11 July 2020

News Flash

औषध कंपन्यांचा डाव किती खरा, किती खोटा?

स्वाइन फ्लूच्या साथीमुळे सध्या सगळीकडे चिंतेचं वातावरण आहे. अशा वेळी गरज आहे ती थोडं शहाणपणानं वागण्याची.

| February 27, 2015 01:31 am

स्वाइन फ्लूच्या साथीमुळे सध्या सगळीकडे चिंतेचं वातावरण आहे. अशा वेळी गरज आहे ती थोडं शहाणपणानं वागण्याची. आपल्या रोजच्या जगण्यातल्या घातक सवयी बदलण्याची. ते अवघड आहे, पण अशक्य नाही…

तो पुन्हा आला आहे.
असे म्हणताना, खरेतर तो गेला कधी होता, हाच मोठा प्रश्न आहे. तो होताच, इथेच होता, फक्त त्याचे अस्तित्व आपल्याला ठळकपणे जाणवत नव्हते इतकेच!
साध्या डोळ्यांनीच काय साध्या सूक्ष्मदर्शक यंत्रातूनही न दिसणाऱ्या इन्फ्युएन्झा विषाणूबद्दल बोलताना तो सतत आपल्या आजूबाजूला आहे, हे जाणवत राहते. मागची एक-दोन वर्षे तुलनेने शांत असणाऱ्या इन्फ्लुएंझा ए एच वन एन वन या विषाणूमुळे म्हणजेच स्वाइन फ्लूने या वर्षी आजपावेतो देशभरात अकरा हजारांहून अधिक लोकांना बाधित केले आहे; तर सातशेहून अधिक मृत्यू देशभरात झाले आहेत. २० फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रातही ८५० रुग्ण आढळले असून त्यापैकी ९२ जणांचा मृत्यू झाला आहे. ‘द ओन्ली थिंग सर्टन अबाऊट इन्फ्लूएन्झा व्हायरस इज दॅट नथिंग इज सर्टन’ (The only thing certain about influenza viruses is that nothing is certain.) या वाक्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. फ्लूचा विषाणू हा असा बेभरवशी पाहुणा आहे. खरेतर त्याला पाहुणा म्हणणेच चूक आहे. इतिहासात जरा डोकावून पाहिले तर आपल्या लक्षात येईल की तो आपल्या सावलीप्रमाणे आपल्यासोबत आहे. आपल्या विकासाच्या प्रत्येक पाऊलखुणांसोबत त्याच्याही पावलांचे (?) ठसे आपल्याला दिसतात. सोळाव्या शतकापासून त्याने अनेक नवनव्या अवतारांत आपल्याला मिठी मारली आहे. गेल्या चारशे वर्षांत फ्लूच्या जवळपास ३१ साथी जगभरात आल्या आहेत.
इतिहासाच्या पानांतून
विसाव्या शतकात फ्लूच्या तीन मोठय़ा साथी जगाने पाहिल्या आहेत. यातील १९१८ ची स्वाइन फ्लूची साथ ही आपल्याला ज्ञात असणाऱ्या साथीतील महाभयंकर साथ मानली जाते. त्या वेळच्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एकतृतीयांश लोकसंख्येवर या साथीचा परिणाम झाला होता. सुमारे पाच कोटी लोकांचा या साथीत मृत्यू झाला असावा, असा एक अंदाज आहे. जगाने पाहिलेली दोन महायुद्धे किंवा इतर कोणत्याही आपत्तीपेक्षा १९१८ च्या फ्लू साथीत झालेली जीवितहानी कितीतरी अधिक आहे. पहिले महायुद्ध मुळात थांबले ते या साथीमुळे, असेही अनेक जण मानतात. अमेरिकन सैन्य युरोपात उतरल्यामुळे नव्हे, तर या सैन्याने त्यांच्यासोबत आणलेल्या या फ्लू विषाणूमुळे अखेरीस पहिले महायुद्ध थांबले. पण इतिहासकारांनी फ्लूच्या विषाणूने केलेल्या या शिष्टाईचे श्रेय त्याला दिले नाही. हा विषाणू असा खविस की त्याने शत्रुराष्ट्रांसोबत बोलणी करायला आलेल्या अमेरिकन अध्यक्षाला म्हणजे व्रुडो विल्सनलाही सोडले नाही. तेही बिचारे काही काळ या विषाणूमुळे आजारी पडून अंथरुणावर पडून राहिले. तसा हा विषाणू लोकशाही समाजवादी आहे आणि म्हणूनच व्रुडो विल्सन, पुतिन, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि आमदार-खासदारांपासून ते सर्वसामान्य माणसापर्यंत सर्वाना तो समभावाने वागवितो.
