रोजच्या रुटीनपेक्षा वेगळं जग अनुभवण्यासाठी घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर सिक्किम हा निश्चितच चांगला पर्याय आहे.

दाट झाडी, उंचच उंच डोंगररांगा, नागमोडी वळणं किती वळणदार असू शकतात याचा दाखला मिळावा असे रस्ते, वळणावळणावर सतत भेटणारे धबधबे, आपण स्वर्गात असल्याचा आभास निर्माण करणारी ढगांची दुलई आणि त्यातून मध्येच डोकावणारी पांढरीशुभ्र शिखरं.. या दृश्यांना कोंदण आहे, प्रत्येक वळणावर एक वेगळं रूप दाखवणाऱ्या हिमालयाचं आणि त्याच्या अंगावर खेळत- बागडत, दौडत, रोरावत वाहणाऱ्या तिस्तेचं. सिक्किमबद्दल खूप जणांकडून ऐकलं असलं, शेकडो फोटो पाहिले असले, तरीही समोर दिसणारं दृश्य शब्दबद्ध करताच येऊ शकत नाही, फोटोच्या फ्रेममध्ये बसू शकत नाही इतकं विलक्षण असतं. ईशान्येकडचं एक राज्य या एकाच साच्यातून बघितल्यामुळे कित्येक र्वष सिक्किम पर्यटनाच्या दृष्टीनं दुर्लक्षित राहिलेलं; पण गेल्या दशकभरात भारताच्या पर्यटनाच्या नकाशावर या टोकावरच्या छोटय़ा राज्यानं महत्त्वाचं स्थान मिळवलंय. इथे पर्यटन व्यवसाय चांगलाच फुलला.. नव्हे तर फोफावला आहे. यात जवळच्या बंगाल्यांबरोबरच मराठी माणसाचाही मोलाचा वाटा आहे, हे तिथले व्यावसायिक मान्यच करतात. अनेक मराठी पर्यटक हल्ली आवर्जून सिक्किमला भेट देतात, पण भेट देणं आणि सिक्किम पाहणं यात बराच फरक आहे. दार्जिलिंगला जातोय तर सिक्किम पाहून येऊ किंवा नेपाळला जाता जाता सिक्किम पाहून जाऊ या दृष्टिकोनातून दोन-चार दिवस हाताशी ठेवून गेलात तर खरं सिक्किम दिसणारच नाही. दिसतील ती फक्त पर्यटनाची दुकानं. सिक्किम नजाकतीनं पाहायचं तर किमान आठ-दहा दिवस हाताशी हवेत. इतकं वैविध्य आणि पर्याय या छोटय़ाशा राज्यात नक्कीच आहेत.
पर्यटनाच्या दृष्टीने ईशान्येकडच्या इतर कुठल्याही राज्यांपेक्षा सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत राज्य म्हणून सिक्किम लोकप्रिय आहे. राज्यात अद्याप एकही रेल्वे स्टेशन किंवा विमानतळ नाही. बंगालमधल्या बागडोगरा विमानतळापासून किंवा जलपैगुडी रेल्वे स्टेशनपासून किमान पाच तासांचा रस्ता कापणं हाच एक मार्ग. हेलिकॉप्टर सेवेचा खर्चीक पर्याय आहे, पण तिस्ता नदीच्या काठाकाठानं जाणारा वळणावळणाचा रस्ता आणि बाजूची बदलत जाणारी वृक्षराजी निरखत जाणं हा चांगलाच अनुभव आहे. सिक्किम राज्याचा बराचसा भाग देशाच्या सीमेजवळचा भाग म्हणून लष्कराच्या अमलाखाली असला तरीही या राज्यात कुठेही असुरक्षित वाटत नाही. ‘यू आर अंडर सव्र्हेलन्स ऑफ चायना’ ही पाटी पहिल्यांदा वाचताना दचकायला होतं, तेवढंच. सिक्किममध्ये कुठल्याही सीमेजवळच्या भागातून हिंडताना परवाना लागतो. बंगालच्या सीमेवरून सिक्किममध्ये शिरतानाही तुमची नोंदणी केली जाते. राजधानी गंगटोकमधूनच हे सगळे परवाने घ्यावे लागतात. (स्थानिक लोक या शहराचा उच्चार गान्तोक किंवा गँटोक असा करतात.. ते का, असं विचारलं तेव्हा याचा आणि गंगेचा काही संबंध नाही, हे लक्षात आलं. गँटोक म्हणजे डोंगराचं टोक किंवा डोंगरमाथा, असं सांगण्यात आलं.)

