‘‘उमे अगं किती लोळणारेस. ऊठ बघू. दुपार व्हायची वेळ झाली अन् तू अजून अंथरुणातच. चल ऊठ लवकर.’’ असं बोलत आईने पडदा सरकवला आणि लख्ख प्रकाशझोत चटदिशी आत आला. आता मात्र उमाला उठावंच लागलं. ‘‘काय गं आई, आत्ता कुठे उन्हाळ्याची सुट्टी सुरू झालीये आणि तू आजपण मला लवकर उठवतेस. झोपू दे ना थोडा वेळ. शाळा पण नाहीये.’’ असं बोलून एक मोठी जांभई देत उमा झोपायला जाणार इतक्यात आईने आपल्या मोठय़ा आवाजात तिला दरडावले, ‘‘उमा ऊठ म्हणतेय ना. बस्स झालं लोळणं आणि काय गं तुला प्रोजेक्ट करायचाय ना उन्हाळी सुट्टीचा गृहपाठ म्हणून. ते कधी करायला घेणार? की उन्हाळ्याचा अभ्यास पावसाळा सुरू झाल्यावर करणार?ऊठ लवकर.’’ शेवटी आईचं हे सगळं रामायण ऐकून उमा एकदाची उठली.
किती मस्त वाटत होतं उमाला. सुट्टी पडल्यावर काय काय करायचं याचे सगळे बेत तिने मनाशी अगदी नीट आखून ठेवले होते. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सकाळी मस्त उशिरा उठायचं, खूप तास टी.व्ही. पाहायचा. डिस्नेच्या सगळ्या फिल्म्स आणि कार्टून्स पाहायचं, आइस्क्रीम खायचं, मस्त बर्फाचा गोळा खायचा. आईबाबांच्या पाठी लागून फिरायला जायचं आणि खूप खूप खेळायचं.
‘‘आई गं मी तन्वीकडे जाऊन येते. आलेच दहा मिनिटांत.’’ आईला उमाची दहा मिनिटं चांगलीच माहीत होती. ‘‘जेवायला वेळेवर घरी ये ग.’’ पण आईचं हे ऐकायलाही उमा होती कुठे घरात? ती तर केव्हाच पसार झाली होती.
तन्वीचं घर उमाच्या घराच्या अगदी हाकेच्या अंतरावर होतं. दोघी जणी एकत्र शाळेत जायच्या. उमाला तन्वीच्या घरी जायला खूप आवडायचं, कारण तन्वीच्या घराशेजारी एक बंगला होता. तिथे छान बाग होती. तन्वी आणि उमाला त्या बागेत खेळायला खूप आवडायचं. त्या बंगल्यात राहणारे आज्जी-आजोबासुद्धा खूप प्रेमळ होते. पण अचानक त्यांनी तो बंगला विकला. आता तिथे कोण राहायला आले असतील याची उमाला उत्सुकता होती. कारण जर ते आज्जी-आजोबांसारखेच प्रेमळ असले असते तर त्यांना तिथे आधीसारखेच खेळायला मिळाले असते. हा सगळा विचार करता करता ती केव्हाच तन्वीच्या घरापाशी पोहोचली होती. तिने बंगल्यावर नजर टाकली. दरवाजा बंद होता. खिडक्यांवर पडदे लावले होते. काहीशी हिरमुसली होऊन ती तन्वीच्या घरी शिरली. ‘‘मला नाही आवडली ती लोकं.’’ जणू काही उमाच्या मनात काय चाललंय हे कळल्यासारखं तन्वी तिला म्हणाली. ‘‘आल्यावर साधी हसलीसुद्धा नाहीत आणि त्यांची ती दोन छोटी मुलं पण मॅडच आहेत. आल्याआल्याच त्यांनी आपण लावलेल्या छोटय़ा रोपटय़ावर पाय दिला. माहितेय, मला इतका राग आला ना त्यांचा.’’ बोलत बोलत हळूहळू दोघी जणी त्यांच्या गप्पांमध्ये गुंग झाल्या. गप्पांमध्ये वेळ कसा निघून गेला ते दोघींनाही कळलं नाही. उमा लगबगीने घरी जायला निघाली. बाहेर पडताच तिने जरा रागाने त्या घराकडे पाहिलं आणि अचानक बकुळीच्या झाडाखाली तिला एक मुलगी दिसली. अर्धवट वेणी घातलेली, जुने मळलेले कपडे तिच्यापेक्षा एक-दोन वर्ष लहान बकुळीची फुलं वेचत होती. तेवढय़ात बंगल्यातून तिला एका बाईने हाक मारली ‘कमल’ का असंच काहीतरी. हाक ऐकताच तिच्या हातातली फुलं खाली पडली. ती घाबरून धावत धावतच बंगल्यात शिरली. आधी तिला पाहिल्यावर उमाला खरं तर तिचा राग आलेला, नंतर मात्र तिला पाहून उमाला तिची दया आली हे असं का झालं हे उमालाही कळेना.
