पल्लवी सावंत response.lokprabha@expressindia.com

घरात लहान मूल असेल तर त्याला आवडतील असे सतत नवनवे पदार्थ कुठून आणायचे, त्याचा आहार पोषक असेल याकडे कसं लक्ष द्यायचं हा अनेक नवमातांपुढचा प्रश्न असतो. थोडं नियोजन केलं तर ही गोष्ट अजिबात अवघड नाही.

लहान मुलांसाठी कोणत्याही पदार्थाचा गंध, चव या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. लहान मुलांना कोणता आहार द्यावा याबाबत अनेकदा बहुतेक नवमाता संभ्रमात असतात. आहाराबाबत सल्ले देताना आणि नेहमीच्या जगण्यातदेखील लहान मुलांच्या पोषणाबद्दलचे काही मुद्दे ठळकपणे लक्षात येतात. संपूर्ण पोषण देण्याच्या अट्टहासापायी अनेकदा अतिपोषित आहाराचे प्रमाणदेखील लहान मुलांमध्ये वाढलेले दिसते.

२०१६ साली मुंबईत केलेल्या एका चाचणीनुसार एक हजार १५० विद्यार्थ्यांपैकी ६०० मुलांमध्ये स्थूलत्व, अतिपोषण यांचे जास्त प्रमाण आढळलेले दिसले. स्थूल विद्यार्थ्यांचे ५० टक्क्य़ांहून जास्त प्रमाण ही बालरोगतज्ज्ञांसाठी मोठी समस्या होती. उत्कृष्ट आहार मिळणाऱ्या या मुलांचे मदानी खेळ खेळण्याचे प्रमाण अत्यल्प होते. बाजारातील पोषक उत्पादनांमधून मिळणारी जीवनसत्त्वे भरपूर होती. संगणकीय खेळांचे प्रमाण अतिरिक्त होते. त्यांच्या स्थूलपणाला कारणीभूत ठरणाऱ्या या गोष्टी ठळकपणे अधोरेखित होत होत्या. लहान मुलांच्या पोषक आहाराबाबतीतील काही अनुभव ‘राष्ट्रीय पोषण महिन्या’च्या निमित्ताने मांडत आहे.

लहान मुलांच्या आहाराबाबत सजग पालकांसोबत माझं अनेक वेळा संभाषण होत असतं. आजच्या लेखात अशाच विविध वयोगटांतील मुलांच्या खाण्याच्या पद्धतींबद्दल जाणून घेऊ या.

* प्रसंग १ :

‘राष्ट्रीय पोषण महिन्या’च्या निमित्ताने एका शाळेत पोषणविषयक व्याख्यान देण्यासाठी जाण्याचा योग आला. व्याख्यान सुरू होण्याआधी शाळेतील  एका शिक्षिकेनं शाळेत मुलांसाठी अभ्यासेतर आहारविषयक सोयींचा कॅटलॉग(?)  माझ्या हाती सोपविला. त्यात वेगवेगळी माहिती आणि चित्रे होती.

अनेक फळे, भाज्या, धान्ये यांच्या पोषक तत्त्वांबद्दलची घोषवाक्ये त्यात होती. अर्थात नव्याने शिकणाऱ्या पिढीसाठी डिजिटल युगात आवश्यक असं सगळंच होतं, स्मार्ट नेक्स्ट जनरेशनची स्मार्ट शाळा!

भिंतींवर सामाजिक संदेश, विविध क्रीडापटूंची माहिती, ‘झाडे लावा झाडे जगवा’ हे आणि या प्रकारचे अनेक संदेश प्रत्येक भिंतीवर लिहिलेले होते.

आम्ही ज्या वर्गात बसलो होतो त्याच्या शेजारीच छोटेखानी स्वयंपाकघर होतं. म्हणजे कॅफेटेरिया शेजारीच आहे तर! मनातल्या मनात सगळ्याची नोंद घेत मी व्याख्यानाच्या वेळेची वाट पाहत होते.

कॅफेटेरियाच्या भिंतींवर मात्र फळांसोबत समोसा, पिझ्झा, चिप्स, मिल्कशेक यांची चित्रे पाहायला मिळाली आणि इतका वेळ शाळेतल्या भिंतींवरील पोषक आहाराबद्दलची चित्रं पाहून सुखावलेली माझ्यातली आहारतज्ज्ञ हलकीशी हिरमुसलीच.

