response.lokprabha@expressindia.com

करोनाच्या पाश्र्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. भाविकांसाठी त्यांच्या भक्तीभावाचं प्रकटीकरण म्हणून गणेशोत्सव महत्त्वाचा असतो तसाच समाजातल्या जाणत्या, संवेदनशील व्यक्तीसाठी तो वेगळ्या कारणाने महत्त्वाचा असतो. ते कारण म्हणजे ‘लोकसत्ता’ पुरस्कृत ‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रम.

हा उपक्रम नेमका काय आहे, हे आता वाचकांना खरंतर नीट माहीत आहे. समाजात होत असलेल्या भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचारांमुळे एक प्रकारचे निराशेचे वातावरण तयार होत असते. यंदा त्यात करोनामुळे मोठी भर पडली. याशिवाय घुसखोरीचे सावट आहेच. एकीकडे स्त्रियांचं सक्षमीकरण होत असलं तरी दुसरीकडे स्त्रियांवरील अत्याचारांनी उग्र स्वरूप धारण केलं आहे. या देशात काहीच चांगलं घडू शकत नाही, असा विचार करत बुद्धिमान तरुण मोठय़ा संख्येने देशाबाहेर जाताना दिसतो आहे. असं सगळं असलं, काहीसे निराशेचे सूर उमटत असले, तरी या वातावरणाला दिलाशाची किनारदेखील आहे. सगळंच संपलेलं आहे आणि आता काही घडूच शकत नाही, असं नाही. समाजात विधायक कार्याचा वसा घेऊन अनेक व्यक्ती-संस्था निरपेक्षपणे समाजमन घडविण्याच्या कार्यात गुंतल्या आहेत.  समाजाचा आधार होण्यासाठी धडपडणाऱ्या या संस्थांना समाजाकडूनही आधाराची गरज आहे. आपण उठून समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी काही करू शकत नसलो तरी ते करणाऱ्यांना हातभार लावायची, त्यांच्या पाठीशी जमेल तेवढी आर्थिक ताकद उभी करायची अनेकांची इच्छा असते. पण कुठेतरी जाऊन काहीतरी करणं त्यांना खरोखरच शक्य नसतं. त्यांची ही सत्कार्याची इच्छा आणि या संस्थांची गरज यांची सांगड घालण्यासाठी ‘लोकसत्ता’ हे व्यासपीठ आहे.

‘सर्व कार्येषु सर्वदा’ या उपक्रमातून या संस्थांची एक विधायक साखळी ‘लोकसत्ता’ने बांधली आहे. या वार्षिक दानयज्ञाची  आवृत्ती दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही सादर झाली. वेगवेगळ्या क्षेत्रांत सामाजिक जाणिवेने काम करणाऱ्या दहा संस्थांची ओळख या उपक्रमातून लाखो वाचकांना झाली. या सत्कार्यात सहभागी होण्याची अनेकांची अतीव इच्छा असते. मात्र, व्यक्तिगत, कौटुंबिक किंवा अन्य अनेक कारणांमुळे त्यामध्ये थेट सहभाग शक्य होत नाही. अशा वेळी, कुणी तरी आपल्या मनातल्याच कामात झोकून दिल्याची माहिती मिळते, आणि इच्छापूर्तीचा क्षण जवळ येतो. ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमातून यंदा गणेशोत्सवकाळात दहा संस्थांचा परिचय करून दिला गेला.

दरवर्षांप्रमाणे यंदाही या संस्थांना लोकसत्ता परिवार व हितचिंतकांकडून मोलाचा आर्थिक हातभार लागेल आणि हीच समाजातील दुख, विघ्ने दूर करणाऱ्या विनायकाची खरी आराधना ठरेल!

धनादेश येथे पाठवा..

धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा.

मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग, मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट,
मुंबई – ४०००२१,
०२२-६७४४०२५०

नाशिक कार्यालय 
संपादकीय विभाग,
स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६,
पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

महापे कार्यालय 
संपादकीय विभाग,
प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे,
नवी मुंबई – ४००७१०.
०२२-२७६३९९००

नागपूर कार्यालय 
संपादकीय विभाग,
प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी,
नागपूर – ४४००१०,
०७१२-२२३०४२१

ठाणे कार्यालय    
संपादकीय विभाग,
कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा,
ठाणे.
०२२-२५३९९६०७

दिल्ली कार्यालय     
संपादकीय विभाग,
द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग,
बी१/ बी, सेक्टर १०,
नॉएडा – २०१३०१ उत्तर प्रदेश.
०१२०-२०६६५१५००

पुणे कार्यालय 
संपादकीय विभाग,
एक्स्प्रेस हाऊस,
प्लॉट नं. १२०५/ २/ ६,
शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४.
०२०-६७२४११२५

 

स्वमग्नतेतून पुढे जाण्याचा ‘आरंभ’

गोल फिरणाऱ्या पंख्याच्या पात्यांकडे तासन्तास पाहत राहणे किंवा एखादी दोरी हातात घेऊन खेळत राहणे, अशा गोष्टींनी ते कंटाळत नाहीत. हलणाऱ्या वस्तूंबाबत त्यांना कमालीची उत्सुकता असते. पण, अवस्था स्वमग्न. सुंदर चित्र काढतील, पण नैसर्गिक विधी कोठे आणि कसे करावेत, याचे भान मात्र नसते. अशा स्वमग्न मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ‘आरंभ’ ही स्वयंसेवी संस्था शाळा चालवते.

स्वमग्न स्थितीमधील मुलांना सांभाळणे हेच एकमेव काम अशी या मुलांच्या पालकांची अवस्था असते. त्यामुळे मूल आणि पालक या दोघांशी संवाद ठेवावा लागतो. या मुलांनी त्यांची दिनचर्या स्वत:हून पूर्ण करावी अशा पद्धतीचे शिक्षण शाळा देते. ही संस्था सुरू करण्यापूर्वी अंबिका टाकळकर यांना स्वत:लाही स्वमग्न मुलांना सांभाळतानाच्या मानसिक आणि शारीरिक ताणातून जावे लागले. औरंगाबादमध्ये या मुलांवर उपचाराची सोय नसल्याने दरवेळी पुणे – मुंबईला  जाणे हे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नव्हतेच, शिवाय मुलांचीही फरफट होई. त्यामुळे दोन मुलांसह त्यांनी २०११ मध्ये आरंभचे हे काम सुरू केले आणि सध्या ६७ मुले येथे शिकतात.

या मुलांची बुद्धिमत्ता कमी असते असे नाही. फक्त त्यांची बुद्धी शरीराच्या गतीशी जुळत नाही. आरंभचे काम येथे सुरू होते. संगीत, नृत्य, शारीरिक कसरत, मन आणि शरीर यांचा समन्वय जुळविणारे खेळ, त्यातून वाचाविकास, संवाद प्रक्रिया घडून यावी असे शब्द, वाक्य, नाटक असे नानाविध प्रकार उपचार पद्धतीचा भाग म्हणून वापरले जातात. प्रत्येक मुलाच्या दिनचर्येची आखणी करणे हे या कामाचे सूत्र. शून्य ते सहा वयोगटातील विद्यार्थ्यांची कृतिपत्रिका वेगळी आणि ६ ते १८ वर्षांच्या मुलांसाठी कृती कार्यक्रम निराळे. अशा मुलांसाठी शिक्षक मिळणे हे महाकठीण काम. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला प्रशिक्षित करण्याचे कामही ‘आरंभ’ला करावे लागले.

ही मुले एका जागी बसू शकत नाहीत. नजरेला नजर देत नाहीत. ओळखीच्या लोकांनाही प्रतिसाद देताना त्यांना वेळ लागतो. ती एकच गोष्ट वारंवार करतात. मूल वयाने वाढते. मोठे दिसू लागते. पण त्याचा स्वत:वर ताबा नसतो. अशा मुलांना सांभाळणे अवघड होऊन बसते. अशा मुलांसाठी वसतिगृह सुरू करण्याचा ‘आरंभ’चा मानस आहे.

शाळा सुरू झाली तेव्हा म्हणजे २०१२ मध्ये किरण जोशी ‘आरंभ’मध्ये आला, तेव्हा त्याचे स्वत:वर नियंत्रण नव्हते. पण नंतरचा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे. आठव्या वर्षी त्याला जेमतेम दोन बोटांत पेन पकडता येत होते. तो आता १९ वर्षांचा आहे आणि दहावीच्या परीक्षेची तयारी करतो आहे. तो आता दुचाकी चालवू शकतो. भ्रमणध्वनी, संगणक हाताळतो. अशा मुलांना आनंदाने, सन्मानाने सुरक्षित जगायला मदत करणे हेच संस्थेचे उद्दिष्ट असल्याचे व्यवस्थापकीय संचालक अंबिका टाकळकर सांगतात. सध्या १६ कर्मचारी या कामात आहेत.

स्वमग्नता वेळेवर लक्षात आली तर लवकर उपचार सुरू करता येतात. उपचार करताना दृक्—श्राव्य माध्यमातून शिक्षण दिले जाते. या मुलांमधील अतिचंचलता कमी करण्यासाठी संगीताचा उपयोग केला जातो. राष्ट्रीय मुक्त संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या मुलांच्या प्रगतीचे मूल्यांकन केले जाते.