१९१८ नंतर १९५७ चा आशियन फ्लू (एच टू एन टू) आणि १९६८ चा हाँगकाँग फ्लू (एच थ्री एन टू) या दोन साथींतही या आजाराने लाखो लोकांचा बळी घेतला. त्यानंतर २००९ ची स्वाइन फ्लूची साथ ही एकविसाव्या शतकातील फ्लूची पहिली मोठी साथ होती. या साथीत आपण या विषाणूच्या प्रसाराचा वेग अनुभवला. अवघ्या दोन ते अडीच महिन्यांत या विषाणूने मेक्सिकोपासून सुरुवात करून अवघे जग पादाक्रांत केले आणि १८ मार्चला मेक्सिकोमध्ये आढळलेला हा नवा विषाणू १५ मेला हैदराबादला पोहोचला, तर २० जूनला मुंबईमध्ये आणि मग तो जंगलातल्या आगीसारखा प्रचंड वेगाने पसरत राहिला. ३ ऑगस्ट २००९ ला पुण्यात रिदा शेख या शाळकरी मुलीचा या आजाराने मृत्यू झाला. हा स्वाइन फ्लूमुळे झालेला भारतातील पहिला मृत्यू. त्यानंतर महाराष्ट्रात आणि देशभरात खूप मोठय़ा प्रमाणावर जीवितहानी झाली. आज जवळपास दोनशेहून अधिक देशांमध्ये तो सुखेनैव नांदतो आहे. २००९ च्या स्वाइन फ्लू साथीत जगभरात १८ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला.
विषाणूचा जन्म आणि बारसे –
इन्फ्लुएंझा विषाणू हा एक महत्त्वपूर्ण विषाणू.. एच.आय.व्ही.च्या खालोखाल सर्वात जास्त संशोधन या विषाणूवर झाले आहे. तरीदेखील अद्यापपावेतो आपल्याला अजून बरेच काही कळावयाचे उरले आहे. २००९ मध्ये इन्फ्लुएंझा ए एच वन एन वन हा नवा विषाणू मेक्सिकोमध्ये आढळला म्हणजे नेमके काय झाले? आणि त्याला सर्वसामान्यपणे स्वाइन फ्लू या नावाने का ओळखले जाते?
