05 April 2020

News Flash

कौटिल्य आणि शिवराय : कौटिल्याच्या राजनीतिबरहुकूम…

कौटिल्याने राजनीतीची जी तत्त्वे सांगितली आहेत, त्यानुसारच शिवाजी महाराजांचे राजकारण विकसित झाले असावे असे मानायला जागा आहे. ‘आज्ञापत्रा’तील अनेक उल्लेख ही बाब स्पष्ट करणारे आहेत.

| February 27, 2015 01:26 am

कौटिल्याने राजनीतीची जी तत्त्वे सांगितली आहेत, त्यानुसारच शिवाजी महाराजांचे राजकारण विकसित झाले असावे असे मानायला जागा आहे. ‘आज्ञापत्रा’तील अनेक उल्लेख ही बाब स्पष्ट करणारे आहेत.

विद्यविनितो राजा हि प्रजानां विनये रत:
स यच्छीलस्तच्छीला: प्रकृतयो भवन्ति,
उत्थाने प्रमादे च तदायत्तत्वात्।
तत्कूटस्थीनीयो हि स्वामीति।
(अर्थ. ८.१.१६-१७)
‘राजाचे जसे शील किंवा आचरण असेल तसेच आचरण प्रजेचे असते, उद्योगी राहण्यात किंवा आळस करण्यात प्रजा त्याच्यावर नजर ठेवून वागते. कारण राजा हा त्या प्रकृतींच्या म्हणजेच प्रजेच्या शिखरस्थानी आहे.’ कौटिल्याने राजाच्या आचरणाचा प्रजेवरील प्रभाव दाखवताना वरील सूत्र दिले आहे. आज्ञापत्रातदेखील राजकुमाराच्या, पर्यायाने भावी राजाच्या आचरणाचा प्रजेवर होणारा परिणाम ‘ईश्वर सर्व जगाचा गुरू, सकळांचे कल्याण अकल्याणाचा हिंदुनृपति कल्पित आहे, तो सगुण असला तर बहुतांचे कल्याण, अवगुणी जाहल्याने बहुतांचे अकल्याण’ अशा शब्दांत सांगितले आहे.
राजाचे अनुकरण प्रजा करत असल्याने राजाचे शिक्षण, संस्कार हे प्राचीन राजनीतीत महत्त्वाचे मानले आहेत. कौटिल्याने अर्थशास्त्रातील पहिले संपूर्ण अधिकरण याच विषयाला वाहिले आहे. या पहिल्या विनयाधिकरणात राजाच्या शिक्षणाचे विषय सांगितले आहेत. चौलकर्म (जावळ) झाल्यावर राजकुमाराने लिपी व संख्येचा अभ्यास करावा असे कौटिल्य सांगतो. हाच विचार रघुवंशातही आहे. रघूच्या शिक्षणाच्या प्रारंभाविषयी सांगताना कालिदास म्हणतो चूडाकर्म (जावळ) झाल्यावर रघू बाल्यातील अवखळपणा धारण करणाऱ्या समान वयाच्या अमात्यपुत्रांबरोबर मुळाक्षरे शिकू लागला (३.२८). चौलकर्माचे वय साधारणपणे पहिले किंवा तिसरे वर्ष असते. म्हणजे तिसऱ्या वर्षांपासून राजकुमाराच्या लिपी आणि संख्येचा म्हणजे प्राथमिक गणिताच्या अभ्यासास प्रारंभ होई. उपनयनानंतर खऱ्या शिक्षणाला सुरुवात होत असे. कौटिल्याच्या मते विद्या चार आहेत-आन्वीक्षिकी, त्रयी, वार्ता आणि दंडनीती. आन्वीक्षिकीच्या अंतर्गत सांख्य, योग आणि लोकायत अशा तत्त्वज्ञाच्या विषयांचा अंतर्भाव होतो. त्रयीमध्ये चार वेद, शिक्षा, कल्प, व्याकरण, ज्योतिष, छंद, निरुक्त ही वेदांची षडांग किंवा सहा अंग, पुराणं आणि इतिहास हे विषय येतात. वार्ता या विषयात कृषीशास्त्र, वाणिज्य आणि पशुपालनाचा समावेश होतो. वार्ता या विषयाने कृषीसंपत्ती, पशुसंपत्ती, सुवर्णादी ऐहिक वैभव, जंगलसंपत्ती आणि उत्तम मनुष्यबळाची प्राप्ती होते म्हणून राजाने त्याचा अभ्यास केला पाहिजे. या तीन विषयांनंतर येते ती दंडनीती किंवा राजनीती. या साऱ्या विषयांबरोबर हत्ती, घोडे, रथ आणि शस्त्र यांचे अध्ययन दिवसाच्या पूर्वभागात होई. या अध्ययनाचे संपूर्ण प्रयोजन चार सूत्रांत कौटिल्य सांगतो-अलब्धलाभार्था लब्धपरिरक्षणी रक्षितविवर्धनी वृद्धस्य तीर्थे प्रतिपादनी च। (१.४.४) अध्ययनाने अप्राप्ताची प्राप्ती, प्राप्त गोष्टींचे सर्व बाजूंनी रक्षण, रक्षित गोष्टीची वृद्धी आणि त्याचा योग्य विनियोग हे उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर शिक्षणाला पर्याय नाही.
