डी जानेरो, ब्राझिलिया, साव पावलो, फोर्टालेझा, बेलो होरिझोन्टे, पोटरे अलेग्रे, सॅल्वाडोर, रेकिफे, क्युइबा, मनौस, नताल आणि क्युरिटिबा या ब्राझीलमधील १२ शहरांमध्ये फिफा विश्वचषकाचा महासंग्राम रंगणार आहे.

स्टेडियम्स
१) इस्टाडियो मिनेइराओ (बेलो होरिझोन्टे) : ब्राझिलियन फुटबॉलमधील ऐतिहासिक स्टेडियम असलेल्या या स्टेडियमला उपांत्य फेरीसह होणाऱ्या सहा सामन्यांकरिता नवी झळाळी देण्यात आली आहे. रोनाल्डो, टोस्टाओ, रेईनाल्डो आणि डारियोसारखे अनेक दिग्गज फुटबॉलपटू या स्टेडियमने घडवले आहेत. ६३ लाख लिटर पावसाचे पाणी साठवून ठेवण्याची क्षमता, ५८२५९ आसनव्यवस्था तसेच अनेक आधुनिक सोयीसुविधा या स्टेडियममध्ये उपलब्ध आहेत.
२) इस्टाडिओ नॅशनल डे ब्राझिलिया (ब्राझिलिया) : ब्राझीलची राजधानी असलेल्या ब्राझिलियामधील इस्टाडिओ नॅशनल डे ब्राझिलिया स्टेडियममध्ये २०१३ कॉन्फेडरेशन चषकाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर आता विश्वचषक स्पर्धेचे सात सामने रंगणार आहेत. त्यात उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याचाही समावेश आहे. लोखंडी छत, खुच्र्या आणि बाहेरून आकर्षक दिसणाऱ्या या स्टेडियमवरील खेळपट्टी थोडीशी खाली असल्यामुळे स्टेडियममध्ये बसलेल्या प्रत्येक चाहत्याला सामन्याचा मनमुराद आनंद लुटता येतो. पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही अशा पद्धतीने बांधण्यात आलेल्या या दुसऱ्या क्रमांकाच्या विशाल स्टेडियममध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होत असते. या स्टेडियमची प्रेक्षकसंख्या जवळपास ६९४३२ इतकी आहे.
३) एरिना पॅन्टानाल (क्युइबा) : खास विश्वचषक स्पर्धेसाठी पॅन्टानाल शहरात या स्टेडियमची बांधणी करण्यात आली. या स्टेडियमसाठी लाकडांचा वापर करण्यात आला असून वाया गेलेल्या लाकडांचाही पुनर्वापर करण्यात आला आहे. स्टेडियममधील माती आणि येणारी हवा, यासाठी विशेष काळजी घेतली जाते. त्यामुळेच या स्टेडियमला ‘द बिग ग्रीन’ असेही ओळखले जाते. बहुउपयोगी उद्देशाने ३९८५९ आसनव्यवस्था असलेले हे स्टेडियम बांधण्यात आले आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर या स्टेडियमचा आकार कमी करण्यात आला आहे. स्पर्धेनंतर हे स्टेडियम कार्यक्रम, प्रदर्शने आणि व्यापार-उद्योजकांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.
४) एरिना डी बाइक्साडा (क्युरिटिबा) : जून १९९९मध्ये नूतनीकरण झाल्यानंतर ऐतिहासिक असे इस्टाडियो जोकिम अमेरिको म्हणजेच एरिना डी बाइक्साडा हे स्टेडियम ब्राझीलमधील सर्वाधिक आधुनिक स्टेडियम म्हणून ओळखले जाते. विश्वचषक स्पर्धेदरम्यान ब्राझीलमधील संस्कृतीची, भव्यतेची ओळख जगाला व्हावी यासाठी २०१२मध्ये या स्टेडियमला पुन्हा नवी झळाळी देण्यात आली. ३८५३३ प्रेक्षकसंख्या असलेल्या या स्टेडियममध्ये विश्वचषकातील चार सामने होणार आहेत.
५) इस्टाडियो कॅस्टेलाओ (फोर्टालेझा) : १९०० कार पार्किंगची व्यवस्था, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी गॅलरी, मीडिया सेंटर, आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असे ड्रेसिंगरूम, आच्छादलेले छत, ६०३४८ आसनव्यवस्था अशी या स्टेडियमची खासियत आहे. चार प्रशस्त बसमार्ग, दोन मेट्रो स्टेशन्स, यामुळे चाहत्यांना या स्टेडियममध्ये पोहोचताना कोणत्याही अडचणी येत नाहीत. उपांत्यपूर्व फेरीसह चार साखळी सामने आणि एक दुसऱ्या फेरीतील सामना या स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
६) एरिना अ‍ॅमाझोनिया (मनौस) : अद्वितीय आणि ब्राझिलियन फुटबॉलचा श्वास असलेले हे स्टेडियम म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच. वेगळ्या शैलीच्या या स्टेडियममधील सामन्यांना चाहत्यांची तोबा गर्दी होते. अ‍ॅमेझॉनच्या जंगलाजवळ उभारण्यात आलेल्या स्टेडियममुळे ब्राझीलच्या संस्कृतीची झलक दिसून येते. या स्टेडियममध्ये पडणारे पावसाचे पाणी मैदानासाठी तसेच शौचालयांसाठी वापरण्यात येते. सूर्यकिरणांद्वारे ऊर्जा तयार करण्यात येते, तसेच तापमान नियंत्रित करणे ही या स्टेडियमची वैशिष्टय़े आहेत. भुयारी पार्किंग, रेस्टॉरंट्स, मोनोरेल सेवा उपलब्ध असलेल्या या स्टेडियममध्ये चार साखळी सामने होणार आहेत.