फुटबॉल, थुकपा आणि मोमो
सिक्किमच्या सौंदर्याखेरीज लक्षात राहिलेल्या या तीन गोष्टी. इथली जनता फुटबॉलप्रेमी. ते प्रेम इथल्या वाहनांवर लागलेल्या फुटबॉल क्लबच्या झेंडय़ांवरून कळून येतं. मँचेस्टर युनायटेड, चेल्सी, बार्सिलोना वगैरेंचे चाहते इथे बक्कळ. टुरिस्ट गाडय़ा चालवणारे ड्रायव्हर विशेष फुटबॉलप्रेमी. त्यांचं प्रेम गाडय़ा सजवून ते दर्शवतात. फुटबॉल विश्वचषकाच्या सुमाराला सिक्किमला जाणं झाल्याने या गाडय़ांवरचा रंगोत्सव अगदी नजरेत भरला. गाडीचा डॅशबोर्ड, कुशन्सपासून सगळीकडे आपापल्या संघाचे झेंडे, लोगो दिसतात. या भागातले भुटिया, बौद्ध आणि हिंदू सगळ्यांच्याच गाडय़ांवर आपापल्या देवतांच्या जोडीला फुटबॉलचेही ‘देव’ दिसतात.
या भागातलं लोकप्रिय खाणं म्हणजे मोमो. मोदकासारखा हा पदार्थ आपल्या शहरांमध्येही आता मिळू लागल्यानं नवीन राहिलेला नाही. पण सिक्किममध्ये कुठेही गेलात तरी हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत वाफाळलेल्या मोमोजची चव निराळीच लागते. त्याबरोबर तसंच गरमागरम थुकपा प्यायचं. नूडल्स आणि भाज्या किंवा मांस घालवून शिजवलेलं हे सूप सिक्किमला मोमोजएवढंच प्रसिद्ध आहे. या पदार्थाचं मूळ खरं तर तिबेटमध्ये आहे. सिक्किममध्ये आजही मूळ सिक्किमी वंशाच्या लोकांबरोबरीने नेपाळी आणि तिबेटी वंशाचे लोक राहतात. उत्तर आणि सिक्किममधले बहुतांश लोक नेपाळी भाषाच बोलतात. या सगळ्या संस्कृतींचा मिलाफ सिक्किमच्या खाद्यसंस्कृतीत बघायला मिळतो.

गंगटोक हा शहरी भाग असला तरी पूर्ण डोंगरउतारावर वसलेलं हे शहर आहे. त्यामुळे कुठेही जायचं झालं तरी अरुंद आणि वळणावळणाचा घाटरस्ता किंवा पायी जायचं झालं तर पायऱ्या ठरलेल्याच. गंगटोकमध्ये धुक्याचं राज्य नेहमीचंच. हिवाळ्यातले काही महिने सोडले तर बहुतेक वेळेला ढग आपल्या भेटीला आलेले असतात. धुक्यात लपेटलेल्या शहराचा मध्यवर्ती भाग म्हणजे एम.जी. मार्ग. या रस्त्यावर गाडय़ांना बंदी आहे. निवांतपणे रेंगाळत, दुकानं हिंडत, खात-पित दिवस घालवायचा असेल तर ही मस्त जागा. संध्याकाळच्या सुमाराला बाजारपेठेच्या या मुख्य रस्त्यावर अचानक धुक्याची झालर पसरते आणि आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. हे ओलसर पांढुरके ढग अंगावर घेत चहा-कॉफीचे घुटके घेत किंवा थुकपाची चव चाखत रस्त्यावरच्या बाकांवर बसून राहिलं तरी निवांत सुट्टीचा परमोच्च आनंद मिळेल ही खात्री.

