स्वातंत्र्य म्हणजे तुमच्या दृष्टीने नेमकं काय, हा प्रश्न ‘लोकप्रभा’ने आजच्या तरुणाईला विचारला आणि त्यांच्याकडून आलेला भरभरून प्रतिसाद म्हणजे सोबतचं लिखाण.

स्वातंत्र्याचा फायदाच घ्या
मला माझ्या आवडत्या क्षेत्रात करिअर करायला मिळतंय, हे माझ्यासाठी माझे स्वातंत्र्य आहे. मी बी.ए. इन ड्रॅमॅटिक्स केलंय. या क्षेत्रात जाण्याचं ठरवलं तेव्हा मला घरच्यांचा पाठिंबा मिळाला. त्यांच्या सहकार्याशिवाय या क्षेत्रात करिअर करणं खरंच खूप कठीण गेलं असतं. एकंदरीतच देशवासीयांना मिळालेल्या सवलती हे माझ्या दृष्टीने देशाचं खरं स्वातंत्र्य आहे; पण या सवलतींचा गैरफायदा मात्र घेऊ नये. मिळालेलं स्वातंत्र्य आपण किती जपतो आणि जगतो ते खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ तिकिटावर काही टक्के सवलत असेल तर सवलत आहे म्हणून तिकीट न काढणं. अशा लहानमोठय़ा कुठल्याच बाबतीत गैरफायदा घेऊ नये. शाळेत झेंडावंदन अनिवार्य असतंच. त्यामुळे मी शाळेत असताना नियमितपणे दरवर्षी झेंडावंदनाला हजेरी लावायचे. आमच्या सोसायटीत झेंडावंदन होत नाही. त्यामुळे शाळा सुटल्यावर झेंडावंदनासाठी कॉलेज हा पर्याय होता. कॉलेजमध्ये झेंडावंदनासाठी जात होते. दरवर्षी नाही, पण शक्य होईल त्या त्या वर्षी मी कॉलेजमध्ये गेले आहे. टीव्हीवर दाखवली जाणारी परेड बघणंही मला महत्त्वाचं वाटतं. टीव्हीवर १५ ऑगस्टच्या दिवशी दिल्लीच्या राजपथावर होणारी परेड, झेंडावंदन बघायला मला आवडतं. याचं कारण या वेळी दिसणारी देशाची विविधता, विविधतेत असलेली एकता, प्रत्येक राज्याची वैशिष्टय़ं असं सगळं आकर्षक असतं. ही परेड बघून नेहमीच चांगलं काही करण्याची प्रेरणा मिळते.
नेहा पाटील, जळगाव</strong>

जबाबदारीचं भान आवश्यक
मी दरवर्षी न चुकता कॉलेजमध्ये होणाऱ्या झेंडावंदनाला जातो. शाळेत तर झेंडावंदन अनिवार्य होतंच. आम्ही कॉलनीतल्या मित्रमंडळींनी मिळून लागोपाठ चार वर्षे स्वातंत्र्यदिनी रॅली काढली होती; पण त्यानंतरच्या वर्षी १५ ऑगस्टला खूप पाऊस पडला आणि आमच्या रॅली उपक्रमाला खंड पडला. मात्र टीव्हीवर दिल्लीला राजपथावर होणारं झेंडावंदन मी अगदी आवर्जून बघतो. विविध राज्यांचे लोक आपापल्या राज्याचे प्रतिनिधित्व करतात. त्या राज्याची संस्कृती, परंपरा यातून आपल्या देशाची विविधता तिथे दाखवत असतात. १५ ऑगस्टचा हा एक आकर्षणाचा भाग असतो. मला असं वाटतं की, प्रत्येकाने जागरूक नागरिकाची जबाबदारी पार पाडली तर अनेक अनावश्यक गोष्टी टाळता येतील. साधं उदाहरण द्यायचं झालं तर ‘येथे थुंकू नये’ असं जिथे लिहिलेलं असतं नेमकं तिथेच लोक घाण करतात. अनेकदा सुशिक्षित, सुसंस्कृत लोकच असं वागताना दिसतात. तेच असं वागले तर अशिक्षितांबाबत काय बोलायचं? किमान सुशिक्षितांनी तरी असं वागू नये. माझ्या मते, माझं स्वातंत्र्य म्हणाल तर ते म्हणजे आपल्याला हवं ते करण्याची मोकळीक असणं. स्वातंत्र्य नक्कीच असावं. पण नैतिक जबाबदाऱ्यांचं भान ठेवूनच त्याचा फायदा घेतला पाहिजे.
प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्यांचे भान ठेवूनच कुठचंही पाऊल उचलावं, असं मला वाटतं.
उदय येशे, धुळे

स्वकीयांच्या पारतंत्र्यात
कॉलेजमध्ये एनएसएसमध्ये होते. त्यामुळे १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दोन महत्त्वाच्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये माझा मोठा सहभाग असे. त्यामुळे एकही वर्ष मी एनएसएसच्या संचलनात भाग घेण्यापासून दूर राहिले नाही. आवडीने आणि देशप्रेमासाठी मी संचलनात नेहमी भाग घ्यायचे. मी अजूनही झेंडावंदनासाठी शाळेत जाते. दूरदर्शनवरील संचलन आणि राष्ट्रपतींचं भाषण बघते. त्यांच्या भाषणाने नेहमीच प्रेरणा मिळते. ६७ वर्षांपूर्वी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं खरं, पण आता भारत स्वकीयांच्या पारतंत्र्यात आहे, असंच मला वाटतं. ही अत्यंत खेदाची बाब आहे. प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य हे मिळायलाच हवं. मग ते सगळ्याच बाबतीत असायला हवं. आपला देश स्वतंत्र असूनही स्वतंत्र नाही असं मला वाटतं. माझ्या मते, स्त्री-पुरुष समभाव असायलाच हवा. स्त्रियांना आदराचं स्थान मिळायला हवं असं मला वाटतं. पण, तेव्हाच मिळेल जेव्हा एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचा आदर करेल. असं झालं तरच तिला आदराचं स्थान मिळेल. पण, यात स्त्रियांनीही याचा गैरवापर करता कामा नये. आपण माणुसकी ही जात आणि भारतीय हा धर्म मानला पाहिजे. माणसाला धर्माचा आधार हवा पण, माणूस धर्मवेडा नको.
सायली कुळकर्णी, मोंड, सिंधुदुर्ग.

