06 August 2020

News Flash

तनामनात पाऊसच पाऊस!

<span style="color: #ff0000;">मथितार्थ</span><br>पाऊस म्हणजे काही केवळ रिमझिम सरी नाहीत किंवा झुरमुरणारा रोमँटिसिझमही नाही. पाऊस म्हणजे कोसळणे असते, पाऊस म्हणजे बरसणे असते.

| August 2, 2013 01:04 am

मथितार्थ

पाऊस म्हणजे काही केवळ रिमझिम सरी नाहीत किंवा झुरमुरणारा रोमँटिसिझमही नाही. पाऊस म्हणजे कोसळणे असते, पाऊस म्हणजे बरसणे असते. आणि त्या जीवघेण्या बरसण्यातही एक अगम्य सौंदर्य दडलेले असते. बरसणारा असा हा पाऊस अनुभवायचा तर मुंबईत आषाढसरी अंगावर झेलायलाच हव्यात!
तुम्ही नरिमन पॉइंटच्या किनाऱ्यावर असा नाहीतर मग मरिन ड्राइव्हवर कुठेतरी गिरगाव चौपाटीपर्यंत, त्या पावसात छत्री उघडण्याचा केलेला प्रत्येक प्रयत्न तो पाऊस हाणून पाडतो. अखेरीस तो मूर्खपणा सोडून मग आपण भिजण्याचा आनंद लुटू लागतो. असे म्हणतात की, तुम्ही आत सुके असताना बाहेर कोसळणाऱ्या पावसाची मजा लुटण्यात काही औरच मजा असते. पण म्हणून तुम्ही रेनकोट घालून मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्यावर उभे राहिलात तर ‘हा कोण नवीन वेडा आला’ अशा मुद्रेने अस्सल मुंबईकर तुमच्याकडे पाहू लागतात. अखेरीस ती व्यक्ती त्या रेनकोटमधील स्वतचे ते बावळट ध्यान बाजूला सारत पाऊस अंगावर घेते. पाऊस अंगावर झेलण्यातच खरी मजा आहे, असे तिथे जाणवते.
पाऊस अंगावर झेलण्याच्या अशा अनेक जागा मुंबईमध्ये आहेत. मुंबईचे भाग्य हे तिला चहूबाजूंनी किनारा लाभलेला आहे. मुंबई हे एक मोठे बेट आहे. पूर्वीची सात बेटे जोडली जाऊन त्यातून आताच्या महामुंबईची निर्मिती झाली आहे. त्यामुळे एखाद्याने होडीतून किंवा बोटीतून मुंबईला फेरी घालायची असे म्हटले तरीही ते सहज शक्य आहे. होडी आणि मुंबई असे म्हटले की, आठवते ती कुलाब्याची दांडी अर्थात कुलाब्याचे दीपगृह. पूर्वी मुंबई म्हटले की, सर्वाच्या नजरेसमोर तेच कुलाब्याच्या दांडीचे चित्र उभे राहायचे. अनेक गाण्यांमधून ही कुलाब्याची दांडी भेटायची. ती दिसली की, मुंबई आल्याची चाहूल लागायची, असे दिवस होते ते. त्या वेळेस कोकणातील नोकरदार एसटीने कमी आणि बोटीने जास्त प्रवास करायचे. या कुलाब्याच्या दांडीपर्यंत जाताना मधे अनेक खडक लागतात. ऐन आषाढामध्ये या खडकांवर उभे राहत.. पाऊस अंगावर झेलण्याचा प्रयत्न करणे म्हणजे खरेतर आत्महत्या करण्यासारखेच.
अलीकडे तिथे जाऊ देत नाहीत. पण ऐन आषाढाच्या पावसात तिथे जाणे म्हणजे स्वत:ला पंचमहाभूतांच्या स्वाधीन करत ‘स्वाहा’ म्हणणेच. त्या तुफान पावसात कुलाब्याच्या दांडीकडे म्हणजेच त्या दीपगृहाकडे जाणाऱ्या त्या खडकांवर उभे राहण्याचा विचारही करणे अशक्यच. कारण खडकावर बसलेल्या अवस्थेतही पहिला प्रयत्न करावा लागतो तो स्वत:चा जीव मुठीत धरून वाचविण्याचा. कारण तुफान पावसासोबत आलेला प्रचंड वेगवान वारा लाटांसह येऊन आपल्यावर