या मुलांकडून वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती आणि विक्री ही आता नित्याची बाब झाली आहे. या मुलांमध्ये वर्तनबदल करण्यासाठी शाळेतील शिक्षक सातत्याने काम करतात. रंगकाम, तबला किंवा इतर वाद्य वाजविणे, संगणकाचा वापर यातून मुलांमध्ये बदल होतात. या मुलांनी एखादे कौशल्य आत्मसात करावे, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. आपले मूल स्वमग्न आहे हे स्वीकारायला पालकांची मानसिकता घडवावी लागते. एक मूल आठ महिने शाळेच्या प्रवेशद्वारात बसायचे.  शेवटी त्याच्यासाठीचे सगळे कृती अभ्यास प्रवेशद्वारात घ्यायचे ठरले. तो मुलगा आता शाळेत रमला आहे. सगळ्या वर्गात हिंडत राहतो. पण हे सारे करताना मूल आणि पालक या दोघांशी सतत बोलावे लागते. समजून घ्यावे लागते. ही मानसिकता घडविण्यासाठी संयम ठेवावा लागतो. हे आता ‘आरंभ’मधील मंडळीच्या अंगवळणी पडले आहे. त्यासाठी पालकमंचही चालविला जातो.

अशा मुलांच्या समस्यांवर काम करणाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळाही संस्थेमार्फत घेतल्या जातात. सध्या हे सारे उपक्रम भाडय़ाच्या जागेत सुरू आहेत. महिन्याला दीड लाख रुपयांपर्यंतचा खर्च ही शाळा सुरू ठेवण्यासाठी येतो. त्यातील सर्वाधिक खर्च हा इमारत भाडय़ाचा आहे. केवळ समाजाच्या मदतीने सुरू असणाऱ्या या शाळेला स्वत:ची जागा घेण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. सध्या बजाज दुचाकी कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून काही मदत मिळत असल्याने डोलारा उभा आहे. पण, इमारत बांधण्यासाठी जागा नसल्याने सारे अडकून पडले आहे.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल?

औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून रिक्षाने साधारणत: १५ मिनिटे अंतरावर शहानूरमियाँ दर्गा चौकातून संस्थेपर्यंत जाता येते.

Aarambh Society For Autism And Slow Learners Children या नावाने धनादेश काढावा.
— सुहास सरदेशमुख

 

शिक्षण उपेक्षितांच्या दारी

घरोघरी शिक्षण कवडसे पोहोचावेत, यासाठी रजनी परांजपे आणि बिना शेठ लष्करी यांनी १९८९ मध्ये ‘डोअरस्टेप स्कूल’ ही संस्था सुरू केली. बिना या त्या वेळी समाजकार्याचे शिक्षण घेत होत्या. महाविद्यालयीन शिक्षणाचा भाग म्हणून त्यांनी कुलाबा पालिका शाळेतून शिक्षण अर्धवट सोडलेल्या मुलांना पुन्हा शाळेत आणण्याचे आव्हान स्वीकारले. यासाठी आंबेडकरनगर वस्तीत फिरत असताना मुले शाळेत न जाण्यामागची कारणे त्यांना सापडली. मत्स्य व्यवसायात काम करणाऱ्या मुलांच्या पालकांनी शिक्षणाविषयी दिलेल्या उत्तरांतून त्यांच्या जगण्यातील हतबलता दिसली. कधीच शाळेत न गेलेली काही किशोरवयीन मुलेही वस्तीत होती. काही मुलांची शिकण्याची इच्छा आहे, पण कामामुळे त्यांच्याकडे वेळ नाही, असे जाणवले.

मुले शाळेपर्यंत पोहोचू शकत नसतील तर शाळा त्यांच्यापर्यंत पोहोचवू या, या विचाराने १९८९ साली ‘डोअरस्टेप स्कू ल’ची स्थापना करण्यात आली. रजनी परांजपे आणि बिना यांनी  वस्तीतच खेळांच्या माध्यमातून शिक्षण द्यायला सुरुवात के ली. हळूहळू आजूबाजूच्या वस्त्यांमधील मुलांची स्थितीही त्यांना कळू लागली. संस्थेने ३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी वस्त्यांमध्ये बालवाडी सुरू के ली. या वयोगटातील मुले काम करत नाहीत आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायला पालकांना वेळ नसतो. त्यामुळे बालवाडीला चांगला प्रतिसाद मिळाला. १९९१—९२ या शैक्षणिक वर्षांत प्रथमच संस्थेने २० ते २५ मुलांना शाळेत दाखल के ले. आता दरवर्षी हजारो मुले शाळेत दाखल होतात.

मुले शाळेत दाखल झाली तरी नियमितपणे शाळेत जात नाहीत. पालक महिनोन्महिने मुलांना गावी घेऊन जात असल्याने शाळा बुडते. त्यामुळे शाळेत दाखल झाल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे पालकांशी नियमित संवाद साधून त्यांचा मुलांच्या शिक्षणाला पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्न के ले जातात. शाळेत दाखल होण्याचे वय निघून गेलेल्या मुलांना संस्थेतर्फे  स्थानिक शिक्षक त्यांच्या वस्तीतच शिक्षण देतात.

शाळेबाहेर अनौपचारिकरीत्या शिक्षण घेऊन अपेक्षित कौशल्ये प्राप्त झाल्यानंतर मुले पालिका शाळांमध्ये दाखल होतात. शाळेत विद्यार्थ्यांच्या गर्दीशी, तेथील क्रमिक पुस्तकांशी आणि सतत शिक्षणेतर कामांमध्ये गुंतलेल्या शिक्षकांशी जुळवून घेणे विद्यार्थ्यांना जड जाते. ही परिस्थिती लक्षात घेऊन संस्थेने १९९२—९३ साली पालिका शाळांबरोबर काम करायला सुरुवात केली.

सध्या संस्था मुंबईत पालिके च्या १० बालवाडय़ा, ४० शाळांबरोबर तर पुणे परिसरात २०० शाळांबरोबर करते आहे. संस्थेतर्फे  पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फर्स्ट स्टेप फॉरवर्ड’ उपक्रम राबवला जातो. संस्थेचे शिक्षक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांना लेखन, वाचन शिकवतात. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनाही शाळेतच अतिरिक्त मार्गदर्शन के ले जाते. याशिवाय वस्ती पातळीवरही अभ्यास केंद्रे चालवली जातात.

एखाद्या ‘कोचिंग क्लास’प्रमाणे ही के ंद्रे विद्यार्थ्यांसाठी काम करतात. विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागून त्यांचा भाषाविकास व्हावा, यासाठी शाळांमध्ये वाचन उपक्रम राबवला जातो. घरातील निराशाजनक वातावरणामुळे विद्यार्थी अबोल होतात, आपली आकलन क्षमता गमावून बसतात. काही विद्यार्थी चंचल, अस्थिर किं वा रागीट होतात. अशा विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी संस्थेने दोन समुपदेशकांची नियुक्ती के ली आहे.

सध्या शाळा बंद असल्याने वस्ती शिक्षकांप्रमाणेच शाळा शिक्षकही वस्त्यांमध्ये जाऊन शिकवत आहेत. मुंबईत १५० वस्ती शिक्षक आणि शाळा शिक्षक आहेत. पुणे, पिंपरी—चिंचवड येथे १३५ वस्ती शिक्षक आणि ९२ शाळा शिक्षक आहेत. या सर्वाचे जवळपास गेल्या ६ महिन्यांचे वेतन रखडले आहे. कंपन्यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी आणि वैयक्तिक देणग्या यांवर संस्था अवलंबून आहे. मात्र, टाळेबंदीमुळे सर्व आर्थिक स्रोत बंद झाले आहेत.

वस्त्यांमध्ये राहणाऱ्या मुलांपर्यंत संस्था पोहोचली, पण आझाद मैदानाजवळ किं वा रेल्वे स्थानकांच्या बाहेर अनेक मुले भटकताना दिसत. या मुलांसाठी संस्थेने जपानी राजदूतावासाच्या मदतीने बसमधील शाळा सुरू केली. ती चालवण्यासाठी ‘आशा फॉर एज्युके शन’ या संस्थेने आर्थिक साहाय्य केले.

सध्या पुणे परिसरात ६ आणि मुंबईत ७ बसेस आहेत. प्रत्येक बस रोज चार ठिकाणी जाते. दोन—अडीच तास थांबते. मुले येऊन खेळ आणि कलेच्या माध्यमातून शिक्षण घेतात. त्यांच्या प्राथमिक शिक्षणावर अधिक भर दिला जातो आणि शक्य झाल्यास त्यांना शाळेतही दाखल केले जाते. ही चालती—फिरती शाळा पुढे सुरू ठेवण्याचे आव्हान संस्थेसमोर आहे. प्रत्येक बससाठी वार्षिक १२ लाख रुपये खर्च येतो.

डोअरस्टेप स्कू लने वंचित, उपेक्षित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारा पूल उभारला आहे. त्याआधारे शिकलेले विद्यार्थी विविध क्षेत्रांत काम करत आहेत. सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचा संस्थेचा मानस आहे. समाजातील दातृत्वशक्ती पुढे आली तर या वंचित मुलांचा शिक्षणप्रवास सुकर होईल.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल?

डोअरस्टेप स्कू ल, खोली क्रमांक  २५४, दुसरा मजला, जगन्नाथ शंकर शेठ पालिका शाळेची इमारत, लामार्ट विनार दुकानाच्या बाजूला,  ग्रँट रोड पुलाच्या खाली, नाना चौक, ग्रँट रोड पश्चिम, मुंबई-४००००७.

THE SOCIETY FOR DOORSTEP SCHOOL या नावाने धनादेश काढावा.
– नमिता धुरी

 

सांस्कृतिक संचित

सन १९१७ मध्ये लोकमान्य टिळक यांनी प्राज्ञपाठशाळेस भेट दिली  होती. लोकमान्यांना प्राज्ञपाठशाळेचे अध्यक्ष स्वामी के वलानंद सरस्वती यांच्या हस्ते मानपत्र देण्यात आले.

