देवी विशेष : महालक्ष्मी आणि करवीरमाहात्म्य आदिशक्तीचे कौतुक मोठे

मातृदेवतेची उपासना ही बहुधा मानवी इतिहासाइतकीच पुरातन असावी. सृष्टीतील सर्जनशक्तीचे कौतुक आणि पूजन केवळ भारतातच नव्हे तर जगभरातच विविध मार्गानी केले जाते.

aadishakti-devi
देवीच्या विविध रूपांचे सुंदर वर्णन कवी, लेखक, शिल्पकार, चित्रकार, संगीतकारांनी त्याचप्रमाणे विद्येच्या आणि कलेच्या सर्वच उपासकांनी आपापल्या माध्यमातून केलेले दिसते.

डॉ. चिन्मयी देवधर – response.lokprabha@ajitsibhu
मातृदेवतेची उपासना ही बहुधा मानवी इतिहासाइतकीच पुरातन असावी. सृष्टीतील सर्जनशक्तीचे कौतुक आणि पूजन केवळ भारतातच नव्हे तर जगभरातच विविध मार्गानी केले जाते. या विविधरंगी जगातील सौंदर्याच्या, हळुवारपणाच्या, वात्सल्याच्या, पालकत्वाच्या सर्व भावांचे प्रतिबिंब आपल्याला देवीविषयक मानवी कल्पनांमध्ये दिसते.

देवीच्या विविध रूपांचे सुंदर वर्णन कवी, लेखक, शिल्पकार, चित्रकार, संगीतकारांनी त्याचप्रमाणे विद्येच्या आणि कलेच्या सर्वच उपासकांनी आपापल्या माध्यमातून केलेले दिसते. या सर्व कलावंतांनी, विद्यावंतांनी आपापल्या वकुबानुसार तिला जागवले, मनाजोगे सजवले आणि उत्कट भक्तीने आळविले. जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय आपल्या शक्तिशाली हातांनी पेलून धरणारी ही जगज्जननी, विश्वातील सर्व चराचरासंबंधी कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम् असे सामथ्र्य असणारी ही जगदम्बा तिच्या पूजकांनी सर्वव्यापीच नव्हे तर विश्वाला व्यापून उरणाऱ्या अशा ‘आदिशक्ती’च्या रूपात पाहिली आणि त्याच स्वरूपात त्यांनी तिची उपासना केली.

महाराष्ट्रातही विविध रूपांमध्ये देवीची उपासना केली जाते. कोल्हापूर, माहूर, तुळजापूर अशी प्रसिद्ध ठिकाणेच नव्हे तर गावागावांत मातृदेवतांची, ग्रामदेवतांची ठाणी दृष्टीस पडतात. शक्ती उपासनेच्या महत्त्वाच्या स्थानांना भारतात शक्तिपीठे अशी संज्ञा आहे. या शक्तिपीठांच्या उत्पत्तीविषयी एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. दक्षाच्या यज्ञामधील सतीच्या आत्मसमर्पणानंतर, शिव तिचे शव हातात घेऊन विमनस्क होऊन त्रिभुवनात संचार करत होता. त्या वेळी विष्णूने सर्व देवांच्या विनंतीवरून आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या कलेवराचे तुकडे केले. पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी हे तुकडे पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठांची निर्मिती झाली.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे स्थानमाहात्म्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची समजली जातात. माहूर (रेणूकामाता), कोल्हापूर (महालक्ष्मी), तुळजापूर (भवानी) ही तीन, तर वणी (सप्तशृंगी) हे अर्धे शक्तिपीठ मानले जाते.

याच साडेतीन शक्तिपीठांपैकी देवी महालक्ष्मी किंवा अंबाबाई आणि तिचे स्थान कोल्हापूर यांचा विचार करू या.