काही गुण हे शिक्षणातून अंगी बाणवले जातात. विद्येचे प्रथम प्रयोजन विनय. असा विनित राजा प्रजेच्या शिक्षणादी गोष्टींची काळजी घेतो, असे कौटिल्यासह सर्व प्राचीन राजनीतिज्ञांचे मत होते. त्यामुळे राजाच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले जात होते. कवींद्र परमानंदकृत शिवभारतात शिवाजी महाराजांच्या शिक्षणाविषयी माहिती मिळते. अर्थशास्त्रात लिपी आणि संख्येच्या अध्ययनाला वयाच्या तिसऱ्या वर्षी प्रारंभ होताना दिसतो तर परमानंदकृत शिवभारतात शिवराय सातव्या वर्षी लिपी शिकण्यास योग्य झालेसे पाहून इतर मंत्रिपुत्रांसह राजाने (शहाजी राजांनी) त्याला गुरूच्या मांडीवर बसवले. सर्व विद्यांचे द्वार अशी लिपी शिवराय चटकन शिकले. गुरूने एक अक्षर लिहिण्यास सांगताच ते दुसरेही लिहीत असत, असे सांगितले आहे (९.७०-७४). याचा अर्थ शिवरायांनासुद्धा खऱ्या अर्थाने शिक्षणाला आरंभ होण्यापूर्वी लिपी शिकवली गेली होती. याशिवाय दहाव्या अध्यायात शिवरायांनी अभ्यासलेल्या विषयांची भली मोठी यादी दिली आहे. त्यानुसार श्रुती, स्मृती, पुराणं, भारत म्हणजे महाभारतादी राजनीती, सर्व शास्त्रे, रामायण, काव्य, व्यायाम, वास्तुविद्या, फलज्योतिष, सांग धनुर्वेद, सामुद्रिक, निरनिराळ्या भाषा, पद्य, सुभाषित, हत्ती-घोडे व रथ यांवर बसणे, त्यांची लक्षणे, चढणे, उतरणे, दौड मारणे, तरवार, धनुष्य, चक्र, भाला, पट्टा, शक्तियुद्ध, बाहुयुद्ध, दुर्ग अभेद्य करणे, दुर्लक्ष्य निशाण वेधणे, दुर्गम संस्थानातून निसटून जाणे, इंगित जाणणे, जादुगिरी, विष उतरणे, नाना प्रकारची रत्न परीक्षा, अवधाने या सर्व विद्य, शास्त्रे व कलांमध्ये प्रवीण झालेल्या शिवरायांनी गुरूंना मोठे यश दिले असे वर्णन येते (३४-४०). कौटिल्याने सांगितलेले विषय आणि शिवरायांच्या अध्ययनाविषयी परमानंदांनी केलेले उल्लेख पाहिले म्हणजे राजांच्या अध्ययनाचा आवाका आणि त्याचे फल लक्षात येते.
विजिगीषु राजाचे प्रथम उद्दिष्ट पृथ्वीचा लाभ हे असते. राजाला ही भूमी तीन प्रकारे प्राप्त होते असे कौटिल्य म्हणतो. त्रिविधश्चस्य लम्भ:- नवो, भूतपूर्व: पित्र्य इति (१३.५.२)। राजाने नव्याने संपादन केलेला भूप्रदेश, पूर्वीपासून त्याच्याकडे असलेला प्रदेश आणि वडिलांकडून चालत आलेली भूमी. प्रारंभीच्या काळात शिवरायांकडे यातील पित्र्य जमीनच होती.
