मॉल, शिबिरं यात सुट्टी हरवलेल्या आजच्या मुलांना कदाचित खरंही वाटणार नाही, असं या लेखातल्या आजोळचं वर्णन आहे साधारणपणे १९५० ते ५५ या काळातलं. लेखक प्रमोद साने यांनी आपल्या मृत्यूपूर्वी म्हणजे १९९२ मध्ये हे वर्णन एका कॅसेटमध्ये रेकॉर्ड करून ठेवले होते. ‘लोकप्रभा’च्या वाचकांसाठी ते त्यांच्या मुलाने म्हणजे अजय साने यांनी शब्दबद्ध केले आहे. अवघ्या ६०-६५ वर्षांत काळ किती बदलला याचा आलेखच या वर्णनातून वाचायला मिळतो.

मी या लेखाद्वारे तुमच्यापुढे उलगडणार आहे माझ्या आयुष्यातील छोटासा कालखंड, माझ्या बालपणाच्या इतिहासातील काही सोनेरी पाने. बालपणी आजोळाला एक अनन्यसाधारण स्थान असते. आईच्या माहेरपणाचा काळ हा आपल्याही दृष्टीने परीक्षेच्या जाचातून सुटलेल्या सासुरवाशिणीसारखा असतो. माझे आजोळ अत्यंत समृद्ध नव्हते, पण त्याच्या आठवणी अतिशय समृद्ध आहेत, कधीही न मिटणाऱ्या आहेत. त्या वेळी आम्ही कारवारला राहत होतो. हा साधारण १९५५ चा काळ असेल. मी मराठी आठवी-नववीत असेन, आणि माझी तीनही लहान भावंडे चौथी, दुसरी आणि बालवर्गात होती. परीक्षांमधून सुटका झाल्यावर आजोळला जाण्याच्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघत असायचो. प्रयाण करण्याअगोदरची आमची तयारी जोमात सुरू व्हायची. वर्षभर वापरलेले खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट याशिवाय आपले काय कपडे आहेत याचा आढावा घेतला जायचा. अगदीच नसतील तर त्या निमित्ताने ते शिवायचा मुहूर्त लागायचा. आजोळी नेण्यासाठी काही तरी खाऊ पाहिजे. आता कारवारसारख्या ठिकाणी त्या वेळी खाऊ म्हणजे काय स्वस्त मिळणार, तर दरवाजावर मोठय़ा वेताच्या टोपल्यांमधून खमंग आणि सालासकट काजू शेर आणि पायली या मापाने विक्रीला यायचे. दोन ते तीन रुपये शेर अशा दराने घेतलेले पाच सहा शेर काजू वर्तमानपत्राच्या वेगवेगळ्या पुडय़ांत भरून त्यावर नावे टाकून तयार ठेवायचे. मग सामानाची बांधाबांध सुरू व्हायची. त्या वेळी सामान घेऊन जाण्यासाठी असायचे फक्त दणदणीत लोखंडी ट्रंक. तिची सोबतीण असायची आतमध्ये वेगवेगळे नीट घडय़ा घालून जाड दोरीने घट्ट बांधलेली घोंगडीची वळकटी. बरोबर असायचा एक फिरकीचा पितळी चकचकीत तांब्या. त्यालाही एका वर्षांनंतर मे महिन्याच्या सुट्टीत झळाळी मिळालेली असायची. या तांब्याच्या फिरकीचे झाकण आतील एक-दोन छोटय़ा भांडय़ांची उत्साहात होणारी खुडबुड आत दामटवून ठेवायचे. त्याच्याही बरोबर असायचा त्याचा दादा म्हणजे पितळी टिफिन कॅरियर. त्या प्रवासात सगळ्यांना काय प्रचंड भूक लागायची हे आठवून आता मजाच वाटते. भाजीपोळी, आमटी, रस्सा, असे पाच-सहा माणसांचे जेवण यात सहज मावायचे. त्या सर्व डब्यांच्या वर आणखी एक छोटा डबाही असायचा, जो लॉकिंगसाठी वापरला जायचा. हे सर्व चार-पाच डबे एकत्र राहण्यासाठी एका बाजूने कडी असायची ती दाबल्यावर हे सर्व डबे अटेन्शनमध्ये एकावर एक रांगेत आमच्या भुकेची वाट बघत उभे राहायचे. हा जामानिमा तयार झाल्यावर आम्ही प्रवासाला तयार व्हायचो. प्रवास असायचा कारवार ते हुबळी, हुबळी ते पुणे, पुणे ते मुंबई, मुंबई ते भाऊचा धक्का, भाऊचा धक्का ते रेवस, रेवस ते अलिबाग तालुक्यातील आवास गावाजवळचे धोकवडे.