उमाची उन्हाळ्याची सुट्टी एकदम मजेत सुरू होती. अगदी तिच्या प्लॅननुसार. उमा जेव्हा जेव्हा तन्वीकडे जायची तेव्हा तेव्हा तिला ती मुलगी दिसायची. ती सतत काही ना काही कामच करत असायची. एकदा ती जवळपास तिच्या वजनाएवढी पिशवी कशीबशी सांभाळत बंगल्याच्या दारापाशी आली. तोच तोल जाऊन तिच्या हातातली पिशवी खाली पडली. ती जमिनीवर पसरलेलं सामान गोळा करत होती तोच दार उघडलेली बाई तिच्याकडे लालबुंद चेहऱ्याने बघत होती. ती तिला काही तरी बडबडली. तिने ते सर्व खाली मान घालून ऐकून घेतले. तिच्या डोळ्यांतून आता पाणी वाहत होतं आणि अचानकच तिने हा सर्व प्रकार समोरून पाहणाऱ्या उमाकडे पाहिलं अगदी केविलवाण्या नजरेने, पण लगेच घाबरीघुबरी होऊन बंगल्यात शिरली. उमाला खूप विचित्र वाटले. झालेली सर्व गोष्ट उमाने तन्वीला सांगितली आणि दोघींनी एकमताने ठरवलं की त्या मुलीला भेटायचं. त्यांना खूप प्रश्न पडले होते. ही एवढी छोटी मुलगी काम का करते? तिची आईच का नाही येत तिच्याऐवजी काम करायला? ही शाळेत कधी जाते? आणि घरी कधी जाते ही की जातच नाही? आईबाबांशिवाय झोप कशी येत असेल तिला?असे अनेक प्रश्नं. यांची उत्तरं मिळविण्यासाठी दोघींनी एक शक्कल लढवली. त्या मुलीला गाठायचं. त्यासाठी दुपारची वेळ ठरवली. दोघीही जणी दोन्ही घरांना लागून असणाऱ्या कुंपणापाशी गेल्या. ती मुलगी बाहेरच बसलेली. काहीतरी धान्य निवडत. उमाने हळूच एक छोटासा दगड तिच्या दिशेने भिरकावला तिला लागणार नाही अशा बेताने. तो तिच्या पायाशी पडला. त्या मुलीने दचकून इथे-तिथे पाहिले आणि तिची नजर उमा अन् तन्वीवर पडली. त्या तिला त्यांच्याजवळ यायला खुणावत होत्या. तिने मात्र त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. उमा आणि तन्वी मात्र िहमत न हारता तिला बोलावत राहिल्या. अखेरीस ती त्यांच्या दिशेने दबकत दबकत आली. ती समोर आल्यावर उमाने तिला विचारलं, ‘‘काम करतेस का इथे? नाव काय आहे तुझं?’’ ‘‘अं. हो. कमल.’’ ‘‘तुझे आईबाबा कुठे असतात? तू घरी का नाही जात? इथे का काम करतेस?’’ तन्वी अगदी उतावीळपणे तिला विचारत होती. ती काही बोलणार तोच बंगल्याच्या दाराचा आवाज आला. ‘‘बापरे त्या उठल्या वाटतं?’’ असं बोलून ती पाठी वळणार तोच काही तरी सुचल्यासारखं ती उमा-तन्वीला म्हणाली, ‘‘तुम्ही मला उद्या भेटाल का? इथल्या बाजूच्या मंडईत अकरा वाजता?’’ त्यांच्या उत्तराची वाट न पाहता ती दाराच्या दिशेने पळाली.
