संगणक आला आणि घराघरांमध्ये रुळला, त्यानंतर समाजामधली एक तक्रार प्रचंड वाढली; ती म्हणजे मुलांनी मैदानावर जाणे आता कमी केले असून त्याऐवजी ते संगणकावर गेम्स खेळण्यात खूप वेळ वाया घालवू लागले आहेत. कॉम्प्युटर गेम्स हा प्रकारच त्या वेळेस नवखा होता, त्यामुळे नव्याची नवलाई म्हणून हे आकर्षण असेल असे समजून अनेकांनी सुरुवातीस त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर असे लक्षात आले की, कॉम्प्युटर गेम्समधील वैविध्यामुळे मुलांना घरबसल्या रंजनाचे एक आयतेच साधन उपलब्ध झाले आहे. शिवाय यात फारसे शारीरिक कष्टही करावे लागत नाहीत. त्यामुळे शॉर्टकटमध्ये अधिक आनंद अशी ही सोय आहे. साहजिकच, त्यामुळे मुलांचे मैदानी खेळ कमी झाले, शॉर्टकट कुणाला नको असतो? या काळात पालकांच्या पिढीकडून केवळ तक्रारी वाढल्या. कॉम्प्युटर गेम्सऐवजी मुलांनी पर्याय म्हणून मैदानी खेळांकडे वळावे, यासाठी फारसे प्रयत्न झालेच नाहीत. ‘‘अरे, कॉम्प्युटरवर काय खेळतोस जरा मैदानात जाऊन खेळ’’ असा धोशा लावणे म्हणजे मैदानी खेळांसाठीचे प्रयत्न नव्हेत. किती पालक आपल्या मुलांसोबत खेळण्यासाठी मैदानावर उतरले आणि त्यामध्ये असलेली गंमत आणि त्यानिमित्ताने मिळणारे जीवनशिक्षण त्यांनी मुलांना समजावून सांगितले? सर्वेक्षण केले तर लक्षात येईल, अशा पालकांची संख्या अगदीच किरकोळ आहे. मग कुणी पालक म्हणतीलही की, आता काय आम्ही मैदानावरपण उतरायचे का? खेळ फक्त लहान मुलांनीच खेळायचे असतात हे कुणी ठरवले? पालकांच्या पिढीनेही मैदानी खेळांना सोडचिठ्ठीच दिली आहे. रस्त्यावर किंवा मैदानाशेजारून जाताना तिथे सुरू असलेले क्रिकेट पाहण्यासाठी क्षणभर पाय आजही थबकतात.. कारण खेळ आपल्या मनात खोलवर रुजलेले असतात. पण पुन्हा मैदानावर उतरण्यास कधी स्वत:च्याच शारीरिक क्षमतांविषयी असलेली शंका आड येते तर कधी लाज. पण पुढची पिढी सुदृढ राखायची असेल तर लाज काही काळ बाजूला सारण्यात अक्कलहुशारी आहे.

संगणकापासून सुरू झालेले खूळ आता मोबाइलवर येऊन स्थिरावले आहे. जागा बदलली, गेम्स बदलले. आता मोबाइल गेम्सचे व्यसन सुरू झाले आहे. परिणामी तासन्तास मोबाइल किंवा टॅब्लेटवरील गेम्स खेळत राहिल्याने कमी वयातच मानेचे, पाठीचे आणि डोळ्यांचे विकार मागे लागण्यास सुरुवात झाली आहे. त्या लहानशा मोबाइल स्क्रीनकडे एकटक नजर लावून बसल्याने डोळ्यांच्या विकारांमध्ये वाढ झाली आहे. शिवाय मौल्यवान वेळ कसा निघून जातोय, याचेही भान राहिलेले नाही. मग बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये उतरण्याचे ठिकाण मागे गेल्याचे अचानक लक्षात आल्यावर धडपडत उठणाऱ्यांची संख्याही वाढल्याचे लक्षात येते.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

इअरफोन लावून, बोलत बोलत रस्ता ओलांडणाऱ्यांमुळे रस्त्यावरच्या अपघातांमध्येही वाढ झाली आहे. मुंबईसारख्या शहरात तर इअरफोन लावून रेल्वे ट्रॅकवरून जाणाऱ्यांचा मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढल्याने तिथेही राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे एक विशेष जागृती मोहीम राबविण्याची वेळ आली. दुसरीकडे मानसिक विकारांमध्येही वाढ होते आहे, हा विकार आहे सोशल मीडिया सिंड्रोमचा. सोशल मीडिया म्हणजे खरे तर आभासी जग. पण त्यालाच वास्तव समजण्याचा झालेला घोटाळा आता अनेकांना मानसिक विकारांच्या दिशेने खेचून नेतो आहे. ‘‘उसके लाइक्स मेरे लाइक्ससे ज्यादा कैसे?’’ या प्रश्नाने केवळ तरुणाईचीच नव्हे तर त्याहीपेक्षा मोठय़ा असलेल्या पिढीची झोप उडवलेली दिसते. खरे तर फेसबुक किंवा इतर कोणत्याही सोशल नेटवर्किंग साइटस्वर मिळणारे लाइक्स असतील किंवा फेव्हरिट्स; त्यामुळे प्रत्यक्ष आयुष्यात कोणताही फारसा फरक पडणार नसला तरीही मानसिक अस्वास्थ्याच्या दिशेने प्रवास सुरू झालेल्यांची आणि निद्रानाशाला सामोरे जावे लागलेल्यांचीही वाढलेली संख्या या इशाऱ्यांच्या घंटा वेळीच समजून घ्यायला हव्यात. पण एक विचित्र स्पर्धा या लाइक्स व फेव्हरिट्समध्ये सुरू झालेली दिसते. याच लाटेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सेल्फी!

