11 July 2020

News Flash

औषधाविना उपचार : चौरस आहाराकरिता कडधान्ये

तांदूळ, गहू, ज्वारी व काही प्रमाणात बाजरी या अन्नधान्याबरोबरच कडधान्ये मूग, तूर, मसूर, उडीद, कुळीथ, वाटाणा, मटार, हरभरा, मटकी, पावटे, चवळी, राजमा यांचे आपल्या दैनंदिन

| March 13, 2015 01:15 am

01khadiwaleतांदूळ, गहू, ज्वारी व काही प्रमाणात बाजरी या अन्नधान्याबरोबरच कडधान्ये मूग, तूर, मसूर, उडीद, कुळीथ, वाटाणा, मटार, हरभरा, मटकी, पावटे, चवळी, राजमा यांचे आपल्या दैनंदिन आहारात मोठेच योगदान आहे. ही कडधान्ये आपल्या शरीराचा रोजचा गाडा नीट चालवण्याकरिता आवश्यक असणारी, चरबी-मांसवर्धक घटक, स्टार्च-पीठ, तेल, चोथा-फायबर, राख-अ‍ॅश व फॉस्फरससारखी द्रव्ये पुरवतात. बहुतेक सर्व कडधान्ये आपल्या देशात विविध राज्यात होतात. तरीपण अनेक कडधान्ये परदेशातून मोठय़ा प्रमाणावर आयात होतात. मूग चीन, म्यानमार व ऑस्ट्रेलियातून येतो. तुरीची आयात चीन व म्यानमारमधून होते. राजमा चीनमधून येतो. राजमा व डॉलर चवळी अमेरिकेतून येते. कॅनडातून सफेद वाटाणा, हिरवा वाटाणा व काबुली चण्याची आवक होते. इथिओपिया व ऑस्ट्रेलियातूनही काबुली चणा येतो. अमेरिकेतून सफेद वाटाणा मोठय़ा प्रमाणावर येतो.

उडीद
काळे, हिरवे, भुरकट रंगांचे असे तीन प्रकारचे उडीद असतात. वैद्यक ग्रंथात उडिदाचे पौष्टिक म्हणून अनेक प्रयोग सांगितले आहेत. त्याकरिता उडीद काळ्या रंगाचा प्रशस्त मानला जातो. उडिदाची तुलना मांसाहाराशी केली जाते. ज्यांना आपल्या आहारामध्ये मांसाहाराचे शरीर पुष्ट करण्याचे गुणधर्म हवे आहेत, त्यांनी उडिदाचा नियमित वापर करावा. रानउडीद ही जात वेगळी आहे. आयुर्वेदात जीवनीय गणात उडदाला स्थान आहे. उडदाला ‘वृषांकुर’ असे सार्थ नाव आहे. शुक्रधातूची वाजवी वाढ करण्याकरिता उडदाचा उपयोग होतो.
उडीद सबंध, त्याची डाळ, लापशी, भिजवलेले उडीद, उडदाच्या पिठाचे लाडू, उडदाचे पापड, सिद्ध तेल असा विविध प्रकारे उडदाचा वापर आहे.
उडीद चवीने गोड रसाचे, भरपूर स्निग्ध, प्रकृतीचे उष्ण आहेत. उडीद बहुमलकारक, रुचकर, कफपित्त वाढवणारे, तृप्तीकारक आहेत. उदीड मांस, मेदवर्धक आहेत. उडिदामध्ये एक प्रकारचा स्त्रंसन गुण आहे. रक्तपित्त विकार, श्रम, दम लागणे, तोंड वाकडे होणे, अर्धागवातानंतरची दुर्बलता, गुडघे, पाठ, कंबर व खांदे याचे वातविकार याकरिता उडदाचा उपयोग आहे.
समस्त वातविकारात उडदाच्या काढय़ात सैंधव किंवा मीठ मिसळून सिद्ध केलेले ‘माष सैंधवादि तेल’ मसाजकरिता उपयुक्त आहे. विशेषत: हातापायात जोम आणून, अ‍ॅटॅकने निर्जीव झालेल्या स्नायूंना बल मिळते. मळ कमी बनत असल्याने मलावरोध होत असल्यास उडदाची डाळ उपयुक्त ठरते.
चमचा-दोन चमचे उडीद रात्रौ पाण्यात भिजत टाकून सकाळी दुधात त्याची लापशी नियमितपणे घेतली तर खात्रीपूर्वक वजन वाढते. विशेषत: खुजी किंवा अतिकृश मुले-मुली खुरटलेले स्तन यांच्या प्राकृत वाढीकरिता उडदाचा मुक्त वापर करावा. ज्यांचा अग्नी मंद आहे, पचनास त्रास आहे, त्यांनी सोबत लसूण, आले, मिरी, हिंग हे पदार्थ वापरावे.
शारीरिक श्रम, ओझी वाहणे, घाम येईल अशी भरपूर कामे करणाऱ्यांनी जेवणात पापड, आमटी किंवा उसळ, डाळ या स्वरूपात उडदाचा वापर करावा. उडीद पाण्यात वाटून त्याचा लेप पांढरे डाग, चाई किंवा आगपैण या विकारात उपयोग करून पाहण्यासारखा आहे. उडदामध्ये २२ टक्के मांसवर्धक द्रव्ये, ५५ टक्के पीठ, २ टक्के चोथा,४ टक्के राख व १ टक्का फॉस्फरिक अ‍ॅसिड असते.