शहाजीराजांकडे २९० गावांचा ७ तरफांमध्ये विभागला गेलेला पुणे परगणा होता. हे सात तरफे –
१. हवेली (८२ गावे), २. कडेपठार (४३ गावे), ३. सांडसखुर्द (२० गावे) ४. कर्यात मावळ (३६ गावे) ५. पाटस (४३ गावे) ६. सांडस बद्रुक (२९ गावे) ७. नीरथडी (३७ गावे). पुण्याची जाहागिरी शहाजीराजांकडे असली तरी तिची परिस्थिती अत्यंत दयनीय होती. १६२९ मध्ये आदिलशाही व निजामशाही एकमेकांविरुद्ध लढत होत्या. या परिस्थितीचा फायदा घेऊन शहाजीराजांनी पुणे-सुपे प्रांत स्वतंत्र म्हणून जाहीर केला होता. पण एक हिंदू सरदार स्वातंत्र्याचा प्रयत्न करतो हे असह्य़ होते. त्यामुळे जरा उसंत मिळताच १६२९ च्या शेवटी आदिलशहाने मुरार जगदेव या सरदाराला शहाजीराजांवर पाठवले. पुन्हा स्वातंत्र्याचा प्रयत्न कोणीही करू नये अशी दहशत निर्माण करण्यासाठी मुरार जगदेवाने पुण्यात गाढवाचा नांगर फिरवला. सारे पुणे बेचिराख केले. अशा या पुणे परगण्याच्या सात तराफ्यांतील फक्त ३६ गावांचा कर्यात मावळ शहाजीराजांनी जिजाबाई व शिवरायांना बंगळुराहून महाराष्ट्रात पाठवताना शिवरायांच्या नावे करून दिला होता. म्हणजे पित्र्य जमिनीपैकी अवघी छत्तीस गावे या विजिगीषुची होती. साल होते १६४२ आणि शिवरायांचे वय होते अवघे बारा. पण शहाजीराजांच्या मनात भविष्यातील योजना तयार होत्या. आपल्या ‘रनभ्वैसिला’ वंशात जन्मलेल्या या पुत्राची चमक बालवयातच त्यांना दिसली असावी. म्हणून राजांनी शिवरायांबरोबर एक छोटे मंत्रिमंडळ व राजमुद्रा दिली. या मंत्रिमंडळात, (नाव आणि मग पद असे वाचावे) शामराज नीळकंठ रांझेकर- पेशवे, बाळकृष्णपंत दीक्षित- मुझुमदार, सोनोपंत -डबीर, रघुनाथ बल्लाळ -सबनीस, माणकोजी दहातोंडे- सरनौबत, बाळाजी मजलसी- कारकून यांचा समावेश होता. आणि राजमुद्रा,
प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।
शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।
‘प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृध्दिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे’, ही होती.
खोल गर्भित अर्थ असलेली ही राजमुद्रा तयार करणाऱ्या शहाजी राजांचे विचार आणि बुद्धिवैभव सहज लक्षात येते. मुद्रेतला प्रत्येक शब्द विचारपूर्वक ठेवला होता. त्या मुद्रेतून भविष्यातील ध्येय आणि हेतू निश्चित झाले आहेत. शहाजीचा पुत्र प्रतिदिनी वृद्धिंगत होणारं राष्ट्र निर्माण करणार आहे हे ध्येय आहे. आणि राष्ट्रनिर्माण हे स्वसुखासाठी नसून प्रजेच्या हितासाठी असल्याने ही मुद्रा विश्ववंद्य होईल हा हेतू स्पष्ट केला आहे किंवा तशी ग्वाहीच दिली आहे. हे कार्य करणारा माझा पुत्र शिवाजी आहे आणि जगाच्या कल्याणासाठी त्याचे राज्य आहे हा विश्वास गांजलेल्या, दु:खी, कष्टी जनतेच्या मनात या मुद्रेद्वारे निर्माण केला आहे.