७) इस्टाडियो दास दुनास (नताल) : १९७२मध्ये बांधण्यात आलेल्या या स्टेडियमवर आतापर्यंत अनेक थरारक लढती पाहायला मिळाल्या आहेत. फिफा विश्वचषकासाठी मोठे स्टेडियम हवे, या निकषामुळे या स्टेडियममधील दोन छोटी स्टेडियम्स पाडण्यात आली. दुनास वाळूच्या संबंधाने या स्टेडियमला दुनास हे नाव देण्यात आले. ३८९५८ प्रेक्षकांना बसता येईल, अशी व्यवस्था असलेल्या या स्टेडियममध्ये चार साखळी सामने आयोजित केले जाणार आहेत.
८) इस्टाडियो बेईरा-रिओ (पोर्टो अलेग्रे) : ग्युईबा नदीच्या काठावर असलेल्या या स्टेडियमवर अनेक ऐतिहासिक लढती झाल्या असून विश्वचषकाचे पाच सामने खेळवण्यात येणार आहेत. हे स्टेडियम बांधण्यासाठी जवळपास दहा वर्षांपेक्षाही जास्त काळ लागला. विटा, लोखंड आणि सिमेंट अशा वस्तू चाहत्यांनी दान केल्यानंतर हे स्टेडियम बांधण्यात आले. स्टेडियमच्या नूतनीकरणाचा खर्चही इस्टाडियो बेईरा क्लबनेच उचलला. ४२९९१ आसनव्यवस्था असलेल्या या स्टेडियममध्ये पाच सामने होणार आहेत.
९) एरिना पेर्नाम्बुको (रेकिफे) : १९५०च्या फिफा विश्वचषकाचे आयोजन करणारे स्टेडियम म्हणजे रेकिफे. मात्र २०१४च्या विश्वचषकात पाच सामने आयोजित करणाऱ्या एरिना पेर्नाम्बुको स्टेडियमला नवे रूप देण्यात आले आहे. सिनेमागृह, शॉपिंग मॉल अशा सुविधा या स्टेडियममध्ये आहेत. जनता आणि उद्योजक अशा दोघांच्या मालकीच्या असलेल्या या स्टेडियमची क्षमता ४२,५८३ इतकी आहे.
१०) इस्टाडियो डो मॅराकाना (रिओ डी जानेरो) : ब्राझील आणि उरुग्वे यांच्यात १९५०मध्ये झालेल्या अंतिम सामन्याचा साक्षीदार म्हणजे ऐतिहासिक मॅराकाना स्टेडियम. २०१४मध्येही याच स्टेडियमवर अंतिम सामन्यासह सात सामने होणार असल्यामुळे मॅराकाना स्टेडियम पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे. जवळपास दोन लाख प्रेक्षकांना सामावून घेईल, इतकी क्षमता असलेले हे जगातील सर्वात प्रशस्त स्टेडियम मानले जाते. फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक प्रेक्षकांनी सामना पाहिल्याची नोंद याच मैदानावर झाली आहे. मात्र ब्राझीलमधील विश्वचषकासाठी या स्टेडियमची क्षमता ७४६९८ इतकी ठेवण्यात आली आहे. रिओमधील टूरिस्ट डेस्टिनेशन असलेले हे स्टेडियम फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या निमित्ताने जगभरातील चाहत्यांना आकर्षित करणार, यात शंकाच नाही.
११) एरिना फाँटे नोवा (सॅल्वाडोर) : ब्राझीलच्या इतिहासातील पहिली राजधानी बनण्याचा मान मिळवणाऱ्या सॅल्वाडोरमध्ये जानेवारी १९५१मध्ये फाँटे नोवा स्टेडियम उभारण्यात आले. मात्र २००७मध्ये हे संपूर्ण स्टेडियम जमीनदोस्त करण्यात आले. त्याच्या जागी हलक्या वजनाचे छत, रेस्टॉरंट, फुटबॉलचे म्युझियम, कार पार्किंग, शॉपिंग मॉल, हॉटेल्स आणि कॉन्सर्ट हॉल अशी सुविधा असलेले नवेकोरे स्टेडियम उभे करण्यात आले. ५१७०८ क्षमता असलेल्या या नव्या कोऱ्या स्टेडियमवर चार साखळी सामने तसेच दुसऱ्या फेरीतील आणि उपांत्यपूर्व फेरीचा एक सामना खेळवण्यात येणार आहे.
१२) एरिना डी साव पावलो (साव पावलो) : फुटबॉल विश्वचषकासाठी बांधण्यात आलेल्या या स्टेडियममुळे अनेक कामगारांना रोजगार मिळाला. या स्टेडियममुळे साव पावलोमधील पूर्वेकडील भागात विकासाला चालना मिळणार आहे. याच स्टेडियमवर फिफा विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. तसेच उपांत्य फेरीसह पाच सामने या स्टेडियमवर रंगणार आहेत. ६१६०६ प्रेक्षकक्षमता असलेल्या या स्टेडियमवर अनेक थरारक लढतींचा अनुभव चाहत्यांना घेता येणार आहे.

