विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com

ज्या मातीतून निर्गुण निराकार रूप साकारायचे ती माती मिळेना, कारागीर ठिकठिकाणी अडकलेले, महागलेला कच्चा माल, उत्सव महिन्यावर येऊन ठेपले असतानाही ग्राहकांचा अल्प प्रतिसाद, आगाऊ रक्कम देऊन नोंदवलेल्या मूर्ती प्रत्यक्षात विकल्या जातील की नाही याची चिंता, शेकडो मूर्तीचं रद्द झालेलं परदेशप्रयाण, प्लास्टर ऑफ पॅरिसवर घातलेली आणि नंतर उठवलेली बंदी, प्रदीर्घकाळ सुरू राहिलेला उंचीमर्यादेचा खल.. करोनामुळे गणेशमूर्तिकारांच्या कानी रोज विघ्नाच्याच वार्ता पडत राहिल्या. वर्षभराच्या मेहनतीचं फळ चाखण्याची वेळ आलेली असताना हे वर्ष तर सोडाच पुढच्या वर्षी तरी ही संकटांची मालिका संपेल की नाही, असा प्रश्न गणेश मूर्तिकारांना पडला आहे.

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
loksatta viva Artificial Intelligence Lok Sabha Election social media
AIच्या गावात!

गणेशोत्सव ५-१० दिवसांचाच, पण भक्तांच्या कल्पनेतलं गणेशाचं रूप साकारण्यासाठी राज्यभरात हजारो मूर्तिकार वर्षभर राबत असतात. साधारण दसऱ्याला मातीची पूजा करून सुरू होणारं काम थेट गणेश चतुर्थीपर्यंत सुरूच राहातं. मधल्या काळात देवीच्या मूर्तीचं कामही सुरू असतंच. एकंदर गणेशमूर्ती घडवणं हा अनेकांसाठी उदरनिर्वाहाचा पूर्णवेळ आणि एकमेव स्रोत असतो. पण यंदा २५ मार्चला टाळेबंदी लागू झाल्यापासून सुरू झालेली संकटांची मालिका आजही संपलेली नाही.

कच्चा माल

मूर्ती साकारण्यासाठी जी माती वापरली जाते ती गुजरातमधल्या सौराष्ट्रातून विशेषत: भावनगरमधून आणली जाते. मूर्तीत भरण्यासाठी वापरला जाणारा काथ्या हा केरळमधून येतो. टाळेबंदीमुळे हा कच्चा माल मिळणं बंद झालं आणि अनेकांचं काम ठप्प झालं. देशव्यापी टाळेबंदी शिथिल करण्यात आल्यानंतरही विविध भागांत र्निबध कायम होते. त्यात मूर्तिकला अत्यावश्यक सेवांत गणली जात नसल्यामुळे कंटेनर, लॉरी अडकून पडण्याचे, अडवले जाण्याचे प्रकार सुरूच राहिले. आता माती उपलब्ध असली तरी काथ्याचा तुटवडा कायम आहे.

कारागीर

ज्यांचे कारागीर गावी गेले होते, ते तिथेच अडकून पडले. ई-पास मिळण्यातले अडथळे, एसटीची सुविधा नसणं, खासगी वाहनाने येण्यासाठी आकारले जाणारे अवाच्या सवा दर आणि मुंबई, पुण्यातल्या संसर्गाचा कहर पाहता इथे परतण्याची भीती वाटणं अशा विविध कारणांमुळे आजही अनेक कारखान्यांतले कारागीर परतलेले नाहीत. आज उत्सव महिन्यावर आलेला असताना काम संपण्यासाठी अनेकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेकांचं अख्खं कुटुंबं मिळून काम पूर्ण करण्याचा आटापिटा करत आहे.