आपले राष्ट्र स्वतंत्र करण्याचे अयशस्वी प्रयत्न शहाजीराजांनी केले होते. स्वातंत्र्याचे हे अपुरे स्वप्न शहाजीराजे आपल्या मुलात पाहात होते. त्याला राजमुद्रा व प्रधानमंडल देऊन त्याच्या जीवनाचे ध्येय शहाजीराजांनी निश्चित केले. अवघ्या बारा वर्षांच्या मुलाकडून शहाजीराजांनी केलेली अपेक्षा मुलाने खऱ्या अर्थाने पूर्ण केली.
पण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राज्य उभं करणं ही सोपी गोष्ट निश्चितच नव्हती. त्यासाठी प्रसंगी कूटनीतीचाही वापर शिवाजी महाराजांनी केला होता.
कौटिलीय अर्थशास्त्रात संघवृत्तम् या अधिकरणात भेदोपादानानि येथे शत्रूशी कसा व्यवहार करावा ते सांगताना कौटिल्य म्हणतो, जे मैत्रीने वागणारे असतील त्यांच्याशी सामोपचाराने व दानाने मैत्री करावी, जे विरोध करतील त्यांना दंड व भेदाने स्वाधीन करून घ्यावे. आपल्या हेरांच्या मार्फत शत्रूतील व्यंगे, द्वेष, वैर, भांडणे यांची माहिती काढून त्यांच्यात फूट पाडावी, भांडणे लावावीत. कुणाला ठार मारावे, कुणावर विषप्रयोग करावा. मात्र हे सारे करूनसुद्धा अध्यायाच्या शेवटी कौटिल्य म्हणतो,
संघमुख्याश्च संघेषु न्यायवृत्तिर्हित: प्रिय:।
दान्तो युक्तजनस्तिष्ठेत्सर्वचित्तानुवर्तक:।।
(११.१.५६)
शत्रूशी कुटिलतेचा वापर केला तरी स्वराष्ट्रात मात्र संघमुख्याने आपल्या लोकांशी न्यायाने वागून त्यांना हितकर व प्रिय होईल अशी वागणूक ठेवावी, इंद्रिये ताब्यात ठेवून सर्वाच्या मनासारखे वागून लोकांची निष्ठा संपादन करावी.
हे भद्र राज्य शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे केले त्याविषयी आज्ञापत्रात म्हटले आहे, ‘कधी कोणावर चालून जाऊन, तुंबळ युद्ध करून रणाशी आणले, कोणावर छापे घातले, कोणास परस्परे कलह लावून दिले, कोणाचे मित्रभेद केले, कोणाच्या डेऱ्यात शिरोन मारामार केली, कोणाशी एकांगी करून पराभविले, कोणाशी स्नेह केले, कोणाच्या दर्शनास आपण होऊन गेले, कोणास दर्शनास आणिले, कोणास परस्परे दगे करविले, कोणी इतर प्रयत्ने नकळत त्यांच्या देशात जबरदस्तीने स्थळे बांधून अनुक्रमे आकळिले’.
हे सारे राजकारण सल्लामसलतीवर अवलंबून असते. यासाठी अमात्यनियुक्तीचे महत्त्व सांगताना कौटिल्य म्हणतो,
सहायसाध्यं राजत्वं चक्रमेकं न वर्तते।
कुर्वीत सचिवांस्तस्मात्तेषां च श्रणुयान्मतम्।।
(१.७.९)
राजशकट ज्याप्रमाणे एका चाकावर चालणार नाही त्याप्रमाणे एकटय़ा राजावर राज्य चालू शकत नाही. म्हणून त्यांनी सचिवांची नियुक्ती करावी व त्यांचे मत विचारात घ्यावे. याचाच अर्थ केवळ मंत्र्यांची नियुक्ती पुरेशी नाही, त्यांचे मत विचारात घेणे तितकेच महत्त्वाचे.
आज्ञापत्र सांगते, कार्यभागी बुद्धिमंत असतील त्यांस पुसावे. ज्याची जी अधिक युक्ती असेल ती घेऊन जेणेकरून योजिले कार्य सिद्धीस जाय ते करावे.