विश्वचषकातील कल्पकता
१) चेंडू : २०१४ फिफा विश्वचषकासाठी खास चेंडू तयार करण्यात आला असून त्याला ‘आदिदास ब्राझुका’ असे नाव देण्यात आले आहे. या चेंडूला नाव ठेवण्यासाठी जवळपास १० लाख ब्राझिलीयन चाहत्यांकडून मते मागवण्यात आली. ब्रासा नोवा, कार्नावलेस्का आणि ब्राझुका अशा तीन नावांमधून अखेर ब्राझुका या नावाची निवड करण्यात आली. दवाचा परिणाम चेंडूवर होऊ नये, असा सिथेंटिक आवरण असलेला चेंडू बनवण्यात आला आहे. मात्र १९७०पासून फिफा विश्वचषकासाठी चेंडू पुरवणाऱ्या चीनमधील आदिदास या कंपनीला या वेळी चेंडूंची मागणी पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळे पाकिस्तानातील सियालकोट येथील कंपनी विश्वचषकासाठी चेंडू पुरवणार आहे. या कंपनीचे मालक ख्वाजा अख्तर हे जर्मन बुंडेसलीगा, फ्रेंच लीग आणि चॅम्पियन्स लीगसाठी चेंडू पुरवतात. अखेर फिफा विश्वचषकासाठी पाकिस्तानी चेंडू पुरवण्याचे त्यांचे स्वप्न या निमित्ताने साकार झाले.

