ओंकार वर्तले – response.lokprabha@expressindia.com

गणेशोत्सवात घरी आलेल्या गणरायांची आराधना केली जाते, तसेच अनेक भाविक आपापल्या परिसरातल्या मंदिरांत जाऊनही गणेशाचं दर्शन घेतात. गणेशाची लहान-मोठी, प्रसिद्ध, फारशी माहीत नसलेली अशी मंदिरं सर्वत्र पाहायला मिळतात. सह्य़ाद्रीच्या कुशीतही अशी अनेक सुंदर मंदिरं दडलेली आहेत. आडवाटेवरच्या जंगलांत, गडकोटांची वाट तुडविताना, पर्यटकांना, फिरस्त्यांना गणेशाच्या विविध रूपांचं दर्शन घडतं. पूर्वी संघर्षांच्या, युद्ध- लढायांच्या काळात राजावर, रयतेवर कृपाछत्र असावं म्हणून बहुतेक गडकिल्ल्यांवर तसंच त्यांच्या पायथ्याच्या गावात गणेशाच्या रूपानं एक अधिष्ठान असायचंच. अशा गडकिल्ल्यांवरच्या तसंच दुर्गम भागांतल्या काही गणेश मंदिराची सफर..

गणपती गडद

ठाणे जिल्ह्य़ाच्या पूर्वेला आणि पुणे जिल्ह्य़ाच्या पश्चिमेला खेटून असणाऱ्या सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांतील दुर्ग धाकोबा किल्ल्याच्या कुशीत गणपती गडद नावाची लेणी कोरलेली आहेत. नावातच गणेशाचं अस्तित्व घेऊन असलेली ही लेणी आपली उत्सुकता चाळवल्याशिवाय राहात नाहीत. नाणे आणि दाऱ्या अशा दोन प्राचीन घाटवाटा, जीवधन किल्ला आणि दुर्ग धाकोबा अशा इतिहासाने नटलेल्या भूगोलाचा परीघ गणपती गदाडचं सौंदर्य आणखी खुलवतो. माळशेज घाटाच्या ठाणे जिल्ह्य़ाच्या बाजूने एक फाटा मुरबाड तालुक्याच्या पळू-सोनावणे गावात जातो. या गावातूनच वाटाडय़ा घेऊन या लेणींकडे कूच करायची. साधारण दोन तासांच्या खडय़ा चढाईनंतर आपण या लेणींपाशी येतो. आडव्या कोरलेल्या या समूहात एकूण सात लेणी आहेत. यातली मुख्य लेणी दुमजली वर जाण्यासाठी पायऱ्या खोदलेल्या आहेत. या लेणींच्या प्रवेशद्वारपट्टीवर मधोमध गणेशाची अतिशय सुरेख प्रतिमा कोरलेली आहे. या प्रतिमेवरूनच या लेणींना गणपती गडद असं नाव पडलं आहे. लेणींमध्ये गणेशाची ही प्रतिमा आवर्जून पाहावी अशीच आहे.

मुल्हेर किल्ल्यावरील गणपती

महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असणाऱ्या नाशिकमधील बागलाण प्रांतातला ‘मुल्हेर’ किल्ला माहीत नाही असा अस्सल दुर्गप्रेमी अथवा इतिहासप्रेमी सापडणं तसं दुर्मीळंच! मुल्हेर त्याच्या दुर्गमतेसाठी आणि प्राचीन इतिहासामुळे जेवढा ओळखला जातो, तेवढाच तो त्याच्यावर असणाऱ्या सोमेश्वर आणि गणेश मंदिरामुळेसुद्धा ओळखला जातो. ही गोष्ट फारच कमी जणांना माहीत आहे. पायथ्याच्या धनगरवाडय़ापासून साधारण पाऊण तासांतच गडाचे तीन दरवाजे पार करून आपण मुल्हेर माचीवर हजर होतो. अन् समोर पाहिलं की बांधीव तलावातल्या पाण्यात उमटलेलं स्वत:चंच रूप पाहत दंग झालेलं गणेश मंदिर मोठय़ा दिमाखात उभं असलेलं दिसत. मंदिराच्या सभामंडपात तीन कमानींची तीन दालनं आणि त्यावर नक्षीकाम केलेलं दिसतं. साधारण मध्ययुगात उभारलेलं हे मंदिर पाहाणं हा आपल्यासाठी  खरोखरच आनंदाचा क्षण! तसं पाहिलं तर गड-किल्ल्यांवर गणेश मंदिरं तशी फारशी दिसत नाही. कित्येक मंदिरांची पडझड, दुरवस्था झालेली आहे. यातील बहुतेक मंदिरं दुर्लक्ष झाल्यामुळेच जास्तच मोडकळीला आली आहे. त्यामानाने इथलं  गणेश मंदिर चांगल्या स्थितीत आहे आणि तत्कालीन स्थापत्यशास्त्राचा वारसा त्यात प्रतिबिंबित झालेला दिसतो.

