15 August 2020

News Flash

आडवाटांच्या सान्निध्यात

एखादा दिवस अविस्मरणीय ठरणार असेल तर त्या दिवसाच्या अगदी पहिल्या क्षणापासूनच काहीतरी भन्नाट घडायला सुरुवात होते. आंबे बहुला गावातल्या त्या दिवसाची सुरुवात फारच इंटरेस्टिंग होती.

| April 10, 2015 01:03 am

एखादा दिवस अविस्मरणीय ठरणार असेल तर त्या दिवसाच्या अगदी पहिल्या क्षणापासूनच काहीतरी भन्नाट घडायला सुरुवात होते. आंबे बहुला गावातल्या त्या दिवसाची सुरुवात फारच इंटरेस्टिंग होती. सकाळी साडेपाच वाजता आम्ही झोपलेल्या मंदिरात आंबे बहुलामधला कोणी भाबडा भक्त पंढरीच्या विठ्ठलाच्याही कानठळ्या बसतील इतक्या मोठय़ा आवाजात कुठलंसं भजन गात होता. त्याच्या भजनाच्या पहिल्या तीन-चार सेकंदांतच आम्ही खाड्कन उठून बसलो आणि त्यानंतर पुन्हा झोपायची हिम्मतच होईना. का कुणास ठाऊक पण मला त्या तीन-चार सेकंदांत आंबे बहुलामधल्या विठ्ठलासकट जगातल्या सगळ्या विठ्ठलमूर्तीनी आपापले कमरेवरचे हात काढून कानावर घेतलेत असं दृश्य डोळ्यांसमोर अवतरलं! आम्ही त्याच्या भक्तापासून ऊध्र्व दिशेला अवघ्या काही फुटांवरच होतो. पण जिथे ते सावळं परब्रह्म नाही बचावलं तिथे आम्हा पामरांची काय कथा. त्याचं भजन सुमारे वीसेक मिनिटांनंतर संपलं आणि त्यानंतरच आमची खाली जायची हिम्मत झाली. एव्हाना उजाडू लागलं होतं. प्रमोदला आम्ही झोपेतून जागे झालोय याचं स्वप्न पडलं असावं, कारण आम्हाला दिवसातलं पहिलं दर्शन त्याचंच झालं. सकाळची कामं उरकली आणि सॅक प्रमोदच्या दुकानात आणून ठेवल्या. ‘चला माझ्याबरोबर. ताजं दूध बनवलंय तुमच्यासाठी.’ कालच्या सेनेपकी कुणाच्या तरी घरी प्रमोद आम्हाला घेऊन जाऊ लागला. इतक्यात काहीतरी आठवून मी विनयला म्हणालो, ‘अरे आपल्याकडे ते नाश्त्यासाठी रेडी पदार्थ आहेत. ते घेऊन जाऊ. नाश्ता करूनच किल्ल्यावर निघू.’