नियमांचे घोळ

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मूर्तीची उंची चार फुटांपेक्षा अधिक असू नये, असे र्निबध २६ जून रोजी घालण्यात आले. आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकांत गर्दी होऊ नये, कमीत कमी कार्यकर्त्यांमध्ये मूर्ती आणता यावी यासाठी ही मर्यादा घालण्यात आली. ११ जुलैला गृह मंत्रालयाचे मुख्य सचिव अमिताभ गुप्ता यांनी एक परिपत्रक काढलं आणि घरगुती गणेशमूर्तीच्या उंचीवर दोन फुटांची मर्यादा घातली, पण तोवर अनेकांच्या मूर्ती नोंदवून झाल्या होत्या. मूर्तीच्या उंचीवरून दरवर्षी घातला जाणारा घोळ यंदाही इमानेइतबारे दीर्घकाळ ताणण्यात आला. धातू किंवा संगमरवरी मूर्तीची स्थापना करावी. शक्य असल्यास विसर्जन पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवात किंवा माघी गणेशोत्सवाच्या वेळी करावं, असंही त्या परिपत्रकात सुचवण्यात आलं होतं. उंच मूर्तीला परवानगी देण्यात यावी यासाठी लालबागचा राजा, जीएसबीसारख्या गणेशोत्सव मंडळांनी केलेला दांडगाईचा प्रयत्न सरकारने हाणून पाडला.

गणेशमूर्तीबाबत प्रत्येक घराची काही एक खास परंपरा असते. यानिमित्ताने संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. गणरायाला वाजत-गाजत घरी आणतं. पण यंदा हा सगळा उत्साह दिसणार नाही. एकाच शहरात राहणारे नातेवाईकही एकत्र येणं कठीण असताना वेगळ्या जिल्ह्य़ात किंवा राज्यात राहणारे नातेवाईक येणं तर शक्यच नाही. अनेक घरांमध्ये एकटय़ा-दुकटय़ा ज्येष्ठांनाच यंदा प्रथा पार पाडावी लागणार आहे. गणरायाची अवजड मूर्ती उचलून आणणं कठीण जाऊ शकतं हे लक्षात घेऊन अनेकांनी दरवर्षीपेक्षा लहान मूर्ती घेण्याला प्राधान्य दिलं आहे. यंदा जलाशयात विसर्जन करणं शक्य होईल की नाही, याविषयी दीर्घकाळ संभ्रमाचं वातावरण होतं. घरच्या घरी विसर्जन ही कल्पनाच अनेकांना न पचणारी आहे. त्यामुळे काही कुटुंबांनी या वर्षी गणपती आणायचाच नाही, असा निर्णय घेतला, काहींनी सोन्या-चांदीच्या मूर्तीची पूजा करून प्रतीकात्मक विसर्जन करण्याचा पर्याय स्वीकारला, तर अनेकांनी अतिशय लहान आकाराची मूर्ती नोंदवली. त्यामुळे मूर्तिकारांना नेहमीच्या तुलनेत बराच तोटा सहन करावा  लागणार आहे.

कारखाने आणि मंडप

कोणत्याही मूर्तिशाळेत गेलात तरी माती, रंग, साचे यांच्या गर्दीत दाटीवाटीने बसलेले कामगार हे दृश्य थोडय़ा फार फरकाने सारखंच असतं. कोविडमुळे आता ते शक्य नाही. कामगारांमध्ये किमान तीन फुटांचं अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, पण त्यामुळे जागा अपुरी पडू लागल्याचं मूर्तिकार सांगतात. मुंबईत असे अनेक मूर्तिकार आहेत, ज्यांच्या स्वत:च्या जागा नाहीत. ते गणेशोत्सवापूर्वी काही काळ मंडप उभारून त्यात काम करतात. पण मंडपांना पालिकेकडून परवानगी मिळण्यास विलंब होणं, मंडपात पाणी साचून नुकसान होणं या दरवर्षी भेडसावणाऱ्या समस्या यंदाही कायम राहिल्या. यंदा कमी मागणीमुळे काही मूर्ती शिल्लक राहिल्या तर त्या कुठे ठेवायच्या, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काही विक्रे ते पेण परिसरातून मूर्ती आणून विकतात. त्यापैकी काही जण एखादं दुकान तात्पुरतं भाडय़ाने घेतात, तर काही जण मंडप उभारून विक्री करतात. अशांपैकी काहींना पालिकेची परवानगी मिळालेली नाही. ज्यांना मिळाली आहे, त्यांना उरलेल्या मूर्ती वर्षभर जपून ठेवण्यासाठी जागेचा शोध घ्यावा लागणार आहे.

