सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे कोकणचे हृदय. गूढ, रम्य, नितांत सुंदर, गर्द हिरवाईने नटलेला, लाल मातींने, पांढऱ्या सागर पुळणींनी, असंख्य फळाफुलांनी बहरलेला हा परिसर. अत्यंत रमणीय. अनेक देवळे, राउळे, मूर्ती, विविध चमत्कारिक गूढ अशा त्यांच्याशी निगडित गोष्टी, रूढी, परंपरा अशा सर्वाचे मिश्रण म्हणजे हा सिंधुदुर्ग परिसर. मालवणी भाषा ही तर इथली खासियत. आंबे आणि काजू यांचे आगर असलेला हा जिल्हा या दोन फळांमुळे थेट जागतिक पातळीवर ख्यातकीर्त झालेला आहे. देवगड हापूसचा अभिमान मिरवणारा हा परिसर. इथल्या प्रत्येक गावात काही ना काही तरी वेगळे आहेच.
खारेपाटणची सूर्यमूर्ती
खारेपाटण ही पूर्वीची अत्यंत गजबजलेली बाजारपेठ होती. कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्य़ातून सिंधुदुर्गात येणारे रस्ते खारेपाटण इथेच सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात प्रवेश करतात. याच खारेपाटण इथे कपिलेश्वराचे मंदिर आहे. गाभाऱ्याच्या बाहेर एका भिंतीला टेकवून ठेवलेली अत्यंत रेखीव, देखणी, सर्वागसुंदर अशी सूर्याची मूर्ती आहे. अंदाजे ४ फूट उंचीची ही मूर्ती आणि अन्य परिवार मूर्ती एकाच काळ्या पाषाणात कोरलेल्या आहेत. आपल्याकडे मुळातच सूर्यमूर्ती खूप कमी. पण ही सूर्यमूर्ती अत्यंत देखणी आहे. डोक्यावर मुकुट, गळ्यात एकावली आणि इतर आभूषणे, कमरेला मेखला आणि नक्षीदार वस्त्र, दोन हातात कमळे, पायाशी सेवक आणि अत्यंत प्रसन्न चेहरा अशी ही मूर्ती आवर्जून पाहिली पाहिजे.
नापणे धबधबा
महाराष्ट्रात बारमाही धबधबे तीन आहेत आणि आश्चर्य म्हणजे हे तीनही कोकणात आहेत. एक ठाणे जिल्ह्य़ात दाभोसे इथला, दुसरा संगमेश्वरजवळ नायरी-तिवरे इथला धोधावणे धबधबा आणि तिसरा हा वैभववाडी तालुक्यातील नापणे किंवा शेर्पे धबधबा. मुंबई-गोवा हमरस्त्यावर तळेरे नावाचे गाव आहे. इथून पूर्वेला वैभववाडीकडे रस्ता जातो. या रस्त्यावर ८ कि.मी. गेले की शिडवणे गाव आहे. इथे पुन्हा डावीकडे ४ कि.मी.वर बावधणे हे गाव लागते. इथे दोन रस्ते लागतात. त्यापैकी उजवीकडच्या रस्त्याने २ कि.मी. गेले की हा नापणे धबधबा आहे. बारमाही पडणारा हा धबधबा दोन टप्प्यांत खाली कोसळतो. इथे असलेला दगड हा वाळूकाश्माचा आहे. जवळच एक उपाहारगृह आहे. तिथे चहा-फराळाची सोय होऊ शकते. पुण्याहून गगनबावडा घाटाने देवगड किंवा सिंधुदुर्गला जाताना पण हा धबधबा पाहून पुढे जाता येईल. देवगडपासून याचे अंतर ६० कि.मी. भरते. निसर्गाचे अनाघ्रात सौंदर्य पाहण्यासाठी इथे नक्कीच जायला हवे.