‘दादा, आईला सकाळीच पोहे बनवून ठेवायला सांगितलेत. दूध घेऊन झालं की आमच्या घरी जायचंय नाश्ता करायला!’ आम्ही प्रमोदकडे बघतच बसलो. कोण कुठले आम्ही रात्री न मागता अंथरूण-पांघरूण काय येतं, सकाळी ताजं दूध आणि त्यानंतर नाश्ता, त्या वेळेलाही काय करावं ते सुचलं नाही आणि आताही भावनांनी शब्दांचा कोंडमारा केलाय! सह्य़ाद्रीत का फिरावं याचं क्षणार्धात उत्तर मिळालेला हा प्रसंग. (मला आठवतंय. या वर्षीच्या कोकण ट्रिपमध्ये गुहागरला ज्यांच्या घरी मुक्काम होता त्यांनी सकाळी पोह्य़ाच्या पहिल्या डिशनंतर अजून एकदा घेतलेल्या घासभर पोह्य़ांचे आठ रुपये बिलमध्ये लावले. याला म्हणतात खरं ‘आदरातिथ्य’!). प्रमोदच्या मित्राच्या घरी पंजाबी लोक लस्सी पितात तेवढय़ा आकाराच्या ग्लासमध्ये गरमागरम आलंयुक्त दूध समोर आलं. कमालीची तरतरी आली. नंतर प्रमोदच्या घरी पोह्य़ांचा कार्यक्रम झाला (इथे पहिल्या डिशचेही पसे द्यायला लागत नाहीत बरं का!). सात वाजत आले होते. आवश्यक सामान बरोबर घेऊन प्रमोद आणि त्याच्या मंडळाबरोबर बहुल्याच्या दिशेने आता पावलं पडू लागली.
आंबे बहुलापासून पायी चार किलोमीटर अंतर कापलं की बहुला किल्ल्याचा खरा पायथा येतो. बहुला किल्ल्याच्या मागच्या बाजूला देवळालीचा मिलिटरी कॅम्प असून रणगाडय़ाच्या तोफांच्या मारगिरीचा (फायिरगचा) सराव करण्यासाठी त्यांनी बहुला किल्ल्याला निवडलं आहे. त्यामुळे बहुला किल्ल्याची निम्मी तटबंदी त्या बॉम्बगोळ्यांनी ढासळली आहे. सोमवार ते शनिवार हा सराव सुरू असल्याने किल्ल्यावर जायला परवानगी नाही. रविवारी हा सराव बंद असल्याने किल्ला बघता येतो. पण आठवडय़ाच्या इतर दिवशी किंवा शनिवारी चुकून जरी तुम्ही समजा किल्ल्यावर सापडलात तरी आर्मीच्या कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दल तुम्हाला चक्की पिसिंग अ‍ॅण्ड पिसिंग करावं लागेल, अशी माहिती प्रमोदने पुरवली. अभिमानाची गोष्ट म्हणजे आंबे बहुलामधले अनेक तरुण आज आर्मीमध्ये भरती आहेत. आमच्याबरोबर असलेला तुकाराम ढगे हाही आम्ही गेलो त्या वेळेस आर्मीच्या शारीरिक चाचणीसाठीची तयारी करत होता. साहजिकच त्या तरुणाईकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि आमचीही मान क्षणभर उंचावली.
सिन्नर-घोटी रस्त्यावरून उजवीकडे बहुला किल्ला व डावीकडे रायगड डोंगर. याच्या पायथ्याला देवळालीचा आर्मी कॅम्प असून पलीकडच्या बाजूला आंबे बहुला गाव आहे. अपरिचित असल्याने या रस्त्यावरून जाताना आपले लक्ष जात नाही. पण आता मात्र लक्षात ठेवून एक कटाक्ष तर बहुल्याकडे टाकला जाईलच.
आंबे बहुलातून कमरेएवढय़ा गवतातून तासाभराच्या आडव्या चालीनंतर किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. उजवीकडचा किल्ला आणि त्याच्या डावीकडचा डोंगर यांच्या िखडीत नेणारी अध्र्यापाऊण तासाची चढणही घाम काढून गेली. िखडीतून बहुला किल्ला अप्रतिम दिसत होता.
किल्ल्यावर तुरळक तटबंदी, पाण्याची टाकी आणि थोडेफार उद्ध्वस्त अवशेष सोडले तर बाकी विशेष बघण्यासारखं फार काही नाही. पण माथ्यावरून चौफेर अप्रतिम दृश्य मिळालं. साधारण पूर्वेला औंढा, पट्टा, बितनगड, शेणीत सुळका, महांकाळ डोंगर, पश्चिमेला कळसूबाई, अलंग-मदन-कुलंग, वायव्येला रायगड डोंगर, गडगडा, डांग्या सुळका, इगतपुरीचा प्रदेश, उत्तरेला रांजणगिरी आणि अंजनेरी, ईशान्येला पांडवलेणी आणि विस्तीर्ण असं नाशिक शहर! अत्यंत अपरिचित असूनही बहुलाने एक अफलातून अनुभव दिला होता. आम्ही बहुलावर गेलो तेव्हा माझ्या ओळखीत बहुला किल्ला पाहिलेला असा फक्त मीच होतो. तृप्त झालेलं मन घेऊन खाली उतरलो. गुहांपाशी आल्यावर विश्रांती घेणे भागच होते. तुकारामने तर दिवाळी नुकतीच होऊन गेल्याने चिवडा, चकली आणि शेवेचा संपूर्ण डबाच त्याच्या पिशवीत भरून आणला होता. किल्ला चढताना अनेकदा विचारूनही त्याने त्या पिशवीत काय आहे याचं उत्तर द्यायचं टाळलं होतं. ‘आधीच सांगितलं असतं तर मग त्यात काय मजा राहिली असती’ असं म्हणून त्याने नवेद्य ठेवावा तशी ती अख्खी पिशवीच आमच्यासमोर ठेवली.