निर्यात

जागाच्या कानाकोपऱ्यांत जिथे जिथे भारतीय आहेत, तिथे गणेशोत्सव साजरा होतो. त्यासाठी गणेशमूर्ती मात्र भारतातूनच नेल्या जातात. अनेकदा उन्हाळी सुटीत मूळ गावी परतलेले भारतीय सुटी संपवून पुन्हा परदेशात जाताना मूर्ती घेऊन जातात. काही जण इथे न येता

तिथूनच मूर्ती मागवतात. अशा सर्वच मूर्ती साधारण मार्च, एप्रिलमध्ये रवाना केल्या जातात. पण यंदा याच काळात अख्खं जग बंद पडलं, त्यामुळे घटलेल्या मागणीचा फटका अनेक मूर्तिकारांना बसला.

अनिश्चिततेचं सावट

मूर्तिकला हा ज्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे, त्यांच्याकडे दरवर्षी आषाढ संपेपर्यंत किमान ६० टक्के तरी मूर्तीची नोंदणी झालेली असते. पण यंदा आधीच मागणी कमी आहे. त्यात गणेशोत्सवाच्या तोंडावर नेमका आपल्या कारखान्याचा परिसर किंवा आपले ग्राहक राहात असलेला परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर झाला, काही ग्राहकांना करोनाचा संसर्ग झाला तर काय, असा प्रश्न प्रत्येकच मूर्तिकाराला पडला आहे. काही कुटुंबांत अनेक पिढय़ांपासून एका ठराविक मूर्तिशाळेतूनच मूर्ती आणण्याची प्रथा असते. उपनगरांतूनच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्य़ांतूनही गिरगाव, लालबागमधल्या आपल्या ठरलेल्या कारखान्यात येऊन मूर्ती घेऊन जाणारी अनेक कुटुंबं आहेत. असे दूर राहणारे पिढीजात ग्राहक प्रवासावरच्या र्निबधांमुळे कारखान्यापर्यंत पोहोचूच शकले नाहीत, तर त्यांनी नोंदवलेल्या मूर्तीही पडून राहणार आहेत. त्यामुळे २२ ऑगस्टलाच काय तो निकाल लागेल. तोपर्यंत काहीच सांगता येत नाही, असं प्रत्येक मूर्तिकाराचं म्हणणं आहे. या अनिश्चिततेच्या वातावरणात प्रत्येकाला काम करावं लागत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती यंदा शिल्लक राहिल्या आणि पुढच्या वर्षी त्यावर बंदी घालण्यात आली तर होणारं नुकसानही सोसावं लागणार आहे.

मूर्तिकारांसाठी वर्षांनुर्वष काम करणारे कारागीर टाळेबंदीमुळे अडकून पडले असले, कारखान्यात येऊ शकत नसले, तरीही त्यांना आर्थिक मदत करावी लागत आहेच. ज्यांनी या व्यवसायासाठी कर्ज काढलं आहे, त्यांची अवस्था तर अधिकच गंभीर आहे. विघ्नहर्त्यांची प्रतिमा साकारणारे सध्या आपल्यासमोर उभी ठाकलेली विघ्नांची मालिका सरण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

व्यवसायात २५-३० टक्के घट

या महासाथीमुळे आमच्या व्यवसायात यंदा २५ ते ३० टक्के घट झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं दरवर्षी ६-८ फुटांच्या मूर्ती तयार करवून घेत. पण यंदा उंचीवर घालण्यात आलेल्या र्निबधांमुळे मंडळांसाठी साडेतीन ते चार फुटांच्याच मूर्ती साकारल्या आहेत. १० दिवस रंगणारा हा उत्सव यंदा दीड दिवसांत आटोपता घेण्याचा निर्णय अनेक मंडळांनी घेतला आहे. घरगुती गणेशमूर्तीच्या ग्राहकांनीही यंदा अतिशय छोटय़ा मूर्तीची मागणी केली आहे. कारागिरांचा तुटवडा आहे. आमचे तीन-चार कारागीर होळीनिमित्त कोकणात गेले होते. ते अद्याप परत येऊ शकलेले नाहीत. मुंबईतला वाढता प्रादुर्भाव पाहता, काहींचे कुटुंबीयही त्यांना परत पाठवण्यास तयार नाहीत. आमचं पूर्ण कुटुंब या व्यवसायात आहे. कारागिरांची कमतरता भरून काढण्यासाठी ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’ आणि ‘इंडियन आर्ट इन्स्टिटय़ूट’च्या काही विद्यार्थ्यांची मदत घेत आहोत. सध्या एकूण १० कारागीर काम करत आहेत. आम्ही सर्वजण योग्य अंतर राखून काम करतो. सर्वजण मास्क लावतात. शक्य ती सर्व काळजी घेतली जाते.

