lp28नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लोकमान्य’ या लोकमान्य टिळकांवरील सिनेमामुळे देशाकडे पाहण्याची अनेकांची दृष्टी बदलली. लोकमान्यांना समजून घेतल्यामुळे आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा मिळाली असंही अनेक तरुणांचं म्हणणं आहे.

‘लोकमान्य एक युगपुरुष’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन २ आठवडे झाले. शंभर वर्षांनंतरसुद्धा लोकमान्यांची जादू अजून तशीच आहे. याचा प्रत्यय आम्हा सगळय़ांना आला. माणूस शरीररूपाने संपला तरी त्याचा विचार संपत नसतो, तो चिरंतन असतो. या चित्रपटानेही लोकमान्यांचे जिवंतपण पुन्हा एकदा सिद्ध केले. त्या काळातल्या तरुणांसाठी स्फूर्तिदायक ठरलेले त्यांचे नेतृत्व पुन्हा एकदा आजच्या काळातल्या तरुणांनी स्वीकारले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने लोकमान्यांच्या चरित्राचा अभ्यास करताना मला एक गोष्ट खूप प्रकर्षांने जाणवली, ती म्हणजे आपण आपल्याच पूर्वजांना वेगवेगळय़ा नावांच्या शृंखलांनी बांधून ठेवले आहे. लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे, आगरकर, महात्मा फुले, गोपाळ कृष्ण गोखले, शाहू महाराज या सर्वच अलौकिक व्यक्तींना आपण समजून घेऊ शकलो नाही.
भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये जशी वेगवेगळी घराणी आहेत, तशी ही वरील सर्व माणसे भारताच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांतील घराणी आहेत. संगीतातील घराण्यांचा अंतिम उद्देश जसे आपापल्या परीने संगीताची सेवा करणे हा असतो त्याच पद्धतीने वरील सर्व व्यक्तींच्या घराण्याचा उद्देश हाही देशसेवा हाच होता. ते कधी त्या घराण्यांमध्ये अडकले नाहीत; पण आपण मात्र त्यांना त्यात अडकवून टाकले.
शाहू, फुले म्हटले की ते एका समाजाचे? टिळक, आगरकर म्हटले की ते एका समाजाचे? इतके संकुचित कसे झालो आपण? एका भूमीमध्ये एका काळामध्ये इतकी नवरत्ने जन्माला आली. त्यांनी जन्म घेतलेल्या भूमीत आपला जन्म झाला हे खरे तर आपले भाग्य. इतिहास हा विषय अभ्यास करताना मला कायम असे वाटते की, तो जेवढा लिहिला आहे त्याच्यापलीकडे अभ्यासायचा असतो. पुस्तकांमधून आपल्याला माहिती मिळते, त्याची अनुभूती नाही. त्यासाठी त्यांच्यापर्यंत जावे लागते. त्यांचे माणूसपण मान्य करून त्यांच्या सर्व गोष्टींसकट त्यांना स्वीकारायचे असते, तेव्हाच ते तुमच्याशी बोलू लागतात. त्यांचे श्वास तुम्हाला जाणवायला लागतात. त्यांच्या प्रत्येक कृतीमागची कारणे तुमच्यासमोर उघड व्हायला लागतात. आपल्या चष्म्यामधून त्यांना पाहिले, तर चित्र धूसरच दिसणार. त्यांच्या डोळय़ांतून जेव्हा तुमची नजर पाहते तेव्हा जाणवते की, जगण्यासाठी अजून केवढे शिल्लक आहे.
हे सर्व तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा उद्देश एकच, की ‘लोकमान्य’ चित्रपटाने ही जाणीव आम्हा सगळय़ांना पुन्हा एकदा करून दिली. शाळा, कॉलेजमधील मुले जेव्हा हा चित्रपट पाहून बाहेर येतात तेव्हाच त्यांची पावले अत्यंत सकारात्मक पद्धतीने पडायला सुरुवात होते. चित्रपट या माध्यमाची ही ताकद आहेच, पण त्याही पलीकडे ही लोकमान्यांच्या विचारांची ताकद आहे. जेव्हा माझ्या तरुण मित्र-मैत्रिणी मला सोशल मीडियावर मेसेज करून सांगतात की, ‘आम्हालाही आता जगण्याचा मार्ग मिळालाय. आम्हालाही आमच्या देशासाठी काही तरी करायचंय.’ तेव्हा त्यांच्या मुखातून शंभर वर्षांपूर्वीचे तरुणच बोलत असतात. अनेक मुलांनी त्यांची परदेशी जाण्याची स्वप्ने रद्द करून भारतातच राहायचे ठरवले आहे. त्यांच्या कौशल्याचा उपयोग यापुढे त्यांनी त्यांच्या देशासाठीच करायचा ठरवला आहे. अनेक नुकतेच डॉक्टर झालेले तरुण आता आदिवासी भागात जाऊन त्यांच्यासाठी काम करणार आहेत. अनेक तरुण मुलांच्या ग्रुप्सनी झाडे लावायची ठरवली आहेत. काहींनी अंध मुलांना शिकवायची जबाबदारी घेतली आहे. कोणी रस्त्यावर कचरा न टाकण्याचा, तर कोणी लहान मुलांना शिकवण्याची जबाबदारी घेतली आहे.
‘स्व’राज्य तर मिळालेच आहे. आता लोकमान्यांच्या आशीर्वादाने ‘सु’राज्याची वाटचाल चालू झाली आहे.
लोकमान्यांच्या भाषेत सांगायचे तर- ‘कर्म करत राहणे, फळाची अपेक्षा न धरणे’ आणि त्यांच्याच वचनानुसार- ‘देशकार्य म्हणजेच देवकार्य’
आम्ही आमच्या देवाचे म्हणजेच देशाचे कार्य करायला सुरुवात केली. तुमचा आशीर्वाद मात्र आमच्या सर्वावर कायम असू दे..