समाजासाठी काहीतरी करावं अशी अनेकांची इच्छा असते. पण त्यांच्यातले काहीजण मात्र खरोखरच उभे राहतात आणि आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या एखाद्या कामासाठी झोकून देतात. लौकिक अर्थाने त्यांचं काम फार मोठं नसेलही कदाचित, पण समाज पुढे जाण्याच्या प्रक्रियेत तो खारीचा वाटा खूप महत्त्वाचा असतो. अशा सेवाव्रतींना ‘लोकप्रभा’चा मानाचा मुजरा

अमरावतीत ‘विठ्ठला’चे अन्नछत्र
पितृछत्र हरपल्यानंतर आलेल्या हलाखीत पोटाची खळगी भरण्यासाठी स्वत: केलेला संघर्ष डोळ्यासमोर ठेवून अमरावतीच्या विठ्ठल सोनवळकर यांनी पंचवीस वर्षांपूर्वी एक-दोन रुपयांत गरिबांना आपल्या घरीच पोटभर जेऊ घालण्याचं व्रत हाती घेतलं होतं, अजूनही त्यांचं अन्नछत्र अव्याहतपणे सुरू आहे.
एका हातगाडीवरची गॅस वेल्डिंग मशीन हेच त्याच्या कमाईचं साधन आहे. अपंग, गरिबांना एक-दोन रुपयांत पोळी-भाजी खाऊ घालणाऱ्या सोनवळकरांकडे आर्थिक सुबत्ता नसली तरी, मनाची श्रीमंती आहे. गॅस वेल्डिंगच्या व्यवसायात कमाई अनिश्चित असतानाही विठ्ठलरावांनी कधी या व्रतात खंड पडू दिला नाही. जादा वेळ श्रम करण्याची तयारी ठेवली, पण कुणाकडे हात पसरले नाहीत.
विठ्ठलरावांचं मूळ गाव मराठवाडय़ातील परभणी जिल्ह्य़ातील मानवत. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना गाव सोडावं लागलं. रेल्वेतून प्रवास करताना पोटाची आग शमवण्यासाठी भिक्षा मागण्याची वेळ त्यांच्यावर आली. रोजगाराच्या शोधात अमरावतीत पोहोचल्यानंतर मजुरी करून जमवलेल्या रकमेतून गॅस वेल्डिंगचा व्यवसाय सुरू केला. लहानपणाचे हलाखीचे दिवस त्यांना आठवत होते. आपल्यावर जी पाळी आली, ती किमान या परिसरातील गरिबांवर येऊ नये, यासाठी त्यांनी आपल्या मिळकतीतला एक हिस्सा वेगळा काढण्यास सुरुवात केली. १९८९ साली त्यांनी आपल्या घरीच ‘इंदिरा गांधी पोळी भाजी केंद्र’ या नावानं अन्नछत्र सुरू केलं. अपंगांना एक रुपयात, तर रुग्णांना दोन रुपयांत भोजन पुरवताना अनेकदा त्यांची ओढाताण झाली. मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आपल्या घरासाठी ते फारशी बचत करू शकले नाहीत, पण हे अन्नछत्र विठ्ठलरावांनी कधीही बंद पडू दिलं नाही. त्यांच्या पत्नीचीही मोठी साथ त्यांना लाभली. दररोज ४० ते ५० लोक त्यांच्या घरी पोटभर जेवतात. त्यांच्या जगण्याच्या पद्धतीत त्यांनी बदल केला नाही. कुठल्याही मदतीशिवाय त्यांचं हे वैयक्तिक समाधानाचं अन्नछत्र सुरू आहे. दिवाळी, दसरा, महाराष्ट्र दिन, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी अशा महत्त्वाच्या दिवशी गरिबांना मिष्टान्न खाऊ घालणं हा विठ्ठलरावांसाठी सणासारखा आनंद असतो. सोनवळकर अघळपघळ बोलणारे. पैसे सारेच कमावतात. त्यातून समाधान कुणाला किती मिळते, हा संशोधनाचा विषय आहे, म्हणूनच आपण केवळ पैसाच नव्हे, तर समाधान मिळवण्यासाठी जगतो, असं ते सांगतात. त्यांच्या जगण्यातही तोच मोकळेपणा आजही कायम आहे.

सेवाव्रती घडवण्याचा वसा
निवृत्ती हा आयुष्याची संध्याकाळ खुणावणारा कालखंड. निवृत्ती घेतल्यानंतर आयुष्यात राहून गेलेल्या गोष्टी अनुभवण्याची हुक्की बहुतेकांना येते. परंतु समाजाप्रती काही तरी करण्याचा ध्यास ध्येयवेडी मंडळी घेतात आणि त्यातूनच रुजते दातृत्वाची चळवळ. चॅरिटी, दान अशा गोंडस शब्दांचे गोडवे न गाता समाजातल्या उपेक्षित मंडळींसाठी काम करण्याचा निर्धार अविनाश कुलकर्णी यांनी केला आणि आज या विचारातून निर्माण झालेली संस्था असंख्य भरकटणाऱ्या पावलांना मार्गदर्शनाचे काम करत आहे. ठाणे जिल्ह्यत शिक्षक म्हणून कार्यरत अविनाश कुलकर्णी माध्यमिक शाळेतून मुख्याध्यापक म्हणून २००४मध्ये निवृत्त झाले. मागे वळून बघताना शिक्षण आणि जगणं या दोन परस्परपूरक गोष्टींतला समन्वय हरवल्याची जाणीव त्यांना झाली. लहानपणी कोल्हापूरजवळच्या गारगोटी गावात एपी नाईक या वंचितांना शिक्षण उपलब्ध करणाऱ्या ध्येयव्रतींचे संस्कार आपल्यावर झाल्याचे कुलकर्णी सांगतात. दहावीचा निकाल ८० % लागतो, परंतु नापासाचा शिक्का बसणाऱ्या उर्वरित विद्यार्थ्यांचे प्रमाण बऱ्यापैकी आहे याची जाणीव त्यांना झाली. यामध्ये मुलींची संख्या जास्त होती. प्रस्थापित शिक्षण व्यवस्थेच्या नापास टॅगमुळे व्यवहार्य जीवनात रोजगाराच्या संधी मिळताना मोठय़ा प्रमाणावर मर्यादा येतात. या मुलांना रोजगाराभिमुख शिक्षण-प्रशिक्षण देता येईल का, असा विचार कुलकर्णी यांच्या मनात आला. आणि नर्सिग इन्स्टिटय़ूटसाठी मानद तत्त्वावर काम करताना कुलकर्णी यांच्या विचारांना ठोस दिशा मिळाली. वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांची देखभाल अर्थात नर्सिग (पेशंट्स असिस्टंट) क्षेत्राला प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे हे त्यांच्या लक्षात आलं. निवृत्तीच्या वेळी मिळालेल्या निधीतूनच त्यांनी नर्सिग इन्स्टिय़ूटची स्थापना केली. कल्याण ते बदलापूर परिसरातील शाळांतून दहावी नापास मुलांना या उपक्रमाची माहिती दिली. प्रशिक्षणाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची संलग्नता मिळवली. प्रशिक्षणाचे शुल्क आर्थिकदृष्टय़ा मागासांना परवडेल असे ठेवले. पहिल्या वर्षी फक्त पाच जण होते. या मुलांना पाच दिवस प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी ऑनजॉब ट्रेनिंग आणि उर्वरित दोन दिवस थिअरी अभ्यास असे स्वरूप होते. स्टायपेंडची व्यवस्था असल्याने या मुलांना कमावण्याची संधी मिळाली. डॉ. परितेकर, डॉ. माहेश्वरी तसेच देवडकर कुटुंबीय अशा समविचारी स्नेह्यंची त्यांना साथ मिळाली. विद्यार्थ्यांची जेमतेम संख्या, निधी उभारणीत येणाऱ्या अडचणी यातूनही त्यांनी हा विचारयज्ञ सुरूच ठेवला. आज दहा वर्षांनंतर संस्थेतून शिकलेले १३८ सेवाव्रती कार्यरत आहेत.

कागदी पिशव्यांचं प्रशिक्षण
पुण्यातली कचऱ्याची समस्या लक्षात घेऊन प्लॅस्टिक पिशव्यांवर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कागदी पिशव्यांचं महत्त्व खूपच वाढलं आहे. मुळात, कागदी पिशव्या हा कॅरिबॅगला उत्तम आणि भक्कम पर्याय आहे हे किती तरी मंडळी पूर्वीपासून सांगत होती. सुरेंद्र श्रॉफ हेही त्यापैकीच एक. एक प्रथितयश उद्योजक ही त्यांची ओळख असली, तरी कागदी पिशव्यांच्या प्रचारासाठी गेली दहा-पंधरा र्वष तळमळीनं काम करणारा कार्यकर्ता ही त्यांची खरी ओळख आहे. रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रलच्या मदतीने सुरू केलेल्या कागदी पिशव्यांचा प्रचार, प्रसार एवढय़ावरच श्रॉफ थांबलेले नाहीत, तर कागदी पिशव्या कशा तयार करायच्या याचं शास्त्र आणि प्रशिक्षणासाठीचा अभ्यासक्रमही त्यांनी विकसित केला आहे.
पर्यावरणाचं रक्षण, प्लॅस्टिकवर नियंत्रण, कागदाचा पुनर्वापर, पर्यावरणाला हातभार आणि गरजूंना रोजगार असे अनेक फायदे श्रॉफ यांच्या या प्रयोगात आहेत. त्यांनी आतापर्यंत शेकडो वर्गामधून हजारो महिलांना, युवकांना आणि गरजूंना कागदी पिशव्या तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं आहे. मुख्य म्हणजे त्यासाठी ते कोणतंही शुल्क आकारत नाहीत. उलट, प्रशिक्षणार्थीना आवश्यक असलेलं कात्री, पट्टी, डिंक वगैरे साहित्य तेच स्वखर्चाने देतात. अवघ्या अडीच-तीन तासांचं हे प्रशिक्षण असतं. कागदी कॅरिबॅगचा वापर वाढवायचा आणि त्यातून अनेकांना रोजगार मिळवून द्यायचा या ध्यासातून श्रॉफ यांचे हे काम सुरू आहे. रद्दी कागदांना साध्या घडय़ा घालून तयार केल्या जाणाऱ्या या पिशव्या पंधरा किलोपर्यंतचं वजन सहज पेलू शकतात आणि त्यांचा दरही अगदी माफक असतो. घरबसल्या रोज शे-दोनशे रुपये मिळवून देणारा रोजगार या शिक्षणातून पुण्यातील शेकडो महिलांना मिळाला आहे. बचत गटातील महिलांसाठीदेखील श्रॉफ यांनी आतापर्यंत अनेक प्रशिक्षण शिबिरं आणि अनेक गावांमध्ये कार्यशाळा घेतल्या आहेत. श्रॉफ यांच्याकडून शिक्षण घेऊन बचत गटातील महिला कागदी पिशव्या तयार करून त्या दुकानदारांना विकतात. एका माणसानं पिशव्यांच्या प्रशिक्षणाचं दान शेकडो जणांना दिलं आणि त्यातून जे एक मोठं काम उभं राहिलं ते पाहिलं, की आपणही चकित होऊन जातो.

दोनशे जणांना नवी दृष्टी
१९८० साली रीडर्स डायजेस्टमध्ये श्रीलंकेतील नेत्रदान चळवळीवर एक लेख आला होता. लेखातील एका उल्लेखाने श्रीपाद आगाशे यांना मात्र अस्वस्थ केले. श्रीलंका हा देश जगातील तब्बल ३६ देशांना नेत्र पुरवितो. त्या ३६ देशांत भारताचादेखील समावेश होतो. हे वाचल्यानंतर आगाशेंना लाजीरवाणे वाटले. श्रीलंकेसारखा एक छोटासा देश जगाला दृष्टी देऊ शकतो आणि प्रचंड लोकसंख्या असलेला आपला खंडप्राय देश आपल्याच देशातील लोकांची डोळ्याची गरज भागवू शकत नाही ही लाजिरवाणी परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा आगाशेंनी विचार केला. तेव्हा ते कल्पकम येथे अणू प्रकल्पात काम करत असत. एक दिवसाची रजा टाकून त्यांनी चेन्नई गाठलं. तेथील नेत्रपेढीला भेट दिली. नेत्रदानाची सारी प्रक्रिया समजून घेतली. दुसऱ्या दिवशी कार्यालयाच्या सूचना फलकावर त्यांनी एक सूचना लावली. ऊल्लं३ी ४१ ए८ी२ कार्यालयातील सहकाऱ्यांचा प्रतिसाद वाढत गेला. १९८१ ला झेरॉक्सची सोय फारशी सोयीस्कर नव्हती. मग मूळ फॉर्म सायक्लोस्टाइल करून वाटायला सुरुवात केली. तेथील दहा वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी सुमारे १२०० लोकांचे नेत्रदानाचे अर्ज भरून घेतले. सुरुवात तर चांगलीच झाली होती. ठाण्यात आल्यावर त्यांच्या कामाला आणखीनच वेग आला. नेत्रदानावरील आणखीन माहिती जमा केली, तज्ज्ञांची व्याख्याने ऐकली, ठिकठिकाणच्या नेत्रपेढय़ांची माहिती जमा केली. विविध वृत्तपत्र, मासिकं, आकाशवाणी, व्याख्याने असे ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी नेत्रदानाविषयी लोकांमध्ये जागृती करायला सुरुवात केली. लोकांना नेत्रदानाचे अर्ज आणून देणे, भरलेले अर्ज नेत्रपेढीपर्यंत पोहोचवणे, त्यानंतर नेत्रपेढीकडून मिळणारे डोनर कार्ड नेत्रदात्यांपर्यत पोहोचवणे असा कामाचा धडाकाच लावला. सुरुवातीला त्यांनी नेत्रदानाचा अर्ज भरलेल्या सर्वाच्या नोंदी ठेवल्या होत्या. मात्र आता वाढत्या व्यापामुळे त्यांना हे शक्य होत नाही.
आगाशे सांगतात की, ‘‘आपल्याकडे नेत्रदानाविषयी उदासीनता तर आहेच, पण लोकांना जागरुक करण्याची गरज आहे. केवळ अर्ज भरून काम संपत नाही, तर त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या जवळच्या नातेवाइकांनी नेत्रपेढीशी संपर्क साधून योग्य वेळेत नेत्र काढले जातील हेदेखील पाहणे गरजेचे असते. अर्ज भरलेला असला तरी जवळच्या नातेवाइकांची परवानगीची कायदेशीर गरज असते.’’ तसेच एखाद्या व्यक्तीने नेत्रदानाचा अर्ज भरला नसेल आणि अशी व्यक्ती मृत्यू पावल्यावर त्याच्या नातेवाइकांची परवानगी असेल तरीदेखील नेत्रदान करता येऊ शकते हे पटविण्यासाठी त्यांनी अनेक वेळा मृत व्यक्तींच्या नातेवाइकांची भेट घेतली आहे. प्रसंगी मानहानीकारक प्रसंगदेखील सोसले आहेत. तर कधी कधी अशा प्रयत्नांना यश येऊन नेत्रदान झाले आहे.
आज ३३ वर्षे आगाशे नेत्रदानाबद्दल समाजात प्रचार प्रसाराचे काम करत आहेत. जवळपास दोनशेहून अधिक व्याख्याने, सव्वालाख माहिती पत्रकांचे वाटप त्यांनी केले आहे. ही इंग्लिश, मराठी, हिंदी या तीन भाषांत माहितीपत्रकं करून घेतली. त्यांच्या या उद्योगाचे यश आकडय़ात सांगायचे तर आजवर तब्बल ८ हजार लोकांनी नेत्रदानाचे अर्ज भरले आहेत आणि त्यापैकी सुमारे १०० लोकांनी मृत्यूनंतर आपले डोळे दान केले आहेत. अर्थात आगाशेंच्या प्रयत्नामुळे आज २०० लोकांना नवी दृष्टी लाभली आहे.
आपल्या देशात किमान तीस लाख लोकांना नेत्ररोपणाची गरज आहे. आपण फक्त १५ हजार लोकांची गरज भागवू शकतो अशी परिस्थिती आहे. श्रीलंकेतून आजही आपल्याकडे दहा हजार नेत्र पुरवले जातात. या आकडेवारीवरूनच या क्षेत्रातल्या आव्हानाची कल्पना येईल.