राजस्थान, गुजरातमधून माती येत नव्हती. त्यामुळे मातीचा तुटवडा होता. रंग तयार करणाऱ्या कंपन्या बंद होत्या. रंगांचा व्यवसाय करणाऱ्या बोहरी समाजानेही बराच काळ दुकानं बंद ठेवली. आताही पी-१ पी-२ धोरणामुळे त्यांची दुकानं आठवडय़ातून अवघे तीनच दिवस खुली ठेवली जात आहेत. त्यामुळे ते नवा माल भरणं टाळत आहेत. कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत, त्यामुळे मूर्तीच्या निर्मिती खर्चात १० टक्के वाढ झाली आहे. पण या कठीण काळात ग्राहकांवर खर्चाचा आणखी बोजा टाकणं योग्य नाही. अनेकांबरोबर आमचे ७०-८० वर्षांपसूनचे उत्तम संबंध आहेत. त्यामुळे किमतीत वाढ केलेली नाही. आमचा कारखाने गिरगावात असला, तरी ग्राहक बोरीवली, नालासोपारा, नाशिक, औरंगाबाद, कोकण, गोव्यापासून ऑस्ट्रेलिया, दुबई,  इंग्लंड, अमेरिका, कॅनडापर्यंत पसरलेले आहेत. पण यंदा ते आमच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. ग्राहकांपैकी अनेकजण एकटे वयोवृद्ध आहेत. ते तर या भयावह स्थितीत घराबाहेर पडतील, असं वाटत नाही.

– प्रदीप मादुस्कर, मूर्तिकार, गिरगाव.

पेणच्या मूर्तिकारांसमोर संकटांची मालिका

पेणमधले कारागीर आपल्या अंगभूत कलेच्या जोरावर रोज ८०० ते हजार रुपये कमवतो. पण सध्या या सर्वांच्याच उपजीविकेचा प्रश्न गंभीर झाला आहे. गणेशमूर्तीकला ही पेणची ओळख आहे. इथे वर्षभर मूर्ती साकारल्या जातात. त्यामुळे माती, रंग आधीच आणून ठेवले होते. टाळेबंदी असतानाही इथे कच्च्यामालाचा तुटवडा नव्हता. पण कारखाने बराच काळ बंद राहिले आणि आताही र्निबधांमुळे ठिकठिकाणचे कारखाने अधूनमधून बंद ठेवावे लागत आहेत.

पेणमधल्या गणेशमूर्तिकारांच्या मागे लागलेली संकटांची मालिका संपायचं नावच घेताना दिसत नाही. दरवर्षी मार्च, एप्रिलपासून इथलं काम वेग घेतं. याच काळात कारखान्यांमध्ये रात्रंदिवस काम सुरू होतं. नेमक्या त्याच वेळी टाळेबंदी लागू झाली. हाच काळ निर्यातीच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असतो. परदेशांत जाणाऱ्या मूर्ती मार्च, एप्रिलमध्ये पाठवाव्या लागतात. तेव्हाच त्या तिथे वेळेत मिळतात. पण जगभर सर्वत्रच साथीने थैमान घातलेलं असल्यामुळे परदेशांतूनही मूर्तींना मागणी नव्हती आणि असती, तरी त्या पाठवणं शक्य नव्हतं. आजही जेएनपीटी किंवा पुण्यातल्या एक्सपोर्ट एजंटकडून असलेली मागणी कमीच आहे. त्यामुळे व्यवसायाचं २०-३० टक्के नुकसान झालं आहे.

