29 March 2020

News Flash

ऑत कुटुर…

डिझायनर्सनी स्वत:च्या कलेवरच्या प्रेमापोटी विशिष्ट ग्राहकाला घेऊन, त्याच्या मापानुसार बनवलेले कपडे म्हणजे ऑत कुटुर.

| July 18, 2014 01:08 am

डिझायनर्सनी स्वत:च्या कलेवरच्या प्रेमापोटी विशिष्ट ग्राहकाला घेऊन, त्याच्या मापानुसार बनवलेले कपडे म्हणजे ऑत कुटुर. फॅशनच्या जगातल्या अभिजाततेचा आविष्कार असंही या संकल्पनेबाबत म्हणता येईल.

‘कपडे, दागिने हे घालण्यासाठी असतात, कपाटात सजवून ठेवण्यासाठी नाही.’ हा आपला कपडय़ांबाबतीत प्राथमिक समज असतो. ‘घालायचेच नसतील तर महागडे कपडे घ्यायचेच कशाला?’ जिथे या प्रश्नाचे ‘बरोबर.. नाहीच विकत घ्यायचे असे कपडे’ असं उत्तर देण्यात आपण समाधान मानतो, तिथे जगात काही डिझायनर्स असे आहेत जे वर्षांतून ठरावीक काळात केवळ असेच कपडे बनवतात जे एक तर उच्चभ्रू लोकं काही लाखो रुपये खर्च करून विकत घेऊ शकतील किंवा डिझायनरच्या संग्रहाची शोभा वाढवू शकतील. असे कोणी सांगितले तर आश्चर्य वाटणे साहजिकच आहे.
कलाकार आणि त्याची कला यात कोणतेही मापदंड नसतात. कलाकाराला त्याच्या कलेशी असलेली निष्ठा जपायची असते आणि तो इमानेइतबारे ती जपतोही. पण कित्येकदा ‘पापी पेट का सवाल है’ असं म्हणत व्यापारीकरण आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्याला विशिष्ट रचना कराव्या लागतात. मग तो चित्रकार असो, गायक, संगीतकार, वादक किंवा शिल्पकार. प्रत्येक जण पोटापाण्यासाठी आपल्या आवडीला, सृजनशीलतेला मुरड घालतात. पण त्यापासूनही दूर जात काही अशा कलाकृतीही बनवतात ज्या अभिजात असतात, त्यांच्या कलेच्या समाधानासाठी असतात. फॅशन जगतामध्येही अनेक डिझायनर्स आपल्यातील प्रतिभेला जिवंत ठेवण्यासाठी काही विशिष्ट प्रकारचे कलेक्शन्स तयार करतात, जे केवळ त्यांच्यातील कलाकाराच्या समाधानासाठी असतात, त्यांना ‘ऑत कुटुर’ म्हटले जाते. अर्थात आपण आजही टेलर किंवा डिझायनरला कलाकाराचा दर्जा देत नाही, त्यामुळे तो केवळ स्वत:च्या समाधानासाठी, कलेच्या प्रेमासाठी महागडे कपडे बनवू शकतो यावर आपण विश्वास ठेवत नाही.
ऑत कुटुर हा तसाच काहीसा प्रकार आहे. याबद्दल बोलण्याआधी या शब्दाचा अर्थ समजून घेऊयात. ऑत कुटुर या फ्रेंच संज्ञेचा शब्दश: अर्थ आहे ‘हाय ड्रेसमेकिंग’, ‘हाय ड्रेसिंग’ किंवा ‘हाय फॅशन’. थोडक्यात उच्च दर्जाचे कपडे शिवणे. अशा प्रकारचे कपडे शिवण्यासाठी कोणत्याही मशीनचा वापर न करता, केवळ हाताने कपडे शिवले जातात. त्यामुळे विशिष्ट व्यक्तीसाठी, त्याच्या मापानुसार हे कपडे शिवले जातात. बाजारात उपलब्ध साइज चार्ट इथे वापरले जात नाहीत. त्यामुळे तयार झालेला ड्रेस हा जणू घालणाऱ्याच्या त्वचेचाच एक भाग आहे, इतक्या सुंदर रीतीने तो आपल्या शरीरावर बसतो. अशा प्रकारच्या