वादविवाद
एकेकाळी सिद्धार्थ महाविद्यालयात शिकणं तसंच शिकवणं प्रतिष्ठेचं समजलं जायचं. आज तिथे शिकायला, शिकवायला जाणारेच धास्तावलेले असतात. अस्पृश्यवर्गातील मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत या हेतूने  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थांची आज त्यांचे वारसदार म्हणवणाऱ्यांनीच वाट लावली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वांना काळिमा फासण्याचे काम त्यांचे अनुयायी या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून करत आहेत.
भारतीय समाजव्यवस्थेने पिढय़ान्पिढय़ा ज्ञानापासून वंचित ठेवलेल्या गरीब, दुबळ्या व मागासवर्गातील मुलांना उच्च शिक्षण मिळावे व त्यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक प्रगतीला वाव मिळावा या उद्दात्त हेतूने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. बाबासाहेबांना या देशात सामाजिक क्रांती करायची होती, त्यासाठी लागणारी आयुधे म्हणा किंवा साधने म्हणा त्यासाठी त्यांनी अनेक संस्था, संघटना मोठय़ा कष्टाने उभ्या केल्या. बाबासाहेबांनंतर त्यांच्या अनुयायांनी या संस्थांची कशी वाट लावली आणि लावत आहेत, याचे किळसवाणे दर्शन रिपब्लिकन पक्षापासून ते पीपल्स संस्थेपर्यंत सगळीकडे जो राजकीय िधगाणा सुरू आहे, त्यातून लोकांना होत आहे. ही अत्यंत खेदजनक बाब आहे.
बाबासाहेब एका बाजूला दबल्या-खचलेल्यांच्या न्याय हक्कासाठी पराकोटीचा राजकीय-सामाजिक संघर्ष करीत असतानाच त्यांनी रचनात्मक कार्यालाही महत्त्व दिले होते. बालपणी शिक्षण घेताना सोसावे लागलेले हाल, सामाजिक अपमान, अवहेलना आणि अमेरिकेसारख्या प्रगत देशात गेल्यानंतर सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षणाशिवाय दुसरा तरणोपाय नाही, याचा झालेला साक्षात्कार, यातून बाबासाहेब आपल्या खडतर अशा संघर्षमय जीवनातूनही शिक्षणासारख्या विधायक कार्याकडे वळलेले दिसतात. लहानपणापासूनच अस्पृश्यवर्गातील मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे, या समाजात शिक्षणाचा प्रचार-प्रसार झाला पाहिजे यासाठी त्यांनी १९२८ मध्ये भारतीय बहिष्कृत समाज शिक्षण मंडळाची स्थापना केली होती. या संस्थेच्या वतीने मागासवर्गीय मुलांसाठी दोन वसतिगृहे चालविली जात होती. बाबासाहेबांच्या शैक्षणिक चळवळीची ही बीजपेरणी होती. पुढे त्यांनी अस्पृश्य वर्गातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेच्या वतीने सुरुवातीला मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयाची व औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुठे प्रवेश मिळाला नाही तरी चालेल, परंतु आंबेडकर किंवा  सिद्धार्थ कॉलेज नको, असे आंबेडकरी समाजातीलच पालक व विद्यार्थी म्हणू लागले आहेत. ही लाज कुणी आणली? काय चालले आहे हे बाबासाहेबांच्या शिक्षण संस्थेत?