नाटकाच्या माध्यमातून रुग्णसेवा
कोल्हापुरात राहणारे प्रशांत जोशी हे नाटय़कर्मी गेली २०-२५ वर्षे या क्षेत्रात काम करत आहेत. सुरुवातीला त्यांनी व्यावसायिक नाटकं केली, पण त्यात जीव रमेना. एक दिवस त्यांच्या स्वत:च्या हॉटेलाच्या गल्ल्यावर बसलेले असताना हातात एक चिठ्ठी घेऊन एक बाई आली. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की या बाईचा नवरा आजारी आहे आणि तिला पैशांची गरज आहे. प्रशांत जोशींनीही तिला थोडेसे पैसे दिले, पण ती निघून गेल्यावर त्यांना असं वाटलं की या बाईची गरज खरी होती कशावरून आणि खरी असेल तर तिला असे सगळ्यांकडून एकदोन रुपये मिळून काय फरक पडणार आहे? मग त्यांनी त्या चिठ्ठीत उल्लेख होता त्या डॉक्टरांना फोन केला. त्या डॉक्टरांकडून समजलं की त्या बाईची गरज खरीच होती. डॉक्टर म्हणाले की मला शक्य तेवढं मी करतो, पण मला मर्यादा आहेत. हे ऐकल्यावर प्रशांत जोशी यांना असं वाटलं की आपण अशा लोकांसाठी नाटकाच्या माध्यमातून काहीतरी केलं पाहिजे. मग त्यांनी २००० साली एका किडनी पेशंटसाठी एका नाटकाचा प्रयोग जाहीर केला. ३७ हजार रुपये जमले. ते त्या रुग्णाच्या उपचारांसाठी वापरले गेले. मग असं करून गरजू रुग्णांना मदत करायची असं त्यांनी ठरवलं. पण दरवेळी लोकांना असं गरजू रुग्णांसाठी दोनेकशे रुपयांचं तिकीट घ्या असं आवाहन करणं त्यांना प्रशस्त वाटेना. मग नाटय़गृहाची क्षमतेऐवढे पास वाटायचे आणि उपस्थितांना गरजू रुग्णांसाठी तिथे ठेवलेल्या बॉक्समध्ये ऐच्छिक मदत करा असं आवाहन करायचं असा उपक्रम त्यांनी सुरू केला. त्यांचा असा अनुभव आहे की ७०० पास वाटले की साधारण २०० माणसं येतात. पण हजार बाराशेच्या वर रुपये जमत नाहीत. मग ते त्यांच्या इतर कामांमधून मिळालेल्या पैशातून भर घालून पाच हजार रुपये उभे करतात आणि मग ते पैसे गरजू रुग्णांना दिले जातात. मिशन मम्मी डॅडी या एक तासाच्या नाटकाचे या पद्धतीने १४७ प्रयोग झाले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अशी ३०-३५ नाटकं केली आहेत. दर महिन्याला ते तीन रुग्णांना तरी प्रत्येकी पाचेक हजारांची मदत मिळवून देतात. हे काम करणं आव्हानाचं आहे. कारण मुळात नाटक मोफत करायचं असल्यामुळे त्यात काम करायला कलाकार मिळणं सुरुवातीला खूप जिकिरीचं होतं. नाटक मोफत द्यायला लेखक तयार नसतात. सुरुवातीला उत्साहाने आलेले कलाकार नंतर कंटाळून निघून जातात. त्यांच्या या कामासाठी वेगवेगळे सहकारी आले आणि गेले; पण गोपी वर्णे हे एकच सहकारी आजवर त्यांच्याबरोबर कायम आहेत. याबरोबरच ‘एकच प्याला’ नाटकाचे प्रयोग करून नवऱ्याच्या दारूचे दुष्परिणाम भोगणाऱ्या महिलांना मदत करायची या पातळीवरही सध्या त्यांचं काम सुरू आहे.

वाचन संस्कृतीचा प्रसार
वाचन संस्कृतीचा प्रसार करायचा असेल तर त्याचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या वाचनालयांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणे आवश्यक आहे, या विचाराने प्रेरित होऊन बदलापूरच्या श्याम जोशी यांनी सर्वस्व पणाला लावून त्यांच्या स्वप्नातील ग्रंथालय उभारले. कल्याणच्या ज्ञानमंदिर शाळेत चित्रकला शिक्षक असणाऱ्या श्याम जोशींना वाङ्मयाची गोडी त्यांच्या वडिलांनी लावली. त्यांच्या वडिलांचा दहा हजार पुस्तकांचा संग्रह होता. त्यामुळे वडिलांच्या निधनानंतर वाचनालयाच्या रूपाने त्यांचे स्मारक उभारावे या हेतूने श्याम जोशींनी बदलापूर स्थानकाजवळ दहा वर्षांपूर्वी जागा विकत घेऊन ‘ग्रंथसखा’ वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली. त्यासाठी त्यांनी त्यांचा दोन हजार चौरस फुटांचा बंगला नऊ लाख रुपयांना विकला. घरातील सर्व पुस्तके ग्रंथालयात ठेवली. आणखी १५ हजार पुस्तके त्यांनी विकत घेतली. त्यानंतर ते स्वत: भाडय़ाच्या घरात राहू लागले. फर्निचर तसेच इतर खर्चासाठी आणखी पैसे हवे होते. त्यामुळे २००६ मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून पीएफ आणि ग्रॅच्युइटीपोटी मिळालेले साडेसहा लाख रुपयेसुद्धा त्यांनी ग्रंथसखासाठी खर्च केले.
उद्याच्या गुढी पाडव्यापासून ‘ग्रंथसखा’ एक स्वायत्त विद्यापीठ म्हणून ओळखले जाणार आहे. आधुनिक काळातील नव्या संकल्पनांना सुयोग्य मराठी प्रतिशब्द सुचविणे, ते मराठी जनमानसात रुजविणे, मराठी भाषेतील घुसखोरी बंद करणे, मराठी भाषेच्या श्रीमंतीचे दर्शन घडविणारी दुर्मीळ पुस्तके वाचकांना उपलब्ध करून देणे, नियमित प्रशिक्षण कार्यशाळा, पुस्तक पर्यटन आदी उपक्रम या विद्यापीठाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत.
आता ‘ग्रंथसखा’चे वातानुकूलित अभ्यास दालन असून तिथे वाचकांना संदर्भासाठी पुस्तके दिली जातात. तसेच सहा संशोधकांच्या निवासाची सोयही येथे आहे. अभ्यासकांना येथे जास्तीत जास्त तीन दिवस राहता येते. त्यांच्यासाठी इंटरनेट तसेच झेरॉक्सची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. बहुतेक वाचकांना आवडणारी ललित, कथा, कादंबरी आदी वाङ्मयसंपदा ग्रंथसखामध्ये विपुल प्रमाणात आहेच, शिवाय तब्बल एक लाखांहून अधिक विविध विषयांची माहितीपर पुस्तकेही आहेत. त्याच जोडीने श्याम जोशी यांनी विश्वसखा प्रकाशन संस्था सुरू केली आहे. मराठी भाषेतील महत्त्वाच्या सर्व लेखकांची समग्र लेखन सूची तयार करण्याचे कामही ‘ग्रंथसखा’ करीत आहे. विशेष म्हणजे शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान अथवा मदत न घेता केवळ लोकवर्गणीच्या आधारे श्याम जोशी यांनी बदलापूरमध्ये आशिया खंडातील पहिले भाषा संग्रहालय उभारले आहे. ज्ञान आणि रंजन यांची योग्य सांगड घालून वाचन संस्कृतीचा अतिशय चांगल्या रीतीने प्रसार करता येतो, हे श्याम जोशी यांनी ‘ग्रंथसखा’द्वारे दाखवून दिले आहे.

रद्दीतून समाजसेवेचा वटवृक्ष!
गिरगावातील झावबावाडीत राहणारे दीपक नेवासकर हे एका खासगी कंपनीतील नोकरदाऱ वय वर्षे पस्तीस़ दैवाने दिलेले अंशत: अंधत्वाचे व्यंग सोबत घेऊन जगणाऱे मात्र इतरांच्या डोळ्यांना दिसणार नाही ते समाजसेवेचे स्वप्न त्यांनी पाहिल़े घरात जमा होणारी रद्दी अगदी टाकून द्यायला नको म्हणून लोक ती रद्दीवाल्याकडे देतात आणि दोन- पाच रुपये घेतात़ या रद्दीचाच सत्कार्यासाठी उपयोग करून घ्यावा, असे त्यांना वाटू लागल़े त्यानुसार सुरुवातीला त्यांनी चाळीतील शेजारपाजारच्या घरांत फिरून काही रद्दी जमा केली आणि त्यातून येणाऱ्या पैशांतून परिसरातीलच शाळांमध्ये कधी शुद्ध पाण्याचे यंत्र देणे, कधी बसायला बैठक देणे, असे उपक्रम सुरू केल़े
या जिद्दी जिवाची धडपड चाळीतल्या तरण्याबांड मुलांच्या लक्षात आली़ त्यातून विशाल आपटे, आदित्य गोखले, गीता गुरव, गौरी निमकर आदी काही तरुणांच्या पुढाकाराने २००६ साली ‘युवा मोरया’ ही संघटना जन्माला आली़ सुरुवातीला त्यांनी झावबावाडीतील घरांमध्ये फिरून रद्दी जमा केली़ त्यातून तब्बल चार हजार रुपयांची रक्कम जमा झाली़ हे पैसे जव्हार या आदिवासीबहुल भागातील दुर्गम गावांमध्ये शैक्षणिक सुविधा देण्यासाठी खर्च करण्याचे ठरल़े त्यानुसार जव्हारमधील काही गावे निश्चित करून कार्यकर्ते वर्षांतून काही वेळा तिथे जाऊ लागल़े तिथल्या शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करू लागल़े
आजही ‘युवा मोरया’ ही नोंदणीकृत संघटना वगैरे नाही़ हा तरुणांचा एक गट आह़े ‘रद्दीदान’ हा या संघटनेचा पाया आह़े त्या पायावर संघटनेने समाजकार्याचा मनोरा उभा केला आह़े दर महिन्याच्या पहिल्या रविवारी हे तरुण कार्यकर्ते घरोघर फिरतात आणि रद्दी जमा करून त्या पैशातून जव्हारमध्ये शैक्षणिक कार्य करतात़ सुरुवातीला १२-१५ असणारी कार्यकर्त्यांची संख्या समीर लेले, विशाल कुलकर्णी, तन्वी पराडकर अशा अनेक कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे आता ५० वर पोहोचली आह़े त्यामुळे गिरगावातील ३५०, दादरमधील २०-२५ आणि बोरिवलीतील १०० घरांतून या कार्यकर्त्यांना रद्दीदान जमा करता येत़े ‘दर महिन्यांच्या पहिल्या रविवारी रद्दीदान,’ या कार्यक्रमात सुरुवातीपासून आजपर्यंत एकदाही खंड पडलेला नाही़ लोकांनाही आता त्यांची सवय झाली आह़े त्यांच्यासाठी घरातील रद्दी, पठ्ठय़ाचे खोके अशा गोष्टी वेगळ्या बांधून ठेवल्या जाऊ लागल्या आहेत़ विशेष म्हणजे या चळवळ्या तरुणांच्या कार्याची माहिती रद्दी विकत घेणाऱ्यालाही झाली आह़े त्यामुळे तोही आता त्यांच्याकडून बाजारभावापेक्षा एक-दोन रुपये अधिक देऊन रद्दी विकत घेऊ लागला आह़े परिणामत: महिन्याकाठी संघटनेकडे १२ ते १५ हजार रुपये जमा होऊ लागले आहेत़
जव्हारमधील मोख्याचा पाडा, कौलाळे, कोगदे आणि जंगलपाडा या गावांमध्ये ‘युवा मोरया’चे कार्य सुरू आह़े गावातील शाळांमधील तब्बल ७०० ते ८०० विद्यार्थ्यांना वर्षांच्या सुरुवातीला बॅग, वही, अंकलिपीसहित सर्व शैक्षणिक साहित्य पुरविण्यात येत़े वर्षांतून ६ ते ८ वेळा कार्यकर्ते गावात जातात़ आणि प्रत्येक वेळी काही तरी वेगळा उपक्रम घेऊन जातात़ दिवाळीनिमित्त रांगोळी स्पर्धा, कधी पुस्तक हंडी, कधी मुलांना शिकविण्यासाठी विविध वस्तू, अशा एक ना अनेक गोष्टी युवा मोरया गावांमध्ये करत़े संघटनेने दोन स्थानिक महिलांना हाताशी धरून एक अंगणवाडीही मोख्याचा पाडा या गावात सुरू केली आह़े या अंगणवाडीत विविध प्रकारची खेळणी आणि इतर शैक्षणिक वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत़ शैक्षणिक कार्यासोबतच या गावांत होणाऱ्या विविध आरोग्य शिबिरांना मनुष्यबळ पुरविण्याचे कामही कार्यकर्ते करतात़ तसेच शबरी सेवा समिती या संस्थेकडून या भागामध्ये दरवर्षी फेब्रुवारीमध्ये करण्यात येणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्यातही मोरयाचे कार्यकर्ते सहभाग घेतात़ सामूहिक विवाहातील गरीब जोडप्यांच्या नव्या संसारासाठी भांडीकुंडी आणि इतर काही वस्तू प्रायोजकांच्या माध्यमातून ते उपलब्ध करून देतात़
घरातली अडगळ समजल्या जाणाऱ्या रद्दीच्या पैशांतून आज एका समाजकार्याचा वटवृक्ष बहरू लागला आह़े