विचारांची मोकळीक हवी
माझ्या मते, घटनेप्रमाणे सगळ्यांना समान वागणूक मिळाली तरच ते देशाचं स्वातंत्र्य असेल. आपल्या दिग्गजांनी घटना अगदी विचारपूर्वक बनवली आहे. त्यामुळे त्याचा आदर करणं ही आपली जबाबदारी आहे. त्याचं जर तंतोतंत पालन केलं तर बहुधा आपलं आयुष्य अधिक सुखकर होईल. माझ्यापुरतं स्वातंत्र्य काय, असा प्रश्न कोणी विचारला तर माझं उत्तर असेल की आपल्या मतांना, निर्णयांनादेखील मोकळीक मिळायला हवी. मग ते कोणत्याही बाबतीत असो, वैचारिक स्वातंत्र्य असायलाच हवं. कुठलाही निर्णय घेताना मनावर दडपण नसावं. दडपण घेऊन निर्णय घेतला गेला तर त्याच्या दुष्परिणामांचाही विचार तेव्हाच व्हायला हवा. कारण घाईने किंवा दडपणाने घेतलेले निर्णय नंतर विचार करायला लावतात हे नक्की. अर्थात या सगळ्यामध्ये मर्यादा विसरून चालायच्या नाहीत. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते आणि या मर्यादांचा सगळ्यात आधी आपण स्वत:च विचार करायला हवा. १५ ऑगस्टला दरवर्षी नित्यनेमाने कॉलेजच्या झेंडावंदनाला हजेरी लावत होतो. यापूर्वी शाळेतलं झेंडावंदन आजही आठवतं. त्या दिवशी करायचे कवायतीचे प्रकार, लेझीम, देशभक्तिपर गीतं असा कार्यक्रम असायचा. त्यामुळे १५ ऑगस्टआधी दोनेक आठवडय़ांपासून सुरू असणारी तयारी उत्साह वाढवणारी होती. खरं तर शाळेतल्या या झेंडावंदनामुळेच त्याचं महत्त्व समजलं होतं. टीव्हीवरची दिल्लीच्या राजपथावरील परेड नियमित बघितली जात नाही; पण टीव्हीवर १५ ऑगस्टला दाखवले जाणारे विशेष कार्यक्रम बघायला छान वाटतं. वेगवेगळी गाणी, स्वातंत्र्यसैनिकांची माहिती, इतिहास असं सगळं सांगणारे कार्यक्रम आवर्जून बघतो.
योगेश शिरसाट, धुळे.

तरच खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल
शाळा संपून इतकी वर्षे होऊनही मी अजून शाळेत झेंडावंदनासाठी जातो. मी ज्या शाळेचा विद्यार्थी आहे त्या शाळेत झेंडावंदनाला जाताना जुन्या आठवणी तर ताज्या होतातच, पण अभिमानही वाटतो. माझ्या शिक्षकांनाही आम्ही माजी विद्यार्थी झेंडावंदनाला गेलो की आनंद होतो. त्या दिवशी टीव्हीवर होणारे विविध कार्यक्रम लक्ष वेधून घेतात. मला वाटतं लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांनाच माहिती देणारे हे कार्यक्रम त्या दिवशी महत्त्वाची भूमिका बजावतात. पण या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम ठरतो तो दिल्लीतला राजपथावरचा परेडचा कार्यक्रम. पण दिल्लीत होणारा हा कार्यक्रम टीव्हीवर मी लहान असताना फक्त एकदाच बघितला होता. त्यानंतर मात्र नाही. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली; पण म्हणजे नेमकं काय झालं? इथे सगळ्यांचं आयुष्य तर तसंच आहे. इथे बदलले ते फक्त मालक. आधी ब्रिटिश होते, आता आपलीच माणसं आहेत. गरिबाला एक वेळची भाकरी मिळू शकत नाही, महिला एकटी रात्रीची सुरक्षित नाही, प्रत्येक क्षेत्रात बोकाळणारा भ्रष्टाचार, महागाई अशा अनेक मुद्दय़ांवर काम करणं अपेक्षित आहे. ती महत्त्वाची कामं झाली की मगच आपला देश स्वतंत्र होईल, तोवर नाही. देश स्वतंत्र झाला, पण राष्ट्रध्वजाची किंमत आपल्या लोकांना अजून समजली नाही. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन्ही महत्त्वाच्या दिवसांनंतर राष्ट्रध्वजाची जी अवस्था होते ती सगळेच बघत असतात. इथेही फक्त बघून केवळ हळहळ व्यक्त केली जाते. पण त्यावर कृती मात्र कोणी करत नाही. कृती करणं तर दूरच, पण किमान त्याबाबत जाण असली तरी खूप असतं. जिथे लोकांना राष्ट्रध्वजाची किंमत कळत नाही, त्या देशाला स्वातंत्र्य मिळून तरी काय फायदा आहे? तो राष्ट्रध्वज फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला प्रत्येकाला आठवतो.
– उमाकांत रमेश चव्हाण, रत्नाागिरी

संयमित स्वातंत्र्य महत्त्वाचं
माझ्या मते, स्वातंत्र्य ही सरळ, सोपी गोष्ट नाही. आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे १५० र्वष ब्रिटिशांशी प्राणपणाने लढलेल्या भारतीयांच्या झुंजीचे फळ आहे. पण आज मला वाटतं की, त्यांचे हे सगळे प्रयत्न वाया गेलेत. कारण आजही आपल्या देशाला ब्रिटिशांच्या काळापासून असलेल्या गरिबी, कुपोषण, भ्रष्टाचार, िहसाचार, महागाई, जातीयवाद, स्त्री-पुरुष असमानता अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. या समस्यांना तोंड देण्यासाठी जी पावलं उचलली गेली ती पुरेशी तर नाहीतच, पण अजून तळागाळातल्या लोकांपर्यंतही पोहोचली नाहीत. या सर्व समस्यांपासून भारत जेव्हा मुक्त होईल तेव्हाच आपल्या देशाला भविष्यात खरं स्वातंत्र्य प्राप्त होईल असं मला वाटतं. मला नेहमीच स्वातंत्र्य मिळत आलंय. अगदी शाळा, कॉलेज, करिअर निवडण्यापासून ते गर्लफ्रेंड, लाइफ पार्टनर निवडण्यापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये मला स्वातंत्र्य मिळालंय. आपल्या आईबाबांकडून, शिक्षकांकडून आणि मुख्य म्हणजे आपल्या बुद्धीकडून मिळणारं संयमित स्वातंत्र्य हे खूप महत्त्वाचं आहे. हेच स्वातंत्र्य आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावतं आणि पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देते आणि मुख्य म्हणजे आपल्या कुटुंब आणि देशाबद्दलच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यास मदत करते.
अक्षय सोनावणी, अलिबाग.