भारताचा कारभार हाती घेतल्यानंतर येथील पारंपरिक शिक्षणव्यवस्था मोडीत काढून ब्रिटिशांनी इंग्रजीतून युरोपीय विद्या शिकविणारी शिक्षण पद्धती अमलात आणली. मात्र, वाईसारख्या परंपरासमृद्ध गावात तर जुन्या पद्धतीच्या पाच पाठशाळा त्या वेळी चालत होत्या. नारायणशास्त्री मराठे यांनी तिथे वेदान्त, न्याय, वेद, काव्य अशा अनेक शास्त्रांचे अध्यापन के ले.  अनेक तरुण विद्यार्थी त्यांच्याकडे शिकायला येऊ लागले आणि ‘प्राज्ञमठ’ नावाची पारंपरिक शिक्षणाची संस्कृत पाठशाळा सुरू झाली. १९०५-०६ साली महाराष्ट्रात राष्ट्रीय शिक्षणाची चळवळ जोर धरत होती आणि त्याच काळात तळेगावला समर्थ विद्यामंदिर नावाच्या राष्ट्रीय शाळेची स्थापना झाली. १९१० मध्ये इंग्रजांनी ही शाळा बंद के ली तेव्हा तेथील विद्यार्थी, शिक्षक वाईतील प्राज्ञमठात आले. मग काही काळाने प्राज्ञमठ या खासगी पाठशाळेला ‘प्राज्ञपाठशाळा’ या सार्वजनिक संस्थेचे स्वरूप देण्यात आले. पारंपरिक पाठशाळेबरोबरच नवा माध्यमिक अभ्यासक्रम सुरू करायचा आणि त्यातून राष्ट्रीय चळवळीला वाहिलेले आणि आधुनिक विद्येने पारंगत विद्यार्थी तयार करायचे हा त्यामागील हेतू होता. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, वासुदेवशास्त्री कोनकर, पांडुरंगशास्त्री गोस्वामी असे विद्वान येथेच तयार झाले. ३१ जुलै १९२० रोजी प्राज्ञपाठशाळा ही संस्था ‘प्राज्ञपाठशाळा मंडळ’ या नावाने नोंदविण्यात आली. या संस्थेने १०० वर्षे पूर्ण केली आहेत.

१९२० ते १९६० या कालावधीत प्राज्ञपाठशाळा मंडळाने अनेक समाजसुधारणांचे निर्णय घेतले. संस्थेचे महत्त्वाचे कार्य म्हणजे स्वामी के वलानंद सरस्वती यांनी सुरू के लेला ‘धर्मकोश.’ प्राचीन भारतीय संस्कृती, सामाजिक मानवशास्त्र, धार्मिक संकल्पनांची उत्क्रांती आदी ज्ञानविषयांचा एक मूलभूत साधनग्रंथ म्हणून धर्मकोशाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आधुनिक ज्ञान, सामाजिक समता तसेच समताधिष्ठित न्यायासाठी परंपरागत हिंदू धर्म आणि समाजात सुधारणा करण्याच्या उपक्रमात प्राज्ञपाठशाळा मंडळ नेहमीच अग्रेसर राहिले. या उपक्रमाचे साधन म्हणून धर्मकोशाची योजना करण्यात आली आहे. धर्मशास्त्राच्या परंपरेप्रमाणे हिंदू धर्म नेहमीच मोकळा, गतिशील होता आणि काळाच्या ओघात, वैचारिक आणि नैतिक प्रगतीला अनुसरून, सतत परिवर्तनशील होता हे सिद्ध करणारा प्रमाण, व्यापक आणि निर्विवाद पुरावा संग्रहित करणे हे धर्मकोशाचे मुख्य प्रयोजन होते. अस्पृश्यता निवारणाला असलेल्या धर्मशास्त्रातील आधारासाठी महात्मा गांधी प्राज्ञपाठशाळेकडे वळाले, यावरूनच धर्मकोशाद्वारे  झालेल्या सामाजिक कार्याचे महत्त्व स्पष्ट होते.

धर्मकोशाचे ११ कांड आहेत. प्रत्येक कांडात वेगवेगळे भाग आहेत. गेल्या ९० वर्षांत पाच कांडांतील २६ भाग प्रकाशित झालेले आहेत. पाचव्या कांडातील १ भाग आणि उरलेल्या ६ कांडांतील २० भाग मिळून २१ भाग तयार करून मंडळाला प्रकाशित करायचे आहेत.

प्राज्ञपाठशाळेचे दुसरे मोठे कार्य म्हणजे ७३ वर्षे सुरू असलेले ‘नवभारत’ मासिक. १९४७ सालच्या ऑक्टोबर महिन्यात शंकरराव देव यांनी हे मासिक सुरू के ले. समाजाला विचारप्रधान साहित्य देणारे ‘नवभारत’ हे महत्त्वाचे मासिक आहे.

‘परंपरेने चालत आलेल्या विद्यांचे अध्ययन आणि अध्यापन प्राज्ञपाठशाळा करत असली, तरी तेथील अभ्यासक परंपरेचे परिष्करणही करीत असतात. हिंदू धर्मात वेळोवेळी सुधारणा झाल्या असून आताही होणे आवश्यक आहे. यातूनच पाठशाळेतील विद्वानांनी ‘धर्म निर्णय मंडळ’ स्थापन के ले. निरनिराळ्या संस्कारांत सोपेपणा कसा आणता येईल, त्यासंबंधीचे नियम तयार केले. अनेक कालबाह्य़ रूढी आणि रिवाज बंद व्हावेत, यासाठी प्रसार के ला,’ असे प्राज्ञपाठशाळा मंडळाचे सहसचिव अनिल जोशी सांगतात.

मौलिक ग्रंथसंपदा

पाठशाळेचा आणखी एक उपक्रम म्हणजे उत्कृष्ट ग्रंथांचे प्रकाशन. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ या ग्रंथाच्या तीन आवृत्त्या प्राज्ञपाठशाळा मंडळाने प्रसिद्ध के ल्या. डॉ. सुमंत मुरंजन यांचा ‘पुरोहितवर्ग वर्चस्व आणि भारताचा सामाजिक इतिहास’ हा एक अजोड ग्रंथ आहे. ‘बौद्धधर्माचा अभ्युदय आणि प्रसार,’ हे प्रा. डॉ. प. ल. वैद्य यांचे पुस्तक, ‘चार्वाक-इतिहास आणि तत्त्वज्ञान’ हे सदाशिवराव आठवले यांचे पुस्तक आणि प्रा. मे. पुं. रेगे लिखित ‘ईहवाद आणि सर्वधर्मसमभाव’ पुस्तके, ही प्रकाशने मराठीतील वैचारिक लिखाणाचे मानंदड आहेत. तशीच आणखी दोन पुस्तके  म्हणजे गंगाधर वामन लेले यांचे ‘प्रस्थानभेद’ आणि डॉ. म. अ. मेहेंदळे यांचे ‘प्राचीन भारत : समाज आणि संस्कृती’.  पाठशाळेने भारतीय परंपरा, संस्कृती आणि वेगवेगळ्या ज्ञानशाखा यांची चिकित्सा करणारे अनमोल, मौलिक ग्रंथ प्रसिद्ध के ले आहेत.

संस्थेतर्फे दरवर्षी नवरात्रात ‘सरस्वती-उत्सव’ साजरा करण्यात येतो. तेथे तीन दिवस नामांकित अभ्यासकांची व्याख्याने होतात. तसेच पाठशाळेतर्फे  दरवर्षी चर्चासत्र, अभ्यास शिबिरे आणि विशेष व्याख्याने आयोजित केली जातात.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल?

प्राज्ञपाठशाळा मंडळ
वाई (जि. सातारा) येथे मध्यवर्ती भागातील गंगापुरी परिसरात प्राज्ञपाठशाळेचे कार्यालय आहे.  पुणे-कोल्हापूर महामार्गावरून सुरूर फाटा येथून वाईला जाता येते. पुणे-वाई एसटी सेवाही आहे.

PRAJNAPATHASHALA MANDAL या नावाने धनादेश काढावा.
– अविनाश कवठेकर

 

जीवनशाळा : लडमई, पढमई साथ साथ..

नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणामुळे या राज्यांतील आदिवासी मोठय़ा प्रमाणात विस्थापित होऊन त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. या आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली १९८५ साली ‘नर्मदा बचाव आंदोलन’ सुरू करण्यात आले. आंदोलनाची दिशा निश्चित होत गेली तसतशी स्थानिक प्रश्नांची व्यापकता मेधाताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नर्मदा खोऱ्यातील शिक्षणाचा अभाव आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या असंख्य समस्या!

नर्मदा खोऱ्यात शाळा होत्या, पण फक्त कागदोपत्री. सरकारला शाळाअस्तित्वाचे पुरावे दाखविण्यापुरती शाळेच्या पटावर खोटी विद्यार्थीसंख्या दाखवली जात असे. नर्मदा खोऱ्यातील लोकांपर्यंत शिक्षण पोहोचावे याबाबत ना सरकार उत्सुक, ना सरकारी अधिकारी, ना शिक्षक. हा गैरप्रकार लक्षात आल्यावर मेधाताईंनी त्याविरोधात गावकऱ्यांसोबत आंदोलन सुरू केले. त्यामुळे या शिक्षकांवर कारवाई करण्यात आली. परंतु शाळा सुरू करण्याबाबत मात्र सरकारी यंत्रणा उत्सुक नव्हत्या. नर्मदा खोऱ्यातील लोकांना अज्ञानाच्या गर्तेतून बाहेर काढायचे तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, या विचारातूनच ‘जीवनशाळा’ या संकल्पनेचा जन्म झाला.

जीवनशाळेची सुरुवात झाली ती १९९२ साली नंदुरबारमधील चिमलखेडीपासून! शाळा सुरू केली तेव्हा गावात दोन टक्केही साक्षरता नव्हती. पण काही वर्षांतच जीवनशाळेने हे चित्र पालटून टाकले. नदीकाठच्या माळावर शाळा सुरू झाली. आदिवासी समाजाकडून मेधाताईंना चांगला प्रतिसाद मिळाला. हळूहळू महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीनही राज्यांमध्ये जीवनशाळा उभ्या राहिल्या.