वृद्धांसाठी आनंदघर
कोल्हापूरचे शिवाजी पाटोळे पाच महिन्यांचे असताना त्यांचे वडील वारले. त्यांना आणि त्यांच्या आधीच्या आठ भावंडांना त्यांच्या आईने काबाडकष्ट करून वाढवलं. परिस्थितीने फटकारलेल्या अशा लोकांना आपण काही ना काही मदत करायची ही खूणगाठ शिवाजी पाटोळे यांनी मनाशी बांधली. त्यांनी एका गुजराती शाळेत शिपाई म्हणून काम केलं खरं, पण आयुष्यात स्थैर्य आल्यावर त्यांनी आणि त्यांच्या आईने मिळून मातोश्री नावाचा एक वृद्धाश्रम काढला. याच नावाने सरकारचे राज्यभर वृद्धाश्रम आहेत. पण पाटोळे यांच्या मातोश्री वृद्धाश्रमाचा त्या सरकारी वृद्धाश्रमांशी काहीही संबंध नाही. कोणतीही सरकारी मदत न घेता ते आपला वृद्धाश्रम चालवतात. त्यांच्या वृद्धाश्रमात आज जवळजवळ १०० वृद्ध राहतात. त्यात अनाथ, अपंग असे वृद्धही आहेत. शंभरपैकी पन्नासेकजण आपल्या राहण्या-जेवण्या-खाण्याचा काहाही खर्च देऊ शकत नाहीत. जे देतात तेही साताठशे रुपये देऊ शकतात. पण पाटोळेंना त्यांच्याकडून कसलीच अपेक्षा नाही. त्यांनी स्वत:च्या दोन एकर जमिनीवर हा वृद्धाश्रम उभारला आहे. त्यांची दरमहा १३ हजारांची पेन्शनही ते याच कामात खर्च करतात. त्यांच्या मालकीच्या घरातून येणारं भाडंरूपी उत्पन्नही याच कामात घालतात. समाजासाठी काहीतरी करू इच्छिणारी काही मंडळी त्यांना आर्थिक मदत करतात, बाकी सगळं त्यांच्या वैयक्तिक बळावरच चालतं. वृद्धाश्रमातल्या वृद्धांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी ५० खाटांचं एक हॉस्पिटलही उभं केलं आहे. त्यांची मुलं, सुना आपापली कामं सांभाळून या कामात मदत करतात.

वृद्धांसाठी हक्काचा निवारा
वृद्धापकाळ म्हणजे मानलं तर जिवंतपणीचे मरण अन् मानलं तर सुखाचा काळ. कुटुंबातील सदस्यांची साथ त्यांना किती मिळते, यावर सारं काही अवलंबून असतं. असमर्थ आबालवृद्धांना आधार देणारा हा डोलारा ७ फेब्रुवारी १९९७ ला डॉ. शशिकांत रामटेके आणि त्यांच्या पत्नी निशिगंधा रामटेके यांनी स्वबळावर नागपुरात उभारला. वृद्धाश्रमापलीकडच्या या संकल्पनेनं आतापर्यंत अनेकांना आधार दिला आहे.
बदलत्या काळात आई, वडील आणि मुलं एवढीच कुटुंबाची व्याख्या, मग अशा वेळी घरातल्या वृद्धांचे काय, असा प्रश्न सहजच पडतो. कित्येकदा या घरातल्या वृद्धांचं आजारपण सांभाळायला त्यांना वेळ नसतो, तर कधी वेळ असला तरीही ती सांभाळण्याची वृत्ती त्यांच्यात नसते. अशा सर्व असमर्थ वृद्धांना या विजया परिवार केअर सेंटरमध्ये सामावून घेतलं जातं. बाबा आमटेंच्या आश्रमात गेल्यानंतर डॉ. शशिकांत रामटेके यांनी बाबांपुढे ही संकल्पना मांडली तेव्हा त्यांच्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, नागपुरात परतलेल्या डॉ. रामटेके यांनी ही बाब मनावर घेतली आणि स्वबळावर विजया परिवार केअर सेंटर उभारलं.
या परिवारात सहभागी होणारा सदस्य कधी पाच मिनिटांचा असतो, तर कधी तो अर्धा तास जगणारा असतो. मात्र, या पाच मिनिटांतही त्यांना या सेंटरमधून मिळालेली आपुलकीची वागणूक मृत्यूची वाट सुखद करून देते. एचआयव्ही, टीबी, अल्झायमर, स्किझोफ्रेनिया अशा दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्ण येथे आणून सोडले जातात. कुणाला रुग्णालयात येणारा खर्च झेपत नाही, तर कुणाला नोकरीमुळे वेळ मिळत नाही, अशी त्यांची कारणे असतात. अशा वेळी त्यांच्या परिवारातील वृद्धांना या ठिकाणी सामावून घेऊन, त्या सर्वाची काळजी इथं घेतली जाते. त्यांना खाऊ घालण्यापासून तर सर्व नैसर्गिक विधी, त्यांची स्वच्छता, त्यांची देखभाल, तपासणी, वेळेवर औषधं देणं ही सर्व काळजी या परिवाराकडून घेतली जाते. डॉ. शशिकांत रामटेके आणि त्यांच्या पत्नी निशिगंधा या दाम्पत्यांनी स्वत:ला त्यासाठी वाहून घेतलं आहे. आजपर्यंत या दाम्पत्यानं सुमारे २०० हून अधिक वयोवृद्धांची सेवा केली आहे. त्या सर्वासाठी त्यांनी हुडकेश्वर मार्गावर एक छोटेसं घरकुल उभारलं आहे. त्यासाठी त्यांना सरकार वा कुणाकडूनही पैशाची मोठी अपेक्षा नाही, तर स्वबळावर आणि या रुग्णांच्या नातेवाईकांकडून जे मिळेल त्या बळावर या परिवाराचा डोलारा उभा आहे. नागपुरात आज तरी वृद्धांसाठी आणि आजारी व्यक्तींसाठी विजया परिवार केअर सेंटर हक्काचं घर झालं आहे.

दान.. वेळेचं..
‘दान’ या शब्दाला अनेक शब्द जोडले जाऊ शकतात. विद्यादान, धनदान, गोदान.. अशी अनेक दानं आपल्याला माहिती आहेत. यातल्या प्रत्येक दानाला महत्त्व आहे. मुळात दानाचंच महत्त्व अनन्यसाधारण आहे. वेळेचं दान हेही असंच. त्याचंही मोल फार मोठं आहे आणि कुमुदिनी आठल्ये यांचं काम आपण बघितलं, की वेळेच्या दानाचं महत्त्व मनावर अधिकच ठसतं.
भारतीय हवाई दलातील वरिष्ठ पदावरून निवृत्त झाल्यानंतर एक दिवस त्या पुण्यातल्या निवारा वृद्धाश्रमात गेल्या आणि निवाराच्या सर्वेसर्वा असलेल्या निर्मलाताई सोहनी यांना भेटून म्हणाल्या की, मला इथे येऊन काही तरी काम करायचंय. कुठलंही काम चालेल. अगदी जेवण वाढायचंही काम करायला मी तयार आहे. सोहोनी आजी म्हणाल्या, हरकत नाही, मग पंगत वाढायला मदत करा.
या वाक्यातून वैयक्तिक स्वरूपातील एक सेवाकार्य दुसऱ्या दिवसापासूनच सुरू झालं. वेळेचं दान अशा स्वरूपाचं काम आठल्ये आजी गेली चौदा र्वष अखंडपणे, अगदी एकही दिवस न चुकता अखंडपणे करत आहेत. त्यांचं वय आज त्र्याहत्तर आहे; पण निवारामध्ये जायची वेळ कधीही चुकत नाही. आजी आल्या की, तिथल्या सर्व वृद्धांना अगदी ‘आपलं’ कोणी तरी आलंय असं वाटतं, कारण आजी फक्त पंगतच वाढत नाहीत, तर पंगतीला बसलेल्या प्रत्येकाशी त्या आपुलकीनं संवाद साधतात, प्रत्येकाचं हवं नको पाहतात. वाढता वाढता गप्पाही मारतात. आग्रहानं पदार्थ खायला लावतात. किती मस्त वास येतोय, घेऊन तर बघा.. असं म्हणत म्हणत भाजी वाढतात. आनंदी वातावरणात मग पंगत रंगते. पंगत झाली, सगळे जण उठले, की आजी परत सर्व आवरून त्यांच्या घरी परततात. आठल्ये आजींचं हे झालं एक काम. याशिवाय वृद्धाश्रमात त्या भजन वर्ग घेतात. सिप्ला केंद्रात जाऊन तिथल्या रुग्णांना हस्तकलेच्या वस्तू तयार करायला शिकवतात. त्यांच्याकडून आकाशकंदील तयार करून घेतात, चित्रं काढून घेतात. आजी म्हणतात, मी फार करत्ये असं नाही, पण आपल्या जाण्यामुळे तिथल्या काही मंडळींना आनंद मिळतोय, ही गोष्ट आपल्यालाच खूप आनंद देते. म्हणून स्वीकारलेल्या या कामात खंड पडू द्यायचा नाही एवढंच मी ठरवलं आहे आणि काम करत राहिले आहे.
आठल्ये आजींचं हे वेळेचं दान एका तपाहून अधिक काळ अगदी निष्ठेनं सुरू आहे आणि म्हणूनच त्याचं मोलही फार मोठं आहे.

ज्येष्ठांसाठी आनंदसोहळा
१९७३ मध्ये पदवी घेतल्यावर कायद्याचादेखील शिक्षण घेतलेल्या पुरुषोत्तम चिंधु पवार (पाटील) यांना स्वत:चा व्यवसाय करण्याची इच्छा होती. हाती भांडवल नसतानासुद्धा साधा कांदे बटाटय़ाचा व्यवसाय सुरु केला. त्यानंतर एक-एक करत वसई मध्ये अन्य अनेक व्यवसायात आपले हातपाय पसरले. पण उद्योगाबरोबर समाजासाठी काहीतरी करण्यासाठी म्हणून त्यांनी १९९३ मध्ये ज्येष्ठ नागरीकांसाठी संघटना काढली. ज्येष्ठ नागरीकांच्या अडचणी समजून घेणे व त्यावर उपाय काढणे, त्यांना एकत्र आणून त्यांच्या सुख-दु:खात समावून जाणे, त्यांनी एकाकी वाटू न देणे यासाठी त्यांनी दर गुरुवारी आपल्या मालकीच्या एक हॉल त्यासाठी विनामुल्य उपलब्ध करून दिला. वर्षांतून तीन चार वेळा ज्येष्ठ नागरीकांना स्वखर्चाने गणेशपुरी येथील आपल्या फार्म हाऊसवर घेऊन जाऊ जातात. तेथे गेल्यावर त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करणे, त्यांच्या सोईचे खेळ खेळणे. त्यांच्या बरोबर जास्तीत जास्त वेळ रहाणे हे ते सातत्याने करीत आले. एकाकी पडलेल्या ज्येष्ठ नागरीकांसाठी त्यांनी ‘वधु-वर’ मेळावापण आयोजित केला होता व वैशिष्ठय़ म्हणजे त्याला चांगला प्रतिसाद पण लाभला.
आपल्या व्यवसायाचा वाढलेला व्याप सांभाळून जेवढा वेळ समाजकल्याणासाठी खर्च करता येईल तेवढा करणे हे त्यांचे नित्यांचे होऊन बसले. त्यांची मुलं मोठी झाल्यावर व्यवसाय त्यांच्यावर सोडून ते आपला वेळ ज्येष्ठ नागरीकांसाठी देऊ लागले आहे. त्यासाठी होणारा खर्च ते स्वत: करू लागले.
‘देह मुक्ती मिशन’ अभियान सुरु करुन त्यामार्फत देहदान व अवयव दानाचा ते प्रचार करतात. आतापर्यंत जवळ-जवळ २०० जणांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
ह्य पाडव्याच्या मुहुर्तावर त्यांनी एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. दवाखान्यातील ऑपरेशन किंवा उपचारानंतरही काही काळापुरता काही साधने लागतात व ती विकत आणणे भाग पडते. या वस्तूंचा नंतर काही उपयोग नसतो. हाच भार हलका करण्यासाठी ‘होम हॉस्पिटॅलिटी सव्र्हिस’मधून रुग्णासाठी घरी लागणारे साहित्य अनामत रकमेवर स्वखर्चाने विनामूल्य वापरासाठी देण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे.
पुरुषोत्तम पवार यांच्या आजवरच्या या उद्योगाबद्दल विचारले असता ते म्हणतात ‘ज्येष्ठांच्या सुख-दु:खात जेवढं जमेल तेवढं समावून जावे आणि त्यांना एकाकी वाटू नये असा प्रयत्न करणे हे माझे उदिष्ट आहे’.