इन्फ्लुएंझा विषाणूचे नैसर्गिक घर म्हणजे पाणपक्षी. बदक आणि त्यासारख्या पाणपक्ष्यांच्या शरीरात हा विषाणू राहतो. या पाणपक्ष्यांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव मुख्यत्वे आतडय़ाला होतो. बदक आणि इतर पाणपक्षी हे या विषाणूचे मूळ यजमान. नंतर या मूळ यजमानांकडून हा विषाणू मध्यस्थ यजमानाकडे म्हणजे कोंबडय़ा किंवा डुक्कर यांच्याकडे प्रवास होतो आणि तेथून मग तो माणसाकडे येतो. भातशेती करणाऱ्या भागात बदकपालनाचा जोडव्यवसायही आढळतो. चीनमध्ये शेतीमध्ये डुकरांचा सहभाग सुरू झाल्यानंतर या विषाणूचे संक्रमण बदकापासून डुकराकडे सुरू झाले. आज फ्लू विषाणूच्या जीवनक्रमात डुक्कर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतो. इन्फ्लुएंझाचा ए प्रकारचा विषाणू हा अत्यंत अस्थिर आहे. तो सतत स्वत:त जनुकीय बदल करून नवेनवे रूप धारण करतो. असा बदल जेव्हा अत्यंत लक्षणीय असतो तेव्हा जगभर नवी साथ (पँडेमिक) येण्याची शक्यता असते. साधारणपणे दर ४०-५० वर्षांनी असे होताना आढळते. हे जनुकीय बदल करण्यासाठी डुकराचे शरीर फ्लू विषाणूकरिता एखाद्या मिक्सरचे काम करते. डुकराला पाणपक्षी, कोंबडी, मानव या सर्वामध्ये आढळणाऱ्या फ्लू विषाणूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. असे झाले की हे वेगवेगळे फ्लू विषाणू डुकराच्या शरीरात परस्परांच्या जनुकांमध्ये अंशत: अदलाबदल करून त्यातून एका नव्या विषाणूला जन्म देतात. हा नवा विषाणू मग डुकरापासून मानवाकडे संक्रमित होतो आणि त्याची प्रसाराची क्षमता चांगली असेल तर एका नव्या साथीची सुरुवात होते. असा विषाणू नवा असल्याने मानवामध्ये त्याविरुद्ध कसलीही प्रतिकारशक्ती नसते. त्यामुळे तो अधिक वेगाने पसरतो. २००९ मध्ये नेमके हेच मेक्सिकोमधील वराहपालन केंद्रात घडले. आपल्याकडे भगवान विष्णूने वराह अवतार घेतल्याची कथा आपल्याला माहीत आहेच. तसा हा म्हणजे फ्लू विषाणूचा वराह अवतार आणि वराहाला आंग्ल भाषेत स्वाइन म्हणत असल्याने तो स्वाइन फ्लू. ‘पँडेमिक इन्फ्युएन्झा ए एच वन एन वन’ असे त्याचे शास्त्रीय नाव कोणी ठेवले असले तरीही लोकांसाठी तो आहे स्वाइन फ्लू.
lp13
२००९ ची ही जगभर पसरलेली साथ (पँडेमिक) संपुष्टात आल्याचे १० ऑगस्ट २०१० मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केले, पण त्याच वेळी आता हा विषाणू सिझनल फ्लूप्रमाणे वर्तन करत असून त्याच्या मर्यादित स्वरूपाच्या साथी जगभरात आढळून येऊ शकतात. त्यामुळे फ्लू सर्वेक्षणसंदर्भात सर्वानी दक्ष राहणे आवश्यक आहे, हेही नमूद केले. आज आपल्याकडे आलेली साथ हे त्याचेच एक उदाहरण आहे.
फ्लू वेगाने का पसरतो?
फ्लू हा खऱ्या अर्थाने ‘आंतरराष्ट्रीय’ आजार आहे. तो जगातल्या सर्व देशांत आढळतो. फ्लू इतक्या वेगाने कसा काय पसरू शकतो, याची काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत.
