रेश्मा भुजबळ – response.lokprabha@expressindia.com
खबर राज्यांची

अलाहाबाद इथला कुंभमेळा नुकताच संपला. हा कुंभमेळा अनेक जणांसाठी परिपूर्ण ठरला. कारण यावेळी सगळ्याच आखाडय़ाचे साधू या कुंभमेळ्यात सहभागी झाले होते. खासकरून हा कुंभमेळा परिपूर्ण ठरला तो किन्नर आखाडय़ामुळे.

जगातला सर्वात मोठा धार्मिक मेळा म्हणून कुंभमेळा ओळखला जातो. कुंभमेळा िहदू धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. गेली अनेक शतकं हा मेळा आयोजित केला जातोय. देशात अलाहाबाद, उज्जन, नाशिक आणि हरिद्वार या वेगवेगळ्या शहरांमध्ये आलटूनपालटून हा मेळा आयोजित केला जातो. या काळामध्ये पवित्र तीर्थावर स्नान केल्यामुळे सर्व पापं धुतली जातात, अशी िहदू धर्मीयांची श्रद्धा आहे. त्यामुळे लक्षावधी लोक पवित्र स्नानासाठी या मेळ्यात एकत्र येतात. या कुंभमेळ्यात सहभागी होणारे साधू वैशिष्टय़पूर्ण आखाडय़ाचे सदस्य असतात. शैव, वैष्णव, उदासीन, नागा, नाथपंथी, परी, किन्नर हे महत्त्वाचे आखाडे कुंभमेळ्यात सहभागी होत असतात. अलाहाबादच्या मेळ्यात या सात आखाडय़ांसह १३ आखाडे सहभागी झाले होते. या अधिकृत आखाडय़ांपकी दररोज एक आखाडा मिरवणुकीसह शहरात प्रवेश करत असायचा. यावर्षी एक मिरवणूक आकर्षण ठरली ती म्हणजे किन्नर म्हणजे तृतीयपंथी साधूंची.

मिरवणुकीत नेहमीप्रमाणे सजवलेले रथ, घोडे, उंट, संगीत पथकही होते. मात्र साधू तृतीयपंथी होते. भगवी वस्त्र, साडी परिधान करून, गळ्यात रुद्राक्ष माळा घालून रथात बसून तृतीयपंथी साधू मिरवणूक घेऊन या वेळी निघाले होते. तृतीयपंथीयांची मिरवणूक कुंभमेळ्यात निघण्याची ही पहिली वेळ नाही. २०१६ मध्ये उज्जनमध्ये झालेल्या कुंभमेळ्यातही अशी मिरवणूक झाली होती.

तृतीयपंथीयांना खासकरून उत्तर प्रदेशामध्ये किन्नर म्हणून संबोधले जाते. देशभरात साधारणत: २० लाखांहून अधिक तृतीयपंथी असल्याचे म्हटले जाते. मात्र तृतीयपंथी किंवा किन्नरांना नेहमीच वेगळी वागणूक दिली जाते. त्यांच्याविषयी भीती बाळगून त्यांना वेगळी म्हणजेच हीन वागणूक दिली जाते.

एखादे मूल तृतीयपंथी असेल तर घरातील वातावरण अतिशय वाईट असते. या जन्माला आलेल्या मुलाला जर कोणी भाऊ किंवा बहीण असतील तर घरच्यांना नेहमीच त्या सामान्य मुलांची काळजी वाटत असते. काळजी कसली तर त्यांच्या लग्नाची. मात्र जे जन्माला आलंय तेही एक मूलच आहे, माणसाचंच मूल आहे, हे त्या मुलाचे पालक आणि नातेवाईक विसरतात. त्यामुळे परिस्थिती अशी आहे की, तृतीयपंथीयांची वाढती संख्या हेही आज समाजाच्या चिंतेच कारण बनतंय, मात्र लोक हे लक्षातच घेत नाहीत की तृतीयपंथीयांना मूल होऊ शकत नाही, मात्र त्यांची संख्या वाढण्याला ते जबाबदार नाहीत हे कोणीच लक्षात घेत नाही असं या आखाडय़ात सहभागी झालेल्या किन्नर साधू आणि तृतीयपंथीयांच मत आहे.

तृतीयपंथी जन्माला आले की त्याचे पालकच त्याचा त्याग करतात. किंवा त्याग नाही केला तर अशी परिस्थिती निर्माण करतात की त्यांनी घर सोडून निघून जावे. घरात, समाजात सतत होणारी घुसमट आम्ही सहन नाही करू शकत असेही कुंभमेळ्यात सहभागी असणाऱ्या तृतीयपंथीयांनी म्हटले.