गैरफायदा घेऊ नये
शाळेतल्या १५ ऑगस्टची दरवर्षीच आठवण येते. दोन आठवडे आधीपासून सुरू असलेली तयारी, त्यासाठी आदल्या दिवशी शाळेचा गणवेश स्वच्छ धुवून इस्त्री करून नीट ठेवणं, शिकवलेले कयावतीचे प्रकार पुन्हा एकदा आठवणं, प्रार्थना, देशभक्तिपर गीतं तोंडपाठ करणं हे सगळं आजही आठवतं. या गोष्टींचं महत्त्व शाळेत असताना खूप असायचं. हे सगळं आजही तसंच आठवतं. आता हे प्रत्यक्ष अनुभवता येत नाही. कारण कामाच्या व्यापामुळे कुठेच झेंडावंदनाला जाणं शक्य होत नाही. शाळेत पूर्वी काही काळ जमायचं, पण आता तेही शक्य होत नाही. कॉलेजमध्ये असताना सुरुवातीला जायचो. अकरावी, बारावीत आणि बीकॉममध्ये असं तीनदा कॉलेजच्या झेंडावंदनाला गेलो होतो. दिल्लीतला राजपथावरचा परेडचा कार्यक्रम त्या दिवशी टीव्हीवर बघतो. तोही पूर्ण बघणं शक्य होत नाही. अधूनमधून बघत असतो. मला वाटतं की, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून आजची परिस्थिती तुलनेने नक्कीच चांगली आहे. पण हेही तितकंच खरंय की, आतापर्यंत जितकी प्रगती व्हायला हवी होती तितकी पूर्णपणे झाली नाही. याची खंत वाटतेच. परिस्थिती सुधारण्याचा वेग वाढायला हवा. गावागावांत वीज, पाणी येतंय, चांगल्या रस्त्यांचं बांधकाम होतंय, ही सकारात्मक गोष्ट आहे. आपल्याकडे भ्रष्टाचार सगळ्याच क्षेत्रांत आहे. तसंच ज्याच्याकडे सत्ता, शक्ती असते त्याची कामं लवकर होतात याचाही अनेकदा प्रत्यय येतो. पण नुकताच घडलेला एक किस्सा सांगतो. मित्राबरोबर रात्री गाडीतून फिरत होतो. दीड वाजले होते. पोलिसांनी आम्हाला थांबवलं. त्यांनी आमची ओळखपत्रं नीट तपासली आणि मगच जाऊ दिलं. पोलिसांनी अशी विचारपूस करणं खरं तर अनेकदा भीतिदायक वाटतं. पण त्यांच्या विचारपूस करण्याचा अजिबात राग, वाईट, भीती असं काहीच वाटलं नाही. याउलट बरं वाटलं, सुरक्षितही वाटलं. एकाच वेळी स्वच्छंद होता येणं आणि तेव्हाच सुरक्षितही वाटणं, हे खरं माझं स्वातंत्र्य. मला हवं त्या वेळी हवं तिथे फिरण्याचं स्वातंत्र्य आहे. ते प्रत्येकालाच असतं. असायलाच हवं. पण त्याचा गैरफायदा घेणं हे चुकीचंच आहे.
भाग्येश भंडारे, नाशिक

जातीयवाद नकोच
शाळेत असताना १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे दोन्ही दिवस खूप महत्त्वाचे वाटायचे. आजही ते महत्त्वाचं आहेच. पण, आता झेंडावंदनासाठी शाळा, कॉलेजमध्ये जाणं शक्य होत नाही. नोकरी आणि इतर कामांमुळे ते जमत नाही. सकाळची झेंडावंदनाची वेळ आणि माझ्या कामाची वेळ जमून येत नाही. याचं वाईट वाटतंच. पण, यातून एक मार्ग मी शोधून काढलाय. सोसायटीमधल्या या दिवशीच्या विशेष कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित राहाते. त्यामुळे शाळा, कॉलेजमधल्या झेंडावंदनाची कसर मी सोसायटीतल्या कार्यक्रमांमधून भरून काढते. तसंच टीव्हीवर दाखवली जाणारी परेड मी दरवर्षी न चुकता बघते. दिल्लीत राजपथावर होणारं संचलन आकर्षणाचा भाग असतो. घरी आम्ही सगळेच एकत्र बसून दिल्लीतली ही परेड बघत असतो. माझ्या बाबांना तर ते इतकं आवडतं की, ते एकदा दिल्लीत खास त्यासाठी जाऊनही आलेत. त्यामुळे टीव्हीवर ते बघण्यासोबतच आम्हाला तिथला प्रत्यक्ष अनुभवही बाबा नेहमी सांगत असतात. एकीकडे देशाचं हे इतकं सुंदर चित्र तर दुसरीकडे अनेक प्रश्न, संकटांनी ग्रासलेला आपला देश. या सगळ्यात महत्त्वाची समस्या जी मला त्रास देते ती म्हणजे जातीयवाद. जोवर सर्व जाती-धर्माच्या लोकांना समान वागणूक मिळत नाही तोवर देश पूर्णपणे स्वतंत्र झाला असं मी म्हणणार नाही. कारण ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची समस्या आहे असं मला वाटतं. तसंच दुसरा आणखी एक मुद्दा विचार करायला लावण्यासारखा आहे तो म्हणजे महिलांची सुरक्षितता. पूर्वीच्या काळी महिलांच्या सुरक्षिततेबाबत बोललं असतं तर एकवेळ चाललं असतं. पण, आता परिस्थिती बदलली आहे. महिलांमध्ये साक्षरतेचं प्रमाण वाढलंय. त्या स्वत:च्या पायावर उभ्या असतात. तरी त्यांना सुरक्षित वाटत नाही. मला स्वत:ला अनेकदा असुरक्षित वाटतं. तसंच खरंतर स्त्रियांनाही स्वातंत्र्य आहे. पण, त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अनेकांचा वेगळा असतो. लोकांची मानसिकता बदलली पाहिजे. हे विचार, मानसिकता, दृष्टिकोन जोवर बदलत नाहीत तोवर महिलांना स्वातंत्र्य मिळालंय असंही म्हणणं मला बरोबर वाटत नाही.
ऋतुजा खाबडे, कोल्हापूर.