फ्लूचा अधिशयन कालावधी एक ते सात दिवस एवढा कमी आहे. हा आजार पसरतो हवेवाटे, रुग्णाच्या शिंकण्यातून आणि खोकल्यातून उडणाऱ्या थेंबातून.! एका साध्या वाटणाऱ्या शिंकेत सुमारे चाळीस हजार थेंब असतात, हे आपण लक्षात घेतले तर हा प्रसार किती वेगात होऊ शकतो हे आपल्या ध्यानात येईल. त्यात थंड हवामानात वाऱ्याचा वेग कमी असल्याने हे थेंब हवेत अधिक काळ तरंगतात, त्यामुळे प्रसाराचा वेग अजून वाढतो. फ्लू झाल्यामुळे मिळणारी प्रतिकारशक्ती ही अत्यंत अल्पजिवी असते. ती केवळ सहाआठ महिने टिकते. त्यामुळे एका सीझनला आपल्याला फ्लू झाला तरी पुढल्या सीझनसाठी आपल्याला इम्युनिटी मिळत नाही. शिवाय ही इम्युनिटी त्या त्या विषाणूपुरती असते. म्हणजे एच वन एन वन ची इम्युनिटी एच थ्री एन टू साठी उपयोगी पडत नाही. लक्षणे आढळणारे फ्लू रुग्ण जेवढे आढळतात, त्यापेक्षा कितीतरी पट अधिक लोक हे फ्लू विषाणू शरीरात जाऊनही लक्षणविरहित असतात. अशा अनेक कारणांमुळे फ्लू खूप वेगाने पसरतो. त्यात भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या आणि लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या देशात त्याचा प्रसाराचा वेग अधिकच वाढतो. ग्रामीण भागापेक्षा तो शहरी भागात अधिक सापडतो त्याचे कारणही तेच आहे. प्रौढांमध्ये त्याच्या प्रादुर्भावाचे प्रमाण पाच ते दहा टक्के, तर मुलांमध्ये २०-३० टक्के एवढे आहे. आजही दरवर्षी जगभरात अडीच ते पाच लक्ष लोक वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लू विषाणूमुळे मृत्युमुखी पडतात, असे जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते. अमेरिकेत फ्लू हे मृत्यूचे सहाव्या क्रमांकाचे प्रमुख कारण आहे.
हा कधीही कसा येतो?
भारतातील इन्फ्लुएन्झाचा नेमका सीझन कोणता, या प्रश्नाचे उत्तर भारताच्या भूगोलाइतकेच गुंतागुंतीचे आहे. शीतकटिबंधात नेमका फ्लू सीझन सांगता येतो आणि तो म्हणजे तेथील हिवाळा. थंड कोरडे असे या हवामानाचे वर्णन केले जाते. या कालावधीत असलेले कमी तापमान आणि त्यासोबतच कमी असलेली विशिष्ट आद्र्रता, वाऱ्याचा कमी वेग यामुळे फ्लूच्या प्रसारास मदत होते. या काळात थंडीमुळे अधिक काळ घरातच राहणारे लोक तसेच त्यामुळे वाढणारा जनसंपर्क, घरातील दाटीवाटी या कारणांमुळे फ्लू प्रसारास हातभार लागतो. हिवाळ्यामध्ये सूर्यप्रकाशाची असलेली कमतरता यामुळे अनेकांमध्ये निर्माण होणारी जीवनसत्त्व ड ची कमतरतादेखील फ्लू प्रसारास हातभार लावते, असे अनेकांचे मत! उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात मात्र फ्लूचा नेमका सीझन सांगणे महाकठीण. त्यात भारताचे हवामान गुंतागुंतीचे म्हणजे असे की कच्छचे रण ते मिझोराम यातून कर्कवृत्त जाते. भारतातील या रेघेखालील भाग उष्ण कटिबंधात, तर या रेषेवरील भाग समशीतोष्ण कटिबंधात मोडतो. या प्रकारच्या हवामानात फ्लूचा नेमका सीझन निश्चित करणे कठीण असते. हिवाळा आणि पावसाळा या दोन ऋतूंत जरी फ्लूच्या केसेस अधिक आढळत असल्या तरी हवामानातील विषमता आणि भारतासारख्या देशात लोकसंख्येचे मोठय़ा प्रमाणावर होणारे तात्पुरते तसेच कायमस्वरूपी स्थलांतर यामुळे जवळपास वर्षभर फ्लू रुग्ण कमीजास्त प्रमाणात आढळत राहतात. मात्र समुद्राकाठच्या प्रदेशातील किमान आणि कमाल तापमानातील असलेले अत्यंत कमी अंतर या प्रदेशाला तुलनात्मकदृष्टय़ा फ्लूपासून दूर ठेवते.