पूर्व सिक्किम
पूर्व सिक्किम जिल्ह्य़ात हे राजधानीचं शहर आहे. गंगटोक सोडून पाच किलोमीटर पूर्वेला गेलं की, लगेच लष्करी हद्दीचा परिसर सुरू होतो. साधारण ४० किलोमीटर अंतरावर चीनची हद्द सुरू होते. नथुला हे आपल्या हद्दीतलं शेवटचं ठाणं. या खिंडीपर्यंत जाता येतं आणि इथून काही अंतरावर चिनी लष्कराचं ठाणंही नजरेच्या टप्प्यात असतं; पण नथूलापर्यंत जाणं हे काही सहजसाध्य नाही. त्यासाठी दुहेरी योग लागतो. दररोज किती लोकांना नथूलापर्यंत सोडायचं याचा निर्णय सुरक्षा दल घेतं. दुसरं कारण अर्थातच बेभरवशाचा निसर्ग. निसर्गानं साथ दिली आणि तुमचा परवानाही वेळेत हातात आला तर तुम्ही नथूलाकडे प्रयाण करू शकता. हा रस्ता जेमतेम ३०-३५ किलोमीटरचा, पण तो कापताना प्रत्येक वळणावर हृदयाचा ठोका चुकेल, अशी परिस्थिती. मुळात या भागात दरडी कोसळणं ही नित्याची बाब आहे. त्यात पाऊस असेल तर विचारायलाच नको. दरड कोसळलेली असेल तर असाल त्या जागेवर किंवा मागे जाऊन वाट पाहणं याला पर्याय नाही. अशा वाटेत अडकलेल्यांच्या अनेक कहाण्या तुम्हाला गंगटोकमध्येच ऐकू येतात; पण या अशा वाऱ्या- पावसात आणि धोकादायक परिस्थितीत बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची माणसं तातडीनं रस्ता मोकळा करायला सज्ज होतात. हे जवान पाहिले की, ‘रारंग ढांग’ची आठवण अगदी प्रकर्षांनं होते.
तुमचं नशीब चांगलं असेल तर नथुलापर्यंत जाता येतं. ऐतिहासिक काळातला प्रसिद्ध सिल्क रूटही बघता येतो. नथूलाकडे जाणाऱ्या रस्त्यातच एक फाटा थोडा खालच्या दिशेनं जातो- बाबा मंदिराकडे. हे मंदिर आहे एका शहीद जवानाच्या नावानं बांधलेलं. हरभजन सिंग हा भारतीय लष्करातला जवान याच सीमावर्ती भागात चीनबरोबरच्या युद्धात शहीद झाला. हे मंदिर लष्करातील जवानांनीच बांधलं आहे. बाबा हरभजन सिंगच्या मृत्यूभोवती मात्र अनेक कहाण्या आहेत. बाबा हरभजन अजून जिवंत आहे आणि तो सीमेवरच्या इतर जवानांचं रक्षण करतोय अशी अनेकांची श्रद्धा आहे.
उत्तर सिक्किम
सिक्किम हिमालयाचं खरं राकट सौंदर्य अनुभवायचं असेल तर उत्तर सिक्किमला जायलाच हवं. उत्तर सिक्किममधलं लाचुंग हे त्यातल्या त्यात मोठं गाव. हादेखील सीमावर्ती भाग असल्यानं वेगळा परवाना गंगटोकहूनच घेऊन यावं लागतं. लाचुंगला जायचं ते इथली ‘फूलों की घाटी’ पाहायला. यमथांग व्हॅलीचा हा प्रदेश तसा दुर्गम. राहण्यासाठी लाचुंगलाच सोय होऊ शकते, पण या यमथांग व्हॅलीत वसंत ऋतूत काय बहार असते, ते प्रत्यक्ष डोळ्यांनाच अनुभवायला द्यावी. ऱ्होडोडेंड्रॉन जातीच्या रंगीबेरंगी फुलांनी हा भाग फुलून जातो. १२ हजार फुटांपेक्षा उंच प्रदेशात व्हॅलीतल्या नदीकिनाऱ्यापासून वरच्या झीरो पॉइंटपर्यंत गाडीनं जाता येतं. या झीरो पॉइंटच्या पुढे मानवनिर्मित रस्ता नाही. भारताच्या हद्दीतला हा शेवटचा पॉइंट. मध्ये ‘नो मॅन्स लॅण्ड’ आणि पुढे चीन. मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ातही इथे हिमवर्षांव अनुभवायला मिळाला. धुक्याच्या सोबतीनं व्हॅलीची चढण चढताना अंगावर पडणाऱ्या पावसाच्या धारांचं हिमकणात कधी रूपांतर झालं कळलंच नाही. या व्हॅलीत समोर येतं ते हिमालयाचं राकट रूप. रंगीत फुलांच्या पाश्र्वभूमीवर मागचा हिमाच्छादित पर्वत तर अधिकच रांगडा वाटतो. या ठिकाणी भर पावसात किंवा हिमवर्षांवात जायचं म्हणजे, दरड किंवा हिमकडा कोसळण्याची भीती मात्र कायम मनात असते. लाचेन हे उत्तरेकडचं दुसरं मोठं गाव. या गावात मुक्काम केला तर उत्तरेकडच्या दुसऱ्या टोकाला गुरुडोंगमार लेकपर्यंत जाता येतं. हा जगातल्या सर्वात उंचीवरच्या सरोवरांपैकी एक आहे. (उंची – १७ हजार फुटांहून अधिक). लडाखच्या वर्णनातीत सौंदर्याची आठवण देणारा हा परिसर, पण लाचेनला जाणारा रस्ता दरड कोसळल्यानं बंद झालेला. त्यामुळे फोटोंवरच समाधान मानावं लागलं.