कारवारहून पहिला प्रवास असायचा एसटीचा. त्या वेळी एसटी हे प्रकरण नवीनच सुरू झाले होते. त्या वेळीही बसेस सुस्थितीत नसायच्या. त्या वेळच्या टोमर मेकच्या बसेसमध्ये २५-३० प्रवासी कसेबसे बसायचे. कमी प्रवासी आणि जास्त आवाज करत ही बस निघायची. पहाटे पाचला निघाली की हळूहळू तिच्या वेगाने घाट आणि जंगले मागे टाकत अंकोलामाग्रे याल्लापूर या गावी हाश्य-हुश्य करीत चार तासांनी येऊन थांबायची. या प्रवासात बस आणि सहप्रवाशांच्या पोटातील पाणीही कमी व्हायचे, पण घाटात आणि बाजूच्या जंगलातून हरणाच्या कळपांबरोबर आज कुठले प्राणी बघायला मिळणार ही उत्कंठा आम्हाला कायम ताजेतवाने ठेवायची. याल्लापूरला आल्यावर मात्र पोटातील कावळे आवाज करायला लागयचे. आता खाद्यपदार्थाचा पहिला हप्ता बाहेर यायचा तो म्हणजे दहीभात. दुसऱ्या दिवशी ताक करायचे नसल्याने सायीसकट दही एका कथालीत घेतलेले असायचे. ते सायीसकट दही आणि भात यांचा सुरेख संगम झाल्यानंतर आम्ही चारही भावंडे आणि आई हातावर घेऊन पाळीपाळीने जे घास खायचो ती चव अस्मरणीय होती. याल्लापूर म्हटले की अजूनही ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर उभे राहते.

कोणा ना कोणामुळे दहा मिनिटांच्या थांब्याचा एक तास झाल्यानंतर आमचा पुढचा प्रवास सुरू व्हायचा आणि आम्ही हुबळीला पोहोचायचो. हुबळीहून दहा तासांच्या प्रवासासाठी २० तास घेत एमएसएन रेल्वेची चेंगट सेवा आम्हाला पुण्याला पोहोचवायची. पुण्याला पोहोचल्यावर दोन-तीन दिवस वडिलांच्या माहेरी राहून मुंबईला प्रयाण करायचो. मुंबईलाही एक-दोन दिवस दिंडोशीला मामाकडे मुक्काम करून भाऊच्या धक्क्याकडे प्रस्थान करायचो. तिथे आमची मामे आणि मावसभावंडेही जाण्यासाठी तयार असायची. सकाळी सहा-साडेसहा वाजता भाऊच्या धक्क्यावर पोहोचल्यावर बोटीने प्रवास करायचा याचा आनंद तर असायचाच आणि अनामिक भीतीही असायची. सकाळच्या धूसर वातावरणात समोर पसरलेला अथांग सागर, त्याच्या लाटांवर डचमळणाऱ्या छोटय़ा छोटय़ा होडय़ा आणि समोर हळुवारपणे खाली-वर होणाऱ्या मोहोम्मदी, बगदादी इत्यादींमधील आपली बोट कुठली ही उत्सुकता असायची. बोटीत चढताना सर्वाची नजर असायची लाइफ जॅकेट कुठे आणि किती बांधलेली आहेत आणि वेळ आली तर कशी सोडायला लागतील याकडे. पुढचा सस्पेन्स असायचा तो धक्क्यावरून शिडीमाग्रे बोटीत उतरताना शिडीची वर-खाली होणारी हालचाल आणि आपला तोल सांभाळून आपण सुरक्षितपणे बोटीत उतरतो कीनाही याचा. इथेही हमालरूपी परमेश्वर आपल्या साहाय्याला धावून यायचा. आपले बखोटे धरून बोटीत कधी उतरवायचा हेच आपल्याला कळायचे नाही. आम्ही लहानपणापासूनच सामानाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होतो, त्यामुळे हमाली मिळायची शक्यता नाही हे माहीत असल्यामुळे कधी कधी बखोटे जरा जास्तच आवळलेले असायचे. नंतर त्यातल्या त्यात सुरक्षित कठडय़ाच्या काठाशी उभे राहून प्रवास सुरू व्हायची वाट बघायचो. बोट सुरू होण्याची वेळ जवळ आली की वेगवेगळ्या घंटांचे आवाज, त्यानंतर इंजिनचा आवाज छातीतली धडधड वाढवायचे. त्यात शेवटच्या क्षणी बोट पकडण्यासाठी धक्क्यावरून धावत येणारे प्रवासी आणि त्याची शिडीवरची कसरत बघताना अर्धा-एक तास कसा जायचा हे कळायचेच नाही. बोट सुरू झाल्यापासून रेवसची दिशा पकडेपर्यंत पुढे-मागे करताना बराच वेळ जायचा. प्रवासाचा वेळ असायचा जेमतेम पाऊण तास. पण त्याअगोदर अर्धा-पाऊण तास यातच गेलेला असायचा.