पेबचा कडय़ावरील गणपती

माथेरानमध्ये पेबचा प्रसिद्ध किल्ला आहे. याच पेबच्या जवळ असलेला प्रसिद्ध असा कडय़ावरचा गणपती आवर्जून पाहावा असाच आहे. पेबला येण्यासाठी सर्वप्रथम नेरळला यावं लागतं. तिथून थेट माथेरानचा रास्ता पकडायचा. घाट रास्ता चढून गेलो की वॉटर पाइप नावाचं स्टेशन लागतं. माथेरानच्या प्रसिद्ध मिनी ट्रेनचं हे मिनी स्टेशन. तिथूनच पेब किल्ल्याकडे एक पायवाट जाते. हे ठिकाण ओळखण्यासाठी आणखी एक महत्त्वाची खूण म्हणजे ‘कडय़ावरचा गणपतीकडे’ ही पाटी. एकदा ही वाट समजली की मग रेल्वे ट्रकच्या कडेकडेनेच चालत निघायचं. उजव्या बाजूला दरी, डाव्या बाजूला डोंगराची भिंत आणि यामधूनच गेलेला रेल्वे ट्रॅक अशा आकर्षक पायवाटेवरून आपली वाटचाल सुरू असते. तासाभरातच आपण एक कमानीपाशी पोहोचतो. या कमानीपासून आणखी थोडं पुढे जायचं आणि दुसऱ्या कमानीपाशी येऊन थांबायचं. उजव्या बाजूला असणाऱ्या आश्चर्याकडे पाहायचं. या बाजूला डोंगराच्या सुळक्याला गणपतीचा आकार प्राप्त झालाय. दगडाच्या या वैशिष्टय़पूर्ण आकाराला अगदी आकर्षकपणे रंगवलंसुद्धा आहे. तिथून या आकाराचं फार सुंदर दर्शन होतं. अगदीच या कडय़ावरचा गणपतीच्या पायापाशी जायचं असेल तर पहिल्या कमानीपासून एक वाट खाली गेली आहे.

दातेगडावरील महागणपती

सातारा जिल्ह्य़ातील पाटण तालुक्यात दातेगड  किल्ला वसलेला आहे. यालाच सुंदरगड असही म्हटलं जातं. पाटणपासून केवळ सहा किलोमीटरवर हा गड आहे. गडापर्यंत पोहोचण्यासाठी कराड-कोयनानगर मार्गावरील पाटण गाठावं लागतं. गावातून चाफोली रोड जातो, त्या रस्त्याने १५ मिनिटं चालल्यानंतर डाव्या बाजूलाच लाल मातीची मळलेली पायवाट दिसते. या पायवाटेने थोडं पुढे गेल्यावर दातेगडावरून उतरत आलेल्या डोंगरधारेस भिडायचं. तिथून १५ मिनिटांत गडावर पोहोचता येतं. या गडावर तलवारीचा आकार असलेली भव्य विहीर आहे. तलवार विहिरीपासून जवळच अखंड खडकात खोदलेल्या गणपती आणि मारुतीच्या सुंदर मूर्ती आहेत. पाहताक्षणीच स्तब्ध व्हावं असं या मूर्तीचं शिल्पकाम आहे. गणपतीची तर ही सर्व गड-किल्ल्यांवर असणाऱ्या मूर्तीपैकी सर्वात मोठी आणि सुस्थितीतली मूर्ती असावी. या मूर्तीपाशी जाण्यासाठी काही पायऱ्या उतराव्या लागतात. चौकोनी आकाराच्या खोदकामात दक्षिणाभिमुख गणपतीची  मूर्ती दिसते. नऊ फुटांच्या कमानींमध्ये साधारण सहा फूट उंच असलेल्या या मूर्तीचे कान जास्वंदाच्या आकाराचे आहेत. ही मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची सोंड उजव्या बाजूला आहे. मूर्ती चतुर्भुज असून मागील हातांमध्ये परशु आणि अंकुश आहेत. सूर्योदयाला सूर्यकिरणं थेट गणपतीच्या मूर्तीवर पडतात.

