नाशिक म्हणताच धार्मिक तीर्थक्षेत्र.. संपूर्ण देशाला कांदा पुरविणारा जिल्हा.. द्राक्षाची पंढरी.. अलीकडच्या काळात वाइनची राजधानी म्हणून नावारूपास आलेला तसेच औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर असणारा जिल्हा अशी वेगवेगळी ओळख पुढे येते. तथापि, या शृंखलेत सर्वप्रथम सिंहस्थ कुंभमेळ्याचे ठिकाण ही या जिल्ह्यची खरी प्राचीन ओळख आहे. देशात ज्या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो, त्यात नाशिक महत्त्वाचे ठिकाण. ही ओळख नाशिकला जगाच्या कानाकोपऱ्यात जशी घेऊन गेली, तद्वतच जिल्ह्यच्या विकासाला नवीन आयाम देणारी ठरली. एका तपाने भरणारा कुंभमेळा म्हणजे नाशिकच्या विकासाची पर्वणी ठरते. शहर व जिल्ह्यचा चेहरामोहरा बदलण्यास सिंहस्थ हातभार लावत आहे.
अलीकडच्या काळात धार्मिक सोहळ्यांना कमालीचे महत्त्व प्राप्त झाल्यामुळे पाहता पाहता सिंहस्थ ‘वैश्विक सोहळा’ कधी झाला हे कोणाच्या लक्षातही आले नाही. कुंभमेळ्याच्या माध्यमातून शाश्वत विकास अर्थात पायाभूत सोयी-सुविधांची पायाभरणी केली जाते. यंदाचा सिंहस्थही त्यास अपवाद नाही. खरेतर कोणत्याही भागाच्या विकासात दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका निभावते. सिंहस्थ व धार्मिक तीर्थक्षेत्र असल्याने राज्यासह देशातील इतर भागांशी नाशिकला जोडण्याचा साकल्याने विचार झाला. या धार्मिक महोत्सवानिमित्त दळणवळणाच्या सुविधा, अंतर्गत व बारस्त्यांचे विस्तारीकरण, गोदाकाठच्या दोन्ही भागांना जोडणारे पूल. असे बरेच दान सिंहस्थाने नाशिककरांना ओंजळीत टाकले आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या गोदाकाठावर दोन्ही ठिकाणी कुंभमेळा भरत आहे. कधी काळी कुंभमेळा ही सर्वस्वी साधू-महंतांची जबाबदारी होती. ब्रिटिशांच्या आमदनीत देशातील कानाकोपऱ्यातून साधू-महंत शहरात दाखल झाल्यावर नाशिककरांना कुंभमेळा निकट आल्याची जाणीव होत असे. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील पहिल्या १९५५-५६ मधील कुंभमेळ्यात नगरपालिकेने कुंभमेळ्याची काहीअंशी जबाबदारी स्वीकारली. तेव्हा शासनाकडून निधी उपलब्ध होत नसे. पण, नगरपालिकेने आपल्या कुवतीनुसार साधू-महंतांना काही सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न केला. साधू-महंतांच्या गरजेचा विचार झालेला हा पहिला कुंभमेळा असल्याचे सांगितले जाते. हा विचार पुढील काळात शहर व परिसरातील गरजा पूर्ण करणारा ठरला. त्यावेळी तपोवनात जाण्यासाठी फारशी दळणवळणाची साधने नव्हती. जुना आडगाव नाका येथील काटय़ा मारुतीपासून लहान रस्त्याने तपोवनात जाता यायचे. साधूंच्या जाण्या-येण्याचा मार्ग म्हणून ‘शाहीमार्ग’ अशी त्याची ओळख झाली. साधू-महंत व भाविकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून या परिसरात झालेल्या विविध विकास कामांनी गोदावरी काठावरील दोन्ही भागांना जोडण्याचे महत्त्वाचे काम केले.
एका सिंहस्थात गोदावरीला पूर आल्याने साधू-महंतांना कपालेश्वरच्या पायरीवर बसून स्नान करावे लागले होते. पावसाळ्यात शहरवासीयांनाही नदी पार करण्याचा प्रश्न भेडसावत होता. १९५५-५६ मध्ये नारोशंकर मंदिर ते बालाजी मंदिर दरम्यान झुलता पूल बांधून समस्या तात्पुरती सोडविली गेली. कायमस्वरूपी हा प्रश्न निकालात निघावा यासाठी ‘रामसेतू’ पुलाची उभारणी झाली. दिल्ली दरवाजा ते गणेशवाडी यांना जोडणारा संत गाडगे महाराज पूल, स्मशान भूमी ते नाशिकला जोडणारा कन्नमवार पूल टप्प्याटप्प्याने आकारास आले. पुढील काळात म्हणजे १९८२ मध्ये नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले. मात्र प्रशासकीय राजवट असल्याने १९९१-९२ चा सिंहस्थ कुंभमेळा खऱ्या अर्थाने नाशिककर आणि प्रशासनाचा समन्वय असलेला सोहळा म्हणता येईल, असा झाला. कुंभमेळ्यासाठी शासनाकडून निधी आणण्याची कल्पना तत्कालीन जिल्हाधिकारी उमेशचंद्र सरंगी यांनी मांडली. शासनाने त्यास मान्यता देऊन कुंभमेळ्यासाठी निधी उपलब्ध करण्यास सुरुवात केली आणि नाशिकचा चेहरा खऱ्या अर्थाने बदलू लागला.