टाळेबंदी उठवली जाऊन व्यवसाय सुरू होतो न होतो, तोच प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी घालण्यात आली. पेण हे पूर्वापार मातीच्या मूर्तींसाठी ओळखलं जात असलं, तरी प्रत्यक्षात आता इथे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती मोठय़ा प्रमाणात तयार केल्या जातात. त्यावरच बंदी घालण्यात आल्यामुळे मूर्तिकारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. पुढे ही बंदी उठवण्यात आली. पण त्या काळात थांबलेल्या कामाचा फटका बसलाच. हे संकट टळतं ना टळतं तोच पेण तालुक्याला निसर्ग चक्रीवादळाने झोडपून काढलं. त्यात ५ -१० कारखान्यांवरचे पत्रेच उडून गेले. या मूर्ती पाण्यात विरघळण्यासाठीच तयार केलेल्या असतात. त्यामुळे पत्रे उडाल्यानंतर, पाऊस पडत असताना त्या वाचणं शक्य नव्हतंच. त्या कारखान्यांचं १५-२० लाखांचं नुकसान झालं. हे नुकसान साधारण दोन टक्केच असलं, तरी ज्यांच्याबाबतीत ते घडलं त्यांच्यासाठी हा मोठाच फटका होता. शिवाय वीज खंडित झाल्यामुळे सर्वांच्याच कामात अडथळे आले.

पेणच्या परिसरात म्हणजे हमरापूर, जोहा, वडाव अगदी उरणपर्यंत गणपतीचे सुमारे दीड हजार कारखाने आहेत आणि त्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या साधारण दोन लाख लोकांची उपजीविका अवलंबून आहे. मुंबईत गणेशोत्सवापूर्वी तात्पुरती दुकानं थाटून मूर्तींची विक्री करणाऱ्यांपैकी अनेक जण या भागांतून मूर्ती मागवतात. पण यंदा मुंबईत अशा पदपथांवरच्या, उड्डाणपुलांखालच्या अनेक दुकानांना परवानगी नसल्यामुळे त्यांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.

पेणमधल्या शाडूच्या मूर्तींना मुंबईच नव्हे, तर नागपूर, नाशिक, औरंगाबादपर्यंत विविध भागांतून मोठी मागणी असते. पण एरवी ४००-५०० मूर्ती मागवणारे विक्रेते यंदा २००च्या आसपास मूर्ती मागवत आहेत. विकल्या गेल्या नाहीत, तर काय, याची चिंता त्यांना आहे.

पेणमधल्या मूर्तिकारांनी बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बॅंकेकडून कर्ज घेतली आहेत. मूर्तिकारांना विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा आकडा २५ कोटींच्या घरात आहे. जवळपास प्रत्येक कारखान्यावर ५-१० लाखांचं कर्ज आहे, त्याचे हप्ते कसे फेडायचे हा प्रश्न कारखान्यांच्या मालकांना भेडसावत आहे.

– श्रीकांत देवधर, अध्यक्ष, श्री गणेश मूर्तिकार व्यावसायिक, कल्याणकारी मंडळ.

मूर्तिकारांविषयी सरकार उदासीन

चीनमध्ये करोनाची साथ पसरल्याच्या बातम्या डिसेंबरपासून येऊ लागल्या. त्यामुळे माघी गणेशोत्सव झाला, तरी कामाला दरवर्षीप्रमाणे वेग आला नव्हता. मार्चमध्ये टाळेबंदी लागू झाली आणि मूर्तिकारांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला. माती मिळेनाशी झाली. मंडप घालणं शक्यच नव्हतं. परवानगी नव्हती आणि असती, तरी त्या भीतीच्या वातावरणात, लोक शेजारच्या घरात जात नव्हते तेव्हा मंडप उभारून काम करण्याच्या मन:स्थितीत कोणीच नव्हतं. आमच्या बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघटनेने गुजरातमधून माती मागवून मूर्तिकारांना पुरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले, पण वापीतून दोन कंटेनर परत पाठवले गेले. बराच प्रयत्न केल्यानंतर पोलिसांच्या सहकार्यामुळे माती कशीबशी मुंबईत पोहोचली. बहुतेक मूर्तिकार चाळीत राहतात. इमारतींत राहणाऱ्यांचीही वन रूम किचन किंना वन बीएचके घरं आहेत. एवढय़ा अपुऱ्या जागेत मूर्तिकला करणं हे आव्हानच होतं. पण पर्याय नसल्यामुळे अनेकांनी घरातच जमेल, तसं काम सुरू केलं.