गैरवापर नको
दरवर्षी शाळेतल्या झेंडावंदनाची आठवण होतच असते. कारण शाळेतल्या झेंडावंदनाचा कार्यक्रम वेगळाच असतो. मला वाटतं, शाळा-कॉलेज संपलं तरी झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला नेहमी उपस्थित राहावं. यामुळे राष्ट्रप्रेम व्यक्त करता येतं. एरव्ही देशाबद्दलचं प्रेम, अभिमान असतोच. पण, प्रत्येक जण ते नेहमी व्यक्त करतोच असं नाही. म्हणून स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन महत्त्वाच्या दिवशी जमेल तसं देशप्रेम व्यक्त करावं असं मला वाटतं. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. पण, त्याचा गैरवापर होऊ न देणे ही प्रत्येकाची जबाबदारी असते. स्वतंत्र भारताचा मी स्वतंत्र नागरिक आहे. मला सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य आहे. पण, म्हणून मी मला हवं तसं वागलो तर मात्र त्या स्वातंत्र्याचा अपमान केल्यासारखं होईल. त्यामुळे सुरुवात मी माझ्यापासून करतो. मला मिळालेल्या स्वातंत्र्याचा मी चांगल्या गोष्टींसाठीच फायदा करून घेतो. मिळालेल्या अधिकारांचा वापरही मी योग्य प्रकारे करतो. वाटेल तेव्हा वाटेल ते करणं मला योग्य वाटत नाही. डॉ. आंबेडकरांनी लिहिलेले कायदे योग्यरीतीने वापरले गेले, प्रत्येकाला न्याय मिळाला. पण, या कायद्यांचा, अधिकारांचा योग्य वापर होणं, जातीव्यवस्थेचा गैरवापर न होणं यात देशाचं स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेला महत्त्व दिलं पाहिजे. भेदभाव न करता सगळ्यांना समान वागणूक, संधी मिळायला हवी, असं माझं मत आहे. यामुळे आरक्षणाचा मुद्दाही डोकावणार नाही. १५ ऑगस्टची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी टीव्हीवर दिल्लीतल्या राजपथावरचं संचलन. कॉलेजमधून घरी आलो की जेवढं मिळेल तेवढं हे संचलन बघतो. यामध्ये देशाची विविधतेतली एकता दिसते.
अभिजीत शिर्के, सोलापूर.

स्वातंत्र्य टिकवणं महत्त्वाचं.
शाळेत असताना आदल्या रात्रीपासूनच १५ ऑगस्टची तयारी सुरू व्हायची. तेव्हा खरं तर स्वातंत्र्य वगरे संकल्पना न पेलणाऱ्या होत्या. उलट त्या दिवशी झेंडय़ातून कबुतर कसं उडतं हे पाहण्यासाठी आम्ही पुढच्या रांगेत उभे राहायचो. या गंमतीसाठी १५ ऑगस्टची वाट बघायचो. पण, जसजसं मोठे होत गेलो तसतसं आम्हाला स्वातंत्र्य दिनापेक्षा त्या दिवशी रिलीज होणाऱ्या सिनेमांची ओढ अधिक वाटू लागली. या दिवशी काही सरकारी बाबू नाइलाजाने कचेरीत जावं लागतं म्हणून जातात तर खासगी क्षेत्रातील सगळे एक दिवस सुट्टी म्हणून खूश असतात. झेंडावंदन झाल्यानंतर भाषण असते. लहानपणी ते ऐकणं फार कंटाळवाणं वाटायचं कारण दरवर्षी प्रमुख पाहुणे बदलायचे मात्र भाषणाचा मजकूर तोच राहायचा. पण, आजकाल भाषणं ऐकावीशी वाटतात. त्यामुळे मी १५ ऑगस्टला नियमाने भाषण ऐकतो. त्या वेळी भारताच्या पंतप्रधानांना भारत पुढे काय करणार आहे यापेक्षा आपल्या सरकारने लोकांसाठी काय केले हे सांगण्यात जास्त रस असतो तरी मी ते ऐकतो. मला सर्वात न आवडणारी गोष्ट म्हणजे पंतप्रधानांनी बुलेटप्रुफ काचेतून बोलणं. मला प्रश्न पडतो जर या स्वतंत्र भारतात आणि देशाच्या राजधानीत पंतप्रधानच सुरक्षित नसतील तर मग आम्ही सुरक्षित कसे? ‘निर्भय’ कसे? स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय झालं? ब्रिटिश गेले म्हणून? मध्ययुगात सरदार उमरावांची घराणी असायची आणि राजा आपली सत्ता राजधानीत बसून चालवायचा. आजसुद्धा अशी छोटी छोटी पॉवर सेंटर्स सत्ता केंद्रे उभी केली गेलेली आहेत, त्यांच्याशिवाय कामं होत नाहीत. असं स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय झालं? प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे असं आपण म्हणतो. पण, एखाद्याने जर आपले विचार मांडले तर बस फोडणे, पुतळे जाळणे, तोंडाला काळे फासणे असे प्रकार सुरू होतात. संविधानात मूलभूत हक्कांमध्ये धर्म, वंश, जात, िलग, जन्मस्थान यांवर आधारित भेदभावास असलेल्या प्रतिबंधाबद्दल नमूद केले आहे आणि आज आपण आरक्षण देत आहोत. कधी कधी वाटतं, खरंच आपल्याला जातीयवाद संपवायचा आहे का? या देशात सर्वाना समान संधी उपलब्ध होतील, तेव्हाच कोणत्याही आरक्षणाशिवाय जातीयवाद संपला असे आपण म्हणू शकू. एक गोष्ट सगळ्यांनीच लक्षात ठेवायला हवी की, प्रथम क्रमांक येण्यापेक्षा तो टिकवणं जास्त अवघड असतं, तसंच स्वातंत्र्य मिळाल्यावर ते टिकवणं जास्त अवघड असतं.
उत्कर्ष अहिरे, मालेगाव.

नागरिकांचीही जबाबदारी
मनात देशप्रेम असलं तरी ते नेहमीच व्यक्त करता येतंच असं नाही. देशाविषयीचं प्रेम, भावना व्यक्त करण्यासाठी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी अशा दोन दिवसांचं निमित्त चांगलंच. म्हणूनच मी अजूनही माझ्या शाळेत स्वातंत्र्य दिनी झेंडावंदनासाठी जातो. शाळेत होणारं ते संचलन, देशभक्ती पर गाणी, भाषणं, लेझीम असं सगळं बघून देशप्रेमाची भावना नेहमीच जागृत होते. टीव्हीवर दिल्लीच्या राजपथावरचं संचलन बघायचं असतं. पण, वेळ जमून येत नाही. त्या वेळी मी शाळेत असतो. स्वातंत्र्यानंतर भारतात भूमिपुत्रांचं राज्य आलं. पण, आता विकास आणि अत्याचार दोन्ही एकाच वेळेला होताना दिसतायत. देश स्वतंत्र आहे. पण, त्यात त्रुटी आहेत. त्यांचं निवारण करणं हे भारतीय नागरिकांचं कर्तव्य आहे. माझ्या मते, मूलभूत गरजा भागल्या पाहिजेत, प्रत्येकाला विचार आणि मते व्यक्त करता आली पाहिजेत.
तेजस ठाकूर, पालघर.

