‘पीके’ सिनेमा प्रदर्शित झाला आणि अपेक्षित प्रतिक्रिया तातडीने आल्या. त्या होत्या धर्माचा अपमान झाल्याच्या. परग्रहावरून आलेला अर्थातच ज्याला कुठलाही आगापिछा नाही, ज्याला कपडे घालणंसुद्धा माहीत नाही त्याला देव-धर्म या संकल्पनांबद्दल काहीही माहीत नाही असा माणूस. परग्रहावरचा माणूस येणं हे या सिनेमात अगदी ढोबळपणे आलं असलं, त्याचे थोडे कानबिन बाहेर आलेले असले तरी तो आमिर खानसारखा देखणाबिखणा आहे. नाहीतर इंग्रजी सिनेमांमधून परग्रहांवरचे पृथ्वीवर आलेले जीव अर्थात एलियन्स अगदी कुरूप दाखवले जातात. हे गोऱ्यांच्या वांशिक दुराभिमानाचंच रूप असेल का? तर असो. आपल्या सिनेमातल्या परग्रहावरून आलेल्या माणसाला देव-धर्म माहीत नाही, कारण तो जिथून आलाय त्या ग्रहावर अशी काही संकल्पनाच नाही. त्यामुळे त्याचं माध्यम वापरून दिग्दर्शकाने हुशारीने देव-धर्म या संकल्पनांची चर्चा केली आहे. याआधी ‘ओ माय गॉड’ या सिनेमातही ही चर्चा आली होती. पण ‘पीके’मध्ये ती आणखी थोडी पुढे जाणारी आहे. त्यामुळेच कट्टर धर्मवाद्यांच्या भावना दुखावल्याच्या प्रतिक्रिया जोरजोरात पुढे यायला लागल्या आहेत.
पंधरा-वीस वर्षांपूर्वी असं काही झालं की अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे पुरस्कर्तेही हिरिरीने पुढे यायचे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गळा दाबला गेल्याची चर्चा करायचे. आता तसं फारसं काही होत नाही. कारण मुळात वेगवेगळ्या लोकांच्या भावना इतक्या लहानसहान गोष्टींमुळे दुखावतात की किती वेळा आणि कुणाकुणाचा निषेध करायचा असं होत असावं बहुधा. सारख्याच कशाकशामुळे कुणाकुणाच्या भावना दुखावत असतील तर इतक्या दुबळ्या भावना असलेल्यांची दखल तरी कशाला घ्यायची असाही विचार केला जात असेल बहुतेक.
किंवा असंही असेल की आता सगळेच जण हुशार झाले आहेत. आपल्या भावना दुखावल्या की असं म्हटलं की लगेच टीव्हीवाले दखल घेतात. प्राइम टाइममध्ये चर्चा करायला बोलवतात. भावना दुखावल्या जाणारे बोलावले की आपोआपच अभिव्यक्तिस्वातंत्र्यवाल्यांनाही बोलावलं जातं. त्यामुळे सगळ्यांचाच खेळ चांगला रंगतो.
या सगळ्याचा मूळ असलेला धर्म मात्र बाजूलाच राहतो. धर्म म्हणजे काय, त्याची निर्मिती का आणि कशी झाली, सगळ्या धर्माची रूपं वेगवेगळी असली तरी त्यांची मूलतत्त्व सारखीच कशी काय आहेत, आपल्या भावना कुणीही कशामुळेही दुखावाव्यात इतक्या आपल्या धार्मिक भावनांच्या खुंटय़ा दुबळ्या कशा आहेत, या प्रश्नांना उत्तरं आहेत का याचा आपण कधी विचार करतो का? डावे, अतिडावे देव, धर्म, संस्कृती हे सगळंच नाकारणारे आणि या सगळ्याचा सतत पुरस्कार करणारे हे द्वंद्व इतकं अटीतटीनं सुरु राहतं की त्यातल्या मध्यममार्गाचा विसरच पडतो. वास्तविक माणसाला जगाची जेव्हा कल्पनाच करता येत नव्हती तेव्हा म्हणजे आदिमानव अवस्थेतल्या माणसाला सूर्य उगवणं, प्रकाश पडणं, पाऊस पडणं, पूर येणं, मूल जन्माला येणं, मृत्यू होणं या त्याच्या आसपास घडणाऱ्या घटना-घडामोडींचा अर्थ लावता येत नव्हता.  तेव्हा या शक्तींना अद्भूत मानून त्यातून देव संकल्पना निर्माण झाली.  आज इतक्या वैज्ञानिक भौतिक प्रगतीनंतरही विश्व चालवणाऱ्या शक्तीविषयी माणसाच्या मनात गूढ भावना आहेतच. धर्म ही जगण्याची पद्धत होती. रोजच्या जगण्यात बदल आणायचा, जगण्याचा उत्सव साजरा करायचा या भावनेतून सांस्कृतिक गोष्टी विकसित होत गेल्या आहेत. इतर धर्माचं माहीत नाही, पण आपल्या हिंदू धर्मात तरी या तिन्ही गोष्टींची प्रचंड सरमिसळ झाली आहे.  
पीकेच्या निमित्ताने या सगळ्याची चर्चा करायचं कारण म्हणजे पीके हा सिनेमा अशा एका जगाची, ग्रहाची कल्पना करतो जिथे माणसावर जन्मत: आणि त्यानंतरही कुठल्याही धर्माचं लेबल लागत नाही. तो कुठल्याही धर्मात वाटला जात नाही.
त्यामुळे कुणाच्या धार्मिक भावना तिथे दुखावल्याही जाणार नाहीत. असं जग खरोखरच अस्तित्त्वात असेल का, येईल का ते माहीत नाही. पण आत्ता देव, धर्म या सगळ्याला जे कट्टर स्वरुप आलं आहे, त्याचं काय? त्यातही देवाधर्मामुळे भावना दुखावल्या जाणाऱ्यांना आवर्जून विचारायचा एक प्रश्न म्हणजे प्रतीकात्मक गोष्टींचा त्यांना जेवढा राग येतो तेवढा वास्तवाचा का येत नाही? आदिमानव काळापासून स्त्रीचं मातृरुप पुजलं गेलं आहे. स्त्रीची जननक्षमता ही तिची शक्ती मानली गेली आहे. पण आपला अगदी हिंदुधर्मातला प्रत्यक्षातला व्यवहार काय असतो? गर्भिलग परीक्षा करून स्त्री भ्रूणाची ह्त्या करणं, स्त्रियांना दुय्यम लेखून त्यांच्यावर सातत्याने होणारे अत्याचार, त्यांचं लैंगिक शोषण या सगळ्या गोष्टी अगदी धर्माच्या नावाखाली देखील राजरोज चालतात तेव्हा कुणाच्या भावना का दुखावल्या जात नाहीत? की खऱ्या गोष्टींसाठी आपल्याला भावनाच नाहीत?