बोट जितकी मोठी तितका वेळ जास्त, जितकी छोटी तितका वेळ कामी असे गणित होते. लाँचने अध्र्या तासात आम्ही रेवसला पोहोचायचो. वाटेत काशाचा खडक नावाचे एक प्रकरण होते. या खडकापाशी रामदास नावाची मोठी बोट वादळात बुडाली होती. या खडकापाशी मोठय़ा लाटा येऊन बोटीला मोठे झोले देऊन जातात हा आमचा नेहमीचा अनुभव होता. तेव्हा या खडकापासून सुरक्षित अंतर ठेवून आम्ही रेवस येथे पोहोचायचो. तिथे ही बोटीवरून धक्क्यावर शिडीने चढायची कसरत पुन्हा व्हायची. तिथे उतरल्यावर बाजूचा सिमेंट काँक्रीटवर जमलेले शेवाळ, साठलेल्या पाण्याचा आणि मासे यांचा संमिश्र वास अजूनही नाकात आहे. तिथून दोन-तीन फर्लाग धावतपळत जाऊन बसच्या थांब्यावर पोहोचायचो. कारण पूर्वी या मार्गावरील खासगी कंपन्यांच्या बसेस मर्यादित सेवा अमर्याद प्रवासी घेऊन करायच्या. वीस माणसांच्या ऐवजी पस्तीस माणसे बसली तरी नवीन येणाऱ्या प्रवाशाचे स्वागत त्या वेळी आनंदाने व्हायचे. धोकवडय़ाला तशा सर्वच बसेस जायच्या, पण सासवन्याला जाणाऱ्या बसमध्ये गर्दी कमी असल्यामुळे ती मिळाली तर आनंद व्हायचा. तिथून साधारण साडेदहाच्या सुमाराला आम्ही धोकवडय़ाच्या फाटय़ावर उतरायचो. उतरल्यावरचा पहिला कार्यक्रम असायचा आईच्या नात्यातल्या गोखलेंच्या दुकानातील मोठय़ा तराजूवर सर्वाची वजने करणे. आता वजने नीटशी आठवत नाहीत, पण १० शेर २० शेरांची वजने उचलताना होणारी धडपड, तराजूच्या पारडय़ांच्या साखळ्याना धरून घेतलेले झोके अजूनही झुलवत आहेत. कमी जण असतील तर धुळीच्या रस्त्याने घराकडे वाटचाल सुरू करायचो. जास्त माणसे येणार असतील तर आजोबांनी पाठवलेल्या बलगाडीत जागा मिळवायच्या धडपडीनंतर समान चढवून चतुर आणि पाखऱ्या या बलजोडीबरोबर आमचे प्रयाण व्हायचे. आखूड आणि वाकडी िशगे असलेला चतुर आणि लांब आणि टोकदार िशगे असलेल्या पाखऱ्याची जोडी बालपणभर आम्हाला सहवास देऊन गेली. चतुर त्यातल्या त्यात गरीब आणि पाखऱ्या मारकुटा असल्याने प्रत्येकाची चतुऱ्याच्याच बाजूला बसायची इच्छा असायची. बलांच्या गळ्यातील घंटा आणि दगडावरून जाणाऱ्या चाकांच्या खडखडाटात घर आल्यावर होणारा आनंद अमर्याद होता. बांबूच्या कुंपणावरून उडय़ा मारून आजोळच्या त्या दुमजली घराकडे आम्ही धावत धावतच पोहोचायचो.