कुळीथ (हुलगे)
कुळीथ किंवा हुलगे हे एक कडधान्य एक काळ गरीब जनतेच्या फार वापरात होते. कोकणात कुळीथ व देशावर हुलगे असे वर्णन केले जाते. रानटी कुळीथ म्हणून आणखी एकजात वापरात आहेत. शुक्र व रक्त विकारात कुळथाचा विचार करू नये.
कुळथाचे कढण किंवा सूप आजारी व्यक्तींकरिता प्रसिद्धच आहे. भरपूर ताकात कुळीथ शिजवून जिरे, तुपाची फोडणी दिली की उत्तम कढण तयार होते. हे कढण वातनाशक, रुची उत्पन्न करणारे आहे.
कुळथाच्या काढय़ाने लघवी साफ होते. अवघड जागी किडणीमध्ये घट्ट बसलेले मूतखडे मरणप्राय वेदना देतात. लघवीला त्रास होतो. अशा मूतखडय़ाच्या अ‍ॅटॅककरिता, कुळथाच्या काढय़ात थोडी सुंठ व पादेलोण मिसळून प्यावा. लघवी मोकळी होते. तात्पुरता आराम पडतो. लघवीची वारंवार होणारी जळजळ, अडखळत होणारी लघवी सुधारते. ज्यांना मूतखडय़ाचे शस्त्रकर्म टाळावयाचे आहे त्यांनी मुळ्याच्या पानांवर कपभर रसाबरोबर ५ ग्रॅम कुळीथ चूर्ण दोन वेळा काही दिवस प्यावे. खूप कफ असलेला खोकला, दमा या विकारात कुळथाचा काढा उपयोगी आहे. कोरडा किंवा सुकलेल्या कफ विकारात कुळीथ उपयोगी नाही. कुळीथ लेखन, भेदन करणारे, उष्ण गुणांचे आहेत. हाच गुण धातूंची आयुर्वेदीय पद्धतीने भस्म करण्याकरिता धातूंच्या शुद्धी प्रक्रियेत वापरला जातो. निरींद्रिय धातूंचे भस्मांना सेंद्रियत्न प्राप्त करून देण्याकरिता कुळिथाचा काढा धातूंचे घट्ट कण विलग करण्याचे मोठेच कार्य करतो. गंडमाळा, मूळव्याध, शुद्ध आमवात, यकृत, प्लीहेची सूज या विकारात कुळथाचा काढा उपयुक्त आहे. रक्ती मूळव्याध, आप्लपित्त या विकारात कुळीथ वज्र्य करावे. कुळिथामध्ये मांसवर्धक द्रव्ये २२.५ टक्के, पीठ ५६ टक्के, तेल २ टक्के, चोथा ५ टक्के, राख ३ टक्के व फॉस्फरिक अ‍ॅसिड १ टक्के असतात.

