विशेष मथितार्थ
विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
गेल्या दहा वर्षांत देशाने तीन संरक्षणमंत्री पाहिले. त्यातील एक अरुण जेटली वगळता दोन महत्त्वाचे काँग्रेसचे ए. के. अँटोनी आणि दुसरे भाजपचे मनोहर पर्रिकर. या दोघांमधील फरक खूप काही सांगून जाणारा आहे. अँटोनीदेखील तसे प्रामाणिक, त्यांनी आपला प्रामाणिकपणा परोपरीने जपण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी देशाच्या संरक्षणाच्या गरजांकडेही त्यांनी दुर्लक्ष करणे पसंत केले. तर दुसरीकडे मनोहर पर्रिकर. गेल्या १५ वर्षांत देशाच्या संरक्षण दलांच्या संदर्भात शस्त्रास्त्र सामग्रीच्या संदर्भात महत्त्वाचे करारच झालेले नाहीत आणि त्यामुळे संरक्षण दले किमान १५ वर्षांनी जगाच्या मागे आहेत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपली प्रतिमा जपण्यासाठी करार न करण्याच्या मार्गाने जाणे टाळले आणि सर्वात महत्त्वाचे असे संरक्षण करार केले. देशाच्या संदर्भात महत्त्वाचे ठरावेत, असे स्कॉर्पिन पाणबुडीसारखे दीर्घकाळ रखडून राहिलेले महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावले. सेनादलांची अडचणीची स्थिती पाहून त्यांनी झपाटय़ाने निर्णय घेतले. तो झपाटा विलक्षणच होता.
एरवी इतर कुणा व्यक्तीने संरक्षणमंत्री असणे आणि पर्रिकरांचे असणे यात जमीन- अस्मानाचे अंतर होते. याला अनेक महत्त्वाचे कोन होते. त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजवरचा अनुभव असे सांगतो की, सर्वाधिक भ्रष्टाचार होण्याची शक्यता ही संरक्षण खरेदीच्या व्यवहारांमध्येच असते. कारण आकडेच काही हजार कोटींचे असतात. त्यामुळे संरक्षण व्यवहार आणि भ्रष्टाचार हे समीकरण तसे जुनेच आहे. असे असतानाही आपल्यावर आरोप होतील म्हणून स्वच्छ चारित्र्याचे असा परिचय असलेल्या पर्रिकरांनी व्यवहार टाळले नाहीत ना संरक्षण दलांना मागास राहण्याच्या खाईत लोटले. त्यांनी व्यवहार केले आणि धडाक्यात निर्णय घेतले. त्यापाठी असलेले महत्त्वाचे कारण म्हणजे स्वतच्या सत्त्वावर असलेला दृढ विश्वास. सत्वनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे व्यवच्छेदक लक्षण होते. ही सत्त्वनिष्ठा साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यातून आली होती.
पर्रिकर किती साधे राहायचे हे तर ते गोव्याचे मुख्यमंत्री असतानाही प्रसिद्धच होते. आपले साधेपण त्यांनी संरक्षणमंत्री झाल्यानंतरही राखले. लग्नामध्ये वधू-वरांना भेटण्याच्या रांगेत किंवा अगदी जेवणाच्या रांगेतही ते सामान्यांप्रमाणेच उभे राहिल्याच्या बातम्याही झाल्या. आणि व्हॉट्सअप संदेशही फिरत राहिले. हा साधेपणा हे त्यांचे खास वैशिष्टय़ होते.
देशवासीयांना पर्रिकरांच्या संदर्भात आवडलेली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एरवी राजकारणी आपल्याकडे फारसे उच्चविद्याविभूषित असतातच असे नाही, किंबहुना नसतात. पर्रिकर हे आयआयटियन होते, धातुशास्त्र या विषयात त्यांची तज्ज्ञता होती. संरक्षणाचे क्षेत्र हे तंत्रज्ञानाशी थेट संबंधित असलेले क्षेत्र. त्यामुळे त्यांची सत्त्वनिष्ठा आणि त्यांची शैक्षणिक व व्यावसायिक तज्ज्ञता याचा अनोखा मिलाफ त्यांच्या निमित्ताने अनुभवता आला. संरक्षणविषयक परिषदांमध्ये किंवा संरक्षण तज्ज्ञांच्या बैठकांमध्ये त्यांची ती तज्ज्ञता विशेष जाणवायची. नेमका हाच भाग संरक्षण दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही अधिक भावला होता. अन्यथा मंत्र्यांना एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून देण्यामध्ये त्यांचा अर्धा जीव जातो. या पाश्र्वभूमीवर पर्रिकर यांचा अनुभव हा कार्यकुशलतेच्या पातळीवर संरक्षण दलांसाठी सुखद असा धक्काच होता.
कदाचित हेच प्रमुख कारण असावे की, गोव्यामध्ये प्राबल्य असलेला ख्रिश्चन समाज आणि हा समाज ज्या धर्मसत्तेचे प्राबल्य मान्य करतो त्या चर्चनेही पर्रिकरांना आपले मानले आणि पर्रिकर यांना निवडणून देण्याचे आवाहन केले. महत्त्वाचे म्हणजे ख्रिश्चन समाजाला तशा फारशा न रुचणाऱ्या आणि थेट दुसऱ्या टोकाची विचारसरणी असलेल्या भाजपचे नेतृत्व पर्रिकर करीत होते. असे असतानाही चर्चने घेतलेला निर्णय हा पर्रिकरांच्या सत्त्वनिष्ठेची जाहीर पावतीच होता.
अशी दुर्मीळ सत्त्वनिष्ठा असलेला राजकारणी आपल्यातून निघून जाणे, हा समाजासाठीचा धक्काच आहे.
मनोहर पर्रिकर यांना ‘लोकप्रभा’ परिवाराची भावपूर्ण श्रद्धांजली.