सुरुवातीस आयपॉड, नंतर आयफोन आणि त्यानंतर आयपॅड असे करत अॅपलने संपूर्ण जगाला मोहिनी घातलेली असली तरी अनेकांना असे वाटते आहे की, आयफोनमध्ये आयपॉड आणि बाकी सुविधा एकत्र केल्यानंतर आता आयपॉडविषयीची क्रेझ कमी झालेली असेल, परंतु वस्तुस्थिती तशी नाही. आजही आयपॉडची असलेली क्रेझ कमी झालेली नाही. मोबाइल वेगळा आणि आयपॉड वेगळा ठेवणारी पिढी आजही मोठय़ा प्रमाणावर आहे. भारतात यांचे प्रमाण कमी असेल. कारण मुळातच अमेरिकेच्या तुलनेत आपली क्रयशक्ती कमी आहे. त्यामुळे एकाच उपकरणात अनेक सुविधा मिळत असतील, तर भारतीय मंडळी त्याला अधिक प्राधान्य देतात, पण भारतीयांचीही क्रयशक्ती गेल्या काही वर्षांत चांगलीच वाढत असून त्यामुळेच इथेही वापराच्या संदर्भातील लोकांच्या सवयींमध्ये मोठा बदल झाला आहे. आयफोन किंवा आयपॉड वापरणाऱ्यांच्या संख्येत भारतातही चांगली वाढ झाली आहे. म्हणूनच अॅपलने आता नव्याने आणलेला आयपॉड टच १६ जीबी त्यांनी भारतातही उपलब्ध करून दिला आहे.
महत्त्वाचे म्हणजे या आयपॉड टच १६ जीबीमध्ये पाच मेगापिक्सेलचा आयसाइट कॅमेराही देण्यात आला आहे. आता अॅपलच्या सर्व आयपॉडना पाच मेगापिक्सेलचा आयसाइट कॅमेरा देण्यात आला आहे. त्यात १०८० पी एचडी व्हिडीओ रेकॉर्डिगची सोयही आहे. चार इंची रेटिना डिस्प्ले वापरण्यात आला आहे. अॅपलची प्रगती एफाइव्ह चिप वापरण्यात आली असून समोरच्या बाजूस फेसटाइम कॅमेराही आहे.
अतिशय हलके आणि सडपातळ वाटेल असे अनोडाइज्ड अॅल्युमिनिअम डिझाइन हा त्याचा विशेष असून गुलाबी, पिवळा, निळा, चंदेरी, स्पेस ग्रे आणि लाल या रंगांमध्ये हा आयपॉड विक्रीसाठी उपलब्ध आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत –
रु. १६,९०० (१६ जीबी)
रु. २०,९०० (३२ जीबी)
रु. २४,९०० (६४ जीबी)