सुनिता कुलकर्णी
गुलजार हे नाव ऐकलं, वाचलं की दर्दी रसिकांचे प्राण कानात गोळा होतात. एकीकडे गुलजार जे बोलतात त्याची कविता होते असं कौतुकाने म्हटलं जातं आणि दुसरीकडे गमतीने एखादं अगदी साधं वरणभातलिंबू वाक्य देऊन गुलजार ते देखील त्यांच्या खास शैलीत, उर्दू भाषेच्या नजाकतीने पेश करून कसं सुंदर करतील असं उदाहरणासहित स्पष्ट केलं जातं.
हा सगळा खटाटोप केला जातो तो अर्थातच गुलजार यांच्यावरच्या प्रेमापोटी.
तुमचं त्यांच्यावर खरोखरच प्रेम असेल तर करोनाकृपेमुळे तुम्हाला घरबसल्या गुलजारांना ऐकण्याची नामी संधी चालून आली आहे. तुम्ही म्हणाल कुठे अलवार कविता लिहिणारे गुलजार आणि कुठे सगळ्या जगाचा कर्दनकाळ करोना. त्यांचा एकमेकांशी काय संबंध…
तर आहे, संबंध आहे. करोनामुळे सगळं जग घरी बसलं आहे. पण ‘शो मस्ट गो ऑन’ असं म्हणत मनोरंजनाच्या क्षेत्रातली मंडळी काही ना काही करू पहात आहेत. त्यातलाच एक कार्यक्रम आहे एनसीपीए म्हणजे नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सने आयोजित केलेला. शुक्रवार २२ मे रोजी संध्याकाळी सहा वाजता होऊ घातलेल्या या कार्यक्रमात गुलजार त्यांना आवडलेल्या रवींद्रनाथ टागोरांच्या कविता उर्दूमध्ये सादर करणार आहेत.
करोनामुळेच तर आपल्याला या मैफलीची अपूर्व संधी अगदी घरबसल्या मिळणार आहे. म्हणजे बघा आधीच बंगाली भाषा कमालीची गोड. त्यात रवींद्रनाथ टागोरांच्या कविता वैश्विकतेला आवाहन करणाऱ्या. त्या गुलजार अनुवादित करून सादर करणार कमालीची मिठी जुबाँ असलेल्या लहेजापूर्ण उर्दूमध्ये.
त्यामुळे लिहूनच ठेवा शुक्रवारची संध्याकाळ गुलज़ार साब के नाम… कारण गुलजारांच्या तोंडून रवींद्र संगीत तेही उर्दूमध्ये ऐकायला मिळणं हा अपूर्व योग आहे. त्यासाठी अर्थातच या टाळेबंदीच्या काळात तुम्हाला कुठे उठून जायचं नाहीये की तिकीटही काढायचं नाहीये. कारण हा कार्यक्रम एनसीपीएच्या युट्यूब चॅनलवर विनामूल्य दाखवला जाणार आहे.
या कार्यक्रमाची लिंक पुढीलप्रमाणे –
Link : https://youtu.be/LB6mkfhEPPo
हा कार्यक्रम ‘NCPA@home’ या उपकक्रमांतर्गत सादर केला जाणार आहे. त्यामुळे घरी रहा, सुरक्षित रहा आणि घरबसल्या गुलजार यांच्या काव्याचा आनंद घ्या असे आवाहन एनसीपीएने केले आहे. या कार्यक्रमासाठी कोणतीही पूर्वनोंदणी करण्याची गरज नाही, २२ मे रोजी वर दिलेल्या लिंकवर जाऊन रसिक या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतात.
आणि हो, रवींद्रनाथ टागोर यांनी ‘एकला चालो रे’ असं एक गीत लिहिलं असलं तरी हा कार्यक्रम एकट्याने ऐकू नका. त्यात तुमच्या घरातल्यांना सहभागी करून घ्या. तुमच्या मित्रमंडळींना सांगा. गुलजारांना असं ऐकायची संधी थोडीच पुन्हा पुन्हा येते?