दुसऱ्या दिवशी दोघीही दहा मिनिटं आधीच मंडईत पोहोचल्या. तेवढय़ात समोरून त्यांना कमल येताना दिसली त्या दिवशीसारखीच भलीमोठी पिशवी घेऊन. ती घाईत होती म्हणून धापा टाकत आली तरी पटापट बोलत होती. कमल शहरापासून काही अंतरावर असलेल्या गावात राहायची. तिला आई नव्हती. वडील आणि ती असे दोघंच राहायचे. कमलला शाळेत जायला खूप आवडायचे. एकदा अचानक कमलला दूरच्या काकांबरोबर शहरात पाठवून दिले. तिला सांगितले की तिला इथल्या शाळेत टाकणार, पण असं काहीच झालं नाही. उलट ही बाई तिच्याकडून सर्व कामं करून घ्यायची. बरेचदा तिला जेवायलाही नीट द्यायची नाही. कमलने तिच्यासमोर खूप गयावया केले, पण त्या बाईला काही तिची दया आली नाही. कमलने आता स्वत:ची समजूत काढलेली की यातून काही तिला बाहेर येता येणार नाही आणि तिच्या आवडत्या शाळेत तिला पुन्हा जाता येणार नाही. हे सगळं ऐकून उमा आणि तन्वी अवाक् झाल्या. त्यांनी ठरवलं की आपण यातून कमलला बाहेर काढायचं आणि तिला पुन्हा शाळेत पाठवायचं. त्यांनी सगळी हकीकत आपापल्या घरी सांगितली. दोघींचेही आईबाबा समजूतदार होते. त्यांनासुद्धा कमलसाठी वाईट वाटले. दोघींच्याही आईबाबांनी सर्व वसाहतीला एकत्र केलं. सर्वाना कमलबद्दल सांगितलं. सगळ्यांनी त्या बाईंकडे जायचे ठरवले. आणि एके दिवशी सर्व जण त्या बाईंच्या घरी पोहोचले. उमाच्या बाबांनी शांतपणे त्या बाईंना कमलला तिच्या घरी सोडून यायला सांगितले आणि बालमजुरी हा कसा गुन्हा आहे आणि त्यासाठी कशी शिक्षा होऊ शकते हेसुद्धा समजावले. त्या बाई काही ऐकायला तयार होत नव्हत्या. कारण बिनपगारी नोकर त्यांना जाऊ द्यायची नव्हती आणि गावाकडचे तिचे वडील केव्हाच ते गाव सोडून दुसरीकडे गेले होते, कमलला कायमची इथे सोडून. शेवटी वसाहतीतल्या गावडेकाकांनी आपला पोलिसी धाक दाखवल्यावर त्या बाई घाबरल्या. कमलला सोडण्यास तयार झाल्या. हे सर्व कमल एका कोपऱ्यात उभी राहून ऐकत होती. तिला खूप रडू येत होतं. बाबांनी असं का केलं हे तिला कळत नव्हतं. ‘‘चल कमल, आता तू काही दिवस तरी आमच्याकडे राहायचंस.. आवडेल ना तुला?’’ उमाच्या आईने तिला जवळ घेत म्हटलं.
कमलला घरी आलेली पाहताच उमाला खूप आनंद झाला. आता आपल्याबरोबर रोज खेळायला एक मैत्रीण मिळाली याचं तिला खूप छान वाटत होतं. कमलची रवानगी थेट उमाच्याच खोलीत झाली. कमलने तिथे आपले सर्व सामान नीट लावले. उमा तिच्या टापटीपपणाकडे बघतच राहिली. दिवसेंदिवस उमा आणि कमलची मैत्री अजूनच घट्ट होत होती. कधीकधी तन्वीसुद्धा त्यांच्याबरोबर खेळायला यायची. कमल खूप गुणी मुलगी होती. जेवणं झाल्यावर ती कायम उमाच्या आईला आवराआवरीत मदत करायची. स्वत:चे कपडे स्वत: आवरून ठेवायची. जेवताना ताटातले सर्व पदार्थ आवडीने खायची. तिला पाहून हळूहळू उमाही टापटीप राहायला लागली. ताटात नावडती भाजी असेल तरीही आईकडे तक्रार न करता ती खायला लागली. स्वत:चे कपडे, चप्पल इथे-तिथे न भिरकावता नीट ठेवायला लागली. उमाच्या आईला उमामधील हे बदल लक्षात येत होते. आपण न सांगता ती हे सगळं करतेय याचं तिला कौतुक वाटत होतं.