न्यायालय, सरकार निर्णय घेऊन मोकळं होतं पण त्याचे अनेक दुष्परिणाम आम्हाला सहन करावे लागतात. मध्येच प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी घातली गेली. उत्सव तोंडावर आलेला असताना, अनेकांनी मूर्ती तयार केलेल्या असताना अशी बंदी घालणं अन्यायकारक आहे. विशेषत: या साथीमुळे  मूर्तिकारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झालेला असताना, तर असे र्निबध घालणं अयोग्यच होतं. नंतर यंदापुरते तरी हे र्निबध शिथिल करण्यात आले, पण त्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला. असे नियम किमान वर्षभर आधी केले पाहिजेत. उंचीवर घातलेले र्निबध योग्यच आहेत. लालबागच्या राजाला उंच मूर्तीची परवानगी दिली असती, तर कितीही टाळण्याचा प्रयत्न केला असता, तरी गर्दी झाली असतीच.

सरकार, पालिका एकीकडे नियम र्निबध घालत आहेत, पण मूर्तिकारांना सुविधा देण्याविषयी मात्र कोणतीही पावलं वेळेत उचलण्यात येत नाहीत. मूर्तिकामासाठी मंडप उभारण्याच्या परवानग्या पालिकेने उत्सवाला जेमतेम महिना शिल्लक असताना- गेल्या आठवडय़ात दिल्या. कारागिरांना कच्चा माल मिळावा म्हणून कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करण्यात आलेले नाहीत.

यात भरीस भर म्हणून यंदा शिवसेना, भाजपने मोफत मूर्ती वाटपाची टूम काढली आहे. या मूर्ती पेणहून आणल्या जाणार आहेत आणि त्या मुंबईत मोफत दिल्या जाणार आहेत. यात स्थानिक कारागिरांचं नुकसान आहे. राजकीय पक्ष आगामी महापालिका निवडणुका नजरेसमोर ठेवून जर हे करत असतील, तर त्यांनी सॅनिटाझर, मास्क वाटावेत. मूर्तीच द्यायच्या असतील, तर स्थानिक कारागिरांकडून खरेदी करून त्या द्याव्यात. घाटकोपर, कांदिवली, चांदिवली, काळाचौकी, मालाड, वांद्रे परिसरात अशा प्रकारे मूर्ती दिल्या जाणार आहेत. प्रवीण दरेकर, आशीष शेलार, मुरजी पटेल, नितीन डिचोलकर यांनी त्यात पुढाकार घेतला आहे.

– श्रेयस वारणकर, मूर्तिकार, परळ गाव.

माती पुरवठादारांना फटका

मूर्तिकलेसाठी माती पुरवण्याचा आमचा व्यवसाय वर्षभर सुरू असतो. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, विश्वकर्मा पूजा अशा काही ना काही निमित्तांनी मागणी सतत सुरूच असते. पण मुंबईत सर्वाधिक मागणी गणेशमूर्तीसाठीच असते. आम्ही दरवर्षी गुजरातमधल्या भावनगर आणि पालेजमधून दोन कंटेनर माती आणतो. ४०-४० किलोच्या गोणींमधून साधारण २५ टन माती आणली जाते. यंदा योगायोगाने टाळेबंदी लागू होण्याच्या सुमारासच आमचे कंटेनर मुंबईत पोहोचले. त्यामुळे माल उपलब्ध होता पण तो उतरवण्यात, ठिकठिकाणच्या मूर्तिकारांपर्यंत पोहोचवण्यात अडथळे आले. माझं गोदाम रे रोडला आहे. तो परिसर रेड झोनमध्ये होता. त्यामुळे माल उतरवण्याची परवानगी नव्हती. उतरवणारे कामगार आपापल्या गावी जाण्यासाठी मुंबईतून निघाले होते. त्यामुळे कामगार मिळेनात. कसेबसे उरले सुरले कामगार गोळा करून त्यांना नेहमीपेक्षा अधिक मजुरी देऊन माल उतरवला. पुढे इथून गोण्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यातही अनेक अडथळे आले. मातीचे ट्रक अत्यावश्यक सेवेत मोडत नाहीत. त्यामुळे कधी भाजीच्या ट्रकमधून तर कधी दंड भरून माती ग्राहकांपर्यंत पोहोचवली. पण त्यामुळे वाहतूकदारांना फेरीमागे नेहमीपेक्षा साधारण हजार-दीड हजार रुपये जास्त पैसे द्यावे लागत होते. मातीच्या भावात कोणतीही वाढ झालेली नाही. पण माल उतरवणाऱ्यांची मजुरी, वाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे खर्च वाढला. आमचे ग्राहक वर्षांनुवर्षांपासूनचे आहेत. त्यामुळे आम्ही भाववाढ केली नाही. मागणीत मात्र मोठी घट झाली. पालिका कोविडशी झुंजण्यात व्यग्र होती, त्यामुळे मूर्तिकारांना मंडप बांधण्याची परवानगी मिळण्यास महिनाभर उशीर झाला. त्यामुळे अनेकांनी यंदा मूर्ती तयारच न करण्याचा निर्णय घेतला. काही मूर्तिकारांचे कारागीर गावी अडकून पडले तर काही मूर्तिकार स्वतच गावी अडकले होते. काहींचे कारखाने बराच काळ रेड झोनमध्ये होते.  त्यामुळे माती पोहोचवणं शक्य नव्हतं. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूर्तीना मोठय़ा प्रमाणात माती आवश्यक असते. पण यंदा या मूर्तीवरही उंचीची मर्यादा असल्यामुळे मूर्तिकारांना जास्त मातीची गरज राहिलेली नाही. अशा अनेक कारणांमुळे यंदा मागणीवर आणि पर्यायाने उत्पन्नावर फार मोठा दुष्परिणाम झाला आहे.