अनोखी दिवाळी
दिवाळी पहाट म्हणजे गेल्या काही वर्षांत डोंबिवलीकरांसाठी फडके रोडवरचा जल्लोष असेच समीकरण झाले आहे. मात्र त्याच डोंबिवलीतील काही सुजाण लोक मात्र या फडके रोडवरच्या या गोंधळात रममाण न होता शहराच्या वेशीवरच्या अमेय पालक संघटनेच्या घरकुलात त्यांची दिवाळी पहाट वेगळ्याच अनुभवाने रंगवतात. अमेय पालक संघटनेच्या घरकुलातील गतिमंद मुलांबरोबर सबंध दिवस ते तेथेच व्यतीत करतात. गेली सात र्वष स्वप्निल हळदणकर आणि त्यांचे मित्र एकत्र येऊन ही अनोखी दिवाळी साजरी करत आहेत. तेथील गतिमंद मुलांशी खेळण्यातून मिळणारा आनंद हीच त्यांची दिवाळी असते. सुमारे ५० समविचारी लोकांचा हा ग्रुप दिवाळीनिमित्ताने फराळाचे नेतोच, पण त्याचबरोबर त्यांच्याकडे असते तब्बल ४००-५०० किलो धान्य, जे तेथील मुलांच्या एक दीड महिन्याची गरज भागवणारे असते. शिवाय चादरी, कपडे अशा अनेक भेटवस्तूंनी या मुलांची दिवाळी साजरी होते.
गेली सात वर्षे नित्यनेमाने अशी दिवाळी साजरी करणारे स्वप्निल हळदणकर सांगतात की, ‘‘आम्हा काही मित्रांना सामाजिक कार्याला मदत करायची इच्छा होती. म्हणून आमच्या सोसायटीतील चार-पाच कुटुंबांनी एकत्र येऊ न धान्य, काही गरजेच्या वस्तू जमा केल्या. त्या गरजूंपर्यंत पोहचाव्यात त्यासाठी आम्ही बदलापूर, जव्हार, मोखाडा परिसरात बरीच शोधाशोध केली. मोखाडय़ात कपडे वाटपदेखील केलं. मात्र त्यातून आम्हाला समाधान मिळत नव्हतं. अमेय पालक संघटनेबद्दल माहिती कळली. आणि गेल्या सात वर्षांपासून आमची दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी होऊ लागली.’’
सुरुवात जरी पाच जणांपासून झाली असली, तरी आज एकमेकांच्या ओळखीने या दात्यांचा ५० जणांचा ग्रुप तयार झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे ते थेट पैशांच्या स्वरूपात मदत नाही करत. तशी आर्थिक मदत अनेकांना मिळत असते. म्हणूनच आम्ही धान्य आणि वस्तुरूपात मदत करू लागलो. असे स्वप्निल सांगतात. मागील वर्षी कोणी चादरी दिल्या, कोणी सर्व मुलांना कपडे शिवून दिले. यामध्ये केवळ धान्य आणि वस्तूंचे वाटप इतकाच हेतू नसल्यामुळे आमचा संपूर्ण दिवस त्या मुलांबरोबर घरकुलातच जातो. त्यामुळे त्या मुलांना एक वेगळाच आनंद मिळताना दिसतो. किंबहुना हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहणे, हाच आमचा त्या दिवाळीचा खरा आनंद असतो.
त्याचबरोबर स्वप्निल आणखी एक उपक्रम करतात तो म्हणजे थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन. दिवाळीच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या उपक्रमामुळे त्यांचे जे मित्रमंडळ तयार झालं आहे, ते या कामी त्यांना मदत करते.

पंच्याहत्तरीनंतरही ज्ञानयज्ञ
न हि ज्ञानेन पवित्रमिह विद्यते अर्थात ज्ञानाइतके पवित्र जगात काहीच नाही, या वचनाला जीवनाचे सार मानून गिरगावच्या उषा नाईक यांनी निवृत्तीनंतरही आपला ज्ञानदानाचा वसा सुरूच ठेवला. ८० व्या वर्षांतही मतिमंद मुलांना, विनामोबदला शिकवण्याचा त्यांचा उत्साह टिकून आहे, हेच विशेष.
त्या महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका होत्या. १९९१ साली निवृत्त झाल्या, मग नातवंडं, घरच्या जबाबदाऱ्या यात नऊ वर्षे झोकून दिल्यावर, त्यांना पुन्हा मुलं, शाळा साद घालू लागली. त्याच काळात त्यांना गोरेगावच्या ‘पुर्नवास’ या मतिमंद मुलांच्या शाळेविषयीची माहिती मिळाली. मग काय, पासष्टी ओलांडलेल्या उषाताई तेथे जाऊन धडकल्या. तेव्हापासून म्हणजे २००० सालापासून सुरू झालेला हा ज्ञानयज्ञ अखंड सुरू आहे, कुठल्याही अपेक्षांशिवाय. पुर्नवास इथल्या निरागस मुलांच्या त्या आजी झाल्या. स्वखर्चासाठी पेन्शन होतीच, मग या मुलांना शिकवत त्या अनुभवाने समृद्ध होत गेल्या. या मुलांना शिकवल्याने मिळणारे आत्मिक समाधान अनमोल, अमूल्य आहे, असे त्या सांगतात. आठवडय़ातले पाच दिवस रोज सकाळी साडे दहा ते दुपारी साडेचार ही वेळ त्यांनी शाळेसाठी राखून ठेवली आहे. एखाद्या दिवशी त्या शाळेत गेल्या नाहीत की मुलंही आजी कुठे म्हणून गोंधळ घालायची, असा मायेचा बंध तयार झाला. पण आपण काही मोठे करतोय, ही भावनाही त्यांना स्पर्श करत नाही. त्या म्हणतात, ‘‘वय झाल्यावर शरीराला थोडी हालचाल हवीच, शाळेत जाण्यामुळे मनही गुंतून राहते, वर दुसऱ्यासाठी काही करू शकते, याचे समाधान मोफत, या वयात आणखी काय हवे?’’ पालिकेच्या शाळेत गरीब घरातली, झोपडपट्टीतली मुलं त्यांनी पाहिली होती, पण इथली दहा-बारा वर्षांची असूनही नैसर्गिक विधींवरही नियंत्रण नसणारी मुलं, मान वाकडी करून एकटक पाहणारी मुलं, तोंडातून लाळ ओघळणारी मुलं पाहून, उषाताईही सुरुवातीच्या दिवसात गोंधळल्या होत्या, मग हळूहळू त्यांनी सारे शिकून घेतले. या मुलांना शिकवताना त्यांच्या कलाने घ्यावे लागते, कठोर मेहनत हवीच मात्र कमालीचा संयम बाळगावा लागतो. हे मुलांनीच त्यांना शिकवले. त्यांच्या मेहनतीचे उदाहरण म्हणजे, सहा वर्षांचा रोहित शाळेत आला तेव्हा चार र्वष फक्त एक हाच आकडा गिरवायचा, त्याची गाडी दोन वरही गेली नाही. आता तो पूर्ण वाक्य न अडखळता बोलू शकतो. दुसरा चिमुकला, एकाजागी शांत बसायचा नाही, आज तो अनेक योगासने अगदी सुरेख सादर करतो. आणखी एक मुलगा दारू पिणाऱ्या बाबांना इतका घाबरायचा की, शाळा सुटल्यावर बाबा घ्यायला आला तरी आजीच्या साडीला घट्ट धरून राहायाचा. अशा अनुभवांनी समृद्ध गाठोडे त्यांच्याकडे जमा झाले आहे. इतकंच नाही तर स्वत: एका पैशाचे मानधन न घेणाऱ्या उषाताईंनी शाळेला अनेक डोनेशन्स मिळवून दिली, अनेक मुलांना वैयिक्तक स्तरावर मदत मिळवून दिली. परिचयातील व्यक्तींनाही या कामी सहभागी करून घेतले. अवघ्या ४२ व्या वर्षी पतीचे निधन झाल्यानंतर उषाताईंनी खंबीरपणे घराची, मुलांची जबाबदारी पेलली. तितक्याच समर्थपणे त्या या मुलांच्या आजी झाल्या. २००७ नंतर धावपळ नको म्हणून मुलांनी घराजवळ काही करण्याचे सुचवले, मग यांनी गिरगावातच एका जागी विशेष मुलांची शाळा भरवली. ती आजही सुरू आहे. उषाताई म्हणतात, ‘‘आपण सेवा देतो ती वरवर पाहता दुसऱ्यासाठी असते, मात्र त्याची अधिक गरज आपल्यालाच असते, म्हणून तर आपल्या आवडत्या कामात वयाचा, वेळेचा कशाचाही अडसर यामध्ये येत नाही, उलट शंभर हत्तींचे बळ मिळते.’’ बहुदा हेच उषाताईंच्या उत्साहाचे गमक असावे.

मनोरुग्णांसाठी शांतिनिकेतन
तारुण्यातील स्वप्नं काही वेगळीच असतात, पण तिचं स्वप्न त्याहूनही वेगळं होतं. समाजसेवेच्या वेडानं तिला झपाटलं होतं आणि तीही नुसती समाजसेवा नव्हती, तर अंध, अपंग, निराधार, मतिमंदांना तिला आधार द्यायचा होता. प्रज्ञा राऊत यांच्या या स्वप्नाला पती प्रमोद राऊत यांनी बळ दिलं आणि २००४ मध्ये या सेवेकरी दाम्पत्यांचा निराश्रितांना आधार देण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली.
मनोरुग्ण बरा झाला तरी समाजच काय, पण कुटुंबही त्यांला स्वीकारायला सहजासहजी तयार होत नाही. अशा वेळी या मानसिक आजारातून बाहेर पडूनही त्यांना एकाकी आयुष्य घालवावं लागतं. अशांचं पालकत्व स्वीकारून त्यांना समाजात जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी हे दाम्पत्य गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्नरत आहे. लग्नानंतर मुंबईत वास्तव्यास असलेल्या या दाम्पत्यानं रेल्वेस्थानक, बसस्थानकावरील कायम दरुगधीच्या गराडय़ात वावरणाऱ्या सर्वावर संस्कार करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरुवातीला केला. मात्र, व्यसनाधीन आणि कायम दरुगधीतच जीवन जगण्याची सवय लागलेल्यांना सुधारण्याचा ही पहिला प्रयत्न फसला. मात्र, मदर टेरेसांच्या भेटीने प्रज्ञाचा आत्मविश्वास वाढला आणि नव्यानं तिनं सुरुवात केली. नागपुरात परतल्यावर मानसिक रुग्णांना दत्तक घेण्याचा प्रयत्न केला आणि येथेही कायदेशीर अडचणी आडव्या आल्या. त्या सर्व दूर सारत सुरुवातीला चार मतिमंद श्रीकृष्ण शांतिनिकेतनच्या परिवारात सहभागी झाले. प्रसूतीदरम्यान वेडी झालेली औरंगाबादची रीना त्यांच्या परिवारातील पहिली सदस्य होती. प्रसूतीदरम्यान बाळाच्या मृत्यूनं मानसिक संतुलन बिघडलेली आशा त्यांच्या परिवारात सहभागी झाली आणि असे एकेकया परिवारातले सदस्य वाढत गेले.
नागपूरबाहेर बेलतरोडी येथे प्रज्ञाचं घर म्हणजे विटांच्या चार भिंती, त्याला ताडपत्री गुंडाळलेली आणि टिनाचं शेड. वादळ आलं तर कधीही उद्ध्वस्त होईल अशी स्थिती, पण त्याची चिंता या दाम्पत्याला नाही. एकमेकांमधील घट्ट भावबंधानं हा डोलारा ताठपणे उभा आहे. प्रमोद व प्रज्ञा राऊत, त्यांची लेक अनुश्री आणि मनोरुग्ण मंडळी प्रेमाच्या या धाग्यात गुरफटले आहेत. इथंही कधीकधी त्यांच्या समाजकार्याला समाजच आडवा येतो, पण प्रत्येक मतिमंदाला, मनोरुग्णाला तिनं याही परिस्थितीत स्वत:चं काम स्वत: नीटपणे करण्याची सवय लावली आहे. प्रज्ञाच्या या घरकुलातील बहुतांशी सदस्य वयाची तिशी ओलांडलेले आहेत. वध्र्याजवळ आर्वीतही त्यांनी या निराधारांसाठी सुंदर घरकुल उभारलं आहेत. नक्षत्रांच्या या बगिच्यात आज १२, तर नागपुरात ७ सदस्य आहेत. प्रसिद्धीचा कुठलाही हव्यास नाही की, कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा नाही. विशेष म्हणजे, सरकारी अनुदान न घेता स्वबळावर या दाम्पत्यांची ही सेवा गेल्या दहा वर्षांपासून अव्याहत सुरू आहे.

