त्या जंगलात राहुल एकटाच होता. जंगल अगदी किर्र नव्हते, बऱ्यापैकी झाडं होती. राहुलला आठवतच नव्हते नक्की कोणत्या वाटेने मघाशी जंगलात आला. मध्येच एका वानराने जोरजोरात चीत्कारत एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारली आणि क्षणभर राहुल घाबरूनच गेला. तसा काही राहुल भित्रा वगैरे नव्हता, पण आता तो एकटाच जंगलात आला होता, अंधार पडायच्या आत त्याला काही तरी शोधायचे होते. तसे जंगलाचा भाग थोडासाचा होता, बाकी ती टेकडी रखरखीतच होती. आज सकाळीच तो या जंगलात येऊन गेला होता. त्यातीलच एका जागेवर त्याला जायचे होते. पण सकाळी त्याच्याबरोबर अनेक मित्र होते. आता तो एकटाच. काय करावे हे कळत नव्हते, आणि क्षणात त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. अरे, आपण सकाळी वापरलेला नकाशा सॅकमध्ये आहे, मॅग्नेटिक कंपासदेखील आहे आणि समोरच्या वाटेवर सकाळचे खुणेचे दगड दिसत आहेत. क्षणात राहुलची भीती पळून गेली.
इकडे त्या टेकडीच्या पायथ्याशी असणाऱ्या शिबिरात मात्र एकच हाहाकार उडाला होता. राहुल दिसत नाही म्हटल्यावर शिबिरात शिकवणारे सगळे दादा-ताई धावाधाव करत होते. कोणाला कळत नव्हते राहुल कोठे गेला ते. नववीत असलेला राहुल पहिल्यांदाच अशा साहस शिबिरांना आला होता. मागच्या दिवाळीच्या सुट्टीत अमेयदादाबरोबर ट्रेकिंगला जाऊन आल्यापासून राहुलला परत परत ट्रेकला जावंसं वाटत होतं. पण आपल्याला तर फारसं काही माहीत नाही आणि नेणारं पण कोणी नाही म्हणून राहुल काहीसा नाराजच झाला होता. या सुट्टीत म्हणूनच अमेयदादाने त्याला मुद्दाम साहस शिबिराला आणले होते. गेल्या पाच दिवसांत आपण आजवर अशा एकाही शिबिरात कसे काय आलो नाही, याचेच त्याला आश्चर्य वाटत होते. राहुल आईबाबांबरोबर भरपूर फिरायचा, मात्र आजवर साहस शिबिरात आला नव्हता. पण शिबिरात आल्यापासून त्याला या सर्वाची चांगलीच गोडी लागली होती. गेल्या पाच दिवसांत त्याने इतकी धमाल केली होती की बस्स. दादाताई जे जे शिकवत ते सगळं मन लावून करत असे. उद्या शिबीर संपणार म्हणून आज सकाळी ट्रेझर हंटचा गेम खेळायचे ठरले होते. टेकडीच्या आसपासचे जंगल आणि एक-दोन छोटय़ा टेकडय़ा या परिसरात लपवलेल्या दहा ट्रेझरचा सर्वानी शोध घ्यायचा होता. सगळ्यांनी अगदी धमाल केली होती. दादा-ताईंनी शिकवलेले मॅप रीडिंग, वाटांची माहिती, खुणा कशा ओळखायच्या. सगळंच एकदम अनोखं होतं. मात्र नेमक्या त्या गोंधळातच राहुलनं आईच्या मागे लागून आणलेला डिजिटल कॅमेरा हरवला होता आणि आता राहुल एकटाच तो शोधायला बाहेर पडला होता.
शिबीर सुरू होतानाच सगळ्या दादा-ताईंनी सांगितलं होतं की, आम्हाला सांगितल्याशिवाय कोठेही जायचे नाही. काही व्रात्य मुलांवर तर सर्वाचंच लक्ष असायचं. राहुल तसा शांत मुलगा आणि नववीत असल्यामुळे शिबिरातील मोठय़ा गटातला दादाच होता. पण दुपारी ट्रेझर हंटच्या नादात कॅमेरा हरवल्यामुळे त्याचा एकंदरीतच मूड ऑफ झाला होता. आईने त्याला कॅमेरा नेऊ नको म्हणून दहादा बजावले होते, अमेय दादाने पण आणू नकोस म्हणून सांगितले होते. पण तो हट्टाने कॅमेरा घेऊन आला होता. आणि त्याचाच त्याला आता पश्चात्ताप होत होता. म्हणूनच कॅमेरा हरवल्याचे कोणालाही न सांगता तो स्वत:च शोधायला जंगलात घुसला होता. त्याला अमेय दादाने नकाशा कसा वापरायचा ते शिकवले होते. कंपासातील उत्तर-दक्षिण दिशा दाखविणाऱ्या सुईच्या आधारे कंपास नकाशावर कसा ठेवायचा, त्यानुसार नकाशा कसा सेट करायचा हे सारं तो शिकला होता. केवळ शिकलाच नाही तर आज सकाळीच ट्रेझर हंटमध्ये नकाशा वापरून शोधण्याची तीनही ट्रेझर राहुलमुळेच त्याच्या टीमने सर्वात प्रथम शोधले होते. म्हणूनच मोठय़ा धाडसाने तो या शोधमोहिमेवर एकटाच आला होता.