लहान मुलांसाठी आकर्षक चित्रे काढताना इतक्या स्वच्छ कॅफेटेरियाकडून मला पूरक आहाराची किंवा खाद्यपदार्थाची चित्रे अपेक्षित  होती. मुलांवर आहार संस्कार करताना शाळेतील कँटीन किंवा कॅफेटेरिया यांचा महत्त्वाचा वाटा आहे. हे ज्या शाळेत जेवणाची व्यवस्था आहे त्या प्रत्येक शाळेने लक्षात घ्यायलाच हवं.

* प्रसंग २ :

माझी मत्रीण प्रतीक्षा! उत्तम फिजिओथेरपिस्ट आणि सुगरण! एकदा ती तिच्या सात वर्षांच्या मुलीला- प्रीशाला घेऊन क्लीनिकमध्ये आली होती.  आम्ही सगळेच एका ठिकाणी जेवायला बसलो. प्रीशासाठी प्रतीक्षा वेगळा डबा घेऊन आली होती. आमच्या एका डॉक्टरांनी कुतूहलाने विचारलं, ‘‘वेगळा डबा म्हणजे विशेष डिश दिसतेय.’’  त्यावर प्रीशा खुदुखुदु हसत ‘‘ममा कलरफुल फूड देते मला. मग मला माझ्याच डब्यातलं खायला आवडतं. ’’ असं म्हणाली आणि तिने डबा उघडून दाखवला. ‘‘आज यल्लो-ग्रीन कटलेट्स आहेत,’’ असं म्हणत तिने एक लहान कटलेट तोंडात टाकलं. नक्की कशापासून कटलेट्स केली आहेत हे जाणून घ्यायला आम्ही सगळेच उत्सुक होतो. प्रतीक्षाने तिच्या डब्यातसुद्धा तसेच मोठय़ा आकाराचे पराठे आणले होते. त्यावर प्रतीक्षाने मला मुळा, भोपळा, पनीर आणि कोिथबिरी घालून केलेले पराठे आहेत असा खुलासा करताच मला तिच्या पाककलेतील हुशारीचं कौतुक वाटलं.

मुलांच्या नावडत्या भाज्यांचा त्यांच्या आहारात वेगळ्या प्रकारे समावेश करणं हा पाककलेसोबत बौद्धिक व्यायामसुद्धा आहे. आपणच बाजारातून आणलेले पालक ढोकळा, बीट कटलेट्स कुतूहलाने खातो. असे प्रयोग मुलांसाठी होणं आवश्यक आहे

*  प्रसंग ३:

‘‘आमच्या आर्याला दूध आवडतच नाही. काय करता येईल? मी काहीतरी घालून तिला देते; पण आता वासावरून कळतं तिला, त्यामुळे तेपण पिणं  होतं नाही.’’ अर्पिताचा स्वर काळजीचा होता.

‘‘मला गाईचं दूध नाही आवडत.’’ आर्याचं ठाम म्हणणं.

‘‘हरकत नाही. तू म्हशीचं दूध पी किंवा रोज एक अंडं किंवा पनीरची भाजी खा दुधाऐवजी.’’ माझा सल्ला.

‘‘म्हणजे गाईचं दूध बंद? हाडांच्या वाढीचं काय?’’

गाईच्या दुधाचे उत्तम परिणाम आपण पिढय़ान्पिढय़ा वाचत आणि ऐकत आलो आहोत. त्यात तथ्य आहेच; परंतु गाईचेच दूध उत्तम आणि रोज एक ग्लास दूध प्यायलाच हवे असा सरधोपट नियम कधीही नव्हता आणि नाही.

अलीकडे दुधाबद्दल अनेक गैरसमज आहेत. त्यातील दररोज दूध पिणे हादेखील एक.

तेलबिया, अंडं, दुधाचे पदार्थ हेदेखील पूरक आहारातील महत्त्वाचे पदार्थ आहेत. लहान मुलांनादेखील दूध आवडत नसेल तर दुधाचे पदार्थ किंवा वनस्पतीजन्य प्रथिने आणि कॅल्शिअमयुक्त पदार्थ खाण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. (मागील अंकातील दुधाबद्दलच्या लेखामध्ये मी याबद्दल सविस्तर लिहिले आहे.)

लहान मुलांच्या आहारात दही, तूप, पनीर हे नियमित असायला हवे. केवळ दुधाचा अट्टहास नसावा.