गरजूंना सांधणारा दुवा
वीस वर्षे वात्सल्य ट्रस्टमध्ये काम केल्यावर काही ना काही सामाजिक उद्योग करत राहण्याची लागलेली सवय गणेश पाठक यांना स्वस्थ बसू देत नव्हती. तब्येतीच्या कारणास्तव फारसा प्रवास शक्य नव्हता. त्यामुळे घरी बसूनच जवळपास जमेल तशी धावपळ करून त्यांनी एका वेगळ्याच कामाला सुरुवात केली आहे. आपल्याला माहीत असणाऱ्या सामाजिक संस्था आणि दाते यांची सांगड घालून देण्याचे काम त्यांनी सुरू केले. मुंबईबाहेरच्या संस्था ज्यांना फारसं एक्सपोजर मिळत नाही, त्यांची माहिती त्यांनी मिळवली. मिळालेली माहिती योग्य त्या लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी काही अपेक्षित दात्यांना स्वत:च्याच घरी एकत्र बोलावलं. अर्थात हे सारं अनौपचारिक पद्धतीनेच केले होते. संस्थेची माहिती सीडी, पुस्तिकांद्वारे दिली. बस इतकंच. दोन घटकांमध्ये दुवा सांधण्याचं काम त्यांनी केलं. कधी एखाद्या संस्थेच्या प्रकल्पाच्या ठिकाणी दात्यांना घेऊन जायचं. त्यांना स्वत:च्या डोळ्यांनी काम पाहण्याची संधी द्यायची. आणि त्यातून त्या संस्थेली मदत मिळवून द्यायची.
तसं पाहिलं तर छोटंसं काम, पण परिणामकारक ठरू लागलं. गरजू संस्थेला योग्य ती मदत पोहचलेली असायची. गेल्या तीन-चार वर्षांपासून गणेश पाठक हे काम करत आहेत, तेदेखील वैयक्तिक स्तरावर. महत्त्वाचे म्हणजे त्यातून एक छोटंसं का होईना नेटवर्क तयार झालं. ज्यांनी आधी मदत पाठवली ते आता आपणहून परस्पर संस्थांना मदत करू लागले आहेत. हेच त्यांच्या या तीन-चार वर्षांच्या कामाचं यश म्हणावं लागेल. अर्थात हे करताना त्यांनी एक पथ्य हमखास पाळलं, ते म्हणजे ज्या संस्थेला मदत मिळवून द्यायची त्या संस्थेचा हिशेब चोख हवा. हिशेब तपासणी न झालेल्या संस्थांची माहिती देणं त्यांनी म्हणूनच बंद केलं आहे.
एका दृष्टीने पाहिलं तर अशा प्रकारची कामं करणाऱ्या गिव्ह इंडियासारख्या अनेक कॉपरेरेट एनजीओ सध्या कार्यरत आहेत, पण ते त्यांच्या व्यवसायाचं साधन आहे. पाठक जे करताहेत ते गरजू संस्थांसाठी. त्यासाठी ते स्वत:च पदरमोड करतात. अर्थात त्यातून मिळणारं समाधान हे महत्त्वाचं असल्यामुळेच ते ही उठाठेव करत आहेत. त्यामुळे सामाजिक संस्थांचा एक फायदा मात्र झाला आहे. एकाच वेळी एका व्यक्तीकडून निधी मिळण्याऐवजी एकाच वेळी खूप मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध झाला. या माध्यमातून समतोल, ग्रामविकास सभा व अन्य काही संस्थांना त्यांनी या गेल्या चार वर्षांत १५ लाखांपर्यंत मदत मिळवू दिली आहे.

आगळावेगळा जीवरक्षक
दिनकर कांबळे भावंडांमध्ये धाकटे. ते १४ वर्षांचे होते तेव्हा त्यांची मोठी भावजय विहिरीत पडली. दोन दिवसांनंतर तिचा मृतदेह तरंगताना दिसू लागला. पण त्याची अवस्था इतकी वाईट होती की कुणी तो काढायला तयार होईना. दिनकर कांबळे विहिरीत उतरले आणि मृतदेह दोन्ही हातात उचलून वर घेऊन आले. त्या क्षणी त्यांच्या मनात येत होतं की आपण यापुढे हेच काम करायचं. मग ते कुठेही अपघात झाला, काहीही दुर्घटना झाली की धावून जायला लागले. खूप दिवस हे घरी माहीत नव्हतं. हळूहळू घरच्यांना इतरांकडून समजायला लागलं की अपघात झाले की तुमचा मुलगा धावून जातो. ते रक्ताळलेले मृतदेह उचलतो, ही कसली आवड वगैरे प्रकारची टीकाही व्हायला लागली. घरातून विरोध व्हायला लागला. मग त्यांनी घर सोडलं आणि हेच काम करायला लागले. आत्तापर्यंत त्यांनी २८० जणांना जीवदान दिलं आहे आणि १५०७ मृतदेह वेगवेगळ्या आपत्तींमधून बाहेर काढून नातेवाइकांकडे सुपूर्द केले आहेत. हे सगळं काम अर्थातच विनामोबदला करतात. ते म्हणतात की अपघात झालेल्याला दवाखान्यात नेलं की त्याचा पुढचा सगळा खर्चच इतका असतो की त्यात नातेवाईक बुडून जातात. मृतदेह ताब्यात दिला की नातेवाईक मंडळी आपल्या दु:खात बुडून जातात. त्यांच्याकडून काय आणि कशी अपेक्षा करणार? १९९८ पासून दिनकर कांबळे हे काम करत आहेत. आज त्यांचं वय ३७ आहे. स्कूटर मेकॅनिक हा त्यांचा मूळचा व्यवसाय. पण कुठल्याही दुर्घटनेची माहिती मिळाली की ते धावून जात असल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या मेकॅनिकच्या कामावर झाला. आता ते रोज उदरनिर्वाहासाठी मिळेल ते, पडेल ते काम करतात. रंगकाम, अगदी कधी हमाली करावी लागली तरी करतात, पण जखमींना मदत करायचा आपला वसा त्यांनी सोडलेला नाही. त्यांनी सातवीत असताना शाळा सोडली होती, पण नंतर कुणीतरी सांगितलं म्हणून ही कामं, जीवरक्षकाचं काम हे सगळं करता करता फूटपाथवर बसून दहावी केली, ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये पोस्ट गॅ्रज्युएशन केलं. आता ते तरुण मुलांना डिझास्टर मॅनेजमेंटचं प्रशिक्षण देतात. त्यासाठी त्यांनी डिझास्टर रेस्क्यू लाइफगार्ड सोसायटी ही संस्था सुरू केली आहे. आपली ही आवड नैसर्गिकरीत्या विकसित होत गेली, त्यातच अजून खूप काम करायचं आहे, पण साहित्याअभावी आपण हतबल आहोत, असंही ते सांगतात.

पर्यावरण रक्षणासाठी अॅल्युमिनियमची तिरडी
इन्शुरन्स कंपनीत क्लार्क म्हणून काम करणाऱ्या कोल्हापूरच्या दीपक केशवराव पोलादे यांचं काम एकदम आगळंवेगळं आहे. त्यांनी पाचेक वर्षांपूर्वी वर्तमानपत्रांतून बातमी वाचली की माणसाच्या मृत्यूनंतर जी तिरडी वापरली जाते, ती लोखंडाची वापरली तर लाकूड वाचेल. त्यासाठी होणारी लाकूडतोड रोखली जाईल, पर्यावरणाच्या समतोलासाठी मदत होऊ शकेल. त्यांना हा मुद्दा एकदम पटला मग त्यांनी एक लोखंडी तिरडी खास बनवून घेतली. मग लक्षात आलं की ती लोखंडी तिरडी खूप जड झाली आहे. त्यामुळे ती वापरता येईना. मग त्यांनी मुंबईहून ऑर्डर देऊन अॅल्युमिनियमची तिरडी बनवून घेतली. ती एकदम हलकीफुलकी झाली. वापरायला सोयीची, सुटसुटीत अशी ती तिरडी बघून त्यांनी तशाच आणखी २० तिरडय़ा बनवून घेतल्या. त्यासाठी स्वत:च्या पदरचे लाखभर रुपये घातले. आज कोल्हापूरच्या चारही स्मशानगृहात त्यांच्या या अॅल्युमिनियमच्या तिरडय़ा वापरल्या जातात. पर्यावरणाच्या रक्षणाचा मुद्दा त्यांना एवढा पटला की त्यांनी आणखी एक पाऊल टाकून आणखी एक सुधारणा घडवून आणली. ती अशी की काही समाजांमध्ये अंत्यविधीच्या दरम्यान महादेवाची पिंड करून ती पुजण्याची पद्धत आहे. त्यासाठी वर्षांनुवर्षे माती वापरली जाते. ती पुन्हा नदीत सोडली जाते. यातून होणारं नदी प्रदूषण रोखण्यासाठी त्यांनी चारही स्मशानभूमींना मिळून फायबरच्या पन्नास पिंडी दिल्या आहेत. त्याशिवाय त्यांनी स्मशानभूमीत स्वखर्चाने कलश ठेवले आहेत. त्या कलशामध्ये मावेल तेवढीच रक्षा नदीत विसर्जित करावी आणि नदीप्रदूषण रोखायला मदत करावी असं आवाहन त्यांनी लोकांना केलं आहे. या सगळ्या उपक्रमांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

दुर्बलांच्या व्यवसाय उभारणीसाठी…
डॉ. अरुण दीक्षित हे ऑरगॅनिक केमिस्ट्रीमधले पीएचडी. एसआय ग्रुपच्या हलदिया केमिकल्समध्ये रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट विभागात जनरल मॅनेजर म्हणून ते काम पाहतात. आपण समाजाचं देणं लागतो हा संस्कार आईपासूनच घेतलेला. त्यांची आई त्र्यंबकेश्वर येथील पिंपदमधील वसतिगृहातील अदिवासी मुलांना इंग्रजी शिकवत असे. आईचा समाजातील आर्थिकदृष्टय़ा कमकुवत गटातील लोकांना मदतीचा हात देण्याचा संस्कार नकळत त्यांच्यातही रुजला आणि आईचे हे व्रत ते पुढे नेत आहेत.
डॉ. दीक्षित यांचं वर्षभर या ना त्या कारणाने समाजातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांना व्यावसायिक मार्गदर्शन करण्याचं काम सुरू असतंच; परंतु वर्षांतले २५ दिवस ते केवळ याच कामासाठी राखून ठेवतात. हा दंडक ते गेली आठ वष्रे सातत्याने पाळत आहेत. विवेकानंद केंद्रातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक मार्गदर्शन करण्याचं काम करतात. पाबळ येथील विज्ञानाश्रमातील विद्यार्थ्यांना गेली आठ वष्रे ते तंत्रज्ञान, संशोधन, व्यवसाय यासंबंधित मार्गदर्शन करतात. या विज्ञानाश्रमात येणारी मुलं ही दहावी पास वा नापास झालेली असतात. ही मुलं आर्थिकदृष्टय़ा कमकुवत समाजातली असल्याने त्यांना विविध स्वरूपातील व्यवसाय मार्गदर्शन करून त्यांच्या पायावर उभे केले जाते. या मुलांना व्यावसायिकदृष्टय़ा मार्गदर्शन करतानाच व्यवसायातील आर्थिक बाजू कशी सांभाळावी, चार पैसे गाठीशी राखण्यासाठी कोणते उपाय योजता येतील या संदर्भातही ते मार्गदर्शन करतात. वेळप्रसंगी पैशाचीही मदत करतात. मात्र आपण दिलेल्या पैशाचे योग्य नियोजन होते आहे की नाही, याबाबतही ते सजग असतात. व्यवसाय उभारताना व्यावसायिक गणित कशी जुळवता येतील हेही ते सांगतात. तसेच या मुलांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित व्यक्तींशी गाठ घालून देतात. तसेच इथले विद्यार्थी व कर्मचारी वर्गाला संशोधनाशी संबंधित माहिती पुरविण्याचं काम करतात. अशा कामांसाठी शैक्षणिक संस्था खोलून विद्यार्थ्यांकडून वारेमाप पैसा ओढणाऱ्या शिक्षणसम्राटांपेक्षा डॉ. अरुण दीक्षित यांचं काम खूपच मोलाचं वाटतं. कारण त्यासाठी ते कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा करीत नाहीत. आपण समाजाचं देणं लागतो, याच भावनेतून ते काम करीत आहेत.
स्वकमाईतील वर्षांला किमान ५० हजारांची मदत अशा कामांच्या माध्यमातून आपल्याकडून या मुलांना व्हावी, असा दंडक त्यांनी स्वत:ला घालून घेतला आहे आणि थोडीथोडकी नव्हे तर तब्बल आठ वष्रे त्यांचे हे व्रत प्रामाणिकपणे सुरू आहे.
डॉ. अरुण दीक्षित आपल्या या सामाजिक व्रतातून एकाच वेळी नकळतपणे देशातला सामाजिक, आर्थिक आणि व्यावसायिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करीत आहेत.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले
सात-आठ वर्षांपूर्वी महिला दिनानिमित्त सामाजिक कामाचं एक छोटं रोप लावलं गेलं आणि आज त्या कामात शेकडो जण सहभागी झाले.. मंजिरी कुलकर्णी, भाग्यश्री कुलकर्णी, अपर्णा केरेकर, वैशाली अकोटकर, अपर्णा जोगळेकर या मूळच्या महाराष्ट्रातल्या; परंतु कामानिमित्त सध्या बंगलोरमध्ये स्थायिक झालेल्या. परप्रांतात राहताना केवळ तिथल्या सुखसोयींचा लाभ न घेता त्या समाजाचं आपण देणं लगतो ही प्रामाणिक भावना या मैत्रिणींच्या मनात होती आणि त्या भावनेतूनच त्यांनी इथल्या एका शाळेतील मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याचं काम सुरू केलं.
या मैत्रिणी राहात असलेल्या बंगलोरमधल्या इंदिरानगर परिसरातील एका शाळेतील विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती त्यांच्या कपडय़ांवरूनच लक्षात येत होती. हलाखीच्या परिस्थितीत या मुलांचं शिक्षण सुरू होतं, हे उघड होतंच. त्यांतूनच या मुलांसाठी काम करण्याची इच्छा प्रबळ झाली. सुरुवातीला भाषेचा अडसर आला. या शाळेतील कर्मचाऱ्यांची भाषा कन्नड आणि इंग्रजीचा फारसा गंध नाही. मग त्याच शाळेसाठी सेवाभावी वृत्तीने काम करणारे एक गृहस्थ या मैत्रिणींच्या मदतीसाठी पुढे आले. संवादासाठी इंग्रजी भाषा साहाय्यभूत ठरली. मग या मुलांसाठी स्वत:च्याच खिशातून गणवेश, स्वेटर, दप्तर, बूट यांसाठी आर्थिक मदत त्या करू लागल्या. मग ज्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पैशाअभावी खंड पडत असेल, तर शैक्षणिक शुल्क भरण्याचं कामही या मैत्रिणी करू लागल्या.
हे काम करीत असताना देशातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांची शैक्षणिक स्थिती काय आहे, याचं करुण वास्तव त्यांच्यासमोर आलं आणि थोडय़ा फार प्रमाणात का होईना ही स्थिती बदलण्याचा आपला खारीचा वाटा उचलण्याचं मनाशी पक्कं केलं. गेली आठ वष्रे त्या सातत्याने या शाळेच्या मुलांशी जोडल्या गेल्या आहेत. परराज्यातील या स्त्रिया कुठल्याही भाषिक वादात न पडता कन्नड मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेत आहेत हे पाहून या शाळेतील कर्मचाऱ्यांनाही या मैत्रिणींविषयी आपुलकी वाटते आहे. या मैत्रिणींनी मिळून शाळेला बदलाची नवी वाट दाखवली. मैत्रिणींच्या या कामाची दखल घेत त्यांच्या ओळखीतूनही शाळेसाठी आर्थिक वा वस्तूंच्या रूपाने मदतीचा ओघ सुरू झाला आहे आणि या मदतीतूनच शाळेचा कायापालट झाला आणि इथल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक सुकर झाले आहे. सामाजिक कामाच्या या खारीच्या वाटय़ामुळेही मुलांच्या चेहऱ्यावर फुलणारे हास्य पुढच्या कामाला बळ देऊन जाते, असे या मैत्रिणी प्रामाणिकपणे नमूद करतात.
हे काम करताना त्यांना आपण सामाजिक काम करीत असल्याच्या समाधानापेक्षाही या कामाचा विस्तार अधिक मोठय़ा प्रमाणात करून देशातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती उंचावण्याचे बीज या मैत्रिणींच्या मनात रुजले आहे आणि सेवेचे हे व्रत अधिक आर्थिक बळाने जोमाने पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