कुंपणाच्या आत आल्यावर आमचे स्वागत व्हायचे ते एखाद्या कुत्र्याच्या भुंकण्याने. बऱ्याच वेळा हा कुत्रा नवीन असायचा. कारण मधल्या आठ-दहा महिन्यांत एखाद्या बिबळ्याने किंवा वाघाने आधीचा कुत्रा नेलेला असायचा. नवीन कुत्र्याशी मत्री करण्याच्या मनसुब्याबरोबर मनात जुन्या कुत्र्याबद्दल हळहळही असायची. आत आल्यावर घरच्या गडय़ांची कुतूहलमिश्रित नजर, बाजूला असलेल्या भात भरडणाऱ्या जात्याची घरघर अजूनही मनात आणि कानात आहे. ही दुमजली वस्तू आजोबांनी स्वकष्टाने बांधली होती. पुढच्या बाजूला अंगण, त्यावर पत्र्याचा मांडव, पुढे ओसरी, तिथून वरच्या मजल्यावर जाणारे दोन जिने, नंतर असलेली मोठी खोली म्हणजेच हॉल, त्यातील पितळी कडय़ा आणि चारही कोपऱ्यांवर चांदीची गोल नाणी खिळ्यांनी ठोकलेला लाकडी झोपाळा, डाव्या बाजूला देवघर, उजव्या बाजूला माजघर, आत कोठीच्या दोन खोल्या, स्वयंपाकघर आणि जेवणाची खोली म्हणजे डायिनग हॉल, सगळ्यात मागे नारळाच्या झापांनी शाकारलेले अंगण, दोन स्नानगृहे आणि त्याच्या बाजूला असलेली विहीर असा टुमदार जामानिमा होता. घरासमोरची वर्तुळाकार बाग कृष्ण-कमळ, जाईजुईचे वेल, मोगरा, जास्वंद, तगर, हिरवा चाफा, अबोली यांनी फुललेली असायची. त्याच्या बाजूलाच सिताफळे, आंबे, पेरू याची कलमेही लावलेली होती. दुसऱ्या मजल्यावर आमच्या आनंदाचे माहेरघर होते, ती म्हणजे मोठ्ठी गच्ची आणि वेगवेगळ्या खेळाची साधने. लगतच्या खोलीत वर्षांपासून वाट बघत असायचा हिज मास्टर्स व्होइस ग्रामोफोन आणि वेगवेगळ्या पेटय़ांतून ठेवलेल्या नारायणराव व्यास, बालगंधर्व, बाई सुंदराबाई यांच्या रेकॉर्ड्सचा खजिना. या रेकॉर्ड्स न कुरकुरता ऐकण्यासाठी मुंबईहून जाताना ग्रामोफोनच्या नवीन पिनांचा बॉक्स आठवणीने घेऊन जायला लागायच्या.