२) गोललाइन तंत्रज्ञान : रेफ्रींकडून चुकीचे निर्णय, हे चित्र जवळपास प्रत्येक विश्वचषक स्पर्धेदरम्यान पाहायला मिळते. पण या वेळी रेफ्रींचे वादग्रस्त नियम टाळण्याकरिता प्रथमच फिफा विश्वचषकात गोललाइन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. २०१२ क्लब वर्ल्डकप, २०१३ क्लब वर्ल्डकप आणि २०१३ कॉन्फेडरेशन चषकानंतर आता फिफा विश्वचषकात या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे. गोलकंट्रोल ही जर्मनीची कंपनी हे तंत्रज्ञान पुरवणार आहे.

३) व्ॉनिशिंग स्प्रेचा वापर : दक्षिण आफ्रिकेत २०१०मध्ये झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत ‘वुवूझेला’ या वाद्याने चाहत्यांपाठोपाठ खेळाडूंच्याही नाकी नऊ आणले होते. या वाद्यातून निघणाऱ्या कर्णकर्कश आवाजामुळे सर्वाचेच कान किटले होते. विश्वचषक स्पर्धेदरम्यान चाहत्यांचा उच्छाद ही सर्वात मोठी डोकेदुखी सुरक्षा रक्षकांवर असते. या वेळी गोंधळ घालणाऱ्या अर्जेटिनाच्या चाहत्यांना ब्राझीलमध्ये मोठय़ा प्रमाणावर येऊ दिले जाणार नाही. त्याचबरोबर चाहत्यांचा उच्छाद रोखण्यासाठी या वेळी पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेदरम्यान व्ॉनिशिंग स्प्रेचा वापर केला जाणार आहे. पाण्यासारख्या असलेल्या या स्प्रेचा वापर केल्यानंतर काही मिनिटांतच तो हवेत विरून जातो. एखाद्या संघाला फ्री-किक मिळाल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाच्या चाहत्यांचा त्रास होऊ नये, यासाठी या स्प्रेचा वापर केला जाणार आहे. १० यार्डापर्यंत या स्प्रेचा प्रभाव राहणार आहे.

वुई आर वन
फिफा विश्वचषकात अधिकृत गाणे असावे, अशी प्रथा १९६२पासूनच आहे. १९९८मध्ये रिकी मार्टिनच्या ‘कप ऑफ लाइफ’ या गाण्याने धुमाकूळ घातला. संपूर्ण जगाला ठेका धरायला लावणाऱ्या या गाण्याने विश्वचषक गाण्याला एक वेगळाच आयाम मिळवून दिला. त्यानंतर २०१०मध्ये सुप्रसिद्ध पॉपगायिका शकिरा हिने ‘वाका, वाका’ या गाण्यावर संपूर्ण जगाला नाचायला भाग पाडले. आता २०१४ विश्वचषकासाठी ‘वुई आर वन’ असा संदेश देणारे गाणे ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे. या वेळच्या स्पर्धेसाठी शकिराने ‘ला ला ला’ हे गाणे तयार केले. मात्र विख्यात पॉपगायिका जेनिफर लोपेझ आणि क्लॉडिया लेईट्टे यांचा सहभाग असलेले ‘वुई आर वन’ हे गाणे आता अधिकृत गाणे म्हणून ओळखले जाणार आहे. या गाण्याला आताच ४१ दशलक्ष चाहत्यांच्या हिट्स मिळाल्या आहेत.

