श्रावणसरी बरसू लागल्या की करवीरनगरीत गणेशोत्सवाच्या नियोजनाचा सपाटा जिल्हा प्रशासन, पोलिसांकडून लावला जातो. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे गणेशोत्सवात डॉल्बीचा वापर करू दिला जाणार नाही, असा इशारा देणारी भाषा प्रशासनाकडून केली जाते. काही मंडळांकडून डॉल्बीचे दुष्परिणाम लक्षात घेऊन डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा शब्द दिला जातो. तथापि, एकदा का श्री विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली की कोणत्याही परिणामांची पर्वा न करता डॉल्बीचा दणदणाट सुरू होतो. आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करीत पोलिसांदेखत डॉल्बीचा आवाज घुमू लागतो अन् नो डॉल्बीचा ढोल वाजवणारी पोलीस यंत्रणा उघडय़ा डोळ्यांनी तरुण मंडळ कार्यकर्त्यांचा नंगानाच पाहत राहते. कारवाई करण्याची पोलिसांची भाषा पंचगंगेत विरली जाते. ध्वनिप्रदूषणाचा अजस्र विळखा सुटणार तरी कधी याचा प्रश्न मात्र सुज्ञ जनतेला पडतो. 

गेल्या दशकभरापासून कोल्हापुरात गणेशोत्सव आणि डॉल्बी यांचे अतूट समीकरण जुळले आहे. डॉल्बीशिवाय उत्सवाची मजा ती काय, अशी मिजास तालीम मंडळे, सार्वजनिक तरुण मंडळे यांच्याकडून मिरवली जात आहेत. डॉल्बीच्या कानठळ्या बसवणाऱ्या दणदणाटामुळे एका आजारी वृद्ध स्त्रीचा मृत्यू घडल्याची घटना याच नगरीत घडली आहे. डॉल्बीचा आवाज १२० डेसिबलपेक्षा अधिक राहिल्याने व्याधी बळावल्याचे वैद्यकीय क्षेत्रातून सांगितले जाते. डॉल्बीचे समाजविघातक परिणाम वारंवार सांगितले गेले आहेत. पोलीस यंत्रणा तर उत्सवाचे पडघम वाजू लागले की डॉल्बीमुक्त उत्सवाचा श्री गणेशा गिरवू लागते. गणेशोत्सव तरुण मंडळांच्या एकत्रित बठका, व्यक्तिगत पातळीवर बठका, माध्यमांचे मंच यांद्वारे नो डॉल्बीच्या प्रबोधनाचा डोस दिला जातो. पण डीजेच्या िधगाण्यात गुंगलेल्या कार्यकर्त्यांना कशाचेच भान उरलेले नसते. कानाचे विकार जडले जातात. कर्कश आवाजाने लहान मुले चिडचिड करतात, हृदयावर परिणाम होतो, रक्तदाब कमी-अधिक होतो, आरोग्य विघातक परिणाम जाणवत असले तरी झुंडशाहीच्या बळावर डॉल्बी मात्र वाजतच राहतो.
कोल्हापूरला पुरोगामी विचारांचे नगर म्हणून ओळखले जाते. गुटखा-दारू, धूम्रपान जाहिरातमुक्त उत्सव, श्रीमूर्ती दान, एक गाव एक गणपती, सामाजिक सलोखा या विधायक उपक्रमांचा पायंडा पंचगंगाकाठीच पडला. तद्वत, डॉल्बीच्या दणदणाटाच्या परिणामाची ठळकपणाची चर्चा घडवून आणत डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ इथेच रोवली गेली. जे-जे चांगले ते स्वीकारायचे ही भूमिका या नगरीत सुरुवातीपासूनच रुजली आहे. म्हणूनच की काय डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाची हाक देण्यात आल्यावर करवीरनगरीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही मंडळांकडून डॉल्बीवरील खर्च सामाजिक कार्यासाठी देण्याचे औदार्य दाखवले गेले. या उपक्रमांची प्रशंसा अन् चर्चा राज्यभर होत राहिली. पण नव्याची नवलाई लवकरच सरली. डॉल्बी वाजवणारच अशी बेपर्वाईची भाषा सुरू झाली आणि या भाषेला आवर घालण्यासाठी व त्यातील मग्रुरीला जागीच रोखून धरणारी कारवाई करण्यात प्रशासन अपयशी ठरले. पोलीस प्रशासनाचा अवसानघातकीपणाही याला कारणीभूत ठरला आहे. एकदा म्हणायचे की, डॉल्बीच्या आवाजाने मर्यादा ओलांडली की त्याची साधनसामग्री जप्त केली जाईल अन् आता सांगितले जाते की, डॉल्बीच्या आवाजाने मर्यादेचे उल्लंघन केले तरी आम्ही ते मिरवणुकीवेळी थांबविणार नाही. आवाजाच्या मर्यादेची नोंद करून डेसिबलमध्ये करून घेऊन नंतर त्या मंडळांवर गुन्हे दाखल करणार. खेरीज ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा हा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कक्षेत आहे असे सांगून पोलिसांनी कारवाईचा चेंडू तिकडे टोलवला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानेच गुन्हे दाखल करावेत, अशी भूमिका घेऊन पोलिसांनी कातडी बचाव धोरण अवलंबले आहे. यातून जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यात ऑफिस-ऑफिस चा खेळ रंगून कारवाईचा बोऱ्या उडणार हे सांगण्याची गरजही उरली नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निस्तेज व निष्प्रभ कारभार पाहता गणेशोत्सव मंडळांवर कारवाई होण्याबाबत उघडपणे साशंकता व्यक्त केली जात आहे.