पाटेश्वराच्या शिवपिंडीतील गणेशमूर्ती

भक्ती आणि निसर्ग यांचा सुरेख संगम जर कुठे पाहायचा असेल, तर पाटेश्वरशिवाय दुसरा पर्याय असूच शकत नाही. साताऱ्याजवळील हा सारा मुलुखच डोळ्यांचं पारणं फेडणारा आहे. साताऱ्याहूनच रहीमतपूर फाटय़ामार्गे देगांव आणि थेट पाटेश्वर डोंगराकडेच निघायचं. स्वत:ची गाडी असेल, तर आपण अध्र्या डोंगरापर्यंत जाऊ शकतो. जिथे डांबरी रस्ता  संपतो तिथेच गाडी लावायची. येथूनच एक ठसठशीत पायवाट थेट डोंगरमाथ्याकडे जाते. पायऱ्यांच्या सुरुवातीलाच गणेशाची फारच सुबक मूर्ती कोरलेली आहे. तिथून आपण अध्र्या तासातच पाटेश्वरच्या लेणींकडे जाते. मुळात पाटेश्वर प्रसिद्ध आहे ते विविध आकार प्रकारांच्या शिवपिंडींसाठी. हे शिवपिंडीचं साम्राज्य नवख्या माणसाला अक्षरश: श्वास रोखून धरायला लावतं. याच ठिकाणी एक वेगळीच गणेशमूर्ती पाहायला मिळते. शेंदूर लावलेल्या या मूर्तीच्या शेजारी दोन्ही बाजूंना एक-एक स्त्री प्रतिमा कोरलेली आहे. गणेशाच्या उजव्या बाजूच्या स्त्रीच्या हातात चवरी आणि चक्र आहे, तर डाव्या बाजूच्या स्त्रीच्या हातात चवरी तर एक हात कमरेवर आहे. काहींच्या मते त्या गणपतीच्या दासी आहेत, तर काहींच्या मते त्या रिद्धी-सिद्धी आहेत. विशेष म्हणजे गणपतीची मूर्तीही आराम करतानाच्या अवस्थेत आहे.

धावडशीतला गणेश

सातारा जिल्ह्य़ातील जावळी तालुक्यातील धावडशी  हे नाव बऱ्याच लोकांना माहितीदेखील नाही. सातारवासी आणि काही मोजके पर्यटक सोडले तर हे नाव तसं अपरिचितच. पण इतिहास-धार्मिकता आणि वास्तुस्थापत्याच्या चष्म्यातून जर बघितलं तर या गावाचं महत्त्व कैकपटींनी जास्त आहे हे लक्षात येईल. जावळी तालुक्यात असणारं धावडशी पर्यटकांच्या आणि भक्तांच्या मनात किती तरी र्वष घर करून राहिलं आहे. सोळाव्या शतकात महाराष्ट्राच्या या महान भूमीत अनेक योगपुरुष आणि संत होऊन गेले. या सर्वानी महाराष्ट्राची सांस्कृतिक-धार्मिक आणि सामाजिक वैचारिक मशागत केली. त्यापैकीच एक योगी म्हणजे ब्रrोंद्रस्वामी धावडशीकर. महाराष्ट्राच्या विस्मृतीत गेलेले पण त्यांच्या भक्तांच्या हृदयात विराजमान असलेले हे सिद्धयोगी. त्यांच्या समाधीस्थानावर छत्रपती शाहूंनी अप्रतिम मंदिर बांधलं. वास्तुस्थापत्यात उजवं असलेलं हे मंदिर पाहणं हा एक आनंदयोग ठराव इतकी यात कलाकुसर आहे. मंदिराची रचना खूपच आकर्षक आहे. सभामंडप लाकडी असून तो नंतरच्या काळात उभारलेला दिसतो. या सभामंडपातून आपण मूळ मंदिराच्या समोर येतो. तिथून पुन्हा आत शिरायचं. हा पूर्वीचा सभामंडप. प्रकाश येण्यासाठी ठेवलेल्या दगडी जाळ्यांच्या खिडक्या पाहण्यासारख्या आहेत. यामध्येच गणेशाची आणि डाव्या बाजूला अष्टभुजा देवीची मूर्ती दिसते. गणेशाची पाषाणात घडवलेली आणि आता रंगरंगोटी केलेली मूर्ती जबरदस्तच आहे. चतुर्भुज असलेली आणि कमरेभोवती नाग असलेली ही सुस्थितीतली मूर्ती आवर्जून पाहावी.