साडेअकराच्या सुमारास आम्ही गावात परतलो. प्रमोदने तर कमालच केली होती. ‘आईला सकाळीच जेवायचं करून ठेवायला सांगितलंय. जेवल्याशिवाय गेलात तर बघा.’ असा दम देऊन त्याने आमची बोलतीच बंद केली. काही केल्या तरी तो आणि बाकीचं मंडळ ऐकेचना. पण कितीही म्हणलं तरी तो प्रेमळ आग्रह स्वीकारता येणार नव्हता. कारण आता इथून नाशिकमाग्रे संगमनेर गाठून आणि पुढे पेमगिरी किल्ला बघून रात्री अकरापर्यंत तरी पुणे गाठणं भागच होतं. मोठय़ा मुश्किलीने त्याची समजूत काढली, तीही पुन्हा फक्त बहुलाला यायच्या अटीवर! भाबडय़ा प्रेमाचा आणि मूíतमंत माणुसकीचा आविष्कार आज आंबे बहुलामध्ये अनुभवायला मिळाला होता. आमची ना कुठली ओळख ना रक्ताची नाती. पण आपण माणसं आहोत ही जाणीवच पुरेशी असते. एका परिपूर्ण दुर्गयात्रेचं समाधान आज लाभलं होतं. भरून आलेली मनं घेऊन आंबे बहुला सोडलं.
नाशिकहून संगमनेरकडे जाताना रस्ता तसा गजबजलेलाच होता. ट्रेकमधलं शेवटचं लक्ष्य आता बाकी होतं. संगमनेर गाठलं. दोन वाजत आले होते. संगमनेर – अकोले रस्त्यावर कळस नावाचं गाव आहे. त्या गावातून डावीकडे गेलं की रस्ता थेट पेमगिरी गावात जाऊन थांबतो. पेमगिरी किल्ल्याचं वैशिष्टय़ म्हणजे त्या भागात एकसारखे दिसणारे तीन डोंगर असल्याने पायथ्याला पोहोचेपर्यंत किल्ला कोणता ते कळत नाही. किल्ल्यावर पेमादेवीचं मोठं मंदिर असल्याने किल्ल्याच्या नव्वद टक्के भागापर्यंत रस्ता करण्यात आला आहे (आम्ही गेलो तेव्हा कच्चा रस्ता होता. आतापर्यंत बहुधा डांबरीकरण झालं असावं.)
पेमगिरी किल्ला दक्षिणोत्तर पसरला असून किल्ल्यावर वरील अवशेषांशिवाय पाण्याची टाकी आणि घरांची जोतीही आढळतात. पण पेमगिरी किल्ला इतिहासात प्रसिद्ध झाला तो शहाजीराजांच्या पराक्रमामुळे. १ मार्च १६३३ रोजी मुघल सरदार महाबतखानने निजामशाहीची राजधानी असलेल्या दौलताबाद ऊर्फ देवगिरी किल्ल्याला वेढा घातला. निजामशाही संपवण्याचा आदेश शहाजहानने महाबतखानाला दिला होता. शहाजीराजे तेव्हा निजामशहाच्या चाकरीत होते. राजांनी निजामशाही वाचवण्यासाठी पराक्रमाची शिकस्त केली, पण त्यात त्यांना यश आलं नाही. अखेर शहाजीराजांनी मुरार जगदेवांच्या मदतीने जीवधन किल्ल्यावर मुघलांच्या कैदेत असलेल्या निजामशाहीच्या तीन वर्षांच्या वारसदाराला म्हणजेच मूíतजा निजामशहाला सोडवून आणले आणि पेमगिरी किल्ल्यावर स्वत:च्या मांडीवर बसवून त्याचा राज्याभिषेक केला. मूíतजा अल्पवयीन असल्याने शहाजीराजे निजामशाहीचा वजीर म्हणून काम पाहू लागले. पण नंतरच्या काळात निजामशाही पूर्ण बुडाली. मूíतजा निजाम म्हणजेच बादशहा या किल्ल्यावर वास्तव्यास असल्याने या गडाला ‘शहागड’ असेही एक नाव आहे. बखरीमध्ये पेमगिरीचा ‘भीमगड’ याही नावाने उल्लेख सापडतो. पण सद्यस्थितीत भीमगड नावाचा किल्ला कर्जतपासून सहा किलोमीटरवर वदप गावाजवळ असून त्याला सामान्यपणे ‘भिवगड’ म्हटलं जातं.
पण पेमगिरीचं महत्त्व एवढय़ावरच थांबत नाही. पेमगिरी गावात महाराष्ट्रातील सर्वात जास्त विस्ताराचा वटवृक्ष असून झाडाचा बुंधाच जवळपास वीस ते तीस मीटर इतका प्रचंड आहे. बॉटनीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे झाड म्हणजे कायमच एक अप्रूप बनून राहिलं आहे. किंबहुना या पेमगिरी किल्ल्यापेक्षा हे झाडच संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि याच झाडाने पेमगिरी गावाला स्वत:ची एक वेगळी ओळख दिली आहे. याशिवाय गावात इ. स. १७०६ मध्ये बांधलेले पुरातन आणि भव्य विठ्ठल मंदिर असून त्याच्याजवळ पायऱ्यांची विहीर आणि तिच्या बांधणीसंबंधातील एक शिलालेखही बघायला मिळतो. वेळेअभावी आम्हाला हे मंदिर मात्र पाहता आलं नाही. पण आपण पेमगिरीला गेल्यावर हे मंदिर, वटवृक्ष आणि मंदिराजवळील विहीर आणि शिलालेख नक्की पाहून या.
(उत्तरार्ध)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2015 1:03 am

Web Title: trekker blogger 3
Next Stories
1 आडवाटांच्या सान्निध्यात
Just Now!
X