* प्रसंग ४ :

काही काळापूर्वी एका आहारतज्ज्ञांनी एका पूरक पावडरमध्ये असणाऱ्या साखरेबद्दल आणि उत्पादनावर लिहिलेल्या जीवनसत्त्वांच्या चुकीच्या दाव्यांबद्दल समाजमाध्यमांवर जाहीरपणे आपले मत मांडले होते.

अनेक वेळा उत्पादनातील मूलद्रव्यांबद्दल ग्राहकांमध्ये भ्रामक समजुती असतात. ज्या वेळी अमुक उत्पादनामध्ये संत्र्याच्या दुप्पट क जीवनसत्त्व आहेत, असा दावा केला जातो; तेव्हा संत्र्याचे प्रमाण आणि उत्पादनाचे प्रमाण यांचादेखील विचार व्हायला हवा.

दूरचित्रवाणीवरील जाहिरातींमध्ये ‘व्हिटॅमिन्स से भरपूर’ किंवा ‘अमुक अमुक प्या आणि उंची वाढवा’ अशा आशयाच्या जाहिराती सर्रास दाखविल्या जातात. यातील ९९ टक्के उत्पादनांमध्ये साखर, रासायनिक रंग, रासायनिक- अन्नसदृश पदार्थाचे प्रमाण भरपूर असते; किंबहुना जीवनसत्त्वे आणि स्निग्ध पदार्थाचे प्रमाण जास्त असल्यामुळे आहाराबाबतीत या उत्पादनांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असतो. त्यामुळे मुलांसाठी या प्रकारचे कोणतेही पदार्थ दुधासोबत देणे टाळणे उत्तम!

मुलांच्या आहारात नेहमीच्या खाद्यपदार्थाचे सेवन नियमितपणे व्हायलाच हवे.

वरील काही प्रसंगांमधून लहान मुलांच्या वेगवेगळ्या मागण्या आणि आवडींबद्दल आपण जाणून घेतलं आहे. याचसोबत वाढत्या वयातील मुलांसाठी मी इथे काही खास पदार्थदेखील देत  आहे. हे पदार्थ मुलांना आवडतील आणि ते करायला सोपेही आहेत.

रोटी रोल :

* बीट किसून ते हलके वाफवून घ्यावे.

* त्यात कोिथबीर आणि जिरेपूड घालावी.

* या मिश्रणात थोडे तिखट आणि मीठ मिसळावे.

* यात आमचूर पावडर आणि कणीक घालून मळून घ्यावे.

* या कणकेच्या लहान पोळ्या करून घ्याव्या.

* डब्यात रोल्स करून द्यावेत.

कडधान्यांचे उप्पीट :

* आपण नेहमी रव्याचे उप्पीट करतो. त्याचप्रमाणे कडधान्यांचे उप्पीट करावे.

* मूग, हरभरा, मटकी, चवळी ही कडधान्ये रात्रभर भिजवून ठेवावीत.

*  सकाळी ती मिक्सरमध्ये हलकीशी वाटून घ्यावीत. नेहमीप्रमाणे उप्पीट करताना करतो तसे तेलावर कांदा, टोमॅटो आणि शेंगदाणे परतून घ्यावेत. त्यात मिरची, हळद आणि मोहरीची फोडणी करावी आणि वाटलेले कडधान्यांचे मिश्रण त्यात घालून मंद आचेवर शिजवावे.

रानभाज्यांची कटलेट्स :

* बाजारात विविध प्रकारच्या पालेभाज्या मिळतात. शेपू, टाकळा, अळू या त्यापैकी काही भाज्या.

* चार ते पाच रताळ्यांचा कीस तयार करून तो तुपावर परतून घ्यावा.

* वरीलपैकी कोणतीही भाजी किमान तीन कप एवढय़ा प्रमाणात बारीक चिरून घ्यावी.

* एक वाटी ओट्सचे पीठ आणि तीन वाटय़ा बेसन पीठ एकत्र करावे.

* त्यात लाल मिरची पावडर, हळद, ओवा एकत्र करावे. नंतर किसलेले रताळे, भाज्या आणि पीठ एकत्र करून घ्यावे.

* थोडे पाणी घालून हे मळून घ्यावे.

* या पिठाची लहान गोल कटलेट्स तयार करावीत आणि वाफवून घ्यावीत.