तारव्याचा सडा
राजापूरपासून देवाचे गोठणेला जाऊ लागले की १० कि.मी. वर बारसू/ बारसव गाव लागते. इथून डावीकडे जाणारा एक रस्ता आहे. तयार रस्त्याने अंदाजे दीड कि.मी. गेले की एक भन्नाट कातळशिल्प पाहायला मिळते. या भागाला तारव्याचा सडा असे म्हणतात. अंदाजे ५० फूट लांब आणि २० फूट रुंद अशी एक काळ्या खडकावर खोदचित्र चौकट आहे. काय आहे इथे. इथे दोन वाघ एकमेकांसमोर उभे आहेत आणि त्यांच्यामध्येच एक मानवी आकृती या दोन वाघांना थोपवून धरते आहे असे चित्र खडकात खोदलेले आहे. पण खरे आश्चर्य पुढेच आहे. हेच चित्र जर विरुद्ध बाजूने समोर जाऊ न पाहिले तर एक मोठ्ठे गलबत समुद्रातून चाललेले दिसते. त्याला शिडे आहेत आणि खाली पाण्याच्या लाटा, पाण्यामधले मासे असे सर्व दाखवले आहे. इतके सुंदर, इतके अद्भुत आणि आखीवरेखीव चित्र का बरे खोदले असेल याचा काही बोध होत नाही. थोडय़ाच अंतरावर २-३ फूट लांबीचे मासे खोदलेले दिसतात. कोकणात आणि मुख्यत्वे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात अशी अजून काही खोदचित्रे आढळली आहेत. त्यांचे प्रयोजन आणि त्यांचा काळ मात्र समजत नाही. अशी आगळीवेगळी चित्रकृती मुद्दाम जाऊ न पाहिली पाहिजे. या चित्राचे जतन झाले पाहिजे. नाही तर असेच एक चित्र गणपतीपुळ्याला जाणाऱ्या निवळी फाटय़ावर होते. परंतु रस्तारुंदीकरणात ते निम्म्याहून अधिक संपले आहे. याची कोणालाही ना खेद..ना खंत. किमान या चित्राचे जतन तरी व्हायला हवे. हा अगदी दुर्मीळ असा ठेवा आहे.
* देवगड-वाडा-गिर्ये-विजयदुर्ग-देवगड ही एक दिवसात होणारी सहल आहे.
* देवगड-कुणकेश्वर-मिठबाव-आचरे-मालवण असा दोन दिवसांचा कार्यक्रम आखला तर तो चांगला. देवगड आणि मालवण दोन्हीकडे राहण्या-जेवणाच्या उत्तम सोयी आहेत. अंतर ४० कि.मी. आहे. मालवणला सिंधुदुर्ग, तारकर्ली पाहून कोल्हापूर, पुण्याकडे पुढे जाता येईल.
* कणकवली-कुडाळ-सावंतवाडी- हा एक दिवसाचा प्रवास सुंदर होईल. सावंतवाडीला सावंतांचा राजवाडा, त्यातले संग्रहालय पाहण्याजोगे आहे. तसेच बाजारात सुप्रसिद्ध लाकडी खेळण्यांची दुकाने बरीच आहेत.
* कणकवली-खारेपाटण-राजापूर-तरव्याचा सडा-देवाचे गोठणे-राजापूर-कणकवली अशीसुद्धा एक दिवसाची सहल ठरवता येईल. राजापूरला जेवणाची सोय चांगली आहे.
उमाडय़ाचो महादेव
वैभववाडी-तळेरे रस्त्यावर नाधवडे नावाचे गाव लागते. ‘वासूनाका’ लिहिणारे भाऊ पाध्ये याच नाधवडय़ाचे. तिथे अलीकडे एक कि.मी. वर रस्त्याच्या उजवीकडे एक जीर्णोद्धारित शिवमंदिर आहे. तिथपर्यंत जायला एक कच्चा रस्ता आहे. मंदिरापुढे एक छोटी नदी वाहते. त्यावर लाकडी साकव आहे. साकवावरून खाली नितळ पाण्याचा तळ दिसतो. त्या पाण्यातून अनेक बुडबुडे (उमाडे) वर येत असतात. या डोहात उतरून आपल्याला ते बुडबुडे जवळून पाहता येतात. पाणी अगदी गुडघाभरच आहे. ते बुडबुडे पायाला गुदगुल्या करतात. हे कसले बुडबुडे आहेत? त्यात हवा आहे का मिथेनसारखा वायू असतो ? तज्ज्ञांसाठी हे कोडेच आहे. पण डोहात अनेक ठिकाणी ही बुडबुडय़ांची मालिका पाहायला मिळते.
अगदी असेच बुडबुडे मठ बुद्रुक, तालुका मालवण इथल्या बोंबडेश्वर महादेवाच्या मंदिरातदेखील पाहायला मिळतात.