दिनक्रमाची सुरुवात व्हायची सकाळी पाच-साडेपाचला येणाऱ्या कोंबडय़ांच्या बांगेने आणि कोकिळा, चिमण्यांच्या चिवचिवाटाने. प्रातर्वधिी आटोपून सर्व जण पाळायचे ते बाजूला असलेल्या िरग टेनिस कोर्टाकडे. अर्धा-पाऊण तास खेळून होईपर्यंत महादू नावाच्या गडय़ाने दोन-तीन चरव्या म्हशीचे दूध काढून आणलेले असायचे. दूध गरम होईपर्यंत नाश्ता व्हायचा तो म्हणजे खमंग गप्पांच्या मफिलीबरोबर गुलाबी रंगाचा जाडय़ा तांदळाचा मऊ भात, मेतकूट, लोणचे, वेणीतील पांढरा कांदा आणि पोह्य़ाचा पापड. महिनाभर जरी हा नाश्ता असला तरी कोणाला त्याचा कधीही कंटाळा यायचा नाही. यानंतर मात्र सर्वानाच काही तरी काम थोडय़ा प्रमाणात दिले जायचे. आजोबांची तशी शिस्तच होती. वालाचे वेल काढून त्याच्या शेंगा बाजूला करणे, खळ्यावर पेंढा पसरणे, शेतावर जाऊन आंब्यांच्या कलमावरचे आंबे, चिकू उतरवणे, रायआवळे झोडपणे आणि ते सर्व काढून घेऊन येणे, शेतातील विहिरींवरील रहाटावर टोणगे हाकात टाक्या पाण्याने भरणे, हँडपंपने पिण्याचे पाणी भरणे इत्यादी कामे सर्वानी मिळून केल्यामुळे कधीच जाचक वाटली नाहीत. आजोबांनी कामाच्या संबंधात मुले आणि मुली असा कधीच फरक केला नव्हता. त्यामुळे सामूहिक तांदूळ, गहू निवडणे व्हायचे. नंतर त्यात खडे जास्त मिळाले तर शिक्षाही व्हायची.

एक दीड तास कामे झाल्यावर मात्र खेळांसाठी मोकळीक मिळायची. गच्चीत पत्त्यांचा अड्डा जमायचा, मोठी माणसे रेकॉर्ड ऐकण्यात मश्गूल व्हायची, बायकांची स्वयंपाकाची कामे चालू असायची. साडेअकरा- बाराला ऊन चांगले डोक्यावर आलेले असायचे आणि पोटात कावळेही ओरडायला लागलेले असायचे. आजोबांचे काम झालेले पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण त्यांच्या अंघोळीसाठी त्यांच्या मागे लागायचो. कारण त्यांची अंघोळ आणि देवपूजा झाल्याशिवाय जेवण नाही. स्नान करून झाल्यावर आजोबांची पूजा जास्तीत जास्त वीस मिनिटे चालायची. पण पूजेच्या शेवटी अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात झाल्यावर देवघराबाजूला जमलेल्या आम्हा सर्वाना कोण आनंद व्हायचा.

तोपर्यंत स्वयंपाकघरात ताट आणि पाटांचा खडखडाट ऐकू यायला लागायचा. जेवताना शेतात पिकलेल्या भाताची मुबलकता असायची, पण विकत घ्यायला लागणाऱ्या गव्हाचे रेशिनगच असायचं. वयोगटाप्रमाणे तीन, दोन आणि एक अशाच पोळ्या वाढल्या जायच्या. आंब्यांचा रस मात्र पाहिजे तेवढा असायचा. त्यावेळची स्वीट डिश म्हणजे आमरस आणि आंबेभात.