सेवाव्रती शिक्षक
धीरज डोंगरे हे पेशाने शिक्षक. त्यांची आई शिक्षिका. शिक्षक हा पेशा नव्हे तर ते व्रत आहे, हीच त्यांची धारणा होती आणि आपल्या मुलांवरही तोच संस्कार केला. मूळ ठाण्यात राहणाऱ्या धीरज डोंगरे यांना पहिलीच नोकरी मिळाली ती शहापूरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेवर. हा भाग अगदी दुर्गम. शहापूर स्टँडपासून ३५ किलोमीटर दूर असलेल्या बिलवली गावात त्यांची शाळा. तिथे गेल्यावर या खेडय़ात आपण का नोकरी करायची, हाच प्रश्न त्यांना पडला. त्यामुळे नोकरीवर पाणी सोडायचं मनाशी पक्कंकेलं असतानाच इथल्या विद्यार्थ्यांच्या ‘गुरुजी इथे कुठलाच शिक्षक टिकत नाही. मग आमचं शिक्षण कसं होणार?’ या प्रश्नाने त्यांना अस्वस्थ केलं आणि नोकरी सोडण्याचा विचार त्यांनी दूर सारला, आणि आता या मुलांच्या भविष्याचाच विचार त्यांच्या मनात कायम असतो.
महिन्याला पगारातील किमान पाच ते सहा हजारांची रक्कम ते या मुलांच्या शैक्षणिक साहित्य वा शुल्कासाठी बाजूला काढून ठेवतात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी ते धडपड करतात. १०० विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च ते उचलतात. त्यांचे काम पाहून त्यांचे मित्रमंडळी व ओळखीतले लोकही या मुलांच्या मदतीसाठी पुढे सरसावतात. या मुलांना कपडे, शैक्षणिक साहित्यासाठी लोकांकडून मदत होते. दहावीतल्या हुशार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करून त्यांचा शैक्षणिक खर्च उभारण्याच्या प्रयत्नात आहेत.
केवळ मुलांना शिकवणे एवढय़ापर्यंतच शिक्षक म्हणून स्वत:ला मर्यादित न ठेवता मुलांच्या सर्वागीण विकासासाठी, आर्थिक उत्थानासाठी काम करणारे धीरज डोंगरेंसारखे शिक्षक विरळाच!

सुविचारांचे ‘एसएमएस’
लेह येथे सैन्यात असलेला एक मेजर त्याच्या पुण्यातला मित्राला रोज सकाळी ‘गुड मॉर्निग’ एवढाच दोन शब्दांचा एसएमएस पाठवायचा. त्यातून या मित्राच्याही मनात आलं की, आपणही आपल्या परिचितांना सुप्रभात करूया. त्यातून मित्रांना, परिचितांना सुप्रभातचा एसएमएस जायला लागला. मग कल्पना सुचली की, फक्त सुप्रभात कशाला; एखादा सुविचार, सुवचन पाठवून सुप्रभात म्हणूया. त्यानुसार सुविचारांचं संकलन झालं आणि एका सुंदर विचाराचा प्रसार रोज सकाळी सुरू झाला. हा उपक्रम करणाऱ्याचं नाव आहे श्रीकांत पाटील. शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या श्रीकांत पाटील यांची ही एक वेगळी ओळख आहे. पुणे महापालिकेत ते २००७ ते १२ या काळात नगरसेवकही होते आणि राष्ट्रवादीचे ते पदाधिकारी आहेत.
वैयक्तिक स्वरूपात अनेक जण रोज काही जणांना एसएमएस पाठवतात; पण त्यात सातत्य राहतंच असं नाही. पाटील यांचं वैशिष्टय़ं हे की, रोज सकाळी न चुकता सुमारे पाचशे जणांना त्यांच्याकडून सुविचाराचा एसएमएस जातो आणि गेली दहा-बारा र्वष हा उपक्रम सुरू आहे. जो एसएमएस पाठवला जातो त्यातला विचार किंवा कोणाचे उद्गार वा वचन हे अगदी संग्राह्य़ ठेवावं असंच असतं. त्यामुळेच पाटील यांच्याकडून आलेला एसएमएस ‘फॉरवर्ड’ करणं अनेकांसाठी अपरिहार्य ठरतं. या उपक्रमाचं वैशिष्टय़ हे की, सध्या वे टू एसएमएस अशा स्वरूपात घाऊक एसएमएस पाठवण्याच्या ज्या काही सुविधा आहेत, त्यांचा वापर पाटील अजिबात करत नाहीत. एसएमएस स्वत:च्या मोबाइलवर टाइप करून तो त्यांच्या मोबाइलवरूनच जातो आणि त्यामुळेच सेंडरमध्येही आपल्याला श्रीकांत पाटील हेच नाव वाचायला मिळतं.
अनेक मित्रमंडळींची, परिचितांची, शासकीय अधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची, नेत्यांची सकाळ प्रसन्न करणारा हा उपक्रम पाटील एखाद्या व्रतासारखा करतात. त्यामुळेच सकाळी साडेपाचपासून हे काम सुरू होतं आणि चांगल्या विचारांचं संकलनही सतत सुरूच असतं. या कामातून काय मिळतं, एवढी र्वष सातत्य कसं काय राहिलं, असं विचारलं की, पाटील म्हणतात, ‘‘अनेक जण मला आवर्जून सांगतात, तुमच्या एसएमएसमुळे आमचा दिवस चांगल्या विचारानं सुरू होतो. त्यामुळेच एवढी र्वष अखंडपणे हे काम सुरू आहे.’’

दान.. सुलेखन कलेचं
‘सुंदर अक्षर हाच खरा दागिना’ हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत; पण तसं बघितलं तर हा दागिना फार थोडय़ांकडेच असतो. बहुतेकांचं अक्षर बरं असतं, काहींचं चांगलं असतं आणि फार थोडय़ांचंच ते उत्कृष्ट, अगदी मोत्यासारखं असतं. अनेकांना असं वाटतं, की सुंदर, वळणदार अक्षराची देणगी उपजत असावी लागते. ती ज्याच्याकडे नसेल त्याचं अक्षर काही चांगलं होऊ शकत नाही, पण पुण्यातील मधुसूदन रायते आणि त्यांची पत्नी सुषमा रायते यांनी ‘वळणदार’ अक्षर घडवण्यासाठी जो ध्यास घेतला आहे तो पाहिला, की आपण थक्क होतो. सुलेखन कलेचं हे दान त्यांनी आजवर शेकडो वर्गामधून दिलं आहे आणि या आगळ्यावेगळ्या दानातून शब्दश: हजारो जणांचं अक्षर सुंदर झालं आहे.
मधुसूदन रायते पाटबंधारे विभागात अभियंता म्हणून नोकरी करत होते. त्यांचे वडील पेशाने शिक्षक. त्यामुळे उत्तम संस्कारांबरोबरच शुद्धलेखनाचे धडेही रायते यांना बालपणीच मिळाले. या सुंदर अक्षराचा फायदा त्यांना नोकरीतही झाला. जेथे जेथे ते जातील तेथे त्यांच्या अक्षराचं कौतुक व्हायचं. नोकरीच्या निमित्तानं ते पंढरपूर येथे असतानाची ही गोष्ट आहे. दहावीतील एक अतिशय हुशार विद्यार्थिनी केवळ अक्षर चांगलं नसल्यामुळे परीक्षेत मागे पडत असे. रायते यांनी तिला सुलेखनाचे धडे दिले आणि ती विद्यार्थिनी दहावीच्या गुणवत्ता यादीत चमकली. या अनुभवातून रायते यांना हुरूप आला आणि त्यातूनच त्यांनी विद्यार्थ्यांसाठी ‘हस्ताक्षर सुलेखन मार्गदर्शन शिबिर’ असा उपक्रम सुरू केला. सुलेखन कलेचे हे वर्ग सुरू झाल्यावर त्यांनी पत्नी सुषमा यांनाही सुलेखनाचे धडे दिले आणि मग त्याही वर्ग घ्यायला लागल्या.
हे वर्ग आधी शालेय विद्यार्थ्यांसाठी होते. मग त्यांचा विस्तार वाढला. शाळांबरोबरच महाविद्यालये, संस्था, मंडळे, सोसायटय़ा, छोटे क्लब येथेही वर्ग सुरू झाले. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक, प्राध्यापक, शासकीय कर्मचारी, बँकांमधील कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वाचाच प्रतिसाद मिळायला लागला. सुलेखन कलेचा प्रसार हाच मुख्य हेतू असल्यामुळे हे वर्ग नि:शुल्क असतात. पाच दिवस रोज दीड तास असं या वर्गाचं स्वरूप असतं आणि वर्गात सहभागी होणाऱ्याचं अक्षर सुंदर होतंच हे आजपर्यंतच्या शेकडो वर्गामधून सिद्ध झालं आहे. अशा वर्गामधून कोणी फीचा आग्रह धरलाच, तर ती रक्कम रायते ‘आनंदी प्रतिष्ठान’ला देतात. आई-वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी रायते यांनी हे प्रतिष्ठान स्थापन केलं आहे. या प्रतिष्ठानतर्फे हस्ताक्षर स्पर्धासारखे अनेक उपक्रम राबवले जातात. सुलेखन कलेच्या दानाचा या दाम्पत्यानं अक्षरश: ध्यास घेतला आहे आणि या दानातून शेकडो जणांचं अक्षर अगदी देखणं झालं आहे.

स्कूल किटचा उपक्रम
आयटी क्षेत्रातील तरुण-तरुणींबद्दल नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची चर्चा कानावर येत असते. मुख्य म्हणजे आयटीतल्या तरुणांना मिळणारे पगार, त्यांचं राहणीमान, ते ज्या शहरात राहायला जातात त्या शहराची होणारी भरभराट वगैरे. चर्चेत येणाऱ्या या नेहमीच्या मुद्दय़ांपेक्षा आयटीमध्ये काम करणाऱ्या पुण्यातील युवकांनी सुरू केलेल्या एका अगदी वेगळ्या कामाची ओळख मध्यंतरी झाली.
आयटी उद्योगांमध्ये काम करणाऱ्या तरुणांनी सेवा सहयोग नावाची एक संस्था स्थापन केली आहे. काही तरी सामाजिक काम करू हा उद्देश त्यामागे होता. ग्रामीण भागात काम करणाऱ्या काही संस्थांचं काम पाहण्यासाठी सेवा सहयोगचे कार्यकर्ते गेले होते. ग्रामीण शाळांमधील विद्यार्थी आणि एकूण शाळांची अवस्था पाहून या सर्वाना वाटलं की, आपण या विद्यार्थ्यांसाठी काही तरी केलं पाहिजे. प्रत्यक्ष शिक्षण देता आलं नाही तरी निदान या मुलांना आनंददायी ठरेल असं तरी काही तरी करू या, असा विचार सर्वानी केला आणि त्यातून स्कूल किट या उपक्रमाचा जन्म झाला.
या उपक्रमातील यंदाचा आकडा ऐकू या. सेवा सहयोगच्या माध्यमातून यंदा चाळीस हजार स्कूल किट तयार करण्यात आली आणि ती महाराष्ट्रासह गोवा, अरुणाचल प्रदेश, ओडिसा आदी राज्यांतील अगदी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वाटण्यात आली. एका किटसाठी साधारण तीनशे रुपये खर्च यंदा आला आणि आयटीमधील तरुणांनी दिलेल्या उत्स्फूर्त आर्थिक सहयोगातून हा उपक्रम यंदाही पार पडला. गेली दहा र्वष हा उपक्रम सुरू आहे आणि दरवर्षीची कमान चढतीच राहिली आहे.
उत्तम दर्जाचं टिकाऊ दप्तर किंवा हॅवरसॅक, वह्य़ा, कंपास, पेन्सिल्स, रंगपेटय़ा, चित्रकलेच्या वह्य़ा, फुलस्केप वह्य़ा वगैरे सर्व प्रकारचं शालेय साहित्य दप्तरात भरून शाळेच्या पहिल्या दिवशी ते विद्यार्थ्यांच्या हाती सोपवलं जातं. हे स्कूल किट तयार करण्याचं काम एप्रिल ते जून या कालावधीत दर रविवारी पुण्यात चालतं. त्यातही शेकडो तरुण, तरुणी आणि अन्य मंडळी उत्साहानं भाग घेतात. सेवा सहयोगचे कार्यकर्ते गावोगावी जातात आणि विद्यार्थ्यांना या किटचं वाटप करतात. अनेक स्वयंसेवी संस्था, वसतिगृह, अभ्यासिका येथेही किट दिली जातात. दहा वर्षांपूर्वी एका छोटय़ा जाणिवेतून हा उपक्रम सुरू झाला आणि आता या उपक्रमाला आता खूप मोठं स्वरूप आलं आहे.