१९९३—९४ सालची गोष्ट. चिमलखेडीची पहिली जीवनशाळा जुगलाडाया यांच्या झोपडीत भरली होती, त्यात पाणी शिरले. पाणी गळ्यापर्यंत आले तशी ही मुले शाळेच्या छतावर जाऊन बसली, पण तिथून हटायला तयार नव्हती. शेवटी पोलिसांनी जबरदस्तीने त्यांना तिथून हलवले. ही मुले या जीवनशाळेशी खूप एकरूप झाली होती याचंच हे उदाहरण. ही शाळा बुडाल्यानंतर पुढे शाळेच्या नव्या जागेसाठी दोन महिने तहसीलदार कार्यालयासमोर धरणं धरलं. मग ती शाळा धरणापासूनचं पहिलं गाव मणिबेलीत भरवली गेली. जीवनशाळा चालवायची तर त्याचा नीट आराखडा हवा. म्हणजे मुलांच्या शिक्षणालाही एक शिस्त येईल, हे मेधाताई जाणून होत्या. त्यासाठी त्यांनी अनिल सदगोपाल, कृष्ण कुमार (एनसीआरटीचे प्रमुख) या दिल्ली विद्यापीठातल्या प्रोफेसरांना बोलावून शिक्षणाच्या आराखडय़ाबाबात चर्चा केली. यात स्थानिक ग्रामस्थांचाही सहभाग होता, हे विशेष! या चर्चेत स्थानिक गावाचा इतिहास, शिक्षणासाठीचे भाषेचे माध्यम, स्थानिक शेती, जंगल, आपल्या हक्कांसाठी आंदोलनातील सहभाग यावर विचार झाला.  या शाळांसाठी दोन पुस्तकंही तयार करण्यात आली. आदिवासींच्या पौराणिक कहाण्यांवरचं- ‘आमऱ्या काण्या’ (आमच्या कहाण्या) हे पावरी भाषेतलं पुस्तक, ‘अक्षरान् ओळखाण’ म्हणजे अक्षरओळख- ज्यात ‘क’ कमळ असे न शिकवता ‘क’ – कुकडा म्हणजे कोंबडा असं स्थानिक ओळख सांगणारे शिक्षण दिले जाते. जीवनशाळांसाठी शिक्षणतज्ज्ञ लीलाताई पाटील, फलटणच्या मॅक्स्सिन मावशी यांच्याकडून शिक्षकांना प्रशिक्षण दिले गेले. याकामी अक्षरनंदनसारख्या शाळांकडूनही खूप मदत झाली. आज महाराष्ट्रात सात आणि मध्य प्रदेशात दोन अशा एकूण नऊ जीवनशाळा आहेत.

या शाळांना सरकारी मान्यता मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले गेले. अथक लढय़ानंतर २०१३ साली या शाळांना सरकारी मान्यता मिळाली खरी; पण विनाअनुदान या तत्त्वावर. ‘स्वयं अर्थसाहाय्य’ या नावाखाली ना मानधन, ना विद्यार्थ्यांसाठी माध्यान्ह भोजन, ना पाठय़पुस्तके, ना शैक्षणिक साहित्य! तरीही जीवनशाळेचा आलेख चढाच राहिला आहे. मात्र योगिनी खानोलकर, गीतांजली चव्हाण, विजय वळवी, जीवनशाळेची संयोजिका लतिका राजपूत, चेतन साळवे, सियाराम, खेमसिंग, ओरसिंग पटले, शिक्षक, आदिवासी युवा यांच्या अथक मेहनतीशिवाय जीवनशाळेचा प्रवास शक्य नाही. हे सारे अपुऱ्या मानधनावर  काम करतात. ही माणसे मेहनतीने सामाजिक बांधिलकी पार पाडतात. कविता भागवत, शिल्पा बल्लाळ जीवनशाळेसाठी तळमळीने मदत करतात. विश्वस्त विजया चौहान, परवीन जहांगीर यांचा इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. या साऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना साथ लाभते ती दात्यांची.  सध्या शाळेत एकूण ९६५ मुले शिकत आहेत. ६६ शिक्षकेतर कर्मचारी आहेत.

हा भाग करोनाबाधित नसल्याने अलीकडेच जीवनशाळांमधील शिक्षण सुरू झाले आहे.  या शाळेमुळे नर्मदा बचाव आंदोलनाला एक वेगळी दिशा दिली हेही मेधाताई मान्य करतात. गेल्या अठ्ठावीस वर्षांत जीवनशाळेतून आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी ‘जीवनशाळा’सारखे प्रयोग महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. अशा प्रयोगांना आर्थिक बळ मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल?

नर्मदा नवनिर्माण अभियान,
मैत्री निवास, टेंभेवाडी,
काकावाडीच्या मागे, तालुका धडगाव, जिल्हा नंदुरबार- ४२५४१४.

Narmada Navnirman Abhiyan या नावाने धनादेश काढावा.
— लता दाभोळकर

 

लोकशाहीचा जागर

पालघर जिल्ह्य़ातील जव्हार, विक्रमगड, मोखाडा आणि नाशिक जिल्ह्य़ातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सुमारे २०० आदिवासी पाडय़ांवरील माणसं त्यांचं आयुष्य बदलू शकणारे कायदे समजून घेत आहेत. शासकीय यंत्रणांसमोर ठामपणे आपली बाजू मांडायला शिकत आहेत. कायद्याची भाषा आत्मसात करून शासकीय यंत्रणांशी त्याच भाषेत बोलत आहेत. हा बदल झाला तो तेथे १२ वर्षे सुरू असलेल्या ‘वयम्’ संस्थेच्या लोकचळवळीमुळे.

मिलिंद थत्ते आणि दीपाली गोगटे या दोघांनी जव्हारमधील आदिवासी पाडय़ांवर २००८ च्या आसपास काम करायला सुरुवात केली. कोणतीही विचारधारा अथवा झेंडा खांद्यावर न घेता लोकशाहीने दिलेली ताकद पूर्ण क्षमतेने वापरणे हाच मूलभूत विचार त्यांनी मध्यवर्ती ठेवला. त्यामुळे ‘वयम्’ चळवळ या मातीत जन्माला आली, रुजली, फुलली. ‘प्रश्न लोकांचे, शक्ती लोकांची आणि मार्ग चळवळीचे’ हे सूत्र कार्यकर्त्यांना त्यातूनच सापडत गेले. विनायक थाळकर, प्रकाश बरफ या कार्यकर्त्यांच्या आधाराने चळवळ आता रुजलेली दिसते.

कायदे प्रभावीपणे अमलात आल्याचे अभावानेच दिसते. त्यामुळे ज्यांच्यासाठी कायदा झाला, त्यांनाच त्याची र्सवकष माहिती देणे, सक्षम करणे आणि अडचणीच्या वेळी त्यातून वाट दाखवणे हाच मार्ग असल्याचे या कार्यकर्त्यांनी पक्के  केले. त्यामुळे ‘वयम्’ ही संस्था न राहता आदिवासींची त्यांच्या विकासासाठीची त्यांची स्वत:ची चळवळ झाली.

कायद्याने दिलेले हक्क वापरण्यासाठी छोटे छोटे टप्पे आखले. या टप्प्यांवर मिळालेले यश अनुभवताना पुढचे धडे दिले. हे ज्ञान सर्वाना मिळावे यासाठी दरवर्षी निवासी प्रशिक्षणे होतात. कायदे, संबंधित शासन निर्णय मुळातून शिकवले जाते. ‘पेसा’, वित्त आयोग यांनी दिलेला हक्काचा निधी, आमच्याच पाडय़ावर, आमच्याच इच्छेने खर्च होतो की नाही, हे तपासण्यासाठी काही गावे प्रशासनाशी चर्चा करायला शिकली. सरकारी कचेरीत योग्य तो कागद नेला की काम होते याची जाणीव त्यांना चळवळीमुळे होऊ लागली. या प्रक्रियेत आदिवासींनी कमालीची चिकाटी दाखवत पाठपुरावा केला. त्यामुळेच ‘लोकसहभागातून विकास’ हे शब्द इथल्या पाडय़ांवर प्रत्यक्षात साकारताना दिसतात.

पिढय़ानपिढय़ा कसत आलेल्या वनजमिनीवर हक्क देणारा ‘वनहक्क कायदा’ २००६ साली आला. त्यासाठीचे दावे करायला शिकवणे हे किचकट काम होतेच; पण त्याहूनही अवघड होते शासन—प्रशासनाला कायदा शिकवणे. आदिवासींसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू झाले. जिल्हास्तरापासून ते राज्यस्तरीय अधिकाऱ्यांपर्यत थेट धडक मारत, तर कधी आंदोलनातून लोकशक्तीची जाणीव करून देत हा लढा सुरू आहे. एका आंदोलनात एकाच दिवसात २,०५१ दावे सादर करण्यात आले. या समन्वय आणि सहकार्यातून चळवळीची शासकीय यंत्रणांनाही मदत झाली. परिणामी एक वर्षांत त्यातील चौदाशे दावे पूर्णत: मंजूर झाले. यातूनच मग पुढे पाच तालुक्यांतील चार हजारांहून अधिक आदिवासी शेतकऱ्यांपर्यंत वनहक्क कायद्याने हक्क पोहोचले.