दुपारी मात्र आजोबांच्या शिस्तीनुसार मोठय़ा लोकांची वामकुक्षी होईपर्यंत एक ते दीड तास सर्व खेळ दबक्या आवाजात व्हायचे. घरा बाजूला असलेल्या टाकीत मिळेल त्या लाकडाच्या होडय़ांची शर्यत व्हायची. दुपारच्या वामकुक्षीच्या वेळी दररोज आमच्यापकी आठ ते दहा वयोगटांतील मुलांची आलटून पालटून आजोबांच्या पायावर पाय देण्यासाठी नेमणूक व्हायची. बाकीची भावंडे कशी मजा करत असतील याचा कानोसा घेत आजोबा कधी घोरायला लागतात याची वाट बघणारी भावंडे अजूनही डोळ्यासमोर आहेत. चार साडेचार वाजता मोठय़ा लोकांची चहा कॉफी तर लहान मुलांसाठी किलगड, चिकू, जांब ही फळ फळावळ असायची. त्यानंतर सर्वाना खेळण्याची पूर्ण मुभा असायची. आमच्या दुपारच्या खेळाचा झोपाळा हा एक अविभाज्य घटक होता. झोपाळा आमची आगगाडी होती, तोच आमचे विमानही होते. त्या विमानातून जगावर आणि जगातूनही विमानावर उशांची बॉम्बफेक व्हायची. उशांची नासाडी होते आहे बघितल्यावर निजायच्या खोलीतील दटावाणी किंवा खऱ्याखुऱ्या धपाटय़ांमुळे जागतिक महायुद्ध संपायचे. चर्चगेट ते अंधेरी आणि दादर ते ठाणे या दोनही गाडय़ा एकाच झोपाळ्यातून चालायच्या. काही स्टेशनांवर गाडी थांबली नाही की प्लॅटफॉर्मवरील प्रवासी चिडायचे आणि त्याचे रडारडीतही रूपांतर व्हायचे. घरासमोरील लाकडी जिन्यावरून एक एक पायरी सोडून उडय़ा मारणे, होडी होडी म्हणजे दोघांनी एका पाउलावर दुसरे पाऊल ठेवून उडय़ा मारत धावणे असेही खेळ असायचे. घराच्या मागे असलेली विहीर कायम अमृताने भरलेलीच असायची. त्यावर एक लाकडी रहाट असायचा. अगदीच कंटाळा आला की तो रहाट फिरवून मडक्यातून वर आलेले ताजे थंडगार पाणी पन्हाळीतून वहात आल्यावर ओंजळीने पिण्याचे समाधान कोणत्याही कोिल्ड्रकने होणार नाही. नंतर सुरू व्हायचे मदानी खेळ. परसात खांब खांब खांबोळी, भक्र्याच्या भाटात जाऊन शेतात क्रिकेट व्हायचे. शेतात करवंदांच्या जाळ्यातून करवंदे खाण्याबरोबर कोंबडा की कोंबडी हा बेटिंगचा खेळ असायचा. करवंदं आत तांबडे लाल असेल तर कोंबडा आणि पांढरे असेल तर कोंबडी. संध्याकाळ झाल्यानंतर मोगरा, मधुमालती इत्यादी फुलांच्या गजरे, वेण्या तयार करायचे काम सुरू व्हायचे. नंतर कंदिलांचे साम्राज्य सुरू व्हायचे. कंदील, चिमण्या, आवडय़ाच्या काचा राखेने स्वच्छ पुसून प्रकाश देण्यास सज्ज व्हायच्या आणि आमचा परवचा म्हणणे सुरू व्हायचे. तिसापर्यंत पाढे, पावकी, निमकी, आउटकी झाल्यावर परसातील झोपाळ्याच्या कुरकुरत्या आवाजाच्या नादात मनाचे श्लोक, रामरक्षाही व्हायच्या. घरातील आज्या, आया आणि माम्याही त्यात सूर मिसळायच्या. कधी कधी जनावर म्हणजे वाघ किंवा बिबटय़ा आल्याच्या हाकाटय़ा सस्पेन्स तयार करायच्या. त्यावेळी कंदील घेऊन गोठय़ाचे दरवाजे बंद करायला कोण जाणार हा यक्ष प्रश्न असायचा. टीव्ही नसल्यामुळे रात्री एकत्र बसून खेळलेले बठे खेळ, पत्ते, गाण्याच्या भेंडय़ा, तर कधी खास गायकांना बोलावून रंगलेल्या मफिलीत निजानीज कधी व्हायची ते कळायचेच नाही.