थडकतो! ती लाट नसतेच; तो असतो एक प्रचंड मोठा तडाखा. कुणी तरी जाणकार व्यक्ती सोबत असल्याशिवाय तिथे जाण्याचाही प्रयत्न करू नये. अगदी पट्टीचे पोहणारे असे कोळी बांधवही या काळात त्या परिसरात जाणे कटाक्षाने टाळतात.. आषाढातील तुफान पावसात तिथे जाऊन तुम्ही परतला असाल तर तो तुमचा पुनर्जन्मच मानायला हवा. आणि आपण परततो त्याच क्षणी मनाने पक्के केलेले असते की, आता आयुष्यात हे धाडस पुन्हा होणे नाही. ‘मूर्तिमंत भीती मजसमोर उभी’ या कविकल्पनेचा थेट प्रत्यय आपण तिथे घेतलेला असतो. खडक, प्रचंड तडाखा देणाऱ्या लाटा, तुफान वारा आणि वेगवान पाऊससरींमध्ये लुप्त झालेली आणि मध्येच पावसाचा वेग थोडा कमी झाल्यानंतर दृश्यमान होणारी ती कुलाब्याची दांडी एवढेच आपले विश्व असते. त्या क्षणी आपण थंडीने पुरते गोठलेले असतो. संपूर्ण शरीरात फक्त आणि फक्त गोठलेली थंडी आणि बाहेर तुफानी वाऱ्यासह कोसळणारा पाऊस अशीच अवस्था असते. इथे जाण्यापूर्वी ‘टायटॅनिक’ किंवा ‘लाइफ ऑफ पाय’ पाहिलेला असेल तर त्यातील प्रसंग नक्कीच आठवतील आणि हे चित्रपट नंतर पाहिलेले असतील तर चित्रपट फारच फिके वाटतील. कारण ते सारे तुम्ही प्रत्यक्षात अनुभवलेले असेल. केवळ कुलाब्याच्या दांडीच्या मार्गावर असलेल्या खडकांवरील आषाढपाऊस हाच चित्रपटाचा विषय ठरावा, असेही मनात येईल. या भीतिदायक आणि आयुष्यच पणाला लावलेल्या क्षणी अनुभवलेला तो पाऊस नंतर तुमच्या मनातील पावसाची भीती खूपच कमी करतो. नंतर कुठेही कोसळणारा तुफान पाऊस आपल्याला तसा कमीच वाटतो! तो पाऊस कोणत्याही शब्दांमध्ये आणता येण्यापलीकडचा असतो. वातावरण बदलते आणि त्याचा वेग कमी होतो तो आपल्या पुनर्जन्माचा क्षण असतो!
मुंबईची ही एक वेगळी मजा आहे. इथे तुम्हाला बरसणारा, कोसळणारा पाऊस वेगळ्या पद्धतीने सामोरा येतो. आताची मुंबई म्हणजे टॉवरबादच झाले आहे. अशाच एखाद्या उंच टॉवरच्या सर्वात वरच्या मजल्यावरून म्हणजे २०व्या किंवा २१ व्या मजल्यावरून पाऊस पाहणे म्हणजे एक अफलातून अनुभव असतो. कारण तो तिथे तुम्हाला येताना दिसतो. एरवी प्रथम काळोखी दाटते आणि मग त्याचे बरसणे सुरू होते एवढेच आपल्याला या मुंबईत कळते. कारण आजूबाजूला इमारती असतात. पण टॉवरमध्ये उंचावर असाल तर अरबी समुद्रावरून सुसाट वेगात येणारा आणि परिसर चिंब करत जाणारा तो पाऊस तुम्हाला दिसतो. मनातल्या मनात आपण अंदाज बांधतो.. तो किती वेळात आपल्यापर्यंत पोहोचणार.. आडाखे कधी बरोबर येतात तर कधी सपशेल फसतात. कधी तो येता येताच तिरका होत आपल्याला न भिजवताच पलीकडे जातो. ही फसगतही कधीतरी अनुभवावी अशीच असते.