फ्लूचा ‘सीसॉ’चा खेळ
इन्फ्लुएन्झा विषाणूंचे अनेक प्रकार, उपप्रकार आहेत. प्रत्येक भौगोलिक विभागात, प्रत्येक मोसमात एखादा विशिष्ट उपप्रकार हा वातावरणात प्रामुख्याने आढळतो. हा विषाणू जनसमूहात पसरत राहतो. जितक्या लोकांना फ्लूची लक्षणे दिसतात त्यापेक्षा कितीतरी अधिक लोकांमध्ये हा विषाणू पोहोचलेला असतो. लक्षणेविरहित लोक म्हणजे सबक्लिनिकल केसेस. अशा तऱ्हेने समाजातील अधिकाधिक लोकांपर्यंत हा विषाणू पोहोचला म्हणजे एक प्रकारे त्या समाजात- सामुदायिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) तयार होते. स्वाभाविकपणे समाजातील त्या विषाणूचा प्रसार कमी होतो आणि मग इन्फ्लुएंझा विषाणूचा दुसरा एखादा उपप्रकार त्याची जागा घेतो. पुन्हा त्याच्याविरुद्धही हर्ड इम्युनिटी..! पण मुळात इन्फ्लुएंझा विषाणूविरुद्ध मिळणारी ही प्रतिकारशक्ती ही अल्पजीवी असते. ती अवघी ८ ते १२ महिने टिकते. त्यामुळे ज्या विषाणूविरुद्ध सामुदायिक प्रतिकारशक्ती प्राप्त झाली आहे तो विषाणू वर्षभरानंतर पुन्हा डोके वर काढू शकतो. हा इन्फ्लुएन्झा विषाणूंचा ‘सी-सॉ’चा खेळ आहे जणू! त्यात पुन्हा जनुकीय बदलातून निर्माण होणारे नवेनवे विषाणू भर घालतात. दीड-दोन वर्षांपूर्वी चीनमध्ये एच सेव्हन एन नाइन हा नवीन एन्फ्लुएंझा विषाणू आढळला आहे.
एकूण काय, इन्फ्लुएंझा विषाणूंचा हा खेळ अनादि अनंत आहे, तो अव्याहत चालू राहणारच!
..की औषध कंपन्यांचा डाव?
२००९ साली जगभरात पसरलेली स्वाइन फ्लूची साथ ही साथच नव्हती, तर तो एक अत्यंत सौम्य स्वरूपाचा आजार होता. मात्र जागतिक आरोग्य संघटना आणि इतर जागतिक संघटनांनी विशिष्ट औषध कंपन्यांचा फायदा व्हावा म्हणून ‘लांडगा आला रे आला’ अशी आवई उठवली, अशा स्वरूपाचे आरोप-प्रत्यारोप मधल्या काळात खूप झाले. डॉ. वोल्फगँग वोडार्ग या जर्मन डॉक्टरने या अनुषंगाने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. साथ काळात वाढलेला टॅमीफ्लू या औषधाचा खप आणि त्यानंतर फ्लू लसीसाठी निर्माण झालेली मागणी यामुळे अशी शंका उपस्थित होणे स्वाभाविक होते. मात्र असे आरोप आपण सर्व बाजूंनी तपासून घेऊन मगच त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या अनेक आरोग्यविषयक धोरणांवर औषध कंपन्या प्रभाव टाकतात, हे खरे असले तरी संसर्गजन्य आजारांच्या बाबतीत असा प्रभाव टाकायला निश्चित काही मर्यादा आहेत. आपण २००९-१० ची स्वाइन फ्लूची साथ अनुभवली आहे. अनेकांनी आपल्या प्रियजनांचा मृत्यू होताना पाहिले आहे. केवळ महाराष्ट्रात या काळात एक हजारच्या आसपास मृत्यू झाले आहेत. त्यामुळे ही साथ म्हणजे केवळ एक आवई होती, यात काहीही तथ्य नाही. औषध कंपन्या आणि लस निर्माते यांनी याकडे व्यावसायिक संधी म्हणून पाहणे, हा वेगळा भाग; पण त्यामुळे अशी साथच मुळात केवळ कोणीतरी निर्माण केली असे म्हणणे, हे कॉन्स्पिरिसी थेअरी थोडी जास्तच ताणणे आहे. इन्फ्लुएन्झाचा इतिहास पाहिला तरी या प्रकारच्या अनेक साथी आलेल्या आपल्याला दिसतात. याचा अर्थ जगाचे बाजारीकरण होण्याच्या आधीही अशा साथी आल्या आहेत. त्यामुळे अशा स्वरूपाच्या अफवांकडे थोडेसे काळजीपूर्वक पाहणे आवश्यक ठरावे.