आजोबांना धनगरी कुत्रा आवडायचा. साधारणपणे या काळ्याभोर कुत्र्याचे नाव वाघ्या वगरे असायचे. आमच्या आगमनानंतर सुरू झालेल्या भेटीचे मित्रतेत रूपांतर लगेचच व्हायचे. निघण्याच्या वेळेस मात्र या साथीदाराला पुढच्या वर्षीपर्यंत सुखरूप ठेव, बिबळ्या किंवा वाघापासून वाचव ही आमची प्रार्थना देवापर्यंत बरेचदा पोहोचायचीच नाही. त्यामुळे परत दुसरा कुत्रा, दुसरी दोस्ती आणि परत तोच विरह हे चक्र कायम असायचे. घरातील पाळीव प्राण्यात आणखी एक सभासद म्हणजे शेपटय़ा हळुवारपणे हलवत पायाशी सारख्या घुटमळणाऱ्या मांजरी. दूध काढल्यावर चरवीच्या सभोवताली फिरताना शांत असणारी मांजरे मात्र वर्षांतील बाकी महिने त्यांच्या वाटय़ाला येणारी दुधाची खरवड आम्ही खातो हे बघितल्यावर जोरात ओरडून निषेधही नोंदवायची. त्यांचा घराशी असलेल्या एकनिष्ठतेचा कळस म्हणजे एकदा त्यांची संख्या वाढल्यावर काही जणांना चांगले चार-पाच मल मनात नसतानाही बलगाडीतून संध्याकाळी दूर सोडून परत घरी येऊन बघतो ते ती आमच्या आधी खरवडीच्या पातेल्यापाशी हजर.

त्या दिवसांतील एक अविभाज्य भाग म्हणजे वर्षांचे पापड घालणे. याची तयारी सकाळी पाच वाजल्यापासून सुरू व्हायची. सर्व जिन्नस नियोजित प्रमाणात एकत्र करून डांगर कालवणे, ते व्यवस्थित कुटणे हे प्रकार झाल्यावर घरातील आणि आजूबाजूच्या बायका पापड लाटण्यास घ्यायच्या. आमच्या चिल्लर पार्टीचा कल त्यांच्या पापड लाटण्याबरोबर चाललेल्या खमंग गप्पा ऐकणे आणि उखळीत डांगर कुटण्यापेक्षा खाण्याकडेच जास्त असायचा. शेकडय़ाच्या हिशोबात पापड तयार झाल्यावर ते नेऊन दुपारी खळ्यातील पेंढय़ावर पसरवून वाळत टाकण्याचे काम आमचे असायचे. त्या पापडांची दुपारच्या कडक उन्हात वाऱ्याने उडून जाणार नाहीत याची काळजी घेत, कावळ्यांचे हवाई हल्ले परतवून टाकत राखण करताना नाकी नऊ यायचे.

आजोबांचे वैशिष्टय़ म्हणजे काम केल्यावर त्या मुलाला लगेचच बोनस मिळायचा. आमच्याकडून गोडीगुलाबीने कामे करून घेण्यात त्यांचा हातखंडा होता. शेतात भुईमुगाची काढणी झाल्यावर काही शेंगा मातीतच असायच्या. बलजोडी जुंपून नगराच्या फाळावर दोन्ही बाजूला तोल सांभाळून दोघे जण उभे राहून शेत नांगरताना मिळालेल्या शेंगा आमच्या या आमिषामध्ये त्यांचे शेत नांगरून व्हायचे आणि आम्हीही मातीत उन्हामुळे भाजून खुटखुटीत झालेल्या शेंगा मिळाल्यामुळे खूश असायचो. शेतातील विहिरीवरचा रहाट तिथल्या टाक्या भरेपर्यंत टोणगे हाकणे हे एकसुरी काम हापूस आंब्याच्या प्रलोभनाने का होईना सर्व जण आनंदाने करायचे. बऱ्याच वेळा शेतात रायवळ आंबे झाडे हलवून जाजमात झेलण्याचा उद्योग असायचा. आकडीने फक्त तयार आंबा कसा काढायचा, आंबे, चिकू जांब इत्यादी फळे तयार झालेली कशी पारखायची याचा त्यांच्या आडाख्यांचा आम्हाला जन्मभर उपयोग झाला. झाडावरून उतरवलेल्या कलमी आंब्यांवर मात्र त्यांचा फारच जीव असायचा आणि ते त्यांची अगदी लहान मुलांसारखी काळजी घ्यायचे. हे आंबे मोठय़ा पातेल्यातून धुतले जायचे आणि नंतर ते स्वच्छ पुसून कपाटात किंवा हाऱ्यात शिस्तीने उभे लावायचे. आंब्यासारख्या फळालाही कुठल्याची प्रकारची इजा होऊ नये याकडे असणारा त्यांचा कटाक्ष आम्हालाही कायमची शिकवण देऊन गेला. बहुतेक वेळी शांत असलेले आजोबा कधी कधी वात्रट नातवंडांच्या मागे खोमटे घेऊन धावताना आणि त्यांना झाडे, तुळशी वृंदावन यांच्या बाजूने चुकवत नातवंडे पळतानाचा प्रसंगही व्हायचा.

