विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

गेली सलग ९ वर्षे ‘गणेश विशेष’च्या माध्यमातून गणपतीच्या नानाविध अंगांचा केवळ ऐतिहासिक, धार्मिक किंवा आध्यात्मिक नव्हे तर याही सर्वाच्या पलीकडे जाऊन पुरातत्त्वीय आणि मनुष्यवंशशास्त्राच्या अंगाने शोध घेण्याचा सलग प्रयत्न ‘लोकप्रभा’ करत आहे. याच प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग म्हणून आम्ही २०१५ साली ‘आसिंधुगांधापर्यंता.. गणेशदेवता’ ही कव्हरस्टोरी गणेश विशेषांकामध्ये प्रकाशित केली होती. मध्य प्रदेशात सापडलेली १० व्या शतकातील २० हात असलेली दुर्मीळ नृत्यगणेश मूर्ती त्या अंकाच्या मुखपृष्ठावर विराजमान होती. तर त्या कव्हरस्टोरीमध्ये आम्ही विख्यात फ्रेंच तज्ज्ञ पॉल मार्टिन दुबोस यांच्या गणेश संशोधनाबद्दल सविस्तर लिहिलेले होते. शिवाय त्यामध्ये जगभरातील प्रमुख गणेश मूर्तीची छायाचित्रेही मुबलक प्रसिद्ध केलेली होती. हा अंक घेऊन ‘लोकप्रभा’चे वाचक दीपक कुलकर्णी, त्यांचे मित्र असलेले जळगावचे विख्यात शिल्पकार रमाकांत सूर्यवंशी यांच्या घरी गेले. ‘‘लोकप्रभा’चा १८ सप्टेंबर २०१५चा अंक आवर्जून विकत घ्या, त्यात गणपतीचे छान फोटो आहेत, तुम्हाला अभ्यासाला कामी येतील’’ असेही त्यांनी सूर्यवंशी यांना सांगितले. सूर्यवंशी यांनी अंक विकत घेतला आणि पान क्रमांक २६ वर त्यांची नजर खिळून राहिली.. आनंदही झाला!

सध्या पॅरिसमध्ये असलेल्या २० हातांच्या दुर्मीळ गणेश मूर्तीचा फोटो होता त्या पान क्रमांक २६ वर. सूर्यवंशी यांना लक्षात आले की, पॅरिसमधील संग्रहात १८ व्या शतकातील दुर्मीळ गणेश मूर्ती म्हणून असलेल्या त्या संग्रहातील शिल्पकृती त्यांनीच १९७० साली साकारली होती. त्यांनी ‘लोकप्रभा’ कार्यालयात संपर्क साधून धन्यवाद दिले. त्या वेळेस आम्हालाही सुखद धक्काच बसला. अधिक संवादात असे लक्षात आले की, ही घटना काही प्रथमच घडलेली नाही. तर शिल्पकार रमाकांत सूर्यवंशी यांनी साकारलेल्या अनेक गणेश मूर्ती आज जगभरातील दुर्मीळ चिजांचे संग्राहकच नव्हेत तर अनेक जगप्रसिद्ध संग्रहालयांमध्ये विराजमान आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्या शिल्पकृतींना रमाकांत यांच्या हातून लाभलेलं ‘प्राचीन सौंदर्यलेणं’ एवढं भुरळ घालणारं असतं की, जगभरातील अभ्यासकही त्याची गणना ‘काहीशे वर्षांपूर्वीची कलाकृती’ अशी करतात आणि मग जगभरातील संग्रहालये लाखो रुपये खर्चून या शिल्पकृती विकत घेतात. प्रत्यक्षात त्या साकारलेल्या असतात गेल्या ५०-६० वर्षांत! मात्र जगभरातील तज्ज्ञांच्या पारखी नजरेलाही भुरळ घालण्याची ताकद रमाकांत सूर्यवंशी यांच्या हातात आहे. पॅरिसच्या संग्रहातील मूर्ती त्यांनी १९७० साली साकारल्यानंतर १९८१ साली पुण्याच्या मुरली कराचीवाला यांना विकली, तिथून ती शिल्पकृती पॅरिसला रवाना झाली!