तूर, मसूर
तूरडाळ अतिशय चविष्ट डाळ आहे. मसुराची डाळ शिजायला सोपी म्हणून त्याचा वापर अधिक आहे. औषधी गुण दोन्हीत फार कमी आहेत. याउलट अनेक विकारांत तूर व मसूर डाळ खाऊ नये, असे सांगावे लागते. दोन्ही डाळी उष्ण, तीक्ष्ण, शरीरात पित्त वाढविणाऱ्या आहेत. त्यामुळे विशिष्ट रुग्णांनी तूर व मसुराची डाळ टाळावी. शारीरिक श्रम करण्याऱ्यांकरिता मसुराची डाळ उपयुक्त आहे.
आम्लपित्त, उलटय़ा होणे, अल्सर, इसब, गजकर्ण, नायटा, सोरायसिस, अंगावर गांधी उठणे, शीतपित्त, खरूज, हातापायांची व डोळय़ांची आग होणे, मलावरोध, भगंदर, संडासवाटे रक्त पडणे, अंगाला खाज सुटणे, गोवर, कांजिण्या, कावीळ, फिशर किंवा परिकर्तिका, तांबडे डाग, कोड, गरमी, परमा, घाम खूप येणे, दातातून रक्त येणे, फिट्स येणे, अंगावर जास्त विटाळ जाणे, रक्ताचे विकार इ.
बाहय़ोपचार म्हणून खरूज, इसब, गजकर्ण या विकारात दहय़ात तुरीची डाळ वाटून लेप लावून पाहावा. मसुराच्या डाळीचे पीठ आंघोळीच्या वेळेस लावल्यास त्वचा नरम व कांतीदायक होते. रासायनिक विश्लेषणात अखंड तुरीमध्ये मांसवर्धक पदार्थ १७ टक्के, तर तूरडाळीत २२ टक्के, अखंड तुरीत पीठ ५६ टक्के, तूरडाळीत ६० टक्के, अखंड तुरीत तेल २.५ टक्के, तूरडाळीत २ टक्के, अखंड तुरीत चोथा ७ टक्के, तर डाळीत १ टक्के, राख दोन्हीतही ३ टक्के असते. तसेच अखंड मसुरामध्ये मांसवर्धक पदार्थ २४ टक्के, तर डाळीत २५ टक्के, अखंड मसुरात पीठ ५६ टक्के, तर डाळीत ५८ टक्के, तेल दोन्हीतही १ टक्के, राख दोन्हीतही २ टक्के; तर अखंड मसुरामध्ये चोथा ३ टक्के, डाळीत १ टक्के असे प्रमाण असते.

मूग: हिरवे, पिवळे
शिंबिधान्य किंवा शेंगांतून निघणाऱ्या धान्यांत मूग श्रेष्ठ आहेत. मूग हिरवे, पिवळे, काळे तीन प्रकारचे मिळतात. हिरवा मूग सर्वश्रेष्ठ आहे. तुरट व मधुर रस असलेले मूग थंड गुणाचे असतात. मूग पचायला हलके आहेत. शरीराला आवश्यक असणारी ए, बी ही व्हिटामिन, लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ही द्रव्ये मुगाच्या टरफलात भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे मुगाचे जीवरक्षक म्हणून सांगितले जाणारे गुण टरफलासकट मुगात आहेत. मूग कफ, पित्त व रक्तासंबंधी विकारात फार उपयुक्त आहेत. मूग क्वचित पोटात वायू उत्पन्न करतात. मुगाबरोबर हिंग, मिरी वापरावी. मुगाचे पिठले, सबंध मूग कढण, उसळ, आमटी, पापड, लाडू, खीर अशा विविध प्रकारे मूग उपयुक्त पडतात. औषधे म्हणून मुगाचा काढा करण्याचा प्रघात आहे. मुगाचे ‘पायसम’ हे एक अफलातून पक्वान्न आहे.
ज्वरामध्ये मुगाच्या किंवा रानमुगाच्या पानांचा काढा प्यावा. जीर्णज्वरांत ताकद भरून येण्याकरिता व चांगल्या झोपेकरिता मुगाच्या पानांचा काढा उपयुक्त आहे. डोळे आल्यास मुगाची पुरचुंडी डोळय़ांवर बांधावी.