कौटिल्य कामज आणि कोपज अशी राजाची दोन व्यसने सांगतो. कामज व्यसनांतर्गत मृगया, द्यूत, स्त्रिया आणि मद्यपान ही चार व्यसने येतात. कोपज व्यसनांमध्ये वाक्पारुष्य म्हणजे कठोर संभाषण, अर्थदूषण म्हणजे मालमत्तेचे नुकसान व दंडपारुष्य म्हणजे अति कठोर शासन ही तीन व्यसने कौटिल्याने मानली आहेत (८.३.२३ व ३८). त्यामुळे राजाने तर स्वत:ला या सगळ्यापासून दूर ठेवले पाहिजे. पण नट-नर्तक इत्यादींना गावात स्थान देण्याच्याही तो विरुद्ध आहे. कारण सामान्य प्रजा त्यांच्यात अडकणे हे नुकसानीला कारण आहे. तो म्हणतो नट, नर्तक, गायक, वादक, कथाकार, कुशीलव यांना गावात आश्रयस्थान नसले म्हणजे तेथील माणसे शेतीच्या कामात गर्क होऊन राहातात व कोश, मजूर, द्रव्य आणि धान्य यांची वाढ होते. अहितकर नटनर्तकादि लोकांशी संबंध, अधर्मयुक्त व अनर्थयुक्त व्यवहार या गोष्टी राजाने टाळण्यास कौटिल्य सांगतो. आज्ञापत्रानुसार जनपदामध्ये नट-नर्तक असले तरी राजदरबारी मात्र त्यांचा निषेध केला आहे, ‘कलावंत, धाडी, गवई, निजग्रही यांचे नित्य नृत्यगायन महोत्साहधिरहित दरवारी करूच नये. महोत्साहामध्ये आपण वसते जागी नृत्यगायनादि न करविता बाहेरल्याबाहेर मजलसींत करवावे.’
खजिन्याचे महत्त्व विषद करताना कौटिल्य
कोशपूर्वा: सर्वारम्भा:। तस्मात्मपरूव कोशमवेक्षेत।
(२.८.१-२)
असे सांगतो. कोश हाच प्रत्येक कार्याच्या मुळाशी असल्याने राजाने प्रथम कोश पाहिला पाहिजे असे कौटिल्याने सांगितले आहे तर खजिना म्हणजे राज्याचे जीवन अशा शब्दात संपत्तीचे महत्त्व आज्ञापत्रात नमूद केले आहे.
राजनीतीमध्ये या गोष्टी असतातच, पण अर्थशास्त्रात अधिकाऱ्यांची बदली दर तीन वर्षांनी करावी असे सांगितले आहे तर आज्ञापत्रातही अधिकाऱ्यांची बदली करावी असे म्हटले आहे. आज्ञापत्रात फरक आहे तो प्रत्येक पदानुसार कालावधीतला. अशा प्रकारे पदानुसार बदलीविषयी कौटिल्याने काही सांगितले नसले तरी मूळ मुद्दा बदलीचा जो दोन्हीकडे समान आहे. योगवृत्तम् या अधिकरणात कौटिल्याने प्रसंगी खजिन्यात पैसा नसेल तर जंगल, पशू किंवा शेतीच्या उत्पन्नातून वेतन द्यावे. कोणत्याही परिस्थितीत ते दिल्याशिवाय राहू नये असे स्पष्ट केले आहे. शिवाय चांगले कार्य केल्यास विशेष भत्ते किंवा वेतन द्यावे पण गाव देऊ नये अशी स्पष्ट सूचना आहे. शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत वतनदारी दृढमूल झाली होती. ती अचानक बदलणे शक्य नव्हते, त्यामुळे ‘‘लहान थोर परंतु प्राचीन परंपरागत वृत्ती चालत आल्या असतील ती वृत्ती लोप केलियाने परम पातक आहे’’ असे मत आज्ञापत्रात आले असले तरी नूतन वृत्ती देण्याविरुद्ध राजे होते असेही रामचंद्रपंत अमात्य लिहितात.
कौटिल्याची राजनीती आणि त्याबरहुकूम शिवाजी महाराजांचे राजकारण दिसते, तेव्हा शिवाजी महाराजांनी कौटिलीय अर्थशास्त्राचा अभ्यास केला असावा असे वाटू लागते. या पुढील लेखांतून आपण अशी साम्यस्थळे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आसावरी बापट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2015 1:26 am

Web Title: shivaji maharaj
टॅग Politics
Next Stories
1 भावेप्रयोग : आजोबा…
2 औषधाविना उपचार : अन्नं वृत्तीकराणां श्रेष्ठम्
3 रुचकर : चायनीज पिझ्झा
Just Now!
X