स्वातंत्र्य.. साध्य नसून साधन
आपल्या देशातील स्वातंत्र्य राजकीय आणि सामाजिक या दोन पातळ्यांवर समजून घेणं आवश्यक आहे. आज अनेक संकटांना सामोरे जाऊनही भारत निर्वविादपणे जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश आहे. प्रत्येकाच्या डोळ्यांतील अश्रू पुसणे आणि भुकेल्या, लाखो लोकांना स्वराज्याची खात्री देणे या गांधीजींच्या उक्तीमध्येच स्वातंत्र्याचा खरा अर्थ दडलाय. एक जबाबदार सुजाण नागरिक म्हणून माझ्या कुटुंबाने, समाजाने आणि संविधानाने मला काही महत्त्वाचे हक्क दिले आहेत. अगदी माझे स्वत:चे कपडे निवडण्यापासून ते माझं करिअर निवडण्यापर्यंतचं स्वातंत्र्य. तसंच विचार करण्याचं, लिहिण्याचं स्वातंत्र्य. अशी अनेक स्वातंत्र्यं आपल्याला दिली गेलेली आहेत. पण या अधिकारांबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. जसं की स्वातंत्र्य देण्यामागची उद्दिष्टे काय आहेत, स्वातंत्र्याचा उपभोग घेतानाच ते काळजीपूर्वक कसं सांभाळलं पाहिजे आणि या स्वातंत्र्याबरोबर कोणत्या जबाबदाऱ्या येतात. आपलं आयुष्य आनंदाने आणि ध्येयप्रेरित होऊन जगणं, लोकांच्या कल्याणासाठी आपल्या क्षमतांचा वापर करणं आणि या हक्कांबरोबर येणाऱ्या कर्तव्यांचं निष्ठेने पालन करणे या गोष्टींचा विचारस्वातंत्र्याबाबत बोलताना केला पाहिजे. आणि म्हणूनच मला विविध रूपांत मिळणारं स्वातंत्र्य माझ्यासाठी साध्य नसून सुधारणेसाठी मिळालेलं एक साधन आहे.
अक्षय पाटील, चाळीसगाव.

जाणीव व्हायला हवी
शाळेत असताना झेंडावंदनाला नियमित हजर असायचो. पुढे इंजिनीअरिंग कॉलेजला असताना झेंडावंदनाला जायचो तेव्हापासून मला माझा देश, कॉलेज, माझं स्वातंत्र्य या सगळ्याबद्दलचा अभिमान आणि स्वत:बद्दलचा अभिमान प्रकर्षांने जाणवायचा. कारण त्या दिवशी असणारे ते शिस्तप्रिय वातावरण, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, परेड्स, भारतीय सेनेतील अधिकाऱ्यांची भाषणं यामुळे माहौल वेगळाच बनायचा. मला मनापासून वाटतं की आजच्या तरुणांनी देशाच्या स्वातंत्र्याबद्दल, त्याच्या सर्वसमावेशक आणि व्यापक अर्थाबद्दल जागरूक असलं पाहिजे. दरवर्षी पंतप्रधानांचं भाषण बघता येतंच असं नाही. शक्य होईल तेव्हा मी त्यांचं भाषण बघतो. त्याच वेळी होणाऱ्या विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रमांतून भारत या ‘अखंड देशाचा’ अनुभव येतो. ‘देश’ हा केवळ एक शब्द नसून ती एक भावना आहे. माझ्या मते, स्वातंत्र्याबद्दल केवळ बोललं जाऊ नये तर ते जगलं पाहिजे, उपभोगलं पाहिजे आणि त्याचबरोबर इतरांनाही त्याचा अनुभव देता आला पाहिजे. स्वातंत्र्याचा अर्थ पाश्चिमात्त्यांचं अंधानुकरण असा न घेता विविध संस्कृतींतून आलेल्या मानवतावादी मूल्यांना एकत्र करून स्वातंत्र्याची जाणीव करून दिली पाहिजे. आज मला मिळणाऱ्या स्वातंत्र्यसारखंच स्वातंत्र्य सर्वाना समान रीतीने मिळायला हवं. ते नुसतंच सत्तेचं हस्तांतरण करण्याची संधी म्हणून उरता कामा नये. खरं स्वातंत्र्य म्हणजे स्वत:ला मनापासून जाणीवपूर्वक स्वतंत्र करण्यासाठी संधी आणि पर्यायांची उपलब्धता आहे. याचा उपयोग आपल्याला योग्य ते निर्णय घेण्यात होतो. स्वातंत्र्याचा अर्थ एकांगी न घेता सर्व समाजाचे एकमेकांवर असलेले अवलंबित्व असा घेतला तरच स्वातंत्र्याची खरी चव चाखता येईल.
प्रसाद थोरवे, सातारा.

स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला जातो…
पारतंत्र्यातून बाहेर पडणं ही तेव्हा देशाची गरज होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र आता चित्र काहीसं बदललंय. या स्वातंत्र्याचा अर्थ लोक आपापला लावत आहेत. युग दुसरीकडेच चाललं आहे. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा देशातील लोक गैरफायदा घेतायत, स्वातंत्र्याच्या नावाखाली मनमानी करत आहेत. तरुणांसाठी तर स्वातंत्र्याचा अर्थ म्हणजे मजा-मस्ती करणं, शिक्षण झालं की पैसा कमवून मजा करणं एवढाच उरला आहे. दुसऱ्यांसाठी, समाजासाठी काही करण्याची भावना, वृत्ती तरुणांमध्ये उरली नाहीये, असं चित्रं बघायला मिळतं. मी दरवर्षी माझ्या शाळेमध्ये १५ ऑगस्टला झेंडावंदनासाठी जाते. शाळा संपून काही र्वष झाली असली तरी आवर्जून मी या दिवशी शाळेत हजर राहते. १५ ऑगस्टला शाळेमध्ये झेंडावंदन होतं, स्वातंत्र्याबद्दल, देशाबद्दल चांगलं आणि सकारात्मक बोललं जातं, देशामध्ये क्रांती घडवून आणण्याविषयीचे विचार मांडले जातात. हे सगळंच मला खूप स्फूर्तिदायक वाटतं. म्हणून मी नित्यनेमाने १५ ऑगस्टला शाळेत जाते. दिल्लीला राजपथवर जी परेड होते, ती मी दूरदर्शनवर सकाळी बघते. पण त्यानंतरची नेत्यांची भाषणं ऐकायला मला आवडत नाही. कारण हे नेते एक दिवस सगळं चांगलं बोलतात, पण ते जे बोलतात ते स्वत: पाळतील, करून दाखवतील असा विश्वास त्यांच्याबद्दल वाटत नाही. त्यामुळे पोकळ आश्वासनं ऐकायला मला आवडत नाही. मला वेगवेगळ्या बाबतीत स्वातंत्र्य उपभोगता येतं, परंतु आपली बाजू ठामपणे मांडण्याचं स्वातंत्र्य मात्र नेहमीच मिळतं असं नाही. कॉलेजमध्ये एखादी गोष्ट चुकीची घडताना दिसत असेल तर त्यावर आपले विचार मांडता येत नाहीत. कॉलेजमध्ये मुलं-मुलींना वेगळं बसवलं जातं. याबाबतीत जास्त स्वातंत्र्य मिळायला हवं. आमच्या महाविद्यालयात मुलं आणि मुलींना एकमेकांशी बोलण्याचंही पुरेसं स्वातंत्र्य नाही. हे आजच्या काळाप्रमाणे बदललं पाहिजे. आमच्या कॉलेजमध्ये गणवेश आले, पण त्याबाबतीत माझी फार काही तक्रार नाही कारण महाविद्यालयात शिस्तीसाठी ते गरजेचं आहे.
योगिता खेताडे, नागपूर