सत्पात्री दानासाठी..
चांगल्या कामाला मदत करणारे समाजात खूप असतात आणि ज्यांना गरज आहे असेही खूप असतात, पण ज्यांची देण्याची इच्छा असते त्यांना कोणाला साहाय्य करायचं ते माहिती नसतं आणि ज्यांना गरज आहे, त्यांना मदत कोण देऊ शकतात ते समजत नाही. पुण्यातल्या हरिओम काकांनी स्वप्रयत्नांतून या दोघांमध्ये दुवा बनण्याचं काम केलं आहे. हे काम हरिओम काकांनी आवडीनं स्वीकारलेलं आहे आणि गेली पंचवीस र्वष ते हे काम करत आहेत. सदाशिव ऊर्फ हरिओम अच्युत मालशे पुणे महापालिकेच्या आरोग्य खात्यातून वरिष्ठ पदावरून निवृत्त झाले आहेत. काही र्वष ते चिन्मय मिशनचंही काम करत होते. त्या वेळी परस्परांशी संवाद साधताना पहिला शब्द उच्चारला जायचा तो हरिओम. त्या शब्दाने संवाद सुरू करायची त्यांना एवढी सवय लागली की, पुढे त्यांची ओळखच हरिओम काका अशी झाली.
पुण्यातल्या अनाथ विद्यार्थिगृहात शिक्षण झालेलं असल्यामुळे अनेकांनी दिलेल्या मदतीतून आपण शिक्षण पूर्ण करू शकलो, ही खूणगाठ त्यांच्या मनाशी पक्की होती. त्यामुळे नोकरीत असतानाही हरिओम काका गरजू विद्यार्थ्यांना जेवढी शक्य होईल तेवढी मदत करत असत. पगारातील ठरावीक रक्कमही ते शैक्षणिक साहित्याच्या वाटपासाठी देत असत. निवृत्त झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, समाजात चांगलं काम करणाऱ्या संस्था खूप आहेत आणि दानशूर मंडळीही खूप आहेत; पण त्यांच्यात समन्वय नाही. त्यामुळे योग्य देणग्या योग्य व्यक्ती वा संस्थांपर्यंत जायला हव्यात. त्यातूनच हरिओम काका या दोघांमधील दुवा झाले. काकांनी १९९० मध्ये सुरू केलं आणि गेली पंचवीस र्वष हे काम अथकपणे सुरू आहे. या पंचवीस वर्षांत काकांनी हजारो देणगीदारांकडून लाखो रुपये मदतरूपानं गोळा केले आणि ते योग्य कामांपर्यंत, योग्य संस्थांपर्यंत पोहोचवले. याशिवाय गोळा करून दिलेल्या वस्तुरूप मदतीचाही आकडा लक्षावधी रुपये असाच आहे.
कमालीचा प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता हे हरिओम काकांच्या कामाचं वैशिष्टय़. त्यामुळे त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकून लोक त्यांच्याकडे हजारो रुपये संस्थांना देण्यासाठी सुपूर्द करतात. कोरा धनादेश काकांच्या हाती देऊन लोक त्यांना म्हणतात की, रक्कम आणि संस्थेचं नाव तुम्हीच लिहा.. एवढी विश्वासार्हता निर्माण होऊ शकली, ती काकांच्या तळमळीमुळे आणि प्रामाणिकपणामुळे. त्यामुळेच पंचवीस वर्षांच्या या कामाचं मोलही लाखमोल असंच आहे.

प्राण्यांशी जिवाभावाचे मैत्र
पाळीव प्राणी आवडणारे अनेक जण असतात. त्यातले कित्येक आपल्या घरात एखादा प्राणी लाडाने पाळणारेही आहेत.. पण केवळ घरातील पाळीवच नाही तर भटक्या, जखमी, एकटय़ा, सगळ्याच मुक्या प्राण्यांना अक्षरश: जीव लावणारा एक महाविद्यालयीन मुलगा आहे. मीत आशर! १९ वर्षांचा हा मुलगा जिवाचे रान करून मुक्या प्राण्यांच्या संरक्षणार्थ झटत आहे.
कुण्या भटक्या कुत्र्यावर झालेला हल्ला असो, आजार असो की कुठे वाहनाने ठोकर दिल्याने जखमी झालेली गाय असो, प्राणी संकटात आहे, असे कळताच हा धावून जातो. त्याला उचलून पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यापासून त्याच्यावरच्या सगळ्या औषधोपचाराची काळजी मीत घेत असतो. अगदी लहान असल्यापासून मीतला मुक्या प्राण्यांचा लळा लागला आहे. या प्राण्यांच्या काळजीपोटी त्याने पशुवैद्यकातील प्राथमिक उपचारांचे थोडेफार शिक्षणही घेतले. तो आता प्रथमोपचार स्वत: करू शकतो. तो राहत असलेल्या मुलुंडच्या परिसरातील तीन डझन कुत्र्या-मांजरांचा मीत सध्या पालक आहे. त्यांना खाऊ-पिऊ घालणे, फिरायला बाहेर सोडणे, औषधोपचार, नसबंदी, लसीकरण, सगळे मीत करतो आणि तो हे सगळे आंतरिक प्रेरणेने करतो. प्रसंगी स्वत:च्या खिशातले पैसे त्याला खर्च करावे लागतात. मीत सध्या पदवीच्या शेवटच्या वर्षांला शिकत आहे. तो सीएचा अभ्याससुद्धा करीत आहे. आई-वडिलांकडून मिळणारा पॉकेटमनी तो याच कामी लावतो, शिवाय सध्या प्रशिक्षणार्थी म्हणून काम करीत असलेल्या ठिकाणचा स्टायपेंडसुद्धा तो या कामासाठीच राखून ठेवतो.
मीतच्या कामाची दखल घेऊन नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने त्याची अॅनिमल वेल्फेअर ऑफिसर म्हणून नेमणूक केली आहे.
‘प्राण्यांच्या सुटकेसाठी किंवा सोडून दिलेल्या, जखमी अवस्थेतील प्राण्यांसाठी मला फोन येतात. पण हल्ली मुक्या प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना वाढल्या आहेत. माणसं पाळलेल्याही प्राण्यांना दगड मारतात, उपाशी ठेवतात, वाईट आणि क्रूरपणे वागवतात. या प्रकारच्या घटना वाढल्या आहेत. सुरुवातीला हौस म्हणून घेतलेला एखादा पाळीव कुत्रा सांभाळणे मग झेपत नाही, त्याला वेळ देता येत नाही म्हणून रस्त्यात लाचार अवस्थेत सोडून देण्यात येतो. एकटय़ा मुंबई शहरात महिन्याला किमान ३५ पाळीव कुत्र्यांना सोडून देण्यात येतेय’, मीत व्यथित होऊन सांगतो. अशा कुत्र्यांचे काय करायचे हाच मुख्य प्रश्न आहे. कारण ते धडधाकट असतात, त्यामुळे सरकारी पशू रुग्णालय किंवा प्राण्यांच्या अनाथाश्रमात त्यांना दाखल करता येत नाही. ठाण्याच्या सोसायटी फॉर प्रिव्हेंशन ऑफ क्रूएल्टी टू अॅनिमल्स या संस्थेच्या मदतीने मीत मुक्या प्राण्यांना वाचवण्याचा एकतर्फी लढा देत आहे.
त्याच्या या कामात त्याला मदत देऊ इच्छिणारे वेळ, पैसा, कौशल्य अशा कुठल्याही स्वरूपात त्याला मदत देऊ शकतात.

काटेरी प्राण्याचे दत्तकविधान!
जगातला प्रत्येक प्राणीप्रेमी आपापल्या परीने प्राण्यांसाठी जे शक्य आहे ते करत असतो. कोणी प्राण्यांसाठी आश्रयस्थान उभे करतात, तर कोणी प्राण्यांवर मोफत उपचार करतात, तर कोणी प्राण्यांच्या अधिकारांसाठी लढतात. बरेच जण संग्रहालयातील प्राणी दत्तक घेऊन त्यांच्या सगळ्या खर्चाची जबाबदारी उचलतात. पुण्यातील अशाच काहींनी कात्रजच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील अनेक प्राणी दत्तक घेतले आहेत. अगदी वाघ, बिबटय़ापासून वळवळणाऱ्या सापांपर्यंत.
स्वराज पेंढारकरही असेच एक प्राणीप्रेमी. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या क्षेत्रात असणाऱ्या स्वराज पेंढारकर यांनी प्राणिसंग्रहालयातील चक्क साळिंदर दत्तक घेतला आहे. प्राणी दत्तक योजनेमध्ये अनेकांनी प्राणी दत्तक घेतले. पण साळिंदराला आपलेसे करणारे स्वराज पेंढारकर पहिलेच. म्हणजे त्यांनी तो घरी आणून ठेवलेला नाही, पण त्याला सांभाळण्याचा खर्च मात्र ते करतात. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातर्फे २०१० मध्ये प्राणी दत्तक योजना सुरू करण्यात आली. त्यामध्ये बिबटय़ा आणि वाघासारख्या राजबिंडय़ा प्राण्यांना खूप जणांनी दत्तक घेतले. पण दिसायला फारशा गोंडस नसणाऱ्या आणि काटेदार साळिंदराला मात्र कोणीच दत्तक घ्यायला तयार नव्हते. पण पेंढारकर यांनी पुढाकार घेऊन साळिंदराचे पालकत्व स्वीकारले. १ मार्च २०१४ ते २८ फेब्रुवारी २०१५ या एका वर्षांसाठी पेंढारकर या साळिंदराचे पालक असणार आहेत. साळिंदराच्या देखभालीचा वर्षांचा खर्च ६० हजार रुपये आहे. म्हणजे महिन्याला पाच हजार रुपये, त्यामुळे साळिंदरासाठी खर्च करणं सहज परवडतं. पेंढारकर यांनी दिलेले पैसे प्राणिसंग्रहालयाच्या खात्यात जमा होतात. याआधी त्यांनी तीन महिन्यांसाठी काळवीटही दत्तक घेतले होते.
पेंढारकर यांना सुरुवातीपासून प्राण्यांबद्दल विशेष जिव्हाळा. प्राण्यांसाठी काहीतरी करावं अशी इच्छा होती. पशुपैदास कार्यक्रम करायचा असंही डोक्यात होतं, पण तशी संधी काही मिळत नव्हती. पण राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाने तशी संधी दिली. पेंढारकरांच्या मित्राने त्यांना या योजनेबद्दल माहिती दिली. संग्रहालय प्राण्यांची देखभाल करून पुन्हा त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडते. हीच गोष्ट मला आवडली त्यामुळे मी या योजनेमध्ये सहभागी झालो आणि शिवाय मला साळिंदर हा प्राणीही आवडतो. पेंढारकर वर्ष संपल्यानंतरसुद्धा शक्य असल्यास पुन्हा साळिंदर दत्तक घेणार आहेत. या योजनेविषयी ज्यांनी विचारले त्यांच्या प्रश्नांची उत्तरं पेंढारकरांनी दिली, पण तुम्हीही यामध्ये सहभागी व्हा, असं कोणाला सांगायच्या भानगडीत मात्र ते पडले नाहीत.

ज्येष्ठांचा आनंदवनला आधार..
ज्येष्ठ नागरिक म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतो तो एक टिपिकल ग्रुप. हातात काठी, डोक्यावर टोपी या पेहरावात असणारा. सकाळी फिरायला जाणारा, संध्याकाळी सोसायटीच्या बागेत बसणारा. पेपर वाचून त्यावर चर्वितचर्वण करणारा. वेळ भरपूर, पण तब्येतीमुळे फारसे काही करता येत नाही अशी तक्रार करणारा. जवळपास अनेक सोसायटय़ांमध्ये दिसणारे हे चित्र. ठाण्यातील विकास कॉम्प्लेक्समधील ज्येष्ठ नागरिकदेखील याच सदरात मोडणारे होते. सगळेच विखुरलेले होते. मात्र साधारण पाच वर्षांपूर्वी काही हौशी ज्येष्ठांनी एकत्र येऊन सोसायटीतील सर्व ज्येष्ठांना एकत्र आणले. आणि या ज्येष्ठांच्या एका वेगळ्या उपक्रमाला सुरुवात झाली. पूर्वी वरणगाव येथील वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. बी.जी. झोपे यांची आनंदवनशी बरीच जवळीक होती. स्वत:ची प्रॅक्टिस सुरू असताना त्यांनी त्याच्या परीने काहीना काही मदत केली होतीच. ज्येष्ठांच्या माध्यमातून आपल्या कॉम्प्लेक्सतर्फे आनंदवनला काही मदत करावी अशी संकल्पना पुढे आली. १४ सोसायटय़ांमधील साधारण ५० ज्येष्ठ एकत्र आल्यावर त्यांनी ठरवले की सर्व रहिवाशांना आवाहन करायचे आणि आनंदवनसाठी निधी गोळा करायचा. सर्व सोसायटय़ांच्या सूचना फलकावर तशा प्रकारच्या सूचना लावल्या. ज्येष्ठांच्या या प्रयत्नांना सर्वानीच प्रतिसाद दिला आणि एकाच वेळी साडेचार लाख रुपये जमा झाले. रोख निधीबरोबरच भरपूर कपडेदेखील जमा करून देण्यात आले. विखुरलेल्या ज्येष्ठांना एकत्रित येऊन काहीतरी वेगळे केल्याचा आनंद तर मिळालाच, पण त्याच जोडीने पुढे आणखीन काम करण्याचा हुरूपदेखील आला. अर्थात वयोमानानुसार फार धावपळ करणे शक्य नव्हते. म्हणून मग एका संस्थेला हाताशी धरून त्यांनी ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी एक उपक्रम सुरू केला. महिन्यातून दोन शनिवार सर्व रुग्णांना या ज्येष्ठांच्या संघाकडून बिस्किटांचे वाटप केले जाते. ही बिस्किटं वाटण्यासाठी सत्यसाई समिती या संस्थेची ते मदत घेतात. गेल्या चार-पाच वर्षांत सारे ज्येष्ठ एकत्र आल्यावर इतर अनेक उपक्रम सुरू झाले आहेत. ६० पासून ते अगदी ८० चा टप्पा पार केलेले या ज्येष्ठांनाच अनेक आधाराची गरज असली तरी तेच आता आपल्या परीने आणखीन कोणाला तरी आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत.