पिवळय़ा मुगास कीड लवकर लागते. त्यांच्यात भुंगे लवकर होतात. त्यामुळेच की काय, पिवळय़ा मुगाची पैदास खूपच कमी आहे. पिवळय़ा मुगाची सर हिरव्या मुगाला येत नाही.
पिवळय़ा मुगाचे भाजून तयार केलेले पीठ फार पौष्टिक आहे. थोडी पिठीसाखर व चांगल्या तुपावर परतलेले पिवळय़ा मुगाचे पीठ उत्तम टॉनिक आहे. कृश मुले, दुपारी उशिरा जेवणारी मंडळी यांनी सकाळी चहाऐवजी चांगल्या तुपावर भाजलेल्या मुगाच्या पिठाचे लाडू खावे. माझ्या मुंबईच्या तीन दिवसांच्या मुक्कामी मी मुगाचे दोन लाडू सकाळी खाऊन त्यानंतर दुपारी एकपर्यंत अखंड काम करू शकतो. बाळंतिणीस भरपूर दूध येण्याकरिता मुगाच्या पिठाचे लाडू तत्काळ गुण देतात.
शारीरिक कष्ट खूप करावयास लागणाऱ्यांनी रोज किमान एक वाटी मुगाची उसळ खावी. खूप लठ्ठ व्यक्तींनी मुगाची आमटी नियमित घ्यावी. कृश व्यक्तींनी मुगाची उसळ खावी. मुगामुळे मेद वाढत नाही, पण स्नायूंना lp33बळ मिळते. अर्धागवात, संधिवात, आमवात, आम्लपित्त, अल्सर, डोकेदुखी, तोंड येणे, त्वचेचे विकार, कावीळ, जलोदर, सर्दी-पडसे, खोकला, दमा, स्वरभंग या तक्रारीवर मूग अत्यंत उपयुक्त आवश्यक अन्न आहे. त्याकरिता मूग भाजून त्याचे नुसते पाणी किंवा कढण हे अर्धागवात, मधुमेह, रक्तदाबवृद्धी या विकारांत उपयुक्त आहे. घशाच्या, जिभेच्या, गळय़ाच्या कॅन्सरच्या विकारात जेव्हा अन्न किंवा पाणी गिळणे त्रासाचे होते त्या वेळेस हिरवे मूग उकळून त्याचे पाणी पुन:पुन्हा पाजावे. शरीर तग धरते. आयुष्याची दोरी बळकट असली तर नुसत्या मुगाच्या पाण्यावर माणसे कॅन्सरवर मात करू शकतात. मधुमेहात भरपूर मूग खावे. थकवा येत नाही.
डोळय़ाचे कष्टसाध्य किंवा असाध्य विकारांत मुगाचा विविध प्रकारे उपयोग होतो. रेटिना, काचबिंदू, मधुमेह किंवा रक्तदाब वाढल्यामुळे क्षीण होणारी दृष्टी या अवस्थेत मूग भाजून त्याचे पाणी, गाईच्या दुधात शिजवून केलेली मुगाच्या पिठाची खीर किंवा पायसम् मुगाच्या पिठाचे पापड, मुगाची उसळ, मुगाच्या डाळीची खिचडी असे विविध प्रकारे मूग वापरावे. चवीकरिता हिंग, जिरे, मिरी वापरावी. मुगाच्या आहारातील वाढत्या वापराने नुकसान होत नाही. डोळय़ांना नवीन तेज प्राप्त होते.