फ्लूला करा रामराम!
फ्लू काय किंवा सध्या आपल्यासमोर आ वासून उभा राहिलेला टीबीसारखा जीवघेणा प्रश्न काय, आपल्या काही चुकीच्या सवयी बदलून आपल्याला या आजारांवर नियंत्रण आणणे शक्य आहे. हे आजार हवेवाटे म्हणजे शिंकण्या-खोकण्यातून पसरतात. त्यात आपण इतस्तत: थुंकत राहतो. यामुळे यांच्या प्रसाराला बळ मिळते. आपण ही साधी सवय बदलली तरी या आजारांचे प्रमाण कमी व्हायला कितीतरी मदत मिळणार आहे. ज्याला आपण रेस्पिरेटरी एटिकेट्स म्हणतो, त्या आपण पाळायला हव्यात. शिंकताना खोकताना नाकातोंडावर रुमाल धरणे, हात पुन्हा पुन्हा स्वच्छ धुणे, आपल्याला फ्लूची लक्षणे असतील तर आपला जनसंपर्क कमी करणे, या साध्या साध्या गोष्टी आपले फ्लूपासून रक्षण करतील. महत्त्वाचे म्हणजे आहार आणि विहार. शारीरिक व मानसिक ताण टाळणे, भरपूर पाणी पिणे, धूम्रपान टाळणे आणि हस्तांदोलनाऐवजी आपला खणखणीत भारतीय नमस्कार घालणे फ्लूला ‘राम राम’ करण्याकरिता आवश्यक आहे.

इन्फ्लुएन्झा लसीकरण
फ्लूविरोधी लसीकरण हा एक वादाचा मुद्दा आहे. याचे उत्तर सरळ सरळ होय किंवा नाही असे एका शब्दात देणे कठीण आहे. फ्लू नियंत्रणात फ्लू लसीकरणाचे महत्त्व मर्यादित आहे. नैसर्गिक प्रतिकारशक्तीप्रमाणेच लसीकरणामुळे मिळणारी प्रतिकारशक्तीही अल्प काळ म्हणजे ८-१२ महिनेच टिकणारी असते. त्यामुळे हे लसीकरण दरवर्षी करणे आवश्यक आहे. तसेच त्या त्या वर्षी कोणता विषाणू वातावरणात असेल त्यावर लसीची उपयुक्तता अवलंबून असते. वातावरणातील प्रबळ असणारा विषाणूचा प्रकार बदलला की लसीतील घटकही बदलावे लागतात. अनेक वेळा वेगवेगळे विषाणू वेगवेगळ्या प्रदेशांत प्रबळ असतात. जसे सध्या आपल्याकडे एच वन एन वन हा विषाणू आढळतो आहे, तर डेन्मार्कमध्ये एच थ्री एन टू. अर्थात सध्या किमान तीन फ्लू (ट्रायवॅलंट) विषाणूंविरोधी एकत्रित लसही उपलब्ध आहे.