अधिकृत बोधचिन्ह : फुलेको
ब्राझीलमधील सहा एजन्सीने तयार केलेल्या ४७ डिझाइन्सपैकी फुलेको याची २०१४च्या फिफा विश्वचषकासाठी अधिकृत बोधचिन्ह म्हणून निवड झाली आहे. मार्केटचा अभ्यास करून ५ ते १२ वर्षांखालील मुलांना फुटबॉलकडे आकर्षित करण्यासाठी हे बोधचिन्ह निवडण्यात आले. त्यानंतर या बोधचिन्हाच्या नावासाठी ऑनलाइनद्वारे चाहत्यांचा कौल मागवण्यात आला. १.७ दशलक्ष लोकांनी (४८ टक्के) फुलेको हे नाव सुचवले. तर ३१ टक्के लोकांनी झुझेको या नावाला तर २१ टक्के लोकांनी अमिजूबी या नावाला पसंती दर्शवली. फुटबॉल+इकोलॉजी या शब्दांचा संगम म्हणजे फुलेको.
विश्वचषक स्पर्धेचे आयोजन म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे असते. स्टेडियमची उभारणी, खेळाडूंच्या निवास स्थानाची निर्मित्ती, वाहतुक व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, आदरातिथ्य, स्वच्छता असे असंख्य मुद्यांची आघाडी एकाचवेळी सांभाळावी लागते. कोटय़वधी रुपये खर्ची घालून ब्राझीलमध्ये स्टेडियम्सची निर्मित्ती करण्यात येत आहे. मात्र त्याचवेळी देशातील नागरिकांच्या मूलभूत गरजाही पूर्ण होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिक अन्न, वीज, रस्ते अशा अत्यावश्यक गोष्टींपासून वंचित असताना क्रीडा विश्वाच्या महाकुंभमेळ्याचा घाट घालणे कितपत योग्य आहे असा सवालही उपस्थित केला जात आहे. प्रत्येक कार्यात अडचणी असतात, त्यातूनच मार्ग काढत कार्य सिद्धीस नेले जाते. नृत्य-उत्साह आणि जल्लोष यांच्यासाठी नावाजल्या जाणाऱ्या ब्राझीलकरांनी ठरवले तर फुटबॉल विश्वातील हा महासोहळा निर्धोकपणे होऊ शकतो. मात्र यासाठी ब्राझीलमध्ये दाखल होणारे खेळाडू, पदाधिकारी, चाहते यांच्या सुरक्षेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. स्पर्धेला हिंसाचाराचे गालबोट लागू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था सज्ज झाल्या आहेत. बेरोजगारी आणि गुन्हेगारी यांची युती कोणत्याही समाजाला बिघडवू शकते. दुर्देवाने ब्राझीलमध्ये सध्या लूटमार, हिंसाचार यांनी थैमान घातले आहे. प्रश्न-समस्या यांची तड लावणे देशातील सरकारवर अवलंबून आहे. घरी होणाऱ्या महाकार्याच्या निमित्ताने वैयक्तित हेवेदावे-अडचणी बाजूला सारत एकदिलाने पाहुण्यांचे स्वागत करण्याची गरज आहे. खेळ हा प्रत्येक समाजाचा अविभाज्य घटक असतो. त्यामुळे समाजात घडणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक कंगोरे निगडीत असतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नाचक्की करायची की जागतिक स्तरावर ब्राझीलचा झेंडा अभिमानाने फडकवायचा याचा निर्णय ब्राझीलकर जनतेवर आहे. खेळ सकारात्मक भावना रुजवतात. विश्वचषकाच्या निमित्ताने संकटे बाजूला ठेऊन नव्या दमाने, नव्या ऊर्जेने आणि उत्साहाने मुसमुसलेला ब्राझील अनुभवण्यासाठी जगभरातले चाहते आतूर आहेत. ब्राझीलकर त्यांचा विश्वास सार्थ ठरवतील याची खात्री आहे.

दृष्टिक्षेपात काही संघ
फुटबॉलच्या या महाकुंभमेळ्यात सहभागी होण्याची प्रत्येक संघाची इच्छा असते, पण ३२ संघांनाच प्रवेश देण्याचा नियम आहे. यजमान देशाला थेट प्रवेश दिला जातो. त्यामुळे ३१ जागांसाठी जबरदस्त चुरस पाहायला मिळते. या वेळी २०७ संघ या ३१ जागांसाठी एकमेकांशी झुंजत होते. आशिया गटातून ४-५, आफ्रिका खंडातून ५, उत्तर, मध्य अमेरिका आणि कॅरेबियन बेटांमधून ३-४ संघ, दक्षिण अमेरिकेतून ४-५ संघ, ओशियाना गटातून १ संघ तसेच युरोपमधून १३ संघ फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरतात.