लोकशाही? राजकारण्यांची हुकूमशाही
आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांचं स्मरण स्वातंत्र्यदिनी केलंच पाहिजे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता ६७ र्वष होतील. तरी अजूनही स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने उपभोगता येतं, असं मला वाटत नाही. राजकारणी लोकांनी या देशाचं भलं केलं नाही. सध्या राजकारणी लोक म्हणतील, जे ठरवतील तसंच सामान्य माणसांना ऐकावं लागतं, तसंच वागावं लागतं. या दिवशी शाळा-कॉलेजला सुट्टी असेल, तरीही प्रत्येक भारतीय नागरिकाने या दिवशी जवानांचं, हुतात्म्यांचं स्मरण करून त्यांना आदरांजली वाहणं महत्त्वाचं आहे. बरेच तरुण सुट्टीचा मुहूर्त साधून सहलीला, मजा करायला जातात, हे मला पटत नाही. जरी कुठे जायचं असेल तरी झेंडावंदनाच्या निमित्ताने काही सामाजिक काम करायला गेलं पाहिजे. दिल्लीमध्ये होणारी परेडची झलक टीव्हीवर बघतो. ते बघताना देशावरचं प्रेम अधिकच जागृत होतं. व्यक्तिगत स्वातंत्र्य मला पूर्णपणे मिळालंय. विविध बाबतीतले निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मला आहे. शिक्षणातील महत्त्वाचे निर्णय घेतानाही मला स्वातंत्र्य दिलंय. आमच्या महाविद्यालयात गणवेश बंधनकारक आहे, पण मला त्यात काही चुकीचं वाटत नाही. कारण शिस्तीसाठी ते आवश्यक आहे. त्याचबरोबर गणवेशामुळे एकजूट दिसून येते व महाविद्यालयाचा या एकजुटीमुळे इतर कॉलेजसमोर प्रभावदेखील वाढतो. घरी मात्र कधी-कधी एखादी गोष्टी विकत घेण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही, पण विचार केल्यावर मला नेहमी जाणवतं की आई-वडील आपल्या हिताचाच विचार करून योग्य तो निर्णय घेतात.
-अर्चित देशमुख, चंद्रपूर</strong>

स्वातंत्र्याचा दुरुपयोग नको
देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ र्वष लोटली, पण त्या स्वातंत्र्याचं महत्त्व हळूहळू कमी होतंय असं मला वाटतंय. आजची भारतीय तरुण पिढी विदेशी वस्तूंकडे, विदेशी जीवनशैलीकडे झुकताना आढळतेय. विदेशी संस्कृतीचा तिच्यावर खूप प्रभाव पडत आहे असं दृश्य सर्वत्र बघायला मिळतंय. आपल्या देशातील जवानांनी, शूरवीरांनी खूप कष्टाने, प्राणांची आहुती देऊन, मिळवलेलं हे स्वातंत्र्य आपल्याला फार सहज मिळालं आहे. त्यामुळे आजच्या पिढीला त्या मिळालेल्या स्वातंत्र्याची तितकी किंमत वाटत नाही. हे जे स्वातंत्र्य आपण सहजरीत्या उपभोगू शकतोय, त्यासाठी बलिदान देणाऱ्या जवानांचा आपण आदर केला पाहिजे. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. पण आज समाजात फक्त ५० टक्के लोक स्वातंत्र्याचा सदुपयोग करतात. मी मागच्या वर्षी कॉलेजच्या शेवटच्या वर्षांला होते, तोपर्यंत मी दरवर्षी १५ ऑगस्टला कॉलेजमध्ये झेंडावंदनासाठी जात होते. कॉलेज संपलं असलं तरी या वर्षीही ध्वजवंदनासाठी कॉलेजमध्ये जाणार आहे. देशाबद्दल आदर, अभिमान व आनंद या दिवशी अधिक जाणवतो. आमच्या कॉलेजमध्ये १५ ऑगस्टला येणं बंधनकारक होतं, पण तरीदेखील काही मित्रमैत्रिणी यायला टाळाटाळ करायचे. तेव्हा मी त्यांना झेंडावंदनाला येण्यासाठी प्रवृत्त करायचे. या दिवशी दिल्लीच्या राजपथवर होणारे संचलन मी दूरदर्शनवर अनेकदा पाहिलं आहे. देशासंबंधी इतरही अनेक कार्यक्रम मला पाहायला आवडतात. मला स्वतला पुरेसं स्वातंत्र्य मिळत आहे व मी त्या स्वातंत्र्याचा सदुपयोग कसा करता येईल त्याचाच विचार नेहमी करते. स्वातंत्र्याबद्दल माझी कोणतीही घरातून किंवा समाजाबद्दल तक्रार नाही. पण, आमच्या काळात मुलींना खूप स्वातंत्र्य मिळालं आहे, पण काही मुली या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करताना दिसतात. मुलींच्या बाबतीत जे वाईट प्रसंग समाजात घडत आहेत, त्यामध्ये मुलीसुद्धा काही प्रमाणात दोषी आहेत असं मला वाटतं. कारण त्यांनी त्यांना मिळालेल्या स्वातंत्र्याच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्याचा विचारपूर्वक उपयोग केला पाहिजे असं मला वाटतं. भारतीय नागरिकांनी मिळालेल्या स्वातंत्र्याचा सदुपयोगच केला पाहिजे. तंत्रज्ञान, मोबाइल, अॅप्स या सर्व मिळणाऱ्या सुविधांचा व त्यांचा वापर करायला मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा आपल्याकडून दुरुपयोग होणार नाही याची सर्वानी दखल घेतली पाहिजे.
-राधिका भोंडे, नागपूर
(निकालास महिला महाविद्यालय)

