अतुल पेठे – response.lokprabha@expressindia.com
ज्येष्ठ रंगकर्मी, नाटककार, लेखक आणि अभिनेते गिरीश कार्नाड यांच्या निधनाने भारतीय रंगभूमीवरील एक विद्वान आणि बहुश्रुत लेखक आपल्यातून गेला आहे, अशीच माझ्यासह सर्वाची भावना झाली आहे. इतिहासाचे व्यापक आकलन त्यांनी आपल्या नाटकांतून मांडले. इतिहास, गणित, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र आणि सामाजिक शास्त्र या विषयांचा कार्नाड यांना प्रचंड व्यासंग होता. कार्नाड यांनी इतिहासातील व्यक्तिरेखेचा उपयोग त्याचे वर्तमानातील आकलन, परिशीलन आणि लेखन करण्यासाठी केला. त्यांना सामाजिक प्रश्नांचे केवळ भानच होते असे नाही तर उत्तम जाण होती. वेगवेगळ्या प्रश्नांसदर्भात त्यांनी रोखठोक मते मांडली.

मी त्यांची ‘हयवदन’, ‘नागमंडल’, ‘उणे पुरेशहर एक’, ‘बिखरे िबब’, ‘तुघलक’ ही महत्त्वाची नाटकं बघितली आहेत. त्यांच्या नाटकातल्या दोन गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात. एक तर १९४७ साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या काळातल्या संवेदनशील भारतीय लोकांमध्ये आपल्या मुळांचा, आपल्या भारतीयत्वाचा शोध घेण्याची एक प्रकारे चळवळच सुरू झाली होती. हा शोध फक्त सामाजिक, राजकीय पातळीवर नव्हता, तर तो कलेच्या पातळीवरूनदेखील होता. नाटकाच्या क्षेत्रातदेखील होता. त्या काळातल्या रंगभूमीवर ब्रिटिश रंगभूमीचा प्रभाव होता. त्यातून बाहेर येऊन आपल्या परंपरा, आपल्या भाषा, आपल्या सर्व गोष्टींचा शोध देशातल्या सर्व प्रांतांमधून घेतला गेला. त्यात मराठीत विजय तेंडुलकर, कर्नाटकात गिरीश कार्नाड, बंगालमध्ये बादल सरकार, दिल्लीमध्ये मोहन राकेश हे महत्त्वाचे आधारस्तंभ होते. या सर्वानी स्वातंत्र्योत्तर काळातलं जनमानसातलं नाटक पकडलं.

गिरीश कार्नाड यांचा पौराणिक कथा, दंतकथा, आदिकथा या सगळ्यांचा उत्तम अभ्यास होता. त्यांनी ‘हयवदन’मधून लोककथांचा अर्थ आजच्या काळाच्या संदर्भात उलगडून दाखवला आहे. ‘हयवदन’मध्ये ते स्त्रीच्या मनातलं पुरुषाचं स्थान उलगडून दाखवतात, तर ‘तुघलक’मधून त्यांनी इतिहासाचा वर्तमानाशी धागा जोडून दाखवला आहे. त्यांच्या सर्व नाटकांमधलं ‘तुघलक’ हे त्यांचं सर्वोच्च नाटक आहे असं माझं मत आहे. ‘नागमंडल’, ‘अग्निवर्षां’, ‘बिखरे बिंब’, ‘बंडा कालू ऑन रोस्ट (उणे पुरे शहर १)’ या त्यांच्या नाटकांमधून त्यांनी प्रतिमांचा, आभासी जगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

गिरीश कार्नाड यांनी ‘कांडू’, ‘चेलूवी’ आणि ‘उत्सव’सारखे महत्त्वाचे सिनेमे केले. या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांच्यातील समृद्ध अभिनेता आपण अनुभवला. पुरोगामी, पंडित, विद्वान, बहुश्रुत अशा सगळ्या पदव्या द्याव्यात अशा परंपरेमधले ते होते. भाषाप्रेमी आणि भारतीयत्व प्रेमी असा हा माणूस कन्नड भाषा, कर्नाटक हे राज्य या सीमा ओलांडून त्यापलीकडे पोहोचला होता. त्यामुळेच भारतीयत्वाला धक्का पोहोचेल अशा सामाजिक घटना घडताना दिसल्या तेव्हा त्यांनी थेट राजकीय भूमिका घेतल्या. कलाकाराने राजकीय भूमिका घेतली पाहिजे या मताचे ते होते. ही भूमिका त्यांनी सातत्याने घेतल्याचे दिसून येते. थेट भूमिका मोजण्याची किंमतही त्यांना मोजावी लागली. तीही त्यांनी मोजली. गिरीश कार्नाड यांच्याकडे कन्नड आणि मराठी या भाषांमधील सेतू म्हणून पाहिले पाहिजे. त्यांच्या कार्यामुळे भारतभरातील नाटके विविध भाषांशी इतकी जुळली आणि जोडली गेली, की ती मूळ त्या त्या भाषेतीलच होऊन गेली. रंगभूमीला वेगळं वळण देणारा, तिच्या कक्षा रुंदावणारा, भारतीयत्वाच्या आशयसंपन्न मुळांचा शोध घेणाऱ्या या बुद्धिमान नाटय़कर्मीला श्रद्धांजली.