एकदा असंच उमाचे आईबाबा कमलबद्दल बोलत असताना उमा तिथे आली. तिने त्यांचं बोलणं ऐकलं. ते कमलला एखाद्या स्वयंसेवी संस्थेत पाठवण्याचा विचार करत होते जिथे कमलसारख्या मुलांची काळजी घेतली जाते. त्यांना शिक्षण दिलं जातं. उमाला खूप वाईट वाटलं. आता कमल आपल्याला भेटणार नाही. तिच्याशी गप्पा मारता येणार नाहीत, खेळता येणार नाही, या विचारांनीच उमाला रडू आलं. दुसऱ्या दिवशी तिने आईला विचारले, ‘‘आई, कमल आपल्याबरोबर नाही का राहू शकत कायमची? मला आणि तुम्हांला दोघांनाही ती खूप आवडते. तिला तुम्ही बाहेर पाठवलंत तर तिची काळजी कोण घेणार? मला पण करमत नाही तिच्याशिवाय. प्लीज ना गं आई.’’ उमा अगदी काकुळतीला येऊन बोलत होती. उमाच्या आईने सुद्धा यावर विचार केला. संध्याकाळी उमा खेळून आल्यावर बघते तर काय, घरी मस्त खमंग पावभाजीचा गंध पसरला होता. स्वयंपाकघरात तर अजूनच वेगवेगळे पदार्थ ठेवले होते. पुरणपोळी- पुलाव- गुलाबजाम. ‘‘हे काय गं आई? आज काय आहे?’’ उमाने आश्चर्याने तिथेच उभ्या असलेल्या आईला विचारलं. ‘‘आज किनई उमाच्या छोटय़ा बहिणीचं स्वागत करायचंय म्हणून ही सगळी तय्यारी.’’ क्षणभर उमाला काही कळलंच नाही, पण अचानक बाहेरून आवाज यायला लागला. उमाचे सगळे मित्र-मैत्रिणी जमले होते, अन् कमल एका सुंदर गुलाबी फ्रॉकमध्ये उभी होती. उमाचं ऐकलं होतं आणि कमलला दत्तक घेतलं होतं. उमाने कमलला मिठी मारली. दोघीही रडायला लागल्या. उमाचे आईबाबा हा सोहळा डोळे भरून बघत होते. कमल उमाच्या घरी कायमसाठी राहायला आली. उमाच्या आईबाबांनी तिला आपली दुसरी मुलगीच मानले.
‘‘तर अशा रीतीने माझ्या बहिणीने मला या उन्हाळ्याच्या सुट्टीत खूप काही गोष्टी शिकवल्या. ही सुट्टी मी कधीच विसरणार नाही, कारण मला या सुट्टीत कमलसारखी बहीण मिळाली.’’ टाळ्यांचा कडकडाट झाला. बाईंना उमाचा प्रोजेक्ट खूप आवडला. आणि तुम्ही ओळखलंच असाल की पहिल्या क्रमांकाचं बक्षीस कोणाला मिळालं असेल ते..

दोस्तांनो, समजलं ना ही गोष्ट वाचून? आपल्याला जे सगळं मिळतं ते कितीतरी मुलांना मिळतच नाही. मग आपण आपल्याला मिळणाऱ्या चांगल्या गोष्टींची जाणीव ठेवायला हवी ना? मग आजपासून काय करायचं रोज? रोज दोन चांगल्या गोष्टी करायच्या आणि त्या आपल्या वहीत लिहून तर ठेवायच्याच आणि रात्री जेवल्यानंतर आई-बाबांना, आजी- आजोबांना सांगायचं आज काय चांगलं केलं ते.. ठरलं? प्रॉमिस?