आणखी प्रगती अपेक्षित
इंग्रजीच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन ६७ र्वष उलटून गेली असली तरी भारतीय नागरिकांना आवश्यक तेवढं विचारस्वातंत्र्य मिळत नाही. आमच्या तरुण पिढीने गुलामगिरी पाहिली नाही, अनुभवली नाही. पण भारताच्या इतिहासामध्ये आम्ही स्वातंत्र्यलढा वाचला आहे. पण, त्या वेळी असलेली स्वातंत्र्याची व्याख्या आणि आत्ताचा आमच्या पिढीचा स्वातंत्र्याकडे बघण्याचा दृष्टिकोन यात निश्चितच फरक आहे. मला वाटतं, इंग्रजांच्या गुलामगिरीतून जरी आपण मुक्त झालो असलो तरी कुठल्या ना कुठल्या विचारधारेचं आजही आपल्यावर बंधन आहे. आपले राजकारणी आपल्यावर राज्य करीत नाहीत. त्यामुळे खऱ्या अर्थाने भारतीय नागरिकाला स्वातंत्र्य उपभोगता येत नाहीये. स्वतंत्र देशामध्ये जेवढी प्रगती, उन्नती आणि विकास व्हायला हवा होता, तेवढा आपल्या देशात अजिबात झाला नाहीये. मोठय़ा शहरांमध्ये कदाचित थोडं स्वातंत्र्य असेल, पण आजही अनेक खेडय़ापाडय़ांत तेथील लोकांना जुन्या समस्यांनाच तोंड द्यावं लागत आहे. दैनंदिन जीवनाच्या गरजांसाठी लढा द्यावा लागतो आहे. अशा परिस्थितीला ‘स्वातंत्र्य’ कसं म्हणू शकतो आपण? मी पर्यावरणाशी निगडित काम करतो, जेव्हा देशाच्या फायद्यासाठी आम्ही एखादा बदल किंवा योजना मांडतो, तेव्हा अनेकदा अधिकाऱ्यांकडून ‘याला सरकारची मान्यता नाही, हे आमच्या अधिकारात नाही’ अशी नकारात्मक उत्तरं दिली जातात. मग विचार येतो की या स्वतंत्र देशात ‘एखादा चांगला विचार मांडण्याचं, कृतीचंसुद्धा स्वातंत्र्य आपल्याला का मिळत नाही?’ मी दरवर्षी शाळा किंवा कॉलेजमध्ये १५ ऑगस्टला झेंडावंदनासाठी जातो. मला वाटतं की इतर वेळी आपण आपल्या कामात खूप व्यग्र असतो, की आपल्याला देशाबद्दल विचार करायला फार वेळ मिळत नाही. तेव्हा १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन दिवशी तरी देशाचा विचार करावा, त्याबद्दल आदर व्यक्त करावा. देशाबद्दल अभिमान जागृत होतो. दिल्लीला जी परेड होते ती मी दरवर्षी दूरदर्शनवर बघतो. कधी तरी दिल्लीला जाऊन आपल्याला हे बघता यावं, असं वाटतं. व्यक्तिस्वातंत्र्याच्या बाबतीत मला वाटतं की, मला एक व्यक्ती म्हणून घरात, मित्रपरिवारात, स्वातंत्र्य आहे, पण मी जेव्हा समाजामध्ये वावरतो तेव्हा असं वाटतं की, आजही आपण अनेक नियम, बंधनांत अडकलो आहोत व या बंधनांमुळे आपल्या देशाच्या सर्वागीण विकासात त्याबरोबरच भारतीय. नागरिकांच्या सर्वागीण विकासात अडथळा निर्माण होत आहे. समस्या माहीत असूनही या राजकीय आणि सामाजिक बंधनांमुळे त्यावर तोडगा काढता आला पाहिजे. कारण मूळ मुद्दय़ाच्या मर्मावर आपण बोटच ठेवत आहोत. विचारस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य असेल तर भारत देशाची नक्कीच खूप प्रगती होऊ शकेल.
सावन बाहेकर, भंडारदरा (मानद वन्यजीव संरक्षक)

झेंडावंदन हे देशप्रेमाचं प्रतीक
शाळा संपली असली तरी आजही झेंडावंदनासाठी मी नियमित उपस्थित राहते. प्रत्यक्षपणे देशासाठी काही करता येत नसलं तरी किमान आपण एवढं तर नक्कीच करू शकतो. देशावरचं प्रेम व्यक्त करायला हा दिवस म्हणजे आपल्यासाठी एक संधी असते. त्यामुळे या दिवशी झेंडावंदनासाठी जायला हवं. मग ते शाळेतलं असो किंवा कॉलेज किंवा सोसायटीतलं असो. झेंडावंदन महत्त्वाचं. टीव्हीवर सुरू असलेलं दिल्ली राजपथावरचं संचलन मात्र मला बघता येत नाही. पण, नंतर बातम्यांमध्ये दाखवताना जरूर बघते. गावात रस्ते बांधले, पण शहरासारखे नाहीत. अगदी शहरासारखे रस्ते असणं अपेक्षित असंही नाही. पण, किमान बरे रस्ते असावेत ही माफक अपेक्षा. शिक्षणाचा अधिकार सर्वानाच मिळाला पाहिजे. आज देशात शिकलेली, गाडी चालवणारी माणसंही रस्त्यात वाटेल तिथे थुंकतात, सिग्नल मोडतात हे अयोग्य आहे. विद्यार्थी, तरुण आणि वयोवृद्ध सगळ्यांचाच आवाज समाजाने ऐकला पाहिजे आणि तशी दाखलही घेतली पाहिजे.
वेदांगी जोशी, रत्नागिरी

आधी स्वत सुधारलं पाहिजे
मी चिपळूणच्या ख्राईस्ट ज्योती कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकत होते. माझ्या शाळेत झेंडावंदनाच्या कार्यक्रमात मी नेहमी सहभागी व्हायचे. आता कॉलेजमध्ये अनिवार्य नसलं तरी मला आवड असल्याने मी झेंडावंदनासाठी जाते. शाळेत असताना स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी झेंडावंदन करून घरी आल्यावर टीव्हीवर पंतप्रधानांचं भाषण मी बघायचे, पण आता मुद्दाम टीव्ही लावून ते बघत नाही. आपला देश स्वतंत्र असल्यामुळे मला हवं तिथे जाता येतं. कोणीही त्यावर बंधन घालू शकत नाही. पण, माझ्या मते एवढं पुरेसं नाही. कारण जातीवाद, धर्मवाद आजही आहे. त्यामुळे जरी मी एका स्वतंत्र राष्ट्राची नागरिक असले तरी काही ठिकाणं अशी आहेत, जिथे एका विशिष्ट धर्माचं वर्चस्व आहे आणि इतर धर्मातील लोकांना तिथे जाता येत नाही. जातीयवाद, धर्मवाद जोपर्यंत भारतातून जात नाही तोपर्यंत भारत देश पूर्णपणे स्वतंत्र आहे असं मी म्हणू शकणार नाही. शिवाय भ्रष्टाचार आहेच. जागोजागी होणाऱ्या भ्रष्टाचारामुळेही नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा येते. एक नागरिक म्हणून मला हवं तसं स्वातंत्र्य मिळत नसलं तरीही वैयक्तिक आयुष्यात मला घरात, कॉलेजमध्ये जितकं गरजेचं आहे तितकं स्वातंत्र्य मिळतंय. हल्ली सोशल नेटवर्किंग साईट्समुळे लोकांना हवं ते जगासमोर मांडायचं स्वातंत्र्य मिळत आहे. पण, उगाच कुठल्याही विषयाचा विनाकारण गावगजर करून उपयोग नाही. आधी आपण स्वत:ला सुधारलं पाहिजे आणि मगच इतरांना. तरच आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळेल.
सायली संतोष दाभोळकर, चिपळूण