झाडांवरून उतरवलेली आंबे, जांब ही फळे मन मानेल त्या वेळी कोणीही न खाता एकत्र बसून खाण्याचा आजोबांचा शिरस्ता होता. पहिल्या पिकलेल्या आंब्याचे त्या वेळी एवढे कौतुक व्हायचे की तो घरच्या सर्व माणसांमध्ये विभागून दिला जायचा. वाटून घेण्याची सवय बालपणापासूनच अशाच प्रसंगांमुळे रक्तात भिनली. माहेरवाशिणींसाठी तयार आंबे आणि बारक्या फणसांचे साठे घालणे, आंब्याच्या गराचा आटवून गोळा तयार करणे इत्यादी मोसमी कामेही या वेळी व्हायची आणि हा मेवा आम्हाला कायम आजोळची आठवण करून द्यायचा.

आमच्या आजीचे सर्वावर खूपच प्रेम होते. त्या दिवसांत तुळशी वृंदावनाजवळ तिला जवळपास दरवर्षी विंचवाचा प्रसाद मिळायचा. त्यामुळे त्या भागात आम्ही जाऊ नये यासाठी ती सतत सूचना द्यायची आणि बारीक नजरही ठेवायची. आजोबांच्या कर्तबगारीमुळे आणि दराऱ्यामुळे ती थोडी मागे मागेच असायची.

आकाशात मेघांची गर्दी मे महिना संपल्याची वर्दी द्यायची. तेव्हा एक टेन्शनचा भाग यायचा ते म्हणजे बाबांकडून आलेले रिझल्ट कार्ड. नंतर सगळ्यांच्या रिझल्टचा सार्वजनिक आढावा व्हायचा. परतीचे वेध लागले की मनात हुरहुर लागून राहायची. पुढच्या वर्षीपर्यंत ही मजा आता करायला मिळणार नाही ही कल्पना मनात घर करून राहिलेली असायची.

प्रत्येकाचे परतीचे वेळापत्रक पुढे-मागे असायचे त्यामुळे एसटी ड्रायव्हरला सासवन्याला अमुक इतक्या सीट रिझव्‍‌र्ह करून ठेव असा निरोप धाडला जायचा. पण सगळ्यांना वाटायचे की त्या ड्रायव्हरला हा निरोप कधीही मिळू नये. कधी कधी असेही व्हायचे की, जाणारे दोन मेंबर आणि सोडायला आलेले वीस जण बघून बस थांबायचीच नाही आणि मुक्काम आणखी काही दिवस वाढायचा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा या आजोळ आणि अशा या आजोबांचे आमच्या हृदयात अढळ स्थान आहे. अजूनही ते दिवस स्वप्नवतच वाटतात. घरी परत जाताना गोखल्यांच्या त्याच तराजूवर परत सर्व जण वजन करायला धावायचो. तराजू आमचे जातानाचे वाढलेले वजन दाखवायचा. पण आजोळातील आठवणींचे आणि सुखाचे वजन कुठलाच तराजू मोजू शकणार नाही.
प्रमोद श्रीधर साने – response.lokprabha@expressindia.com