महापालिकेला शासनाकडून द्रव्य मिळाल्याने विकास कामांसाठी निधीचा प्रश्न राहिला नाही. शहरात ठोस स्वरूपाची अनेक कामे झाली. पपया नर्सरी ते अंबड जोडरस्त्यावर समांतर पूल, आयटीआय पूल, दोंदे पूल यांच्या उभारणीमुळे इतर भाग जोडले गेले. कुंभमेळ्याचे वाढते प्रस्थ पाहता साधू-महंतांच्या निवास व्यवस्थेसाठी कायमस्वरूपी जागा अधिग्रहित करण्याचा विचार झाला. साधुग्रामद्वारे साधूंना निवासासाठी आवश्यक तंबू, शौचालय, स्नानगृह, पाणी, वीज, स्वच्छता आदी सोयीसुविधा देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला. साधुग्राम आणि शहर परिसरातून मार्गस्थ होता यावे म्हणून तपोवन, टाकळी रोड, शहराला पंचवटीशी जोडणारे रस्ते बांधण्यात आले. प्रशासनाने बाहेरगावहून येणाऱ्या भाविकांच्या अडचणी लक्षात घेत गोदाकाठा लगत ठरावीक अंतरावर स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था केली, जी आजतागायत कायम आहे. शाही स्नानासाठी होणारी गर्दी, भाविकांचा राबता पाहून रामकुंडाकडील परिसर मोकळा करून गोदा घाटाच्या पुनर्रचनेत बदल करण्याचे ठरले. त्यासाठी रामकुंड ते यशवंतराव पटांगण परिसरातील पाच देऊळ आणि पटांगणातील छोटय़ा मूर्ती हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. नदीच्या दुतर्फा घाट बांधण्यात आले. यंदाच्या कुंभात हे घाट जुन्या नाशिकची सीमा ओलांडत थेट दसक-पंचकपर्यंत पोहचले आहेत. या परिसरात भाविकांना तात्पुरत्या स्वरूपात निवारा व्हावा, त्यांना पूजा-अर्चा करता यावी यासाठी मागील कुंभमेळ्यात गांधी ज्योतीच्या मागील बाजूस संगमरवरी गोल छत्री मंडप उभारला गेला. भाविकांना विशेषत: महिलांना स्नानानंतर कपडे बदलण्यासाठी तीन मजली वस्त्रांतरगृहाची निर्मिती करण्यात आली.
नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील ताण हलका करण्यासाठी ओढा रेल्वे स्थानकाची उभारणी करण्यात आली. नाशिकरोड रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण झाले. सिंहस्थात लाखो भाविक सहभागी होत असल्याने जिल्ह्यातील पर्यटन उद्योगाला चालना मिळत गेली. सप्तश्रृंगी देवस्थान, त्र्यंबकेश्वर देवस्थान, कावनई आदी तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी विस्तीर्ण रस्ते, निवास व्यवस्था आदींची उपलब्धता केली गेली. या निमित्त ग्रामीण भागात सुधारणा होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यंदाच्या सिंहस्थात तब्बल २५०० कोटी रुपये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे विविध कामांवर खर्च करण्यात आले आहेत. त्यातून नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे चौपदरीकरण, नाशिकमध्ये नव्याने १०६ किलोमीटरचे रस्ते, नव्याने चार पुलांची उभारणी, नाशिक जिल्हा रुग्णालय आणि त्र्यंबकेश्वर रुग्णालयाचे विस्तारीकरण, नाशिकरोड रेल्वे स्थानकात नवीन फलाट, नाशिक व त्र्यंबकेश्वर सभोवतालच्या रस्त्यांचे विस्तारीकरण, पर्यटन स्थळांचा विकास, गोदाकाठावर नवीन घाटांचे बांधकाम, त्र्यंबक नगरीसाठी नवीन पाणीपुरवठा योजना, कुशावर्त जलशुद्धीकरण योजना, विद्युत व्यवस्थेचे नूतनीकरण आदी चिरकाल सहाय्यभूत ठरतील अशा योजना पूर्ण झाल्या आहेत. विकास कामांची ही लांबलचक यादी नाशिकला सिंहस्थाने काय दिले हे सांगण्यास पुरेशी ठरावी.
चारुशीला कुलकर्णी response.lokprabha@expressindia.com