कपडय़ांसाठी निवडलेले कापड, एम्ब्रॉयडरी, अगदी दोरेदेखील खास पडताळून निवडलेले असतात. डिझायनर्स या कलेक्शन्ससाठी जगातला कानाकोपरा पालथा घालतात, त्यांच्या मनाला भावेल अशाच साहित्यांची निवड करतात. त्यात तडजोडीचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे बहुतेकदा या कपडय़ांवर ‘प्राइस ऑन रिक्वेस्ट’चे लेबल असते. म्हणजेच याची किंमत ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य डिझायनरकडे असते. त्याला बाजारभावाचा संबंध अजिबात येत नाही. कित्येकदा हे कलेक्शन्स विकण्यापेक्षा आपल्या कलादालनात सजवून ठेवण्यासही कलाकार प्राधान्य देतात.
आज शनेल, डिओर, लुई विटॉन, जिवाशी, इमिनो पुची, लावीन असे कित्येक महत्त्वाचे युरोपियन ब्रान्डस कुटुर कलेक्शन्स बनवत आहेत. पूर्वी डिझायनर्स अशा प्रकारच्या कलेक्शन्सचा एक शो आयोजित करत असत. तेथे शहरातील उच्चभ्रू लोक हजेरी लावत. या कलेक्शन्सपैकी त्यांच्या पसंतीच्या डिझाइन्समध्ये त्यांना आवश्यक फेरबदल करून तसे कपडे डिझाइनरकडून बनवून घेतले जात. आजही कुटुर कलेक्शन्समधून ब्रॅण्डची मूळ ओळख दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. या कलेक्शन्समध्ये फक्त कपडय़ांचा समावेश असतो असेही नाही. यात दागिने, बॅग्स, शूज यांचाही समावेश होतो.
या संकल्पनेची सुरुवात अर्थातच युरोपात झाली. सुरुवातीला म्हणजेच व्हिक्टोरियन कालखंडापर्यंत उंची कपडे, दागदागिने घालण्याची परवानगी केवळ शाही कुटुंबाला होती. डिझायनर कपडे तेव्हा अर्थात सामान्य माणसाच्या आवाक्यात नव्हतेच. त्यामुळे डिझायनर्सनासुद्धा वेगवेगळे प्रयोग करण्याची, आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळत असे. आपल्या कारागिरीसाठी त्यांना शाही नजराणेसुद्धा मिळत असत. पण हळूहळू राजघराण्यांना शह देणारा नवा कारखानदारी, व्यापारीवर्ग उदयाला येऊ लागला होता. या वर्गाच्या हातात पैसा खुळखुळू लागला आणि त्यांनीसुद्धा उंची राहणीमान स्वीकारायला सुरुवात केली. हे आपण मागे पाहिलेच आहे. त्यामुळे फॅशन जगतातसुद्धा व्यापारीकरण सुरू झाले. कला सादर करण्याऐवजी दुसऱ्याच्या तोडीस तोड डिझाइन्स बनवून एकमेकांशी स्पर्धा करण्यात डिझायनर्स धन्यता मानू लागले. पण त्यातही कुठेतरी त्यांचे कलाकार मन त्यांना साद घालत होते. त्यातूनच १९४५ मध्ये युरोपात ‘ऑत कुटुर’ची संकल्पना उदयास आली. आज या संकल्पनेला Chambre Syndicale de la haute couture या संस्थेचे स्वरूप लाभले आहे. या संस्थेच्या माध्यमातून ऑत कुटुर या संकल्पनेला काही ठरावीक मापदंड दिले आहेत. या नियमांचे पालन करून बनवलेल्या कलेक्शन्सना कुटुरचा दर्जा दिला जातो. यातील प्रमुख अट ही आहे की, ऑत कुटुरच्या नावाखाली बनवलेले कपडे हे विशिष्ट ग्राहकासाठी आणि त्याच्या मापानुसार बनवलेले असले पाहिजेत.