एकेकाळी मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयात शिकणे आणि शिकवणेही प्रतिष्ठेचे मानले जात होते, त्या शिक्षण संस्थेत आता शिकायला आणि शिकवायला जाणारेही धास्तावलेले असतात, हे बाबासाहेबांनंतरच्या नेत्यांचे कर्तृत्व समजायचे का? खरे तर पुढे सिद्धार्थ महाविद्यालय, आंबेडकर महाविद्यालय, मिलिंद महाविद्यालय आणि वडाळ्यातील सिद्धार्थ विहार वसतिगृह ही आंबेडकरी चळवळीची केंद्रेच झाली. सामाजिक-सांस्कृतिक क्रांतीच्या उठावाची ती ठाणी झाली होती. सिद्धार्थ विहारातूनच दलित पँथरचा झंझावात सुरू झाला आणि त्याने महाराष्ट्रच नव्हे तर सारा देश ढवळून काढला. आज त्या पीपल्स सोसायटीची, सिद्धार्थ महाविद्यालयाची, सिद्धार्थ विहार वसतिगृहाची काय अवस्था आहे? बाबासाहेबांनी आपल्या हयातीत उभ्या केलेल्या या संस्थेची मालमत्ता आज काही हजार कोटी रुपयांची आहे. त्यासाठीच आता ही संस्था आपल्या ताब्यात कशी राहील, यासाठी आरपीआयमधील गटांनी आणि त्यांच्या गटाधिपतींनी पीपल्सचा राजकीय आखाडा बनविला आहे. बाबासाहेबांनंतर त्यांच्या अनुयायांनी एक तरी त्यांची संस्था नीट चालविली का, की वाटोळे करण्यातच धन्यता मानली? रिपब्लिकन पक्षाच्या कशा चिंध्या झाल्या ते आपण पाहात आहोत. ‘सत्ताधारी बना’ असे सांगणाऱ्या बाबासाहेबांच्या पक्षात दुसऱ्यांनी टाकलेला सत्तेचा शिळा तुकडा चघळण्यातच फार मर्दुमकी मानणारे नेते असल्याचे आज आपण पाहात आहोत. ‘स्वाभिमानासाठी जगा आणि स्वाभिमानासाठी मरा’, असा विचार देणाऱ्या बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षात ‘सत्तेसाठी लाचारीने जगा आणि लाचारीने मरा’, असा नवा विचार नव्या पिढीसमोर ठेवला जात आहे. अशी लाचारी करत अनेक पिढय़ा बरबाद झाल्या, आता अशा स्वाभिमानशून्य राजकारणाचा धडा नव्या पिढीलाही शिकविला जात आहे, हेच त्यांना बाबासाहेबांनी शिकविले आहे काय?

देशभरात या संस्थेची ३०-३२ महाविद्यालये आहेत, त्याचा आणखी विस्तार करण्याऐवजी संस्थेची तिजोरी आपल्या हातात कशी येईल, त्यासाठीच सध्या विविध गटांमध्ये हातघाई सुरू आहे, कुठे प्रवेश मिळाला नाही तरी चालेल, परंतु आंबेडकर किंवा  सिद्धार्थ कॉलेज नको, असे आंबेडकरी समाजातीलच पालक व विद्यार्थी म्हणू लागले आहेत, ही लाज कुणी आणली?

राजकारणातील गोंधळ कमी म्हणून की काय आता सारेच गटाधिपती पीपल्स सोसायटीकडे वळले आहेत. बाबासाहेबांनंतर न्या. आर.आर. भोळे, बोराळे, घनश्याम तळवटकर यांच्यासारख्या दिग्गजांनी ही संस्था पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र संस्थेत काही अपप्रवृत्तींचा शिरकाव खुलेआम होऊ लागला. त्यामुळे संस्थेची आणि संस्थेच्या वास्तूंची दुरवस्था न बघवणारी झाली आहे. वडाळा येथील सिद्धार्थ विहार मोडकळीस आले आहे, त्याची साधी दुरुस्ती किंवा नूतनीकरण करावे, असे कुणाला वाटत नाही. आंबेडकर कॉलेज व सिद्धार्थ विहाराच्या आजूबाजूच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. सहकारनगरमधील जवळपास १५-२० एकराची जागा अशीच पडून आहे. देशभरात या संस्थेची ३०-३२ महाविद्यालये आहेत, ही जमेची बाजू आहे. परंतु त्याचा आणखी विस्तार व्हायला हवा होता, दर्जा वाढवायला हवा होता, त्याऐवजी संस्थेची तिजोरी आपल्या हातात कशी येईल, त्यासाठीच सध्या विविध गटांमध्ये हातघाई सुरू झाली आहे, अशी शंका घ्यायला बराच वाव आहे. कुठे प्रवेश मिळाला नाही तरी चालेल, परंतु आंबेडकर किंवा  सिद्धार्थ कॉलेज नको, असे आंबेडकरी समाजातीलच पालक व विद्यार्थी म्हणू लागले आहेत. ही लाज कुणी आणली?