डॉल्बीच्या दणदणाटासाठी राजकारणीही तितकेच कारणीभूत ठरले. कधी महापालिका निवडणुकीचे नगारे वाजत असतात तर कधी विधानसभा निवडणुकीची हवा तापू लागलेली असते. अशात मग मतांची बेगमी करून देणारी तरुण मंडळे आणि तालीम मंडळांचा कळवळा राजकारण्यांना न येईल तरच नवल. एरवी सुशासनाचे गोडवे गाणारे सर्वपक्षीय नेते मंडळी डॉल्बी वाजवण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या प्रोत्साहन देत असतात. गुन्हे दाखल झाले तरी आपल्याला सांभाळून नेणारा वरदहस्त आपल्या पाठीशी आहे याचा ठाम विश्वास असल्याने डॉल्बीचा आवाज वाढतच राहतो. इतका की कोणत्या मंडळाच्या डॉल्बीचा खणखणाट अधिक आहे याची एक कुस्पर्धाच जणू रंगत राहते. यंदाच्या श्री विसर्जन मिरवणुकीतही याचाच प्रत्यय एकूण एक मिरवणूक मार्गावर दिसून आला. मुख्य मिरवणूक मार्ग असो की पर्यायी मार्ग.. साऱ्या ठिकाणीच कशी डॉल्बीची हुकूमत गाजत होती.
डॉल्बीच्या दुष्परिणामांची चर्चा घडवली जाताना पारंपरिक वाद्यांचा वापर केला जावा, असा सल्ला पोलीस प्रशासनाकडून अलीकडे नित्यनेमाने मिळत आहे. त्याचे अनुकरण करीत गणेशोत्सव मंडळांकडून ढोल-ताशे, झांज पथक, लेझीम, बेंजो, नाशिक ढोल वाजविणाऱ्यांना पाचारण केले जात आहे. अर्थात ही सर्व वाद्य्ो लयीत व मर्यादित आवाजात सादर होत असल्याने त्याची लज्जत चाखण्यास निश्चितच गर्दी जमताना दिसते. यातून पारंपरिक वाद्य्ो वाजविणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन अन् रोजगाराची संधीही प्राप्त होते. तथापि, डॉल्बीला पर्याय म्हणून अशा वाद्यांचा वापर होताना दिसत आहे. दुधाची तहान ताकावर भागवण्याचा हा प्रकार होय. यामुळे होते काय की, कर्ण-कर्कश आवाज करणाऱ्या कण्र्यातून बेंजोचा आवाज इतक्या उच्चरवात येतो की मिरवणूक मार्गावरून जाणाऱ्या भाविकांना कानात बोटे घालण्यावाचून पर्याय उरत नाही. नाशिक ढोल, झांज पथक ही वाद्य्ो ताकदीनिशी जोरजोराने वाजवली जात असल्याने ती जवळ जाऊन ऐकणाऱ्यांना कानाचा पडदा फाटतो की काय असा भास होत राहतो. म्हणजे एका अपप्रवृत्तीला रोखायला जाताना पर्याय म्हणून पुढे आलेला मार्गही पहिल्या प्रकाराइतकाच विघातक ठरताना दिसतो आहे. या पर्यायी वाद्यांच्या आवाजाचे मोजमाप केले तर ते १०० ते १२५ डेसिबलच्याही पुढे गेल्याचे यंत्रणेला आढळले. हे सारे चित्र पाहता धार्मिकता, उत्सव यातील कर्ण-कर्कश गोंगाटास पूर्णविराम कधीच मिळणार नाही का अशी साधार शंका भेडसावत राहते. कोल्हापूरच्या पुरोगामित्वाला या आवाज कलहाने गालबोट लागले आहे.