रासायनिक विश्लेषणात मुगात मांसवर्धक द्रव्ये २३ टक्के, पीठ ५४ टक्के, तेल २ टक्के, चोथा ५ टक्के, राख ४ टक्के आहे. सालीत चोथ्याचे प्रमाण फार असते. मुगाची टरफले वज्र्य करावी. यात फॉस्फरिक अ‍ॅसिड आहे.
हरभरा
थंडीत ओला हरभरा मंडीत केव्हा येतो याची लहानथोर सर्व जण आतुरतेने वाट पाहात असतात. ओला हरभरा खाल्ला नसेल असा महाभाग विरळच! हरभरा किंवा चणा अनेक प्रकारचा आहे. हरभऱ्याची आंब, हरभरा डाळ, हरभऱ्याचे कढण, चण्याचे पीठ, उसळ असे विविध प्रकार सर्वाच्या वापरात असतात. श्रावण महिन्यात शुक्रवारी व फाल्गुन महिन्यात हरभरा डाळीचे पुरण असणारी पुरणपोळी एकूण जेवणाला वेगळीच लज्जत देते. संक्रांतीच्या वाणात सुगडामध्ये हरभऱ्याचे घाटे हवेच. हरभऱ्याचे वैशिष्टय़ त्याच्या पानांच्या आंबटपणात, हरभऱ्याच्या आंब या पदार्थात आहे. चांगल्या आंबेचे १०-२० थेंब कसलीही पोटदुखी लगेच थांबवतात. अजीर्ण, अग्निमांद्य, अरुची, वायुगोळा, पोटात वायू धरणे याकरिता आंब वापरावी. मात्र ती खात्रीची हवी. त्याअभावी हरभरा टरफले पाण्यात उकळून त्याचा काढा प्यावा. मंद अग्नी असणाऱ्यांना हरभऱ्याची डाळ मानवत नसल्यास हरभऱ्याचे कढण वापरावे. हरभरा पित्तशामक आहे. हरभरे भाजून खाल्ले व काही तास पाणी प्यायले नाही, तर ते अधिक चांगले अंगी लागतात. मधुमेह, स्थौल्य, रक्तदाब विकार, अजीर्ण, अपचन, गॅस, मूळव्याध, भगंदर या विकारांत हरभरा वज्र्य करावा.
अखंड हरभऱ्यात मांसवर्धक पदार्थ १९ टक्के, पीठ ५३ टक्के, तेल ४ टक्के, चोथा ७ टक्के, राख ३ टक्के आहे, तर हरभरा डाळीत मांसवर्धक पदार्थ २१ टक्के, पीठ ५९ टक्के, तेल ४ टक्के, चोथा १ टक्के, राख २.५ टक्के, फॉस्फरिक अ‍ॅसिड १ टक्का असते.