‘स्वाभिमानासाठी जगा आणि स्वाभिमानासाठी मरा’, असा विचार देणाऱ्या बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षात ‘सत्तेसाठी लाचारीने जगा आणि लाचारीने मरा’, असा नवा विचार नव्या पिढीसमोर ठेवला जात आहे. अशी लाचारी करत अनेक पिढय़ा बरबाद झाल्या. आता अशा स्वाभिमानशून्य राजकारणाचा धडा नव्या पिढीलाही शिकविला जात आहे, हेच त्यांना बाबासाहेबांनी शिकविले आहे काय?

आता पीपल्समधील वर्चस्ववादाला आंबेडकर घराणे विरुद्ध आठवले व इतर असे स्वरूप आले आहे. बाबासाहेबांचे नातू व भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या वर्षी पीपल्स सोसायटीच्या विश्वस्तपदी निवड करून घेऊन संस्थेचा कारभार आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांना सोसायटीत प्रवेश देण्यास आंबेडकरांचा पहिल्यापासून विरोध होता. पानतावणे हे आरएसएसचे हस्तक आहेत, असा त्यांचा आरोप होता. कालांतराने जातीच्या तांत्रिक मुद्दय़ावर पानतावणे यांचे संस्थेचे सदस्यपद रद्द होताच, प्रकाश आंबेडकर यांनी पीपल्स आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु संस्थेत आधीच आपले वर्चस्व प्रस्थापित केलेल्या रामदास आठवले आणि त्यांच्या समर्थकांनी आंबेडकरांच्या प्रयत्नांना यश येऊ दिले नाही. अर्थात त्यावेळी सिद्धार्थच्या बाहेर बराच हंगामा झाला, राडा होता होता मात्र टळला. आठवले गटाचेच अ‍ॅड. प्रीतमकुमार शेगावकर हे अध्यक्ष होते. त्यांच्या निधनानंतर आठवले यांना त्यांच्या समर्थकांनी पीपल्सचे अध्यक्ष म्हणून जाहीर केले. त्यात सध्या आनंदराज आंबेडकर यांनी निलंबित केलेले प्राचार्य कृष्णा पाटील आघाडीवर होते. हे कृष्णा पाटील आठवले यांचे कट्टर समर्थक. विद्यार्थ्यांकडून बेकायदा फी वसूल केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हे प्राचार्य महाशय खासगी सुरक्षारक्षकांच्या गराडय़ात महाविद्यालयात प्रवेश करतात. त्यांच्या केबिनबाहेरही सुरक्षारक्षकांचा खडा पहारा असतो. काय चालले आहे हे बाबासाहेबांच्या शिक्षण संस्थेत ?
प्रकाश आंबेडकर यांनी कायदेशीर लढाईवर भर दिला असताना २४ जूनला बाबासाहेबांचे दुसरे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी पीपल्सचा ताबा घेतला. त्यांनी आपल्याला बहुसंख्य सदस्यांचा पाठिंबा असल्याचे सांगत स्वतला संस्थेचे अध्यक्ष म्हणून घोषित केले आणि धडाधड काही निर्णयही घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे रामदास आठवलेही संतप्त झाले. त्यांनी आनंदराज यांना खुले आव्हान दिले आहे. एवढय़ावर ते थांबले नाहीत, तर पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही आंबेडकरांची आहे. आंबेडकरी घराण्याची मालमत्ता नाही, अशी कडवट भूमिका त्यांनी घेतली आहे. हा संघर्ष आणखी किती विकोपाला जाईल, हे सांगता येणार नाही. परंतु बाबासाहेबांच्या संस्थेवर हक्क सांगणाऱ्या या नेत्यांनी त्यांच्या राजकीय चळवळीचे काय केले, यापैकी एका तरी नेत्याने एखादी विधायक संस्था स्थापन करून रचनात्मक कार्य केले आहे का, एका तरी नेत्याने एखादी स्वतंत्र शिक्षण संस्था काढून ती यशस्वीपणे चालविण्याचा प्रयत्न केला आहे का, मग पीपल्सवर कोणत्या अधिकाराने हक्क सांगितला जात आहे, आंबेडकरांचे अनुयायी म्हणून की त्यांच्या घराण्याचे वारसदार म्हणून ?