सिक्कीमचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे बहुरंगी लोकजीवन. बौद्ध विहार आणि पॅगोडा बघायला आणि धार्मिक पर्यटनासाठीदेखील इथे अनेक लोक येतात. रंगीबेरंगी पॅगोडाची वैशिष्टय़पूर्ण रचना, आतला घंटानाद, अंतर्मुख करणारी शांतता एकदा तरी अनुभवण्यासारखी. रुमटेक, लाचुंग, पेलिंग इथल्या मोनास्ट्री आवर्जून बघण्यासारख्या आहेत.
सिक्किमचा क्लायमॅक्स
सिक्किमवरचा लेख कंचनजुंगाच्या उल्लेखाशिवाय केवळ अपूर्ण. जगातलं हे तिसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर सिक्किममध्ये आहे. खरं तर सिक्किमच्या अनेक शहरांमधून कंचनजुंगा दिसू शकतं. गंगटोकमधूनही ते दिसतं म्हणे. पण या धुक्याच्या राज्यात ते दिसणं ही गोष्ट वाटते तितकी सहज नाही. गंगटोकमध्ये पोचल्याच्या पहिल्या दिवसापासून आम्ही या कंचनजुंगाच्या दर्शनासाठी वेडे झालेलो, पण पहिल्या सहा दिवसांत काही जणाचं दर्शनही झालं नाही. पश्चिमेकडच्या पेलिंगपासून जवळ कंचनजुंगाचा पायथा आहे. तिथूनच कंचनजुंगाचा ट्रेक सुरू होतो. पेलिंग हे शहर कंचनजुंगाच्या त्या दिव्य दर्शनासाठीच पर्यटनाच्या नकाशावर आलेलं. शहरातल्या सगळ्या हॉटेल्समधून हे शिखर दिसणार.. तशीच या हॉटेल्सची रचना. पेलिंगला पोहोचेपर्यंत पाऊस सोबतीला होता, धुक्याची दुलई दूर करायला काही तो हिमालय तयार नव्हता. पेलिंगमधली शेवटची संध्याकाळ थोडी आशा लावून गेली. दूर क्षितिजावरची काही शिखरं लखलखली. कंचनजुंगा कुठच्या दिशेला ते ड्रायव्हरला विचारून ठेवलं होतंच. हॉटेलमध्ये परतताना केवळ त्या दिशेकडेच नजर जाऊन होतो. संधिप्रकाशसुद्धा सरत आलेला, तरी ती दिशा मात्र पांढऱ्या बुरख्यातून बाहेर येईना. पूर्ण काळोख पडण्यापूर्वी काही क्षण अचानक त्या दिशेला ढगातून वर उंचावर काही तरी लखलखलं.. स्थानिक ड्रायव्हरनंही क्षणभर गाडी थांबवून निरखलं आणि मान डोलावली.. हेच ते शिखर! अहाहा, त्या क्षणी मनभर आनंद, समाधान म्हणजे काय ते जाणवलं. कॅमेरा बाजूलाच ठेवला आणि निळ्या अंधारात चमकणारी ती रुपेरी टोकं डोळे भरून बघत राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी पेलिंग सोडण्यापूर्वी हे शिखर पुन्हा नक्की दर्शन देणार, या आशावादावरच झोपलो. पूर्वेकडच्या राज्यात पहाट लवकर होते. चार वाजता तांबडं फुटायच्या आतच हॉटेलच्या गॅलरीत पोचले आणि समोरचं दृश्य बघून स्तब्ध झाले. हातातला कॅमेरा सरसावण्याचं भानही राहिलं नाही. स्वच्छ निळ्या कॅनव्हासवर कंचनजुंगाची संपूर्ण रांग चमचमत होती. हाच तो सिक्किमचा क्लायमॅक्स होता.