पण सकाळची गोष्ट वेगळी होती. त्यांच्याबरोबर दोन मोठे दादादेखील होते. ते ट्रेझर कोठे आहे ते सांगत नसत, मात्र सोबत असल्यामुळे मुलं आरामात भटकत होती. राहुल तसा मोठाच असल्यामुळे त्यानेच त्याचा ग्रुप लीड केला होता. त्याला डोंगरातील वाटा, जंगल हळूहळू कळू लागलं होतं. तसा तो काही वात्रट वेंधळा नव्हता, मात्र तरी कॅमेरा हरवलाच होता त्याने. आता त्याला त्याची चूक स्वत:च सुधारायची होती. तसं हे जंगल आणि टेकडय़ा सुरक्षित आहेत असं अमेय दादानं त्याला सांगितलं होतं. जंगलात एकटय़ाने न जाण्याबद्दल तर शिबिरात आल्यापासून तो ऐकत होता. पण कॅमेरा हरवलाय आणि तो शोधायचा म्हटल्यावर कदाचित त्याला सर्वाकडून ओरडा खावा लागला असता, म्हणून तो एकटाच निघाला होता. सगळ्या दादांनी पाच दिवस शिकवलेल्या गोष्टी त्याच्या डोक्यात होत्या. सॅकमध्ये काय काय हवं, दोर कसा वापरायचा, वाट कशी शोधायची सगळं नीट आठवून पाणी, नकाशा, एक बिस्किट पुडा, केळं, कंपास, खुणेसाठी म्हणून रंगीत फिती या सर्व सकाळच्या ट्रेझर हंटमधील गोष्टी त्याने सॅकमध्ये भरल्या.
दुपारी तीनच्या सुमारास शिबिरातील सगळे झोपले असताना तो हळूच सटकला होता. पहिली छोटीशी टेकडी चढल्यावर लगेचच एक जंगलाचा तुकडा होता. राहुल मोठय़ा धाडसाने आत शिरला होता, पण त्याला पुढे कोठे जायचे तेच कळत नव्हते. काहीसा गांगरलाच होता तो. मग मात्र त्याला ट्रेझर हंट आठवलं आणि गेल्या पाच दिवसांतील शिकलेल्या गोष्टी आठवल्या. एका वाटेवर मधोमध ठेवलेली दगडाची चव्वड म्हणजे ही वाट चुकीची हे त्याने जाणले आणि दुसऱ्या पायवाटेने पुढे जाऊ लागला. पुन्हा आपण चुकलोच तर, कोणी शोधायला आले तर दोघांच्या सोयीसाठी त्याने एक रंगीत फीत त्याच्या वाटेवरील झाडाला बांधली. थोडंसं चालल्यावर एक मोकळी जागा आल्यावर त्याने लगेच नकाशा बाहेर काढला. सकाळी ट्रेझर हंटची मोजकीच ठिकाणं त्यांना नकाशावर शोधायची होती. राहुलला ती सारी स्पष्टपणे नकाशावर दिसत होती, पण त्याला कॅमेरा विसरला असण्याची खात्री असणारे ठिकाण काही नकाशावर ट्रेझर हंट म्हणून दाखविले नव्हते. त्यामुळे त्याला आता तेच ठिकाण नकाशावर शोधायचे त्रासदायक होते. नकाशाची उत्तर दिशा आणि कंपासाची उत्तर दिशा जुळवून त्याने नकाशा सेट केला. आता सांकेतिक खुणांची ठिकाणं शोधून आपली जागा नक्की करायची होती. वाटेत दिसलेलं छोटं मंदिर त्याने सर्वप्रथम शोधलं आणि स्वत:ची जागा नक्की केली. जेथे कॅमेरा राहिला असेल असे त्याला वाटत होतं तो एक आदिवासी पाडा होता, ज्याच्या बाजूला एक छोटीशी विहीर होती. नकाशावर ते अंतर होते साधारण एक किलोमीटरवर. दुपारचे चार वाजले होते. थोडय़ाच वेळात सूर्य डोंगराच्या पलीकडे जाऊ लागला की अंधार होणार. राहुलने दिशा व अंतराचा अंदाज घेतला आणि त्याची पावलं भराभर पडू लागली. काहीसा पळतच तो निघाला.