– पीयूष पटेल, माती पुरवठादार

कोकणात मागणी जैसे थे!

आमच्या जैतापूरमध्ये एकच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. बाकी सगळे घरगुती गणपती आहेत. कोकणात मूर्तीना असलेल्या मागणीत फारसा फरक पडलेला नाही. पण उंचीत फरक पडला आहे. ग्राहकांनी दोन-अडीच फुटांपेक्षा मोठी मूर्ती घेणं टाळलं आहे. आमचे कारागीर स्थानिकच आहेत, त्यामुळे कारागीर अडकून पडल्याची समस्या उद्भवली नाही, पण मूर्तीसाठी माती मिळवण्यात अडथळे आले. दरवर्षी आम्ही कणकवलीतल्या डीलरकडून ६० गोणी माती आणतो. पण यंदा टाळेबंदीमुळे माती वेळेत मिळू शकली नाही. २५ गोणीच माती मिळाली, त्यातून ५० गणपती घरी तयार केले. पण वर्षांनुवर्षांच्या ग्राहकांना नकार देऊ शकत नाही. त्यामुळे उरलेले गणपती पेणहून मागवले आणि मागणी पूर्ण केली. किमतीत फारशी वाढ झालेली नाही.      – राजेंद्र मांडवकर, जैतापूर.

पुण्यात कच्च्या मालाचा तुटवडा

पुण्यात तीन महिने कच्चा माल मिळतच नव्हता. काही कारखाने वर्षभर सुरू राहतात, त्यांच्याकडे माती शिल्लक असते. त्यातून त्यांनी लहान मूर्ती तयार केल्या. पण बाकीच्या मूर्तिकारांपुढे कच्च्या मालाचा प्रश्न आ वासून उभा होता. काही मूर्तिकार कर्ज काढून कच्चा माल खरेदी करतात. काही जण माल उधारीवर घेतात आणि मूर्तीची विक्री केल्यावर पैशांची परतफेड करतात. त्यांची पूर्ण भिस्त विक्री किती प्रमाणात होते यावर असते. अशांसाठी टाळेबंदीचा मार्चचा मुहूर्त योग्यच ठरला. टाळेबंदी एक-दीड महिना उशिरा सुरू झाली असती, मूर्तिकारांनी कर्ज घेऊन किंवा उधारीवर माल खरेदी केला असता आणि नंतर मूर्तीची विक्री झाली नसती तर त्यांना मोठाच फटका बसला असता. आता एवढय़ा उशिरा मूर्ती तयार कधी करणार, ती सुकणार कधी, रंग कधी देणार या विचाराने अनेक मूर्तिकारांनी यंदा काम बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात मूर्तीना असलेली मागणी मात्र कमी झालेली नाही.            – अभिजीत धोंडफळे, मूर्तिकार, पुणे