जैविक संपदा सांभाळण्यासाठी जंगलाचे रक्षण व अभ्यास ग्रामसभांनी करावा यासाठी आदर्श अशा लोकजैवविविधता नोंदवह्य़ा तयार झाल्या. रानभाजी महोत्सवातून जंगलाचा अभ्यास रंजक झाला. हा अधिकार आदिवासी स्वशासन (ग्रामपंचाय तरतुदी अनुसूचित विस्तारित क्षेत्र) कायद्याने डिसेंबर १९९६ साली मिळाला. त्याची नियमावली २०१४ मध्ये लागू झाली. ग्रामपंचायत स्तरावरची निर्णयप्रक्रिया अनुसूचित क्षेत्रात पाडास्तरापर्यंत नेणारा हा पेसा कायदा. पेसामुळे प्रत्येक पाडय़ाचे स्वतंत्र अस्तित्व जपले जाते. सध्या पाच ते दहा पाडय़ांची एक ग्रामपंचायत आहे. पेसामध्ये प्रत्येक पाडय़ात ग्रामसभा गठित करता येते. याच तरतुदीनुसार मग ४६ ग्रामसभा कार्यरत झाल्या. सुमारे अडीच हजारांहून अधिक लोकांनी तत्कालीन आदिवासी मंत्र्यांना ‘आमचा कारभार आजपासून आम्हीच करणार.’ असे प्रत्यक्ष निवेदन दिले.  यापैकी २५ पाडे अतिशय सक्षमपणे गेली दोन वर्षे दरमहा ग्रामसभांच्या माध्यमातून पाडय़ांचा कारभार सांभाळत आहेत.

इतके दिवस ग्रामपंचायत ठरवेल तेवढाच लाभ पाडय़ाला मिळत असे. पण आता ‘पेसा’ निधी थेट पाडय़ांतील ग्रामसभांच्या बँक खात्यात येऊ शकत होता. पाडय़ामध्ये त्याचा कसा वापर करायचा हेदेखील ठरविण्याचा अधिकार ग्रामसभेलाचा आहे. त्यामुळे निधीचा निगुतीने वापर होऊ लागला. उदाहरणच द्यायचे तर, केवळ ३३ हजार रुपयांच्या निधीत पाडय़ासाठी दहापेक्षा अधिक महत्त्वाची कामे मार्गी लागली.

पंचायतीत आलेला इतर निधी कशासाठी वापरायचा हे सांगण्याचा हक्कदेखील ग्रामसभेला आहे. स्वत: पारदर्शी ग्रामसभा ग्रामपंचायतीला विचारू लागल्या, तुम्हीपण पंचायतीचा हिशोब जाहीर करा. त्याला प्रतिसाद मिळेना म्हणून मग थेट माहितीच्या अधिकाराचा सत्याग्रहच करण्यात आला. त्यासाठी १३ पाडय़ांतल्या ३९२ आदिवासींनी तीन वर्षांपूर्वी माहितीचा अधिकार वापरला. यामुळे व्यवस्थेला, यंत्रणेला प्रश्न विचारण्याचा आत्मविश्वास आदिवासींमध्ये निर्माण झाला. वयम् संस्थेचे सर्व पदाधिकारीही पाडय़ांवरील कार्यकर्तेच आहेत. गावोगावचे असंख्य कार्यकर्ते ही वयम्ची खरी संपत्ती आहे.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल?

‘वयम्’ लोकशाही जागर केंद्र, जांभूळविहीर, ता. जव्हार.
जि. पालघर पिन ४०१ ६०३.
मुंबईहून सुमारे १४० किमी. नाशिकहून ७९ किमी.

Vayam या नावाने धनादेश काढावा.
— सुहास जोशी

 

प्राणिमात्रांचे ‘करुणाश्रम’

वध्र्याजवळचे ‘करुणाश्रम’ हे भूतदयेचे आदर्श उदाहरण आहे. भूचर, जलचर, उभयचर अशा सर्व प्राणिमात्रांना आणि पक्ष्यांना तेथे आश्रय दिला जातो. वध्र्यापासून पाच किलोमीटरवरील पिपरी या गावात पाच एकरावर वसलेल्या करुणाश्रमात आज ३००हून अधिक प्राणी सुरक्षित जीवन जगत आहेत. देशभरात प्राणिमात्रांच्या संरक्षणासाठी झटणाऱ्या ‘पीपल फॉर अ‍ॅनिमल्स’ या संस्थेच्या कार्याची प्रचीती करुणाश्रमातून येते. याच संघटनेचे आशीष गोस्वामी यांनी उपजत प्राणीप्रेमातून हे प्राणी आश्रयस्थान साकारले.

बेवारस, जप्त केलेल्या, अपघातग्रस्त, बेकायदा पाळलेल्या, कत्तलखान्याच्या वाटेवर जाता जाता वाचवलेल्या प्राण्यांची देखभाल करुणाश्रमात केली जाते. बाबा आमटे यांनी दिलेला प्राणीसुरक्षेचा सल्ला अंगिकारून गोस्वामी यांनी १९९९ मध्ये संस्था स्थापन केली. मनेका गांधी यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहारामुळे पाच एकरचा पट्टा ‘करुणाश्रमा’साठी मिळाला. पावणेदोनशे गायी—बैल, म्हशी, उंट, घोडे, बदक, मोर, ससे, कुत्रे, मांजरी, हरीण, माकड, सर्कशीतील पोपट अशा प्राण्यांचा सांभाळ करुणाश्रमात केला जातो. त्यासाठी दररोज दहा हजार रुपयांचा खर्च येतो. पशुखाद्य, उपचार, देखभालीचा खर्च कसाबसा भागवला जातो.

मुंबईच्या ‘समस्त महाजन’ या संस्थेतर्फे  महिन्याला एक ट्रक चारा पाठविला जातो. फळ विक्रेते खराब झालेली फळे देतात. त्यातून पक्ष्यांसाठी लागणाऱ्या फळांचा प्रश्न सुटतो. भाजी विक्रेत्यांकडे शिल्लक भाजीपाला मिळतो. जातो. निर्मल बेकरीच्या लतादीदी दररोज दोन गोणी ब्रेड पुरवतात. प्राण्यांच्या उपचारांसाठी एका पशुवैद्यकास महिन्याला सात हजार रुपये मानधन द्यावे लागते. सेवकांना गरजेपुरते मानधन देण्याचा खर्चही आहेच.

आश्रमाचे उत्पन्न आणि खर्चाबद्दल गोस्वामी सांगतात, ‘‘खर्च भागवण्यासाठी लोकवर्गणी—देणगीच्या स्वरूपात काही मदत मिळते. आश्रमात तयार होणाऱ्या खताची विक्री करून त्यातून वर्षांकाठी तीन लाख रुपये मिळतात. अलीकडे पिकांवर फवारणीसाठी ‘गोमय’ वापरले जाते. त्यामुळे आश्रमातील गोमूत्र साडेतीन रुपये दराने विकले जाते. त्यातून काही उत्पन्न मिळते. परंतु उत्पन्नाचे ठोस साधन नसल्याने प्राण्यांचा सांभाळ करणे ही मोठी कसरत आहे. दैनंदिन खर्च भागवताना अडचणी येतात.’’

करुणाश्रमातील काही पाहुणे खर्चीक ठरले आहेत. नांदेड येथून मूनलाइट सर्कशीतून तसेच अमरावतीच्या अमर सर्कशीतून जप्त करण्यात आलेले १२ आफ्रि कन ग्रे प्रजातीचे पोपट इथेच वास्तव्याला आहेत. त्यांचा रोजचा खर्च दोनशे रुपये आहे. पक्ष्यांमध्ये अतिशय बुद्धिमान समजली जाणारी ही प्रजाती आहे. तीस हजार शब्द स्मरणात ठेवण्याची या पक्ष्यांची क्षमता आहे. त्यांना दैनंदिन खाद्यासह जीवनसत्त्वयुक्त द्रव द्यावे लागते.

प्राण्यांचा सांभाळ करणे यापलीकडेही ‘करुणाश्रमा’चे कार्य अधिक व्यापक आहे. त्याविषयी  गोस्वामी म्हणतात, ‘‘गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांना अटक केल्यानंतर त्यांचे घोडे जप्त करण्यात आले. या घोडय़ांची जबाबदारी कुणीच घेतली नाही. हे घोडे अखेर करुणाश्रमात आले.’’

कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गायी जप्त केल्यानंतर त्यांचा स्वीकार करण्यास गोप्रेमी संस्थाही टाळाटाळ करतात. अशा वेळी पोलीस आणि पालिका प्रशासन करुणाश्रमाकडे धाव घेतात. काठेवाडीच्या आश्रयातून भरकटलेल्या उंटांचाही इथेच सांभाळ केला जात आहे. गेल्या वर्षी बोर अभयारण्यातील पशूंना पाण्याचा तुटवडा जाणवू लागल्यावर करुणाश्रमानेच लोकवर्गणीतून पैसा उभा केला आणि कृत्रिम पाणवठे तयार करून वन खात्याला मदत केली होती.

आपत्कालीन परिस्थिती असो की अपघाती परिस्थिती असो संस्थेचा चमू प्राण्यांना वाचविण्यासाठी धाव घेतो. संकटप्रसंगी प्रशासनही संस्थेच्या चमूला पाचारण करते. संस्थेच्या वन्य प्राणी बचाव केंद्राला केंद्रीय चिडीयाघर प्राधिकरण आणि महाराष्ट्र प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची मान्यता आहे. बेवारस प्राण्यांचा सांभाळ करण्यासाठी भारतीय जीवजंतू कल्याण मंडळाची मान्यता मिळाली आहे, मात्र अनुदान नाही.