सिद्धेश्वर मंदिर आहुपे

आहुपे घाट हे अत्यंत रमणीय ठिकाण आहे. निसर्गाची उधळण, आजूबाजूला डोंगरदरी, जवळच गर्द अशी देवराई आणि इतकं असूनही पर्यटकच काय स्थानिकांचीही वर्दळ अजिबात नाही असं ठिकाण म्हणजे आहुपे. घाटमाथ्यावरून कोकणात उतरणारे जे अनेक प्राचीन घाटरस्ते आहेत त्यापैकीच एक म्हणजे आहुपे घाट. पुणे जिल्ह्य़ातल्या मंचर-घोडेगाव-डिंभेहून आहुपे हे साधारण ५०  कि.मी. अंतर आहे. रस्ता वळणावळणांचा आहे. डावीकडे डिंभे जलाशय कायम सोबतीला असतोच. या गावाच्या अगदी अलीकडे आहे वचपे गावचे प्राचीन सिद्धेश्वर मंदिर. असं म्हणतात की हे मंदिर शिलाहार राजा झंझ याने नदीच्या उगमस्थानी बांधलं. कालौघात डिंभे धरणाखाली हे मंदिर बुडालं. पण हे सिद्धेश्वराचं शिल्पमंदिर गावकऱ्यांनी मोठय़ा मेहनतीने जलाशयाच्या काठावर आणून वसविलं आहे. याच मंदिरात गणेशाची अप्रतिम मूर्ती ठेवलेली दिसते. मूर्तीला शेंदूर फासलेला दिसून येतो. तसंच कमरेला नागाचा विळखाही पडलेला आहे. या मूर्तीचे कान हे जास्वंदीसारखे दिसतात.

हडसरवरील गणेशमूर्ती

हडसर जुन्नरपासून १२ किलोमीटरवर आहे. जुन्नरजवळ साकारलेल्या माणिकडोह धरणावरून नाणेघाटाच्या दिशेने अंजनावळे, घाटघर गावाकडे एक रस्ता जातो. या रस्त्यावरच हडसर गावाच्या डोक्यावर हा सुंदर  किल्ला आहे. मुळात हडसर ओळखला जातो तो त्यावरील कातळातच पायऱ्या खोदून तयार केलेला मार्ग, कातळाचेच कठडे, कातळात खोदून काढलेली दोन अत्यंत रेखीव प्रवेशद्वारं, त्यावरच्या कमानी, बुरुज, पहारेकऱ्यांच्या खोल्या इत्यादींसाठी. गडमाथ्यावर तळ्याच्या पुढे काही अंतरावरच महादेवाचं एक मंदिर आहे. या मंदिरात  आपल्याला एका बाजूला गणेशाची अतिशय रेखीव मूर्ती दिसते. आजही ही मूर्ती अतिशय सुस्थितीत असून चतुर्भुज आहे. मागील दोन हातांत शस्त्रे आहेत तसेच डोक्यावर नागाचे शिल्पही दिसते. आवर्जून पाहावी अशी ही मूर्ती आहे.

पिंगळसईतील पेशवेकालीन गणेश मंदिर

रायगड जिल्ह्य़ातील रोहा तालुक्यात असणारा अवचितगड हा तसा बऱ्यापैकी सर्व दुर्गयात्रींना परिचित आहे. या गडावर जाण्यासाठी पायथ्याच्या पिंगळसई गावातून एक वाट आहे. पिंगळसई या गावाचं वैशिष्टय़ इथेच संपत नाही तर या गावात अतिशय देखणं आणि कलाकुसरीने नटलेलं पेशवेकालीन गणेश मंदिर आहे. मंदिराची बांधणी संपूर्ण दगडात कोरली असून मंदिराचा कळस अतिशय देखणा आहे. गाभाऱ्यातील बैठय़ा स्वरूपाची गणेशमूर्ती  डोळ्यांचं पारणंच फेडते.