त्यामुळे १८व्या शतकाच्या कालखंडात युरोपातील चार्ल्स फेड्रिक वर्थसारख्या डिझायनर्सनी शाही घराण्यांसाठी बनवलेले पोशाख ऑत कुटुरमध्ये समाविष्ट केले जातात. आज युरोपातील फ्रान्स, इंग्लंड, जर्मनीसारख्या देशांमध्ये या कुटुर कपडय़ांसाठी खास संग्रहालये बनवण्यात आली आहेत. तेथे विशिष्ट पद्धतीने या कपडय़ांचे जतन केले जाते. विशेष म्हणजे या कपडय़ांची स्थिती आजही इतकी उकृष्ट आहे की तुम्ही आजही ते घालून कोणत्याही पार्टी किंवा शाही समारंभाला जाऊ शकता. तिथे तुम्हाला ओल्ड फॅशन्ड म्हणून हिणवलं जाणार नाही, तर तुमच्या निवडीचे कौतुक केले जाईल. आजही लिलावात त्यांच्यावर लाखोच्या बोली लागतात. आपल्याकडे आजीच्या, पणजीच्या जुन्या हातमागावरच्या साडय़ा जपून ठेवल्या जातात. संग्रहालयात आपल्याही जुन्या राजेमहाराज्यांचे कपडे, आभूषणे पाहायला मिळतात. पण त्यांची स्थिती दयनीय असते. कित्येक पोशाख तर गहाळसुद्धा झाले आहेत. पूर्वीच्या साडय़ांना सोन्याचांदीची जर लावलेली असे. ती काढून या साडय़ा नष्टही करण्यात आल्या आहेत. असे असले तरी आजही कित्येक घरामध्ये अशा जुन्या साडय़ा, दागदागिने जपून ठेवले आहेत. ही आपल्याकडील ‘ऑत कुटुर’ संपत्ती आहे.
आज कित्येक युरोपियन आणि भारतीय डिझायनर्ससुद्धा कुटुर कलेक्शन्स बनवत आहेत. पण युरोपात सादर होणारे कुटुर कलेक्शन्स आणि भारतात सादर होणारे कलेक्शन्स यांच्यात तफावत आहे. युरोपातील या कलेक्शन्सना व्यावसायिक रूप मिळाले असले तरी कुटुर कलेक्शन्स बनवण्यासाठीच्या नियमांचे काही अंशी पालन तिथे आजही होते. या कलेक्शनमधील कपडे प्रत्यक्षात घालता आलेच पाहिजेत असा नियम नसतो. त्यातून कदाचित डिझायनरला त्याच्या पुढच्या चार कलेक्शनची प्रेरणाही मिळू शकते. फक्त डिझाइनरचे कौशल्य, त्याचे कलेवरील प्रेम पाहिले जाते. भारताला मात्र या नियमांचे बंधन नाही. त्यामुळे उच्चभ्रू समाजातील महिला लग्नसमारंभात घालतात ते कपडे म्हणजे कुटुर कपडे असे मानले जाते. त्यात कलेपेक्षा व्यावसायिक दृष्टिकोन जास्त असतो.
त्यामुळे केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता, आपल्यातला कलाकार जिवंत ठेवण्याचा प्रयत्न जर डिझायनर्स करत असतील आणि आपला इतिहास, परंपरा, पूर्वजांच्या आठवणी या ‘ऑत कुटुर’ या गोंडस नावाखाली सांभाळून ठेवता येत असतील तर त्यात काहीच हरकत नाही. त्यामुळे कलाकाराच्या कलेचा सन्मानसुद्धा होईल आणि कलेचा अभिजातपणासुद्धा टिकून राहील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2014 1:08 am

Web Title: haute couture
टॅग Fashion
Next Stories
1 ऑफिसमधील स्टाइलगिरी…
2 रॅम्पवर : चंदेरी दुनियेतील फॅशनचे वारे
3 कहानी छोटे पडदे से उतारे हुए फॅशन की…
Just Now!
X