प्राण्यांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा संस्थेचा संकल्प आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपाचे औषधोपचार, लहान शस्त्रक्रिया, निगा राखण्याची सोय संस्थेकडे आहे, मात्र प्राण्यांसाठी अतिदक्षता विभाग, अद्ययावत पिंजरे, मोठय़ा शस्त्रक्रियेची सुविधा, क्ष—किरण यंत्रे, कृत्रिम श्वसन यंत्रणा इत्यादी सोयीसुविधांची आवश्यकता आहे. उकीरडय़ावर मिळेल ते भक्षण करणाऱ्या बेवारस गायींच्या पोटातून शस्त्रक्रिया केल्यावर प्लास्टिक निघते. हात-पाय तुटलेल्या माकडाला उपचार साधनांअभावी अपंगावस्थेत जगावे लागते. त्यामुळे प्राण्यांसाठी सुसज्ज रुग्णालयाची गरज आहे. केवळ डोळ्यांतून, विव्हळण्यातून आणि ओरडण्यातून आपले दु:ख, वेदना आणि भावना व्यक्त करणाऱ्या मूक जीवांचे जगणे सुसहय़ करण्यासाठी सुसज्ज रुग्णालय उभे करण्याची धडपड संस्था करीत आहे. त्या धडपडीला समाजातून हात हवा आहे.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल?

करूणाश्रम, पीपल फॉर अ‍ॅनिमल्स, पिपरी मेघे, जि. वर्धा,  ४४२००१.

People for Animals, Karunashram, Wardha या नावाने धनादेश काढावा.
— प्रशांत देशमुख

 

बौद्धिक अक्षम मुलांचा आधार

बौद्धिकदृष्टय़ा अक्षम मुलांकडे पाहण्याचा पालक आणि समाजाचा दृष्टिकोन बराचसा नकारात्मक असतो. अशा मुलांच्या पंखांना बळ देण्याचे काम पेणमधील ‘सुहित जीवन ट्रस्ट’ ही संस्था करते. शहरांमध्ये बौद्धिक अक्षम मुलांसाठी शाळा असतात, पण ग्रामीण भागात मात्र त्यांची वानवा असते. ही बाब लक्षात घेऊन पेण येथे २००४मध्ये डॉ. सुरेखा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘सुहित जीवन ट्रस्ट’ची स्थापना केली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पेण तालुक्यातील गावागावात जाऊन मुलांचे सर्वेक्षण केले. त्यातून मानसिकदृष्टय़ा अक्षम असलेली १७० मुले आढळली. त्यावेळी बौद्धिकअक्षम ही संकल्पना फारशी प्रचलित नव्हती. यामुळे अशा मुलांना ‘वेडे’ ठरवून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्याच क्षणी या मुलांसाठी विशेष शाळा सुरू करण्याचा निर्णय डॉ. पाटील यांनी घेतला.

पेण शहरातील महाडिक चाळीत दोन खोल्या भाडेतत्त्वावर घेऊन सुमंगल विद्यालय सुरू करण्यात आले. मानसिकदृष्टय़ा अपंग आणि बहुविकलांग विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली रायगड जिल्ह्य़ाच्या निमशहरी भागातील ही पहिलीच शाळा होती.  सर्वेक्षणात आढळलेल्या १७० बौद्धिक अक्षम मुलांपैकी केवळ १० मुलांनीच शाळेत प्रवेश घेतला. पण त्यांना शाळेत आणणे आणि परत घरी नेणे ही पालकांपुढील मोठी अडचण होती. ती लक्षात घेऊन शाळेने विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा सुरू केली. गावागावांत जाऊन विद्यार्थ्यांना शाळेत आणणे सुरू झाले. त्यांचे प्रशिक्षणही सुरू झाले. हळूहळू विद्यार्थ्यांच्या वागण्या—बोलण्यात पालकांना फरक जाणवू लागला. त्यामुळे शाळेबद्दल आणि संस्थाचालकांबद्दल  विश्वास दृढ होत गेला.

समाजाचा या विद्यार्थ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. १५ ऑगस्टला झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात या शाळेतील विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा सहभाग घेतला आणि कार्यक्रम सादर केला. मानसिकदृष्टय़ा विकलांग विद्यार्थी म्हणजे मनोरुग्ण नाहीत याची जाणीव त्यांना झाली. हळूहळू शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. आज अलिबाग, पेण, उरण, रोहा या तालुक्यांच्या ४४ गावांमधील १५० विद्यार्थी शाळेत नियमित शिक्षण घेत आहेत. संस्थेत १० विशेष प्रशिक्षित शिक्षक आणि १० कर्मचारी आहेत. ८० टक्के विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाते. एक वेळचे जेवणही शाळेतून मुलांना दिले जाते.

मंगलदास ठाकूर, विशांत नाईकडे, वरुण पाटील, श्रीकृष्ण गोडबोले, एम आर सुंदरेश्वर यांनी संस्थेच्या वाटचालीत मोठे योगदान दिले. भाडय़ाच्या दोन खोल्यांमधून सुरू झालेले संस्थेचे काम आज विस्तारले आहे. संस्थेच्या कार्याची दखल घेऊन शासनाने संस्थेसाठी पेण शहरातील चिंचपाडा येथे ३३ गुंठे जागा दिली आहे. ‘एम्पथी फाऊंडेशन’ने शाळेसाठी भव्य इमारत बांधून दिली.

संस्थेच्या एकलव्य व्होकेशनल केंद्रात १८ ते ४५ वयोगटातील विशेष युवक आणि युवतींना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिले जात आहे. २०१० मध्ये सुरू करण्यात आलेल्या या प्रशिक्षण केंद्रात ७५ प्रशिक्षणार्थी आहेत. त्यांना राख्या, दिवाळीत पणत्या, शोभेची फुले, गणपती, कापडी पिशव्या, मेणबत्त्या, पापड इत्यादी उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.  विद्यावेतनही दिले जाते. येथून प्रशिक्षित झालेले विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभे राहिले आहेत.

विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षक घडवण्यासाठी संस्थेने लाइट हाऊस स्पेशल टीचर्स ट्रेनिंग सेंटर सुरू केले. ‘रिहॅबिलिटेशन काऊन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली’च्या मान्यतेने तज्ज्ञ शिक्षक तयार करण्याचे काम सुरू आहे. आजवर १५६ शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले आहे.

बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांवर लहानपणापासूनच उपचार करणे आवश्यक असल्याने ० ते ६ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ‘पालवी शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ सुरू करण्यात आले. तेथे मानसोपचारतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, स्पीच थेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि फिजिओ थेरपिस्ट यांच्यामार्फत बालकांवर नि:शुल्क उपचार सुरू करण्यात आले.

संस्थेचे सर्व उपक्रम शासन मान्यतेने राबविले जातात, एकाही उपक्रमाला शासनाकडून अनुदान वा मदत मिळत नाही. खासगी कंपन्या, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या मदतीवर संस्थेचे कार्य सुरू आहे.

करोनाच्या साथीमुळे देशभरात टाळेबंदी लागू झाली. परिणामी आर्थिक मदतीचा ओघ आटला. मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी संस्थेने विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संपर्क आणि संवाद उपक्रम सुरू केला. आता इतर मुलांप्रमाणे ही मुलेही ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत आहेत. या विशेष मुलांच्या शिक्षणाबाबत शासनस्तरावर अजूनही उदासिनता आहे. आजही सामाजिक संस्थाच्या मदतीने विशेष मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांना शासनाचे पाठबळ मिळणेही आवश्यक आहे.

निरनिराळ्या क्षेत्रातील मंडळी एकत्र येऊन संस्थेसाठी निरपेक्ष भावनेने कार्यरत आहेत. तेच संस्थेचे मुख्य संचित आहे. ही मुले काहीशी दुबळी असली तरी ती परिस्थितीपुढे हतबल होत नाहीत. त्यांना सहानुभूतीची नाही तर प्रोत्साहन देऊन लढ म्हणण्याची आवश्यकता आहे.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल?

सुहित जीवन ट्रस्ट
दामोदरनगर, चिंचपाडा,
आगरी समाज हॉलजवळ,
तालुका पेण, जिल्हा रायगड, महाराष्ट्र. पिन कोड ४०२१०७.

Suhit Jeevan Trust या नावाने धनादेश काढावा.
— हर्षद कशाळकर

 

संगीतसाधनेचा पारिजातक

भारतीय संगीतातील गंगोत्री समजल्या जाणाऱ्या ग्वाल्हेरला महाराष्ट्रातील अनेक कलावंत गेले. त्यांच्यापैकी परत आलेल्या पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनी महाराष्ट्रात लावलेले संगीताचे झाड बहरले. त्याने संगीतसुरांना ज्ञानाची जोड दिली. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ संगीतसाधनेचे कार्य करणाऱ्या ‘पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर संगीत साधना मंडळा’च्या वास्तुनिर्मितीची कहाणीही ‘पुल’कित करणारी आहे.

इचलकरंजी येथे १९७४ साली झालेल्या सुवर्णमहोत्सवी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात पु. ल. देशपांडे यांनी इचलकरंजीत पं. बाळकृष्णबुवा यांचे स्मारक नसल्याची खंत व्यक्त केली होती. ती गोष्ट इचलकरंजीकरांनी मनावर घेतली आणि पाहता पाहता स्मारक उभारणीला वेग आला.

शं. बा. माळी मास्तर यांनी संगीत साधना मंडळाला जागा दिली. पु. मा. रानडे यांनी ५१ हजार रुपये वास्तू उभारणीसाठी दिले. त्यानंतर कलाप्रेमींच्या देणगी देण्यासाठी रांगा लागल्या. सकळांच्या प्रयत्नांना यश आले आणि संगीताची सेवा करणारे एक सुसज्ज – संपन्न दालन आकाराला आले.