राजमा (चवळी)
शिम्बी व शाकभाजी वर्गातील या वेलाची लागवड पावसाळय़ात व नंतरच्या खरीप हंगामात केली जाते. चवळीचे लहानमोठे व रंगाप्रमाणे वेगवेगळे प्रकार आहेत. काळय़ा, लालचुटूक व गुलाबीसर चवळय़ांना राजमा या नावाने संबोधले जाते. गुजराती चवळी लहान आकाराची, मध्य प्रदेशातील चवळी मोठय़ा आकाराची असते. डॉलर चवळी असा नवीन वाणही बाजारात उपलब्ध आहे. आयुर्वेदशास्त्रानुसार चवळी स्वादिष्ट, सारक, तृप्तीकारक व बल्य व स्तन्यवर्धक आहे. रुची राखून शरीरातील संतुलन राखण्याकरिता रूक्ष गुण चवळीत आहे.
राजम्यात २४ टक्के मांसवर्धक द्रव्ये, ५६ टक्के पीठ, १ टक्के तेल, ४ टक्के चोथा, तर राख ३.५ टक्के व फॉस्फरिक अ‍ॅसिड १ टक्का असते.

वाटाणा
वाटाणा, मटार, कलाय या नावाने अनेक प्रकारची शेंगधान्ये स्थळपरत्वे बाजारात मिळतात. वाटाणा हे अन्न मांसवर्धक आहे. यात तुलनेने पिष्टमय भाग कमी आहे. वाटाणा शीत गुणाचा व रूक्ष आहे. वात प्रकृतीच्या व्यक्तींनी वाटाणा टाळावा. खावयास असल्यास सोबत लसूण, आले असे वातानुलोमन करणारे पदार्थ हवेत. गर्भिणी व नवजात बाळंतिणींनी मटार, वाटाणा टाळावा. बाळाच्या पोटाचे विकार सुरू होतात. वाटाणा, मटार हे पोटभरू अन्न, ज्यांना शारीरिक श्रम खूप आहेत त्यांच्याकरिता उपयुक्त आहेत. भाजलेले वाटाणे वाटून त्याचे उटणे लावल्यास त्वचा-कांती सुधारते. वाटाण्यात २३ टक्के मांसवर्धक घटक, ६४ टक्के पीठ, १ टक्का तेल, १ टक्का चोथा, तर २.५ टक्के राख असते.

मटकी
मटकी म्हटले की खवय्यांच्या मनात मिसळ या पदार्थाची आठवण होते. शेंगधान्यात मटकी हे क्षुद्र धान्य समजले जाते. मटकी चविष्ट आहे. कांदा, लसूण याबरोबर शिजवलेली मटकीची उसळ सगळय़ांनाच हवीहवीशी असते; पण समस्त वातविकारात, अजीर्ण, अपचन, उदरवात, पोटदुखी, मलावरोध, मूळव्याध, आतडय़ाची सूज या विकारांत मटकी वज्र्य करावी. मटकी अतिशय रूक्ष व वातवर्धक आहे. गुणाने उष्ण आहे. सर्दी, पडसे, कफ या विकारांत मटकीच्या उकळलेल्या पाण्याचा उपयोग करावा. मटकीच्या उसळीपेक्षा lp34मटकीचे कढण किंवा उकळलेले पाणी जास्त उपयुक्त आहे. रासायनिक विश्लेषणात मांसवर्धक द्रव्ये २३ टक्के, पीठ ५६ टक्के, चोथा ४ टक्के, तर राख ३.५ टक्के असते.

पावटे, वाल
पावटे, वाल, कडवे वाल एकाच गुणाचे आहेत. त्या वालाची उसळ सर्वाना हवीहवीशी वाटणारी आहे. ज्यांचा अग्नी चांगला आहे त्यांच्याकरिता, विशेषत: भरपूर श्रम करण्याकरिता शेंगांच्या धान्यांत वाल जास्त चांगले धान्य आहे. श्रीवर्धन, हरिहरेश्वर या भागांतील वालात काही वेगळीच अनोखी चव असते. या वालांच्या उसळीत बिरडय़ाची उसळ असे नाव प्रचारात आहे. वाल रात्रभर गरम पाण्यात भिजवून किंवा त्यांची पुरचुंडी घट्ट फडक्यात बांधून ठेवली जाते. मोड आल्याशिवाय वाल्याच्या उसळीला मजा नाही. वाल वातवर्धक, उष्ण गुणाचे पौष्टिक व पचावयास जड आहेत. त्यामुळे सोबत आले, लसूण वापरले तर पोटात वात धरत नाही. वालाचे कढण किंवा सूप चांगले होतेच. ज्यांचा अग्नी मंद आहे, मूळव्याध, भगंदर, अतिसार, पोटदुखी, मलावरोध इत्यादी महास्रोतसाचे विकार ज्यांना आहेत, त्यांनी वाल वज्र्य करावे. बाळंतिणींना भरपूर दूध यायला वालाच्या उसळीचा उपयोग होतो. वालाच्या डाळीत मांसवर्धक द्रव्य २४ टक्के, पीठ ५७ टक्के, तेल १.५ टक्के, चोथा १ टक्का, राख ३ टक्के, तर अखंड वालात मांसवर्धक द्रव्य २० टक्के, पीठ ५३ टक्के, तेल २ टक्के, चोथा ५.५ टक्के, तर राख ३.५ टक्के असते.
वैद्य प. य. खडीवाले वैद्य

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2015 1:15 am

Web Title: sprouts
Next Stories
1 रुचकर : पोळीचा स्टफ पिझ्झा
2 कौटिल्य आणि शिवराय : ‘यथार्हदण्ड’ आणि ‘पृथिव्या लाभ’
3 वेध विश्वचषकाचा : जेव्हा अंदाज फसतात…
Just Now!
X