वास्तविक पाहता बाबासाहेबांनी ज्या ज्या संस्था स्थापन केल्या, त्या लोकशाही विचाराने चालल्या पाहिजेत, अशी भूमिका घेत असतानाच ती चालविणारी माणसे, लायक, नि:स्वार्थ आणि सत्शील असली पाहिजे, असा त्यांचा कायम आग्रह राहिला होता. म्हणूनच त्यांनी वर उल्लेख केलेली अगदी सुरुवातीच्या त्यांच्या बहिष्कृत शिक्षण मंडळाच्या कार्यकारी समितीत त्यांनी स्वतबरोबरच मेयर निस्सीम, शंकर सायन्ना पारशा, पुरुषोत्तम सोळंकी अशा त्यावेळच्या प्रतिष्ठित व उच्चशिक्षित मंडळींचा समावेश केला होता.  त्यानुसार आता पीपल्स संस्थेवर आपला दावा सांगणाऱ्यांनी, कब्जा करणाऱ्यांनी जरा स्वतला तपासून बघावे. बाबासाहेबांच्या विचारसूत्रात आपण कुठे बसतो आहोत का, याचाही जरा अंतर्मुख होऊन विचार करावा.
दुबळ्या, दबलेल्या-पिचलेल्या वर्गाच्या शिक्षणाबद्दल बाबासाहेबांना किती तळमळ, किती कळकळ होती, हे त्यांनी १९१३-१४ च्या दरम्यान पहिल्यांदा परदेशात म्हणजे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेले होते, त्यावेळी त्यांच्या वडिलांच्या एका मित्राला लिहिलेल्या पत्रातून दिसून येते. त्यात त्यांनी आपल्या अस्पृश्य समाजातील प्रत्येक कार्यकर्त्यांने शिक्षण प्रसारासाठी झटले पाहिजे, असे म्हटले आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात जेव्हा संधीची लाट येते, तेव्हा त्या संधीचा योग्य प्रकारे त्याने उपयोग केला तर, त्या मनुष्यास वैभव प्राप्त होते. शिक्षणाची महती सांगण्यासाठी त्यांनी जगविख्यात नाटककार शेक्सपिअर यांचे हे वचनही आपल्या पत्रात उद्धृत केले होते. बाबासाहेबांनी कार्यकर्त्यांना शिक्षणासाठी झटले पाहिजे असा संदेश दिला, पण आता त्यांच्या अनुयायांची एकमेकांतच झटापट सुरू झाली आहे, कशासाठी तर संस्था आपल्या ताब्यात घेण्यासाठी आणि त्या संघर्षांला आंबेडकरांचे वारसदार विरुद्ध आंबेडकरांचे अनुयायी असे स्वरूप देणे हेही लांच्छनास्पद आहे. बाबासाहेब आंबेडकर कट्टर लोकशाहीवादी होते, म्हणून ते घराणेशाहीने चालत आलेल्या कोणत्याही वारसा हक्काच्या व्यवस्थेच्या विरोधात होते, हे त्रिवार सत्य आहे. त्यासाठी अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या निवडणुकीचे त्यांनी दिलेले उदाहरण बोधप्रद आहे. मात्र तरीही बाबासाहेबांचा संस्था चालविण्यासाठी योग्य-लायक माणसे हवीत या आग्रहाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. मनुष्यबळाच्या ताकदीवर एखादी संस्था आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणे ही लोकशाही आहे काय, आणि केवळ एखाद्याने महापुरुषाच्या घराण्यात जन्म घेतला म्हणून तो गुन्हेगार ठरतो काय आणि त्याची कृती लोकशाहीविरोधी ठरते काय? या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर, पीपल्समधील वाद मिटायला त्याची बरीच मदत होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
(छायाचित्रे – प्रशांत नाडकर)

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Peoples education society and dr babasaheb ambedkar
First published on: 05-07-2013 at 01:02 IST