पं. बाळकृष्णबुवा यांच्या ५२ व्या पुण्यतिथीनिमित्त ९ फेब्रुवारी १९७९ रोजी या वास्तूचे उद्घाटन झाले.  स्वर आणि लयीचा पारिजातक ‘पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर संगीत साधना मंडळा’त फुलला. तो वर्षांनुवर्षे संगीतप्रेमींवर सुरेल स्वरांचा शिडकावा करीत आहे. पं. बाळकृष्णबुवा मूळचे इचलकरंजीजवळच्या चंदूर गावचे. वयाच्या दहाव्या वर्षी पोरक्या बाळकृष्णने संगीत शिकण्याच्या ध्यासाने मजल—दरमजल करत ग्वाल्हेर गाठले. तिथे हद्दु — हस्सु खाँ यांचे शिष्य पं. वासुदेवराव जोशी यांच्याकडे त्यांनी गुरुसेवा करून ख्याल गायकीचे ज्ञान मिळवले. त्यानंतर मुंबईला येऊन संगीत विद्यालय सुरू केले.

पं. बाळकृष्णबुवांनी मग सातारा, औंध, मिरजेत वास्तव्य केले आणि शेवटी १९०० सालापासून आयुष्याच्या अखेपर्यंत सलग २५ वर्षे ते इचलकरंजीचे संस्थानिक श्रीमंत नारायणराव घोरपडे यांच्याकडे राजदरबारी गवई म्हणून संगीतसेवा करत राहिले. गायनाचार्यानी म्हैसूर, मुंबई, कोलकाता, दिल्ली, लाहोर असे दौरे करून अस्सल गायकीच्या दिमाखाने दिग्गजांना दिपवले. भारतभर त्यांच्या नावाचा विलक्षण दबदबा निर्माण झाला होता. कलेचा अमोल ठेवा त्यांनी मुक्तहस्ताने  शिष्यवर्गाला विनामोबदला दिला.

अखिल भारतीय कीर्तीच्या संगीत सम्राटाचे निर्वाण होऊन दीर्घकाळ लोटला होता. त्यांची पुण्यस्मृती चिरंतन ठेवण्याच्या दिशेने १९६५ सालादरम्यान पावले पडू लागली. संगीत क्षेत्रातील मंडळी पं. बाळुबुवा हजारे यांच्या घरी जमत असत. तेव्हा पं. द. वि. काणे बुवा यांनी पं. बाळकृष्णबुवांच्या नावाचे मंडळ सुरू करण्याचा विचार बोलून दाखवला. त्यानंतर १९६७ मध्ये पंडित बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ स्थापन झाले. पुढे पु. ल. देशपांडे यांच्या सूचनेनुसार अमूर्त कल्पनेपासून सुरू झालेला बुवांच्या स्मारकाचा प्रवास स्मृती मंदिराच्या साकार शिल्पापर्यंत सुफळ झाला. अनेक उपक्रम या वास्तूमध्ये होत राहिले. नव्या उमेदीने कार्य करणारे सदस्य पुढे आले. ख्यातनाम गायक पं. द. वि. काणे यांनी आपल्या दरबारी गायकांच्या स्मरणार्थ बाळकृष्णबुवांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम सुरू केला. संगीत शिक्षक, कीर्तनकार प्रभाकरबुवा शेंडे यांनी आपले संगीत शिकवणीचे वर्ग बंद करून मंडळात विनामूल्य वर्ग सुरू केले. आज या शिक्षणवर्गात सुमारे १५० विद्यार्थी शिक्षण घेत असतात. तसेच परिसरातील तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी संगीत परीक्षा देतात.

प्रारंभी सदस्य ३५ रुपये वार्षिक वर्गणी काढून कार्य चालवत.  इचलकंरजीतील सहकारी संस्थांही मदतीचा हात देतात. इचलकरंजीचे श्रीमंत आबासाहेब घोरपडे सरकार, दत्ताजीराव कदम, आबासाहेब खेबुडकर, कल्लापाण्णा आवाडे आदी मंडळींनी आर्थिक अडचण भासणार नाही याची काळजी वाहिली. या वास्तूला आता चाळीस वर्षे होऊन गेली. कालौघात संस्थेच्या गरजा आणि लोकांची जीवनशैली बदलली आहे. त्यानुसार वास्तूमध्ये काही बदल करणे गरजेचे झाले आहे. वास्तू बांधताना वर्तुळाकार प्रेक्षागृह बांधले होते. त्यामध्ये भारतीय बैठकीनुसार दीडशे रसिक बसू शकतात. पण सध्या अधिक आसनव्यवस्था गरजेची आहे. त्यामुळे मोठे प्रेक्षागृह बांधण्याचा संस्थेचा संकल्प आहे. शिकवणी वर्ग अपुरे पडत आहेत. चार वर्ग खोल्या बांधण्याचा संकल्प आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या वाद्यांची आवश्यकता आहे. बालवाद्यवृंद तयार करण्याकरिता वाद्यांची आवश्यकता आहे. यासाठी ३५ ते ४० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. नियोजित बांधकामाचा आराखडा तयार आहे. करोनामुळे हे काम थांबले आहे.

संस्थेने आजपर्यंतचे सर्व काम वर्गणीतून केले आहे. आजवर शासकीय मदत, अर्थसाहाय्य मिळालेले नाही. इतकी र्वष निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या या संस्थेला हाती घेतलेले संगीतविषयक उपक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी, संगीताची साधना अखंड सुरू ठेवण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे, असे मंडळाचे अध्यक्ष अशोक सौंदत्तीकर यांनी सांगितले.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल?

कोल्हापूर किंवा सांगली येथून इचलकरंजी अंदाजे २७ कि.मी.  आहे. एसटीने प्रवास करता येतो. मुख्य पोस्ट कार्यालय, मंगलधाम रस्ता इचलकरंजी (४१६११५) येथे संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय आहे.

Pandit Balkrishna Buva Sangit Sadhana Mandal या नावाने धनादेश काढावा.
— दयानंद लिपारे

 

भिक्षेकऱ्यांच्या स्वावलंबनाचा ध्यास

डॉ. अभिजित सोनवणे यांनी अडचणींच्या काळात एका भिक्षेकऱ्याने केलेल्या मदतीचे ऋण फेडण्यासाठी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली आणि शहरातील मंदिरे, मशिदी, दग्र्याबाहेर बसणाऱ्या भिक्षेकऱ्यांवर मोफत उपचार सुरू केले. त्यांच्यापैकी काहींना लघुउद्योग सुरू करण्यासाठी सहकार्य करून त्यांच्या जगण्याला नवी दिशा दिली. त्यांनी पत्नी डॉ. मनीषा सोनवणे यांच्यासह स्थापन केलेल्या ‘सोहम ट्रस्ट’ची ‘डॉक्टर्स फॉर बेगर’ ही मोहीम भिक्षार्थीसाठी संजीवनी ठरली आहे.

माणदेशातील म्हसवड (जि. सातारा) या मूळ गावातून वैद्यकीय शिक्षणासाठी अभिजित पुण्यात आले १९९९ मध्ये टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून बीएएमएस झाले. शिवाजीनगर भागात डॉ. अभिजित आणि डॉ. मनीषा यांचा छोटा दवाखाना आहे. सुरुवातीच्या काळातील अडचणींविषयी ते सांगतात, ‘‘वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर घरच्यांकडे मदत मागायची नाही असं मी ठरवलं. खेडेगावात वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. दिवसाकाठी जेमतेम ३५ ते ४० रुपये मिळत. आíथक अडचणी होत्या. एका भिक्षेकरी कुटुंबाने तेव्हा मला अन्न आणि पैशाची मदत केली. मानसिक आधार दिला. त्यानंतर मला एका आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली आणि आयुष्यच बदलले. या नोकरीने मला पसे आणि मानमरातब दिला, परंतु त्या भिक्षेकऱ्यांच्या ऋणातून मुक्त होण्याची इच्छा स्वस्थ बसू देईना. त्यामुळे १५ ऑगस्ट २०१५ रोजी नोकरीचा राजीनामा दिला आणि पुण्यातील मंदिरे आणि मशिदींच्या बाहेर बसलेल्या भिक्षेकऱ्यांवर मोफत वैद्यकीय उपचार सुरू केले.’’

अनेक भिक्षेकऱ्यांनी डॉ. अभिजित यांच्यावर घरातल्यासारखे प्रेम केले. त्यामुळे उपचारानंतर त्यांना त्याच अवस्थेत न सोडता त्यांच्यासाठी काही करता येईल का, असा विचार त्यांनी केला. ‘भिक्षेकरी ते कष्टकरी’ असे परिवर्तन घडवून आणताना अनेकांना छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले. शनी मंदिरासमोरील भिक्षार्थीना शनीला वाहायला तेलाच्या पुडय़ा करून त्यांची विक्री करण्यास प्रोत्साहन दिले. ज्यांना हात-पाय नाहीत त्यांना चाकाच्या खुच्र्या घेऊन दिल्या. या खुर्चीवर बसून विक्री करण्यासाठी वस्तूही घेऊन दिल्या. बसून भिक्षामागणाऱ्यांना बसूनच फुलं, भाजी, रुमाल आणि स्कार्फची विक्री करण्यास सांगितले. वृद्ध महिलांना गृहसंकुलांमध्ये मुले सांभाळण्याची कामे मिळवून दिली. काहींना हॉटेलमध्ये पोळ्या करण्याचे आणि भाज्या निवडण्याचे काम मिळवून दिले. कुणाला दाढी करण्याचा व्यवसाय सुरू करून दिला. काहींना एटीएम केंद्रांबाहेर रखवालदाराचे काम मिळवून दिले. आतापर्यंत ८५ भिक्षेकऱ्यांनी भिक्षाटन सोडले आहे. त्यांची कुटुंबे स्वावलंबी झाली आहेत.

डॉ. अभिजित तीन बॅगांमध्ये औषधे घेऊन मंदिराबाहेर रस्त्याच्या कडेला पदपथावरच अकरा ते तीन या वेळेत  भिक्षेकऱ्यांवर उपचार करतात. तपासणी करून औषधे द्यायची, जखमांना मलमपट्टी करायची आणि आजार गंभीर असेल तर रुग्णाला रुग्णालयात दाखल करायचे, असे त्यांचे काम चालते. त्यांनी गेल्या पाच वर्षांत पुण्यातील अकराशेहून अधिक भिक्षेकऱ्यांवर मोफत औषधोपचार केले आहेत.

शहरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यासाठी भिक्षेकऱ्यांची ‘खराटा पलटण’ स्थापन करण्याचा संस्थेचा मानस आहे. संत गाडगेबाबा ही या उपक्रमामागील प्रेरणा आहे. या खराटा पलटणीत काम करणाऱ्यांना मानधनही देण्यात येणार आहे. टाळेबंदी संपल्यानंतर ही ‘खराटा पलटण’ कार्यरत होईल.

सोहम ट्रस्टतर्फे ५५० भिक्षेकऱ्यांवर मोफत मोतििबदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ५४ लहान मुलांना भिक्षेकरी वृत्तीपासून परावृत्त करून त्यांचे पालकत्व घेऊन त्यांचे शिक्षण सुरू केले. रस्त्यावर अनेक वष्रे भिक्षा मागणाऱ्या १६ आजी-आजोबांना संस्थेने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वृद्धाश्रमांमध्ये निवारा मिळवून दिला आहे. डॉ. अभिजित यांनी वृद्धाश्रमात निधन झालेल्या चार ज्येष्ठांवर मुलाच्या नात्याने अंत्यसंस्कार केले.

भिक्षेकऱ्यांसाठी सोहम ट्रस्टतर्फे लवकरच नोकरी महोत्सव भरवण्यात येणार आहे. टाळेबंदी शिथिलीकरणानंतर काही व्यवसाय सुरू झाले असले तरी कामगारांची टंचाई आहे. दुसऱ्या बाजूला रस्त्यावर भिक्षेकऱ्यांची संख्या वाढली आहे.  कामगारांची गरज असणाऱ्या व्यावसायिकांना कामगार कसे मिळवावे हे समजत नाही, तर कामाची गरज असणाऱ्यांना ते कसे मिळवावे, हे कळत नाही. नोकरी महोत्सवात या दोन टोकांना जोडण्याचा प्रयत्न असेल.

आता भिक्षेकऱ्यांसाठी एक व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा ‘सोहम ट्रस्ट’चा संकल्प आहे. या केंद्रामध्ये कागदी पिशव्या, मेणबत्त्या, भेटवस्तू तयार करणे, शिवणकाम इत्यादी कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणार्थी भिक्षेकऱ्यांना विद्यावेतन देण्याचे संस्थेचे नियोजन आहे. प्रशिक्षणानंतर स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना सर्व तऱ्हेची मदत करणे हे संस्थेचे ध्येय आहे. त्यासाठी किमान पाच गुंठे जागेची गरज आहे आणि ती घेण्यासाठी संस्थेला मदतीची आवश्यकता आहे.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल?

सोशल हेल्थ अँड मेडिसिन ट्रस्ट (सोहम)
फ्लॅट नं. २, शालिनी हाईट्स, शिरोळे गल्ली, शिवाजीनगर,
पुणे ४११००५.

SOCIAL HEALTH AND (SOHAM) MEDICINE TRUST या नावाने धनादेश काढावा.
– विद्याधर कुलकर्णी

 

सार्थक : परिवर्तनाचा आगळा प्रयोग

सर्वच शहरांमध्ये रस्त्याच्या कडेला, कचराकुंडय़ांच्या अवतीभोवती, पदपथांवर किंवा सिग्नलजवळ भटकणारी, हाणामाऱ्या करणारी, भीक मागणारी, कचऱ्यातील वस्तू वेचणारी मुलं दिसतात. केंद्र सरकारच्या नोकरीतील बदलीमुळे २००१ साली पुण्यात आलेल्या डॉ. अनिल कुडिया यांना ही मुलं अस्वस्थ करून गेली. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची प्रबळ इच्छा कुडिया यांच्या मनात होती. त्यांनी या मुलांशी, त्यांच्या पालकांशी संवाद साधायला सुरुवात केली. अर्थात आधी प्रतिसाद मिळालाच नाही, उलट अनेकांनी त्यांच्यावर संशयही घेतला. तरीही कुडिया नाउमेद झाले नाहीत. काही समविचारी मंडळींशी चर्चा करून, एकत्र येऊन २००९ मध्ये ‘सार्थक सेवा संघ’ या संस्थेची स्थापना केली.

पुण्याजवळ हांडेवाडी येथे एक सदनिका भाडय़ाने घेऊन सार्थक संस्थेचे काम सुरू झाले. सुरुवातीला चार मुले होती. चारची अकरा मुले झाली. एकदा ती सगळी मुले पळून गेली. पुन्हा काही मुले परत आली. मग नंतर रहिवाशांच्या तक्रारींमुळे ती सदनिका सोडावी लागली. पुढे जागेचा शोध, नवी जागा मिळवणे यासाठीही खूप खटाटोप करावे लागले.  कुडिया यांच्या लक्षात आले, की संस्थेला स्वत:ची जागा हवी. त्यासाठी पुरंदर तालुक्यातील आंबळे या गावात त्यांनी स्वत:च ५० गुंठे जागा खरेदी केली आणि संस्थेला दान केली. तेथे एक छोटेखानी घर बांधण्यात आले आणि वंचित, उपेक्षित मुलांचे एक मोठे कुटुंब कुडियांसह या घरात राहू लागले. मुलांची देखभाल करण्याची जबाबदारी कुमुदिनी खंडागळे ऊर्फ अक्का यांनी स्वीकारली. मुले रमली. शाळेची पायरीही न चढलेली ही मुले आणि मुली गावातील शाळेत जायला लागली. मुलामुलींची संख्या वाढू लागल्यानंतर वसतिगृहाची बांधणी करण्यात आली. मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच, वैद्यकीय सेवा, पोषक आहार, क्रीडा प्रशिक्षण, छोटय़ा स्वरूपात व्यवसायाभिमुख प्रशिक्षण, कौशल्य प्रशिक्षण असे अनेक उपक्रम संस्थेत सुरू आहेत. संस्थेच्या जागेत कबड्डीची दोन, क्रिकेटची दोन, फुटबॉलची दोन आणि खोखोचे एक अशी मैदाने  आहेत. याशिवाय टेबल टेनिसची दोन टेबले आहेत. संस्थेच्या वसतिगृहात ४८ मुले आणि २८ मुली असे मिळून ७६ जण सध्या आहेत. साधारण पाच ते अठरा या वयोगटांतील मुले संस्थेच्या वसतिगृहात राहतात.

संस्थेत आलेली काही मुले फासेपारधी समाजातील आहेत, तसेच काही वेश्यावस्तीतील, तर काही झोपडपट्टय़ांमधील विस्कळीत कुटुंबातीलही आहेत. मुक्त जीवनातून संस्थेत आल्यानंतर साहजिकच काही जण पळूनही जातात. अशा वेळी कुडिया आणि संस्थेतील त्यांचे सहकारी या मुलांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात.

मुले उत्तमरीत्या फुटबॉल, क्रिकेट आणि अन्य खेळ खेळतात. याच उपक्रमाला पुण्यातील आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू सन्मय परांजपे याची कृतिरूप जोड मिळाली. त्यातून  ‘इंडिया खेलेगा’ या उपक्रमात संस्थेतील आठ मुलांची निवड टेबल टेनिस प्रशिक्षणासाठी करण्यात आली. ही मुले पुण्यात टेबल टेनिसचे प्रशिक्षण अव्वल प्रशिक्षकांकडून घेत आहेत. या मुलांच्या निवासासाठी पुण्यात सदनिकेची वा घराची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी संस्थेने आवाहन केले आहे. खासगी स्पोर्ट्स क्लब सारख्या ठिकाणी या मुलांना भविष्यात क्रीडा क्षेत्रातील नैपुण्यावर प्रशिक्षक, सहायक प्रशिक्षक, मदतनीस आदी अनेक प्रकारच्या नोकऱ्या मिळू शकतात. त्यासाठी  खेळांचे प्रशिक्षण देणारी सुसज्ज क्रीडा अकादमी सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे.

वसतिगृहात अधूनमधून काही ना काही कामे होत असतात. त्यातून बांधकाम, प्लास्टिरग, छोटे आरसीसी काम, कटिंग, ग्राइंडिंग, वेल्डिंग, लांबी भरणे, रंगकाम, प्लंबिंग, शेतीकाम अशा लहानसहान कामांचे शिक्षण ही मुले खुशीने घेतात.  अशी कामे शिकता शिकताच मुलांनी संस्थेचे एक छोटे घर बांधले, त्यावर पत्रे बसवले, फरशा बसवल्या, रंगकामही केले. मुले शेतीकामही करतात. वसतिगृहात शिवणकाम प्रशिक्षण केंद्रही चालते. पाच शिवणयंत्रांवर मुलामुलींना शिवणकामाचे प्राथमिक धडे दिले जातात. त्यातून कापडी पिशव्या, फ्रॉक आणि अन्य कपडेही मुले शिवतात. काही मुले महाविद्यालयीन  शिक्षण घेत आहेत. काहींनी छोटा व्यवसाय सुरू केला आहे, तर काही विद्यार्थी सार्थकमध्येच नोकरीस लागले आहेत.

संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नाही. सरकारी मदतही नाही. संस्थेचे अगदी स्थापनेपासूनचे कार्य पूर्णपणे समाजाच्या मदतीवरच सुरू आहे. संस्थेचे अनेकविध नवे प्रकल्प आणि योजना सुरू करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल?

सार्थक सेवा संघ,
काळे मळा, आंबळे, सासवड-यवत रस्ता, पुरंदर, पुणे -४१२१०४.

Sarthak Seva Sangh, Pune या नावाने धनादेश काढावा.
– विनायक करमरकर