कचऱ्यातून उभी राहते ‘देवाची बाग’..
अमेरिकेला जाणं हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. पण तेथे जातानाच आपल्याला स्वदेशात परत यायचं आहे आणि काही काम उभं करायचं आहे, हे स्वप्न असणारी माणसं विरळच. ६३ वर्षीय अफझल खत्री आणि ६१ वर्षीय नुसरत खत्री हे असं स्वप्नं बाळगणाऱ्या विरळांपैकीच. ५०व्या वर्षांपर्यंत कमाई करायची आणि नंतर भारतात परतून शिक्षण, भ्रष्टाचार विरोध, पर्यावरणीय संवर्धन किंवा आरोग्य यापैकी एका क्षेत्रात काम करायचं या निर्धाराने ते सुमारे १३ वर्षांपूर्वी भारतात परतले. कांदिवलीत वास्तव्य होतं. तेथे असणारा आणि वाढत जाणारा कचरा खटकत होता. मग नुसरत खत्री यांनी ‘बागकामाचा’ तीन महिन्यांचा प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला. एकदा काही अवशेष (डेब्रीज) त्यांच्या घराजवळच्या रस्त्यावर टाकून दिलेलं त्यांना आढळलं. ते उचललं जावं यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले पण प्रतिसाद शून्य. अखेर महापालिकेत अधिकाऱ्यांना त्यांनी प्रश्न विचारला की, आम्ही त्या विखुरलेल्या अवशेषांना नीट एकत्र करून ठेवले, तर तुम्ही एक कचरा गाडी पाठवून ते उचलू शकाल का? नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता, उलट उत्तरात एक तुच्छता होती, की यांच्याकडून हे काम कसलं होतंय? पण खत्री दाम्पत्य इरेला पेटलं. उंची हॉटेलमध्ये जेवायला गेलं तर, १२०० ते १५०० रुपये सहज उडतात, मग निसर्गासाठी तेव्हढे खर्च करायला काय हरकत आहे, असा विचार करून त्यांनी काही गरजू बोलावले, प्रत्येकी १५० रुपये याप्रमाणे त्यांना मानधन दिलं आणि स्वत: त्यांच्यासह रस्ता साफ केला. सगळे अवशेष एकत्र केले, दोन दिवसांचा १८०० रुपये खर्च आला, पण महापालिका अधिकाऱ्यांना ‘धक्का’ देण्यासाठी तो पुरेसा ठरला. दिशा सापडली होती आता फक्त त्यावरून श्रद्धेने चालण्याची गरज होती.
त्याच दरम्यान, समता नगर पोलीस स्थानकात काही कामानिमित्त जाण्याचा प्रसंग अफझल खत्री यांच्यांवर आला. त्या वेळी पोलीस स्थानकाची रंगरंगोटी सुरू होणार होती, म्हणून काही मृत झालेल्या रोपटय़ांच्या कुंडय़ा पोलीस इतरत्र ठेवत होते. नुसरतबाईंनी ते पाहिले आणि विचारले, अशी मृतवत रोपटी लावण्यापेक्षा तुम्हाला चांगली रोपटी आणून देऊ का? पोलिसांनी हो म्हटले तर चक्क या बाई दुसऱ्या दिवशी खरोखरीच काही सुंदर रोपटी घेऊन गेल्या. विनायक मुळ्ये नावाच्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांची तळमळ लक्षात आली. त्याचदरम्यान, सुका कचरा आणि ओला कचरा वेगवेगळा करून ठेवावा, कचरा रस्त्यावर टाकू नये, त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी, अशा स्वरूपाची जनजागृती खत्री कुटुंब दारोदार फिरून करीत होते. मुळ्येंनी हे पाहिले आणि त्यांना पोलीस स्थानकात बोलावून घेतले. पोलीस स्थानकाच्या मागे, सुमारे दीड एकरचा परिसर मोकळा होता. पण त्यावर कचरा, काचेच्या बाटल्यांचे तुकडे, दरुगधी यांचे थैमान माजले होते. पोलिसांनी खत्रींना ही जागा ‘कसण्यासाठी’ म्हणजेच सेंद्रीय खतनिर्मितीसाठी आणि बागनिर्मितीसाठी देण्याची तयारी दर्शवली. जवळच असणाऱ्या ठाकूर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना यासाठी मदतीला घेत तीन महिन्यांच्या अविश्रांत मेहनतीने ती जागा स्वच्छ करण्यात आली. एका अज्ञात व्यक्तीने एक ट्रक माती पाठवली. एका माणसाने स्वत:हून हजारभर विटा पाठविल्या. तेथे नंदनवन फुलविण्यास सुरुवात झाली.
जी जमीन आपल्या मालकीची नाही, जिच्यावर उगवलेली रोपटी ही केवळ देवाच्या किमयेमुळेच वाढतात आणि जेथील तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा किमान पाच अंशांनी कमी असतं, असा ‘देवाचा मळा’ या दोघांनी फुलविला. आज त्याच जागेत, सेंद्रीय खत तयार केले जाते. दिवसाचे सहा-सहा सात-सात तास हे दाम्पत्य तेथे काम करीत असते. एका रुपयाचेही मानधन नाही किंवा कसली अपेक्षा नाही, हे कसं जमतं या प्रश्नावर खत्री आजी म्हणाल्या, ‘गेल्या बारा वर्षांमध्ये मला एकदाही साधी क्रोसिनची गोळीदेखील घ्यावी लागली नाही. या वयात यापेक्षा अधिक उत्तम ते काय?’
आजही वेगवेगळ्या शाळांमधील, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व सांगणे, त्याच्या संवर्धनासाठी काय-काय करता येईल, हे पाहणे, जनजागृती करणे असे प्रयत्न खत्री दाम्पत्याकडून सुरू आहेत. ‘देवाची बाग’ हे त्यांनीच दिलेलं नाव. आज या जागेत, सुमारे १८०० विविध प्रकारच्या वनस्पती आहेत, २५ विविध प्रकारचे पक्षी तिथे नियमित येतात. या जागेत पडलेल्या पाण्याचा एक थेंबही येथे वाया जात नाही आणि या पट्टय़ातील संपूर्ण ओला कचरा येथे सेंद्रीय खतात रूपांतरित केला जातो, एक रुपयाचेही शुल्क न घेता. या बागेच्या, जनजागृतीच्या कामासाठी खत्री कुटुंबाने एक माळीबुवा स्वखर्चाने ठेवले आहेत. ते माळीबुवा आणि दाम्पत्य यांच्या दैनंदिन अंगमेहनतीने मुंबईच्या कचऱ्यातून ‘देवाची बाग’ फुलली आहे.’

अंधांसाठी ज्ञानाचा प्रकाश
शैला भागवत या अमरावतीच्या. लहान मुलांसाठी रामायणातल्या बालकांडावर आधारित एक परीक्षा घेतली जायची. त्याला लहान मुलं खूप हौसेने आणि आनंदाने प्रतिसाद द्यायची. ते बघून शैला भागवत यांना असं वाटलं की दृष्टी असलेल्या मुलांना मिळणारा हा आनंद दृष्टिहीन मुलांनाही मिळायला हवा. मग त्यांनी नागपूरहून माधव नेत्रपेढी या संस्थेकडून अंध मुलांसाठी बालकांडावरची ब्रेल लिपीतली पुस्तकं छापून घ्यायला सुरुवात केली. आनंदवनापासून ते चिखलदऱ्यापर्यंत अंधशाळांमध्ये त्या फिरल्या. आता त्या दरवर्षी बालकांडावरचं ३० पानांचं पुस्तक ब्रेल लिपीत प्रसिद्ध करतात. त्याच्या ब्रेल लिपीतल्या शंभर प्रती काढल्या जातात. दहा दहा जणांचा ग्रुप एक पुस्तक वापरतो. त्या सगळ्या शाळांमध्ये फिरणं, या उपक्रमांची माहिती देणं, पुस्तकं, मग सर्टिफिकेट या सगळ्याचा त्यांना दरवर्षी ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो. विदर्भात आणखीही अंधशाळा आहेत, पण त्या सगळ्यांपर्यंत मी पोहोचू शकत नाही, असं त्या सांगतात. त्यांच्या काही विद्यार्थिनी, मैत्रिणी त्यांना या उपक्रमात मदत करतात. बालकांडाबरोबरच त्यांनी भगिनी निवेदिता यांच्यावरचं एक पुस्तक तयार केलंय. आता बाबा आमटेंवर पुस्तक तयार करत आहेत. ही पुस्तकं त्या स्वत:च लिहितात. गेली १० वर्षे त्यांचं हे काम सुरू आहे.

केवळ स्वानंदासाठी..
सुजय लेले हा रत्नागिरी येथील २९ वर्षांचा तरुण. होमिओपथी डॉक्टर. घरची परिस्थिती व्यवस्थित. पण, मन कायम अस्वस्थतेने घेरलेलं. समाजातील विषमता, निरक्षरता, बेरोजगारी, अनाथ मुलांच्या वेदना याने व्यथित होणारा. पुण्यात प्रशासकीय सेवा परीक्षेच्या अभ्यासासाठी सुजय आला आणि तेथे आठवडय़ातील शनिवारचे काही तास शिवाजीनगरमधील हर्डिकर रुग्णालयाजवळ असलेल्या ‘बालसुधारगृह आणि अनाथालयातील’ मुलांसाठी देण्यास त्याने सुरुवात केली. त्यांची पाश्र्वभूमी समजून घेणं, त्यांना अक्षरओळख करून देणं, संस्कारक्षम गोष्टी सांगणं, शालेय विषय शिकवणं, स्वच्छतेचं महत्त्व पटवणं अशा मार्गानी हा प्रवास सुरू झाला. पण तरीही समाधान होत नव्हतं. समाजाचं आपण काही देणं लागतो आणि ते उत्तम पद्धतीने कसे देता येईल हा सवाल कायम होता. अशातच त्याची भेट भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेल्या लीना मेहेंदळे यांच्याशी झाली. त्यांच्या व त्यांनीच सुरू केलेल्या कौशलम् ट्रस्टच्या कामातून सुजयने प्रेरणा घेतली. रत्नागिरीला परतून आपला दवाखाना सुरू करत असताना, चरवेली या हातखंब्याजवळ असलेल्या गावातील समस्या त्याला खुणावू लागल्या. १०वी झाल्यानंतर शिक्षण सोडून दिलेली मुलं, बेरोजगारी, सरकारच्या योजनांची माहिती आणि कागदोपत्री पूर्तता करू न शकल्याने अडणारी प्रगती याचे मूळ त्याने शोधले. मराठीतील टंकलेखन आणि संगणकाचे प्रशिक्षण अशा तरुणांना दिल्यास त्यांची दिशा बदलू शकेल, हे त्याच्या लक्षात आले. मग आपल्या व्यापातून आठवडय़ाचे १०-१२ तास द्यायचे त्याने ठरविले. राज्य मराठी विकास संस्थेने मान्यताप्राप्तीची मोहोर उमटवलेला ‘इन्स्क्रिप्ट टंकलेखना’चा अभ्यासक्रम तो स्वत: आधी शिकला आणि उपलब्ध संगणकावर त्याने गावातील मुला-मुलींना हे टंकलेखन शिकविण्यास सुरुवात केली. चरवेली, कापडगाव, वेळवंड अशा जवळपास असलेल्या गावांमधूनही मुले उत्साहाने प्रतिसाद देऊ लागली. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, संत गाडगेबाबा तंटामुक्ती अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आणि सरकारी पातळीवरील संगणकीकरणाची मोहीम जसजशी पुढे सरकू लागली, तसतशी सुजयने तयार केलेल्या मुलांना रोजगाराची संधी निर्माण होऊ लागली. आज, अशी २० मुलं आणि मुली ‘डेटा ऑपरेटर’ म्हणून काम करीत आहेत. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील हजेरीपटावर नेमकी हजेरी लागते की नाही, ती मराठीतूनही कशी नोंदवता येईल हेही तरुण मुले जबाबदारीने पाहू लागली. हे कामही दोन टप्प्यांवर सुजयने केलं. सुरुवातीला नुसतं संगणकावरील मराठी टंकलेखन आणि कार्यालयीन उपयोगाचे ‘संगणकीय ज्ञान’ शिकवणं व नंतर हे शिकलेल्यांना त्यांनी ते ज्ञान इतरांना कसं शिकवावं याचं प्रशिक्षण दिलं. गंमत म्हणजे गावांतील युवतींचा या प्रशिक्षणात उत्साही आणि मोठय़ा संख्येने सहभाग होता. त्यामुळे आपोआपच महिला सक्षमीकरणासही हातभार लागला.. यापुढेही हे प्रयत्न अधिक व्यापक स्वरूपात कसे करता येतील याबाबत प्रयत्नशील असल्याचे सुजय नम्रपणे नमूद करतो.