विजयदुर्गजवळील गिर्ये
सुप्रसिद्ध विजयदुर्गच्या अलीकडे जेमतेम तीन कि.मी वर गिर्ये गाव लागते. गावातल्या शाळेजवळ एक खोदीव पायऱ्यांची वाट आपल्याला एका जुन्या, टुमदार, रामेश्वर मंदिरात घेऊ न जाते. सुंदर कौलारू मंदिर, फरसबंदी अंगण, मंदिरासमोरच्या दीपमाळा आणि नीरव शांतता इथे आपले पाय खिळवून ठेवतात. १७९२-९३ साली आनंदराव धुळप यांनी एका पकडलेल्या जहाजावर मिळालेली एक अजस्र घंटा पुढे कृष्णराव धुळप यांनी १८२७ साली याच रामेश्वराला अर्पण केली. ती घण्टासुद्धा पाहता येते. घंटेवर १७९१ सालचा उल्लेख आहे. या गिर्ये गावातच आंबा संशोधन केंद्राच्या जवळ खाडीच्या किनारी मराठा नौदलाची मोठ्ठी आरमारी गोदी आहे. अंदाजे ११० मीटर लांब आणि ७० मीटर रुंद अशा आकाराची ही गोदी आहे. आंग्रे यांच्या काळात वीस ते दीडशे टनी मराठी जहाजे असत. पुढे धुळप यांच्या काळात ती २५० टन इतकी मोठी होती. या गोदीची क्षमता ५०० टनी जहाजांची वाहतूक सुलभतेने होईल अशी आहे. गिर्ये गावचा रामेश्वर आणि ही मराठी आरमाराची गोदी, विजयदुर्गबरोबर मुद्दाम थांबून पाहिली पाहिजे.
मालवणपासून फक्त १५-१६ कि.मी. वर आहे कुणकावळे गाव. या गावात आहे दुर्गादेवीचे मंदिर. प्रत्यक्ष धर्मराजांनी या देवीची स्थापना केली अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. खास कोंकणी पद्धतीचे देऊळ आणि आत अतिशय देखणी साडेचार फूट उंचीची दुर्गादेवीची उभी मूर्ती आहे. मूर्तीवर वस्त्रप्रावरणे, दागदागिने, ठसठशीत कोरलेले आहेत. देवीच्या पायात खडावा आहेत तर केशसंभार अप्रतिम आहे. अत्यंत मनोहारी अशी ही मूर्ती, आडवाटेला असली तरी खास वेळ ठेऊन पाहायला हवी.
राजापूर-ओणी मार्गे अनुस्कुरा घाटाकडे रस्ता येतो. तिथे आधी पाचल नावाचे गाव लागते त्या गावात आहे. संगनातेश्वराचे देऊळ. देवळातील शिवपिंडीवर तिथेच ठेवलेल्या अभिषेकपात्रातून पाण्याच्या पाच धारा पडतात. त्या पडू लागल्या की शिवपिंडीमधून जुन्या रेडिओच्या व्हॉल्वमधून यायचा तसा आवाज येतो. याला सिंहनाद म्हणतात. असाच आवाज शेजारीच असलेल्या नदीमधल्या दगडावर पण येतो. सिंहनाद हा पण एक दुर्मीळ निसर्गचमत्कार म्हणावा लागेल.
देवगड तालुक्यातले पुन्हा पुन्हा जाऊन पाहावे असे ठिकाण म्हणजे कुणकेश्वर. इथला समुद्रकिनारा आणि त्याचा जवळचे शिवमंदिर अत्यंत देखणे आहे. या मंदिराच्या पूर्वेला डोंगर एक गुहा आहे. तांबडय़ा कापीव दगडाची गुहा १० फूट १० फूट आकाराची आहे. या गुहेत १८ कोरीव मानवी चेहरे असलेले मुखवटे ठेवलेले आहेत. एकेका बस्कानीत एक सत्रे व एक पुरुष मूर्तीच्या मस्तकांच्या जोडय़ा अशा ८ जोडय़ा इथे आहेत. कदाचित हे पूर्वजांच्या स्मरणार्थ केले असतील. पण असे मुखवटे इतर कुठे दिसत नाहीत आणि या इथे गुहेत ठेवायचे प्रयोजन कळत नाही.