रमाकांत सूर्यवंशी यांच्याच शिल्पकृतींच्या बाबतीत हे असे का होते, याचा विचार केला तर लक्षात येईल की, या शिल्पकृती सर्वस्वी वेगळ्या असतात कारण त्याचे उगमस्थान सूर्यवंशी हे स्वत:च असतात. ते एकसारखी शिल्पकृती परत कधीच साकारत नाहीत. याही खेपेस याची खात्री पटावी म्हणून त्यांनी साकारलेली गणेशाची शिल्पकृती आम्ही या विशेषांकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध केली आहे. ही शिल्पकृतीदेखील प्रत्यक्षात पाहिली तर लक्षात येईल की, अगदी हिच्यासाठीही ‘प्राचीन मूल्य’ म्हणून संग्रहालये किंवा संग्राहक त्यांची पुंजी सढळ हस्ते सहज खुली करतील.

रमाकांत सूर्यवंशी यांना १९८७ साली भारत सरकारतर्फे तत्कालीन राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते शिल्पकलेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर २०१२ साली तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘शिल्पगुरू’ हा राष्ट्रीय सन्मान देऊन गौरविण्यात आले. अशा या अवलियाच्या आयुष्यातील अनेकानेक प्रसंग ऐकताना आपण केवळ अवाक झालेले असतो!

अशीच एक घटना घडली ती जर्मन म्युझियमचे संचालक हेनिंग स्केनजेकल रमाकांत यांचा पत्ता शोधत त्यांच्यापर्यंत पोहोचले तेव्हा. पुणे येथील राजा केळकर म्युझियममधून त्यांना रमाकांत यांच्याविषयीची माहिती मिळाली होती. ते रमाकांत यांच्या शिल्पकृती पाहण्यासाठी आले होते. बराच वेळ बोलून झाल्यावर त्यांनी जर्मन म्युझियमचा कॅटलॉग रमाकांत यांना भेट दिला. तो पाहताना लक्षात आलं की, त्यातील दोन ब्रॉन्झ गणेश स्वत रमाकांत यांनीच साकारलेले होते. ‘‘माझीच यात्रेत हरविलेली दोन मुलं कित्येक वर्षांनंतर मला भेटली असंच वाटलं.’’ रमाकांत सांगत होते. त्यांचं मन आंनदाने मोहरून गेलं. स्केनजेकल यांना ही गोष्ट कळल्यानंतर ते ऐकून अवाक्  झाले. पण त्यांचं समाधान होईना. मग अखेरीस पुण्याच्या अण्णा पालकर या व्यापाऱ्याचं नाव सांगितलं, ज्यांना ते गणेश शिल्प विकलं होतं, तेव्हा मात्र त्यांना खात्री पटली.. कारण पडताळा जुळला होता! ‘लोकप्रभा’शी संवाद साधताना रमाकांत म्हणाले, ‘‘तरीही त्या जर्मन गृहस्थांच्या भेटीनंतर मनात एका गोष्टीचा आनंद होता की, आपली शिल्पं जर्मनीच्या संग्रहालयात अठराव्या शतकातील म्हणून ठेवली गेली आहेत आणि त्यांनाही ती नवीन आहेत ते समजलंदेखील नाही.’’

लंडन म्युझियमचे संचालक नील मॅक्ग्रेगर यांनाही रमाकांत यांच्या शिल्पकृतींची अशीच भुरळ पडली होती. खंत याचीच वाटते की, त्या कलाकृती जगभरातील संग्रहालयांत विराजमान होत असल्या तरी त्याची ‘नेक किंमत’ मात्र या कलाकाराला मिळत नाही. अर्थात तरीही रमाकांत सूर्यवंशी यांचे काम करते हात थांबलेले नाहीत. ते नव्या उमेदीने आजही काम करतात.

गणपती ही जशी बुद्धीची देवता आहे तशीच ती सकळ कलांचीही देवता आहे. गणपती अथर्वशीर्षांमध्ये गणपतीला उद्देशून ‘कालत्रयातीत: गुणत्रयातीत:’ असे म्हटले आहे. तीन गुणांच्या मीलनातून निर्मिती होते त्याहीपलीकडे असलेला असा तो गणपती असा हा उल्लेख येतो. रमाकांत सूर्यवंशी हे कलाधर अर्थात कलाकार आहेत. त्यांची सौंदर्यलुब्ध कलाकृती पाहताना सहज ओळी येतात..

गुणत्रयातीत: कलाधर:।।