आडवा तिडवा झोडणारा असा पाऊस मुंबईत अनुभवता येतो तो थेट मढच्या किल्ल्यावरून. शिवडी, शीव, वरळी, माहीम आणि वांद्रे हे किल्ले मुंबईकरांना ठाऊक आहेत. पण मढचा किल्ला आजही अनेक मुंबईकरांना माहीत नाही. या किल्ल्याची एक वेगळीच मजा आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश असलेल्या दिवशी इथून संपूर्ण मुंबई नजरेच्या एका टप्प्यात पाहता येते. अलीकडे चित्रवाणी मालिकांमध्येच हा किल्ला पाहायला मिळतो. इथे आषाढसरी अनुभवण्याची मजा काही औरच. कुलाब्याच्या दांडीला अनुभवता येणारा भन्नाटपणा इथेही अनुभवता येतो. पण इथे आपण किल्ल्यावर सुरक्षित असतो. शिवाय समोर दिसणारी मुंबई पावसाचा पडदा गडद झाला म्हणजे पाऊससरींचा वेग वाढला की लुप्त होते आणि तो वेग कमी झाला की, पुन्हा दृग्गोचर होते. आषाढातील पावसात मुंबईचा हा असा आगळा लपंडाव इथे सुरू असतो. तुफान पाऊसच अनुभवायचा तर शीवचा किल्लाही काही कमी नाही. इथेही तुम्ही सुरक्षित असता. पडण्या-धडपडण्याची भीती नाही. नाही म्हणायला अनेक ठिकाणी शेवाळे तयार झालेले असते, तेवढे मात्र पाय टाकताना सांभाळावे लागते.. एखाद्या वीर योद्धय़ाप्रमाणे पाऊस अंगावर झेलायचा असेल तर मढचा किल्ला आणि कान्हेरीचा डोंगर यांना मात्र पर्याय नाही! कान्हेरीच्या डोंगरावर पश्चिमेकडे तोंड करून पाऊस झेलायचा म्हणजे पावसाच्या थेंबांनी अंगच शेकून काढायचे. पावसाचा प्रत्येक थेंब तेव्हा बंदुकीच्या गोळीप्रमाणे वेगात येऊन अंगावर शेकतो. तो पडत नाहीच तो शेकतोच. एखाद्याने चहूबाजूंनी अंगावर फटके द्यावेत, तसे पावसाचे फटके इथे सहन करावे लागतात. आषाढातील पाऊस असेल तर फार काळ हे फटके सहन करता येत नाहीत, एवढा तो इथे धारदार झालेला असतो. पावसाला ‘धारानृत्य’ही म्हटले जाते. पण कान्हेरीचा हा पाऊस म्हणजे ‘धारदार नृत्य’च असते.
कान्हेरीला हा असा पाऊस कोसळत असताना खालच्या जंगलात वेगळीच सृष्टी अवतरलेली असते. फुलपाखरांचा विणीचा हंगाम सुरू झालेला असतो. कीटकसृष्टी ऐन बहरात असते. जंगलातील झाडांची पाने खालच्या बाजूने पाहिली की, कीटकांचे वैविध्यपूर्ण साम्राज्यच नजरेस पडते. पण मुंबईकर यांपासून तसे दूर असतात. त्यांच्या लेखी पावसाळा म्हणजे तुफान पाऊस कोसळल्याने पूर्ण मुंबई पाण्याखाली जाणे. म्हणजेच मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल गाडीची सेवा ठप्प होणे. मुंबईचा असा हा पाऊस पावसाळ्यानंतरही मनात मात्र कोसळतच असतो. कधी आयुष्यातील समर प्रसंगाला सामोरे जाताना तो कुलाब्याच्या दांडीप्रमाणे आपल्याला अचल निर्धारावर कायम राखतो तर कधी त्याच प्रसंगात कान्हेरीच्या योद्धय़ाप्रमाणे फटके पडत असतानाही सामोरा जायला शिकवतो; तर महत्त्वाचे म्हणजे सुख-दुखादी सर्व प्रसंगांत त्यातून जात असतानाच आयुष्याची मजाही लुटायला शिकवतो. कारण तो पाऊस तनामनात जपलेला आणि भिनलेला असतो.. तनामनात असतो पाऊसच पाऊस!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2013 1:04 am

Web Title: rain 3
टॅग Lokprabha,Matitartha
Next Stories
1 प्रतीक्षा पावसाच्या ज्ञानकोशाची!
2 ‘झोती होती ऽऽऽ, झोती होती ऽऽऽ’!
3 मेघायन
Just Now!
X