सोशल मीडियाचं स्वतंत्र जग
माझं संपूर्ण शालेय शिक्षण सांगलीमध्ये झालं. सहावीपर्यंत बरनाले तर सातवी ते दहावी अल्फोन्सा या शाळांमध्ये मी शिकत होते. या दोन्ही शाळांमध्ये झेंडावंदनाच्या कार्यक्रमामध्ये मी उत्साहाने भाग घ्यायचे. शाळा संपल्यावर अजूनही मी झेंडावंदन झालं, की घरी येऊन दरवर्षी पंतप्रधानांचं भाषण ऐकते आणि तो संपूर्ण झेंडावंदनाचा कार्यक्रम बघते. एका स्वतंत्र राष्ट्रात राहत असल्याचा मला आनंद आहे. पण, अजून बऱ्याच गोष्टींकडे लक्ष दिलं तर आपला देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल. घरातल्या स्वातंत्र्याबद्दल म्हणाल तर मला आई-बाबांनी कधी कुठलंच बंधन घातलं नाही. बाहेर गेल्यावर मी सुरक्षित आहे का हे ते नक्की तपासून पाहतात, पण ते योग्यच आहे. आजकाल आम्हा मुलांना सोशल मीडियामुळे एक वेगळंच जग मिळालंय आणि त्यात बरंच स्वातंत्र्य अनुभवायला मिळतं. नवनवीन मित्र-मैत्रिणी भेटतात. पण, त्यासाठी आम्ही मोबाइल फोन्स आणि टेक्नॉलॉजीवर अवलंबून राहतो आणि ते चुकीचं आहे असं मला वाटतं.
नम्रता पारेख, सांगली

इतरांचं स्वातंत्र्य मुलींना धोकादायक?
मी कोल्हापुरातल्या तवानाप्पा पाटणे हायस्कूलमध्ये होते. तिथे आम्ही दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदन करायचो. पण, शाळेनंतर ज्युनिअर कॉलेजमध्ये झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला कधी गेले नाही. आता डिग्री कॉलेजमध्ये मात्र मी जाते. झेंडावंदन करून आल्यावर पंतप्रधानांचं भाषण थोडा वेळ ऐकते. स्वातंत्र्याची व्याख्या माझ्या मते खूप व्यापक आहे. ती फक्त माणसांपुरती मर्यादित नाही, तर ती पर्यावरणाला, जनावरांना, मशिन्सना, शिक्षणाला सगळय़ालाच लागू होते. एका स्वतंत्र राष्ट्रात प्रत्येकाला आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण करता यायला हव्यात. प्रत्येक स्त्रीला सुरक्षित जगता यायला हवं आणि तरुणाईला योग्य आणि अयोग्य काय आहे यात फरक करता यायला हवा. मी एक मुलगी, एक स्त्री असल्यामुळे या देशात स्वातंत्र्याचा अनुभव घेतेय. पण, मी आनंदी आहे असं म्हणणार नाही. जागोजागी मुलींवर, स्त्रियांवर अत्याचार होतायेत. अशा स्वतंत्र राष्ट्रात राहण्याचा काय उपयोग? माझ्यासारख्या मुलींना उशिरापर्यंत घराबाहेर थांबण्याआधी दहा वेळा विचार करावा लागतो. देशात प्रत्येकाला मिळालेलं स्वातंत्र्यच आम्हा मुलींना धोक्याचं आणि घातक ठरतंय. मग काय उपयोग या स्वातंत्र्याचा? जिथे महिला सुरक्षित आहेत असाच देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र देश आहे. व्यक्तिगत आयुष्यात तसं मला कुठल्याच बंधनात राहावं लागत नाही. या समाजात राहताना मात्र नक्कीच बंधनं आहेत. सध्या शिक्षणामुळे थोडा सुधार आहे, पण, अजून बऱ्याच गोष्टी बदलण्याची गरज आहे. सोशल नेटवर्किंग साईट्समुळे आम्हाला मतं मांडायला आणि भावना व्यक्त करायला एक चांगलं माध्यम मिळालंय. जे सामाजिक प्रश्न आहेत ते माध्यमांनी ठळकपणे मांडले पाहिजे. त्यामुळे जे आपल्या हातात आहे, त्यात तरी आपण नक्कीच बदल घडवून आणू शकतो.
प्रणोती सपकाळ, नेरली, कोल्हापूर

स्वातंत्र्य पूर्ण उपभोगता येत नाही..
माझं शालेय शिक्षण वारणा विद्यालयात झालं. तिथे आणि पुढे कॉलेजमध्येही झेंडावंदनाच्या कार्यक्रमात सहभागी होणं बंधनकारक होतं. कॉलेज संपल्यावर मला पुढेसुद्धा आवडेल झेंडावंदनाला जाणं. झेंडावंदन करून आल्यावर मी पंतप्रधानांचं भाषण ऐकत नाही. मला ते ऐकावंसं वाटत नाही. या देशात मी पूर्णपणे स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकत नाही. स्वतंत्रपणे मी कुठेही फिरू शकते, पण, मनात भीती असतेच. या देशात स्वत:चं मत मांडण्याची मुभा आहे, पण उघडपणे कोणावर टीका करता येत नाही. आपण आहोत तसं लोकांनी आपल्याला स्वीकारलं पाहिजे. पण या स्वतंत्र देशात तसं होताना दिसत नाही. मला घरात, जिथे वावरते तिथे पूर्ण स्वांतत्र्य आहे. पण तरी एक मुलगी म्हणून माझ्यावर काही बंधनं आहेत. उशीपर्यंत घराबाहेर न राहण्याचं बंधन तर सगळ्याच मुलींना असतं. काही बाबतीत मुला-मुलींमध्ये अजून असमानता आहे आणि ती बदलली पाहिजे.
अनघा आंबोळे, वारणानगर