त्यापैकी यजमान देश म्हणून ब्राझीलला फिफा विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला. फिफा विश्वचषकाच्या इतिहासातील ब्राझील हा सर्वात यशस्वी संघ आहे.

उत्तर मध्य अमेरिकन आणि कॅरेबियन देशांमधील गटातून मेक्सिकोला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागल्यामुळे त्यांच्यासाठी प्ले-ऑफ फेरीद्वारे फिफा विश्वचषकाचे दार खुले झाले.

सध्याच्या काळातील सर्वोत्तम संघ म्हणजे स्पेन. १४ वेळा विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या स्पेनसमोर जेतेपदासाठी ब्राझील, अर्जेटिनाचे आव्हान असणार आहे.

एएफसी गटातून ऑस्ट्रेलियाने जपानपाठोपाठ दुसरे स्थान पटकावून ब्राझीलच्या महासोहळ्यासाठी स्थान मिळवले आहे. चार वेळा फिफा विश्वचषकात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाला काही वेळा त्यांना एकही गोल न करताच बाहेरचा रस्ता धरावा लागला आहे.

दिदियर द्रोग्बा या जागतिक कीर्तीच्या खेळाडूने आयव्हरी कोस्टला चांगले दिवस दाखवून दिले. त्याची ही शेवटची विश्वचषक स्पर्धा असल्यामुळे तिसऱ्यांदा विश्वचषकात खेळणाऱ्या आयव्हरी कोस्टला या वेळी चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.

आशिया खंडातील बलाढय़ संघ म्हणजे जपान. त्यामुळेच सात वेळा विश्वचषकात खेळण्यासाठी जपानला पात्रता फेरीत फारशा आव्हानाला सामोरे जावे लागले नाही. आशिया चषकात नेहमीच सरस कामगिरी करणाऱ्या जपानसमोर आता दुसऱ्या फेरीपलीकडे मजल मारण्याचे आव्हान असणार आहे.

युरोप गटातील बलाढय़ संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंडकडे विश्वचषकाचा दावेदार म्हणून कायम पाहिले जाते.

तब्बल चार वेळा फिफा विश्वचषकावर नाव कोरणारा इटली हा ब्राझीलनंतरचा दुसरा यशस्वी संघ आहे.
२००६च्या अंतिम फेरीत मजल मारूनही महान फुटबॉलपटू झिनेदिन झिदानच्या डुक्करढुशीमुळे (हेडबट) फ्रान्सला विश्वचषकावर नाव कोरता आले नव्हते.

दक्षिण अमेरिकन गटात वर्चस्व गाजवणारा संघ म्हणजे लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेटिना. मेस्सी तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे.

फिफा विश्वचषकात ‘नया है यह’ अशी बोस्निया आणि हेझ्रेगोविनाची ओळख आहे. इराण आशिया खंडातील फुटबॉलमधील सुपरपॉवर आहे.

आफ्रिकन देशांमधील चषकाचा मानकरी ठरलेल्या नायजेरियाची ही चौथ्यांदा विश्वचषकवारी असणार आहे.

तीन जेतेपदे आणि तब्बल चार वेळा उपविजेतेपद अशा सात वेळा अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या जर्मनीसाठी पात्रता फेरीचा अडथळा पार करणे म्हणजे डाव्या हाताचा मळ साफ करण्यासारखेच.
‘वन मॅन आर्मी’ अशी पोर्तुगाल संघाची ओळख. नुकताच बलॉन डी’ऑर पुरस्कार पटकावणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या कामगिरीवर पोर्तुगाल संघ अवलंबून आहे.

कोनसाफ गटातून अमेरिकेने अन्य सर्व संघांवर सरशी साधून अव्वल स्थानासह दिमाखात फिफा विश्वचषकाची मुख्य फेरी गाठली आहे.