खूप वर्षांपूर्वी किन्नरांना उपदेवता मानले जायचे, मात्र असे असूनही त्यांना कायम समाजाबाहेरच राहावे लागले. तृतीयपंथीयांचे आशीर्वाद फळाला येतात अशीही एक श्रद्धा िहदू धर्मीयांमध्ये आहे. त्यामुळे लग्न, जन्माच्यावेळी आशीर्वाद देण्यासाठी त्यांना बोलावले जाते, म्हणजे लोकांची गरज असतानाच त्यांना मान दिला जातो, अन्यथा तृतीयपंथीयांना जेव्हा समाजाची, समाजातील लोकांच्या मदतीची गरज असते तेव्हा मात्र कोणीही मदतीसाठी पुढे येत नाही, अशी तक्रार या मेळ्यात सहभागी तृतीयपंथीय करतात.

२०१४ साली सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निर्णयात तृतीयपंथीयांना थर्ड जेंडर म्हणून मान्यता दिली. त्यानंतर तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी किन्नर आखाडय़ाची स्थापना केली. २०१८ साली सर्वोच्च न्यायालयाने समिलगी संबंधांना मान्यता दिली हे दोन्ही निर्णय आमच्यासाठी खूपच विशेष आणि महत्त्वाचे आहेत, असे प्रत्येक तृतीयपंथीयांचे म्हणणे होते.

तृतीयपंथीयांनी कुंभमेळ्यात सहभागी होण्यावर बरेच वाद विवाद झाले. मात्र त्यांना या कुंभमेळ्यात सहभागी होता आले, याचा किन्नर आखाडय़ात सहभागी होणाऱ्या प्रत्येकालाच आनंद होता. या आखाडय़ाला दररोज जवळपास २० ते ३० हजार लोक भेट देत होते आणि आशीर्वाद घेत होते. एवढेच नव्हे तर त्यांच्याबरोबर फोटो, व्हीडिओ काढून घेत होते. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात मिळणारा आदर हा त्यांना नक्कीच सुखावणारा होता. समाजाचे आपणही एक घटक आहोत याची प्रचीती मेळ्यात मिळाली, असे अनेक तृतीयपंथीयांचे मत होते. लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रिया किंवा त्यांचा राग किन्नर आखाडय़ात नावालाही नव्हता. तर अनेकजण पहाटेपासून ते रात्री दहापर्यंत रांगा लावून किन्नर आखाडय़ाला भेट देत होते आणि किन्नर साधूंकडून आशीर्वाद घेत होते. लोकांचाही दृष्टिकोन तृतीयपंथीयांप्रती बदलल्याचे किन्नर आखाडय़ात दिसत होते, तशाच आदरयुक्त, आश्चर्याच्या प्रतिक्रिया या आखाडय़ाला भेट देणारे लोक व्यक्त करत होते. अनेक महिला प्रथमच तृतीयपंथीयांना इतक्या जवळून बघत होत्या, त्यांना जाणून घेत होत्या. फक्त स्त्रियाच नाही तर अनेक पुरुषही प्रथमच तृतीयपंथीयांना भेटत होते आणि त्यांच्याविषयीचे गरसमज दूर करून घेत होते. किन्नर साधूही असतात हे पाहूनही अनेकांना आश्चर्य वाटत होते. इतका मोठा प्रतिसाद मिळेल असं या किन्नर साधूंना कधीच वाटलं नव्हतं. पुढील आयुष्यात आमच्यासाठी चांगलं भविष्य असल्याचं या कुंभात दिसतं. आजवर हेटाळणी, अत्याचार, बाजूला फेकलं जाणं याचा त्रास आम्ही भोगलेला आहे, असे मत कुंभमेळ्या दरम्यान किन्नर आखाडय़ात व्यक्त होत होतं.

कुंभमेळा संपला आणि खूप काही सांगून गेला, समाजाला आणि तृतीयपंथीयांनाही. आजही आखाडय़ात सहभागी होण्यासाठी, समाजाचाच एक भाग आहोत, माणूसच आहोत हे पटवून देण्यासाठी त्यांना धडपड करावी लागत आहे. मात्र कुंभमेळ्यात मिळालेल्या आदराने लोकांत, समाजात बदल होतोय याची कल्पना तृतीयपंथीयांना आणि त्यांना नाकारणाऱ्यांनाही आली आहे. तृतीयपंथी कुंभमेळ्याच्या आखाडय़ात तर आलेत आता समाजाच्या आखाडय़ातही स्वीकारले जावेत. पुढील मेळेही लोकांमध्ये बदल आणणारेच ठरावेत, अशी आशा सर्वचजण आता कुंभाच्या समाप्तीनंतर करत आहेत.