विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
खैरलांजी असो वा साकीनाका
बळी जातो तो ‘ती’चाच
एका बाजूला शक्ती म्हणून पूजा करायची
आणि दुसरीकडे बलात्कारासारख्या निर्घृण अत्याचारांनाही
‘ती’नेच सामोरे जायचे
समाजाचा हा भंपकपणा केव्हा थांबणार?
बलात्कार झाला की,
पाशवी किंवा हिंस्र श्वापदांशी तुलना करायची
पण वन्यजीवांमध्ये कुठाय बलात्कार?
त्यांचे सारे होते ते निसर्गनियमानुसार
एकमेकांचा सन्मान राखत
त्यांच्यामध्ये नाही होत ‘मानवी बलात्कार’
खरे तर वन्यप्राण्यांमध्ये संस्कार करणारे कुणीही नाही
ना त्यांचा समाज असतो.. असते ती टोळी
मग असे का व्हावे की,
संस्कारी समाजात
बलात्कारांचे प्रमाण अधिक आणि वाढते असावे
आपण समाज असतो
की, आपल्यात फक्त ‘माज’च असतो
तो उतरवला जातो
कुणा असहाय्य‘ती’वर
मग बलात्कार होणारा ‘तो’ समाज
कायदा करतो शिक्षेचा
फाशीने काय होणार?
निर्भयाच्या बलात्काऱ्यांनाही
फाशी झाली
पण निर्घृण बलात्कार मालिका सुरूच आहे.
कधी हैदराबाद, कधी शक्तीमिल तर कधी साकीनाका
कायदा करून आणि त्याला
शक्तीचे नाव देऊन काहीच होणार नाही
सडलेले मेंदू आणि किडलेली मने
स्वच्छ व्हायला हवीत
तरच साजरा होईल
खरा शक्ती सोहळा!