आणि तो एका जागी थबकला. आता त्याची खरी परीक्षा होती. इतका वेळ तो तसा निर्धास्त होता आणि वाटेत अचानक म्हशींचा कळप आला होता. त्याच्याबरोबरची दोन-तीन कुत्री जोरजोरात भुंकत होती. जाम टरकवणारा प्रसंग होता. तो खरं तर पुन्हा जंगलाच्याच दिशेने धावणार होता. कोठून हे असं एकटय़ाने जंगलात आलो, असे त्याला वाटू लागले. पण लगेचच अमेयदादाने सांगितलेलं आठवलं. अशा वेळेस पळापळी करायची नाही, शांतपणे उभे राहायचे. तो शांत झाला. इतका शांत की जंगलातील सारे छोटेमोठे आवाज त्याला जाणवू लागले. दूरवर आदिवासी वाडीतील आवाज ऐकू येत होता. राहुल इतका शांत कधीच राहिला नव्हता. त्याला त्याही प्रसंगात या शांततेने एक वेगळाच आनंद दिला होता. निरव शांतता, आजूबाजूला जंगल, त्यामागे मोठा डोंगर, आजूबाजूला कोणीच नाही. राहुल त्या निखळ शांततेत आणि सगळ्या निसर्गात इतका गढून गेला की, असा आनंद त्याला पूर्वी कधीच वाटला नव्हता.
थोडय़ाच वेळात आपोआप सगळ्या म्हशी निघून गेल्या, कुत्री तर राहुलच्या पायाशी लगट करू लागली, जणू काही राहुलच्या या छोटय़ाशा धाडसाचे जोडीदारच बनले होते ते. आता राहुल निर्धास्तपणे ठरवलेल्या वाटेने निघाला. त्याने अंदाज केल्याप्रमाणे नकाशावरील वाडी आता हाकेच्या अंतरावर आली होती. समोर विहीर दिसत होती. कॅमेरा आहे की नाही इतकंच पाहायचं बाकी होतं. तो धावतच विहिरीपाशी आला, पण कॅमेरा नव्हता. इतका वेळ त्याला झालेल्या आनंदाने त्याला क्षणात निराश केलं होतं. इतक्यात समोरच्या वाडीतून एक म्हातारी येताना दिसली. जवळ आली तसं त्याला लक्षात आलं, तिच्या हातात कॅमेरा आहे. राहुलचा आनंद गगनात मावेनासा झाला. म्हातारीला मघाशी हा कॅमेरा दिसला, तेव्हाच तिच्या लक्षात आलं ही पोरं विसरून गेली असणार. कुत्री-मांजरं काही करू नयेत म्हणून तिने तो उचलून घरात ठेवला होता. राहुलला पाहताच ती बाहेर आली होती. राहुलनं कॅमेरा हातात घेतला आणि त्याला लक्षात आले, आपण इथे आलोय ते कोणालाच माहीत नाही. तिकडे शिबिरात काय गोंधळ उडाला असेल, सगळे दादा-ताई चिडले असतील..
विहिरीचे पाणी पोटभर पिऊन तो दोन घटका तेथेच बसला. इतक्यात त्याला कोणी तरी हाका मारतंय असं वाटलं. त्याला लक्षात आलं. अरे, हा तर अमेयदादाचा आवाज, एररओ अशी खुणेची हाळी देतोय, तर दुसरा दादा राहुलच्या नावाने हाका मारतोय. राहुल धावतच पुढे आला. जंगलातून अमेयदादा येत होता. अमेयला पाहिल्यावर आता सगळे रागावणार म्हणून राहुलला रडूच फुटलं, पण अमेयदादा काहीच बोलला नाही. त्यानं त्याला जवळ घेतलं. राहुलने त्याची माफी मागितली.
परतीच्या वाटेवर राहुलने आज काय काय प्रयोग केले ते सांगितले. कॅमेरा शोधताना त्याने केलेल्या सर्व करामती ऐकून सगळेच खूश झाले होते. त्याच्या या छोटय़ाशा धाडसी मोहिमेबद्दल तर शिबिरातील सर्व मुलांनी त्याचं जाम कौतुक केलं. शिबिरात शिकलेल्या सगळ्या गोष्टी राहुलने आत्मसात केल्या होत्या. फक्त कोणाला न सांगता आणि एकटय़ाने असं जंगलात डोंगरात जायचे नाही हे तो विसरला होता. संध्याकाळी अमेयदादानं कॅम्प फायरच्या वेळेस राहुलला हे पुन्हा सांगितलं. राहुलने पुन्हा एकदा माफी मागितली, मात्र त्याच्या डोक्यात दुपारची शांतता, तो आनंद घुमत होता.
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2014 रोजी प्रकाशित
राहुलचे धाडस…
त्या जंगलात राहुल एकटाच होता. जंगल अगदी किर्र नव्हते, बऱ्यापैकी झाडं होती. राहुलला आठवतच नव्हते नक्की कोणत्या वाटेने मघाशी जंगलात आला.

First published on: 16-05-2014 at 01:06 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kids special