*  मुलांना खायला देताना वाफवलेली किंवा कमी तेलात टाळून कटलेट्स खायला द्यावीत.

प्रथिनेयुक्त लाडू :

* मुलांसाठी लाडू तयार करताना साखर न वापरता घरगुती लाडू करणे सोपे आहे.

* लापशीचा रवा/दलिया आणि मूगडाळीचे पीठ सम प्रमाणात घ्यावे.  (प्रत्येकी एक किलो)

* हे दोन्ही तुपात हलकेसे भाजून घ्यावे. त्यानंतर मिक्सरला बारीक होईपर्यंत फिरवावे. अर्धा किलो खजूर आणि बदाम, अक्रोड, काळा मनुका, खारीक, काजू, बेदाणे हा सुकामेवा प्रत्येकी २०० ग्राम घ्यावा.

* सुक्या मेव्याचे मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यावे.

*  सगळ्या पदार्थाचे मिश्रण एकत्र करावे. त्यात प्रत्येकी २५ ग्राम सुंठ पावडर, वेलची पावडर, ज्येष्ठमध पावडर, अळशी पावडर एकत्र करावे.

*  या सगळ्या पदार्थाचे मिश्रण एकत्र करून लाडू तयार करावेत. हा रोज एक लाडू  मुलांसाठी पौष्टिक आहे.

भाज्यांची मॅगी :

*      नूडल्स हा मुलांचा आवडता खाद्यपदार्थ ! नूडल्स तयार करताना ते शिजवून त्यातील पाणी काढून टाकावे आणि जेवढे नूडल्स असतील तितक्याच भाज्या चिरून घ्याव्यात (यात गाजर, कोिथबीर, टोमॅटो, मटार, वांगं, बटाटा, फ्लॉवर, कोबी, पातीचा कांदा या भाज्यांचा समावेश केला जाऊ शकतो.) या सगळ्या भाज्या वेगळ्या शिजवून नंतर नूडल्ससोबत एकत्र कराव्यात.

मीठ आणि तिखट चवीनुसार घालावे.

*  लहान मुलांच्या आहारात शक्यतो नूडल्स, सॉस यांचे आहारात प्रमाण अत्यल्प असण्याकडे लक्ष द्यावे.

*  लहान मुले नेहमी मोठय़ांचे अनुकरण करतात त्यामुळे योग्य आहाराची सुरुवात घरातूनच व्हायला हवी. पालकांनीदेखील जास्तीत जास्त वेळा घरचेच जेवण करावे आणि आहारसंस्काराची मुहूर्तमेढ स्वत:पासूनच रोवावी.

* प्रसंग ५  

‘‘तू समजावून सांग तिला. माझं काहीही ऐकत नाही ती.’’

गिरिजा सांगत होती. ‘‘काळजी वाटते गं. मी लहानपणापासून घरचंच  बनवलंय; पण ती नेहमी डबा परत आणते.’’

यावर साराने माझ्याकडे विशेष पद्धतीने पाहिलं.

‘‘माझे फ्रेंड्स त्यांचा टिफिन मला देतात. मग माझा टिफिन राहतो.’’ फारच गोड आवाजात तिने सांगितलं.

‘‘मग तुझा टिफिन खातात का त्या?’’

‘‘नाही; त्यांना बोअर होतं.’’ साराने सांगितलं.

यावर गिरिजाला मी म्हटलं, ‘‘तू तिला एखादा दिवस टिफिन  बनवायला का देत नाहीस?’’ यावर गिरिजाने माझ्याकडे अविश्वासाने पाहिलं.

‘‘अगं, फक्त आठ वर्षांच्या मुलांना कसं? . तू काहीही सांगतेस.’’

‘‘अगं, हळूहळू शिकवायचं, कणीक कशी मळतात किंवा इडलीचं पीठ कसं तयार होतं?’’

‘‘पण त्याने काय होणार आहे?’’

‘‘त्याने मुलांना एखादा पदार्थ बनविण्यासाठी काय काय करावं लागतं ते कळतं आणि मेहनत कळते. त्यामुळे ती आवडीने खायला लागतात. आपलं खाणं तयार करणाऱ्या व्यक्तीबाबतचा त्यांच्या मनातील आदरदेखील वाढतो.’

हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन त्यानुसार लहान मुलांचा पोषण आहार आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निश्चित करता येईल. त्याचे परिणामही लगेचच दिसायला लागतील.