अर्थात फ्लू लसीकरणाच्या काही मर्यादा असल्या तरी रुग्णालयात कार्यरत डॉक्टर्स, नर्सेस आणि अतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्ती यांच्याकरिता हे लसीकरण महत्त्वाचे आहे.
आपल्या हातात काय?
इन्फ्लुएन्झा आपल्यासोबत राहणारच आहे. कधी सी-सॉ खेळत, कधी बहुरूपी बनत. आपण काय करायचे, हा लाखमोलाचा प्रश्न! आपल्या हातात आहे शहाणपणाने वागणे. लोकशाही आणि आरोग्य या दोन्हींमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. या दोन्ही गोष्टी टिकवण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी सातत्यशील प्रयत्नांची गरज असते. आरोग्य म्हणजे आदल्या रात्री क्लासच्या नोट्स वाचून परीक्षा देण्यासारखी इन्स्टंट गोष्ट नाही. आपल्याला आरोग्यदायी सवयी लावाव्या लागतील. याला कोणताच शॉर्टकट नाही.
सर्वसाधारणपणे फ्लू हा सौम्य स्वरूपाचा आजार आहे. पण तरीही सर्दी खोकला अंगावर काढू नये. डॉक्टरांच्या सल्लय़ाने उपचार घेण्यासोबतच गरम पाण्यात मीठ हळद टाकून गुळण्या करणे, गरम पाण्याची वाफ घेणे आणि पुरेशी विश्रांती घेणे हा उपचाराचाच एक भाग आहे, याचे विस्मरण होऊ नये.
फ्लूचा धोका सर्वाधिक कोणाला आहे, हेही आता आपल्या ध्यानात आले आहे. मधुमेह, हृदयरोग, दमा यांसारखे जुनाट आजार असणारे लोक आणि गरोदर महिला या व्यक्तींमध्ये हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो आणि म्हणून या व्यक्तींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. गेल्या चार-पाच वर्षांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या गरोदर मातांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आपापल्या डॉक्टरांच्या सल्लय़ाने अतिजोखमीच्या लोकांचे फ्लूविरोधी लसीकरण हा एक महत्त्वाचा भाग आहे. घरातल्या फ्लू रुग्णाची काळजी कशी घ्यावी, एका रुग्णाची काळजी घेताना त्याच्यापासून स्वत:ला आणि घरातील इतरांना हा आजार होणार नाही ना, यासाठी दक्ष असणे आवश्यक आहे. मात्र फ्लूचा प्रसार टाळणे म्हणजे रुग्णाला हिडीसफिडीस करणे नव्हे किंवा कोणत्याही रुग्णाला वाळीत टाकणे नव्हे, हेही समजणे गरजेचे आहे. कारण फ्लूचा बीमोड करणे म्हणजे आपले माणूसपण गमावणे नव्हे..!
१९१८ च्या स्वाइन फ्लू साथीच्या वेळी मुली दोरीवर उडय़ा मारता मारता एक गाणं म्हणायच्या –
“I had a little bird,
Its name was Enza.
I opened the window,
And in-flu-enza”
फ्लूचे हे पाखरू आपल्या घरटय़ात तर विसावले आहेच, पण आपण न घाबरता, पॅनिक बटन न दाबता सावध राहिलो आणि शहाणपणाने वागलो तर आपल्या घरटय़ाची एक काडीही विस्कटणार नाही, इतके मात्र नक्की.!डॉ. प्रदीप आवटे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2015 1:31 am

Web Title: swine flu 4
Next Stories
1 ‘स्वाइन फ्लूू’चे वास्तव
2 पर्यटन : बगान, पॅगोडांच्या देशा
3 पर्यटन विशेष : औंधचे नितांतसुंदर संग्रहालय
Just Now!
X