या सेल्फीने संपूर्ण जगालाच सेल्फिश केले आहे. परिणामी, मोबाइल कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनात समोरच्या बाजूस असलेल्या कॅमेऱ्याच्या क्षमतेमध्ये वाढ करण्यास सुरुवात केली आहे. त्यातून मोबाइल कंपन्यांची वेगळीच गळेकापू स्पर्धा सुरू झाली आहे. कारण अलीकडे ग्राहक मोबाइल घेताना केवळ रिअर कॅमेऱ्याच्याच नव्हे तर फ्रंट कॅमेऱ्याच्या क्षमतेचाही विचार करतात. या फ्रंट कॅमेऱ्याची सुविधा आली ती थ्रीजीसाठी. म्हणजे एकमेकांना त्या फ्रंट कॅमेऱ्यात पाहून व्हिडीओ चॅट करता यावे यासाठी. पण नंतर सर्वाना सापडला तो मार्ग सेल्फीच्या दिशेने जाणारा होता. जवळपास सर्वच सोशल मीडिया साइट्सवर प्रोफाइल पिक्चरची सोय असून त्यासाठीची ही सारी झटापट सुरू असते. या सेल्फीसाठी मग काय वाट्टेल ते केले जाते. आपण नेमके काय करतो आहोत, त्याने आपलाच जीव धोक्यात तर येणार नाही ना, याचेही भान तरुण पिढी राखताना दिसत नाही. अशा वेळेस अनेक दुर्दैवी अपघातांना सामोरे जावे लागते. मध्यंतरी तलावात होडीच्या एका बाजूला येऊन सेल्फी टिपताना पाच तरुणांना आपला जीव गमवावा लागला; तर गेल्याच आठवडय़ात शनिवारी मुंबईच्या बॅण्ड स्टॅण्डवर साहसी पद्धतीने सेल्फी टिपताना तीन मुली वाहून गेल्याची घटना घडली. यातील दोघींचे प्राण वाचले. मात्र त्यांचे प्राण वाचविणाऱ्यास आपले स्वत:चे प्राण गमवावे लागले. हे केवळ दु:खद नाही तर भीषणच आहे. आपल्याला स्वत:ला हव्या असलेल्या गोष्टींसाठी आपण कोणतेही टोक गाठण्यास तयार आहोत, हेच या घटनांमधून लक्षात येते आहे. त्यातही जे काही मिळवण्यासाठी ही सारी धडपड सुरू आहे ते सारे आभासी आहे!  केवळ त्या आभासी बाबींसाठी स्वत:चा जीव गमावणे व इतरांचाही जीव पणाला लावणे हे शहाणपणाचे लक्षण नाही!

सध्याच्या जगातील हे आभासी वास्तव आपण समजून घेतले तर अशा घटना टाळता येतील. सोशल मीडियावर असलेले प्रोफाइल एकदा तपासून पाहा, म्हणजे लक्षात येईल की, आता प्रत्येकाला स्वत:च्या वास्तव परिचयाबरोबर एक ‘डिजिटल परिचय’ही लाभलेला आहे. तो ‘डिजिटल परिचय’ आपल्याला हवा तसा तयार केला जातो. तो प्रत्यक्षातील परिचयाशी जुळेलच असे नाही, किंबहुना अनेकांच्या बाबतीत तो जुळतच नाही. आपल्याला आपण जसे असावे असे वाटते, तसा तो ‘डिजिटल परिचय’ तयार करण्याची सोय असते. त्याचाच पूर्ण वापर आपण करत असतो. म्हणजे प्रत्यक्षात शास्त्रीय संगीताची आवड नसेलही. पण अनेकांवर छाप टाकण्यासाठी किंवा आपण अभिजात आहोत, असे भासविण्यासाठी तसे म्हटलेले असते. आभासी जगाची सुरुवात ही अशी या वास्तव नसलेल्या ‘डिजिटल परिचया’पासूनच होते.

अलीकडे काही विशिष्ट प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे, ती म्हणजे अपहरण किंवा बलात्कार. यामध्येही असे लक्षात आले आहे की, फेसबुकवरील ओळखीमुळे प्रत्यक्ष भेट ठरते आणि नंतर ती व्यक्ती वेगळीच असते.. कुणीतरी त्या आभासी जगाची बळी ठरते. म्हणून आता मुंबई पोलिसांनीही ‘हर एक फ्रेंड जरुरी नही होता’ या आशयाची जाहिरात करून अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात सोशल मीडियावर राहू नका, असे सांगण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आपला स्वत:चा जीव अनमोल आहे. तो जपणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींचा जीव धोक्यात घालणेही टाळायलाच हवे.

मुळात सध्या सोशल मीडियावर जे काही सुरू आहे ते वास्तव नाही, याचे भान बाळगणे गरजेचे आहे. सेल्फीशिवायचे वास्तव आयुष्य खूप वेगळे आणि चांगले आहे. केवळ आभासी लाइक्स आणि फेव्हरिट म्हणजे आयुष्य असा गैरसमज करून घेतला तर पुढे प्रत्यक्ष आयुष्यात नैराश्याला सामोरे जावे लागेल. ते टाळण्यासाठी वेळीच समजून घ्या, हा आभास आहे, वास्तव नाही!
01vinayak-signature
विनायक परब – response.lokprabha@expressindia.com
twitter: @vinayakparab