-सुनिता कुलकर्णी
चीनने काढलेल्या आपल्या गंभीर कुरापतीमुळे वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. चीनला धडा शिकवला पाहिजे अशी समस्त भारतीयांची रास्त इच्छा आहे. पण अशा गंभीर वातावरणात काही मंडळी तुफान विनोदनिर्मिती करताना दिसतात.
त्यातले एक आहेत खासदार रामदास आठवले. त्यांनी चीनी पदार्थांवर बंदी घातली पाहिजे असं जाहीर करून टाकलं. आता ज्यापासून नूडल्स तयार करतात, तो गहू इथलाच, त्यात वापरल्या जाणाऱ्या भाज्या इथल्याच, तेल-मीठ इथलंच, तर मग बंदी घालून चीनचा तोटा कसा होणार? आणि इथे तयार होणारे चायनीज पदार्थ चाखून चिनी देखील हरखून जातील इतके ते भारतीय असतात. कारण आपण त्या चायनीज पदार्थांचं सरसकट भारतीयीकरण करून टाकलं आहे. त्यामुळे आठवले साहेबांची सोशल मीडियावर चांगलीच फिरकी घेतली गेली.
प्रतिक्रिया देणाऱ्यांनी लिहिले होते…
चायनीज पदार्थांमध्ये चिनी काय आहे ? बंदीच घालायची तर टिकटॉकवर घाला,
आठवलेंच्या ‘गो कोरोना गो’ ची आठवण देत कुणीतरी ‘गो चाऊमीन गो’, असंही मीम केलं होतं.
अगर चायना की नजर पड गयी हमारे जमीन पर, पनीर रायता डाल देंगे उनके चाऊमीन पर,
आज से चाय मे चिनी भी बंद,
भारतीय चायनीज गोबी मंचुरियन विकल्याबद्दल भारतीय हॉटेलांवर बंदी, चायनीज बनवणाऱ्या शेफवर बंदी,
भारतात मिळणारं चायनीज हाच खरं तर चीनवर उगवलेला सूड आहे…
असे मीम त्या बातमीवर प्रतिक्रिया म्हणून आले होते.
हा विनोद कमी होता की काय म्हणून पश्चिम बंगालमधल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय भूमीत घुसण्याची जुर्रत करणाऱ्या चीनचा निषेध करायचा म्हणून कुणाचा पुतळा जाळला, तर चक्क उत्तर कोरियाच्या किम जोंग उनचा. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन आणि चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांच्यामध्ये त्या बिचाऱ्यांचा बहुधा समजुतीचा घोटाळा झाला असावा. मागे एकदा असाच स्नॅपचॅटवरचा राग स्नॅपडीलवर काढला गेला होता, तसाच हा प्रकार झाला.
मग काय नेटिझन्स लागले कामाला आणि त्यांनी विचारलं किम जोंग आणि जिनपिंग यांच्यात घोटाळे करणारे नमुने भाजपा कसे काय शोधते बुवा ? किम जोंग चीनचे सर्वेसर्वा ? कमाल आहे…तर किम जोंग विचारत आहेत की मला का जाळलं, असाही एक मीम होता.