ऐतिहासिक महत्त्व

कोल्हापूर किंवा करवीर हे स्थान प्राचीन काळापासून पवित्र मानले गेले आहे. ऐतिहासिक दृष्टीने करवीर आणि तिथे जागती-गाजती असलेली महालक्ष्मीदेवी यांचा सर्वात प्राचीन उल्लेख राष्ट्रकुट राजा अमोघवर्ष याच्या संजान ताम्रपटामध्ये येतो. प्रस्तुत अभिलेखामध्ये प्रजेवरील महामारीचे संकट दूर करण्यासाठी म्हणून त्याने आपल्या डाव्या हाताची करंगळी अर्पण केल्याचा उल्लेख येतो. (इसवी सन ८७१) तसेच सातवाहन काळातील पैठण येथील पीठजा देवीच्या स्थापनेच्या संदर्भातही करवीरनिवासिनी महालक्ष्मीचा उल्लेख येतो. राष्ट्रकुटानंतर कदंब, शिलाहार, सिन्द, चालुक्य, यादव याही राजवंशांनी महालक्ष्मीची आराधना केल्याचे उल्लेख सापडतात. मुस्लीम राजवटीत काही काळ विस्मृतीत गेलेले, लपलेले, परंतु भक्तांच्या मनात सुरक्षित असलेले या आदिमायेचे तेज मराठी राजसत्तेच्या निर्भय अमलात पुन्हा तरारून, झळाळून उठले. पुढे छत्रपती भोसल्यांच्या करवीर शाखेमुळे या देवस्थानाला आगळेच वैभव आणि माहात्म्य प्राप्त झाले.

‘तन्त्रचूडामणी’, ‘महापीठनिर्णय’, ‘देवीभागवत’, ‘स्कन्दपुराणाचा सह्यद्रिखण्ड’, ‘देवीमाहात्म्यम्’ अशा ग्रंथांमध्ये येणाऱ्या शक्तिपीठांच्या नामावलीमध्ये करवीरपीठाचे आणि तेथील अधिष्ठात्री देवता म्हणजेच महालक्ष्मीचे नाव मानाने घेतले जाते. ‘करवीरमाहात्म्य’ असे एक स्थलपुराणही कोल्हापूर आणि करवीरनिवासिनी महालक्ष्मीच्या महतीवर रचलेले दिसून येते. कोल्हापूर या तीर्थक्षेत्राच्या तसेच महालक्ष्मी या दैवताच्या सामाजिक व धार्मिक विकासाच्या दृष्टीने या ग्रंथाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. करवीरमाहात्म्यानुसार ते पद्मपुराणाचा भाग आहे, परंतु उपलब्ध पद्मपुराणाच्या आवृत्त्यांमध्ये करवीरमाहात्म्याचा समावेश झालेला दिसत नाही. ७३ अध्यायांचे हे स्थलपुराण साधारणत: इसवी सन १३०० ते १३५० या काळात लिहिले गेले असावे, असे मत या ग्रंथाचे संपादक प्रा. जी. व्ही. तगारे यांनी मांडले आहे. या संस्कृतातील स्थलमाहात्म्याचे मराठी रूपांतर कोल्हापुरातीलच प्रसिद्ध अशा जोशीराव घराण्यातील दाजिबा जोशीराव यांनी ७२ अध्यायांत (आठ हजार ओव्यांद्वारे) केले आहे.

कोल्हापुरी सध्या उभे असलेले मंदिर कोणत्या काळात व कोणत्या राजवटीखाली बांधले गेले याची नक्की माहिती देणे अवघड आहे; परंतु मूळचे काळ्या पाषाणातील हे मंदिर हेमाडपंती शैलीत बांधलेले आहे. पश्चिम बाजूला महाद्वार असून तिथून आत आल्यानंतर भव्य दीपमाळा आपले स्वागत करतात. यानंतर लाकडी स्तंभांचा गरुडमण्डप, पुढे गणेशमूर्ती असलेला दगडी मण्डप असून त्यानंतर पश्चिमाभिमुख अशी तीन मंदिरे दिसतात. त्यापैकी मध्यभागी हे महालक्ष्मीचे असून इतर दोन मंदिरे महाकाली व महासरस्वती यांची आहेत. वर उल्लेखिलेल्या शक्तिपीठांच्या कथेनुसार सतीचे तीन नेत्र या क्षेत्री पडल्यामुळे तिथे या तीनही देवतांची स्थाने निर्माण झाली. इतर भारतीय पारंपरिक मंदिरांप्रमाणेच महालक्ष्मी मंदिराच्या स्तंभांवर, भिंतींवर शिल्पकलेचे सुंदर नमुने दिसतात.

हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे. देवळातील खिडक्या व झरोक्यांची रचना अशा प्रकारे केली आहे की, कार्तिक आणि माघ या महिन्यांमध्ये म्हणजे साधारणत: ९, १०, ११ नोव्हेंबर आणि ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी या काळात अतिशय विलक्षण असा किरणोत्सव अनुभवता येतो. मावळतीची मृदू सूर्यकिरणे गाभाऱ्यात थेट प्रवेश करून पहिल्या दिवशी मूर्तीचे चरण, दुसऱ्या दिवशी मध्यभाग, तर तिसऱ्या दिवशी तिचे मुख उजळून टाकतात.

मूर्ती आणि क्षेत्रमाहात्म्य

महालक्ष्मीची मूर्ती साधारणपणे २.५ फुटांची असून काळ्या दगडात कोरलेली आणि चतुर्भुज आहे. तिने चार हातांमध्ये गदा, ढाल, पात्र आणि महाळुंग धारण केले आहे. तर देवीच्या मस्तकी शिवलिंग शोभते. महालक्ष्मीच्या या मूर्तीचे वर्णन हेमाद्रि पंडितांच्या ‘चतुर्वर्गचिन्तामणि’ या ग्रंथात दिसते.

दक्षिणाध: करे पात्रमूध्र्वे कौमोदकी तथा ।

वामोध्र्वे खेटकं धत्ते श्रीफलं तदध: करे।

बिभर्ति मस्तके लिङगं पूजनीयां विभूतये ॥ ’’

मूर्तीचे वर्णन पाहिल्यानंतर काही कोडय़ात टाकणारे प्रश्न समोर येतात. या देवीचे नाव महालक्ष्मी असल्याने साहजिकच तिचा संबंध विष्णूशी जोडला जातो; पण ही देवी तर मस्तकावर शिवलिंग मिरविते आहे. मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने महालक्ष्मीची मूर्ती शैव आहे. हे जागृत शक्तिपीठ असल्याने शाक्त वैशिष्टय़े लक्षात घेणेही आवश्यक आहे. एकूणच वैष्णव, शैव आणि शाक्त अशा तीनही पंथांचा सुंदर संगम या तीर्थी दिसतो. करवीरमाहात्म्याचा रचयिता म्हणतो,

करवीरे जलं शम्भु: पाषाणस्तु जनार्दन: ।

सिक्ता मुनय: सर्वे तरव: सर्वदेवता: ॥

आद्यं तु वैष्णवं क्षेत्रं शक्त्यागमसम्न्वितम्।

भुक्तिमुक्तिप्रदं नणां वाराणस्या यवाधिकम् ॥

‘‘करवीर क्षेत्रात सर्व जल शंभुरूप आहे तर सर्व पाषाण जनार्दन म्हणजेच विष्णुरूप आहेत. सर्व वाळुकण हे ऋषी असून सर्व वृक्ष देवता आहेत. पूर्वी विष्णूचे क्षेत्र असलेले हे नगर शक्तीच्या आगमनामुळे ‘शक्तियुक्त’ झाले आहे. मनुष्यांना भुक्ती आणि मुक्ती दोन्ही प्रदान करणारे हे क्षेत्र वाराणसीहून सर्वाधिक श्रेष्ठ आहे.’’

आपल्या वण्र्य तीर्थक्षेत्राला अतिशय विश्वासाने आणि श्रद्धेने हा रचनाकार काशीहूनही अधिक माहात्म्य बहाल करतो. तेवढय़ावरच न थांबता करवीरमाहात्म्यामध्ये याविषयी एक कथाही सांगितली आहे. त्यानुसार विष्णूने उत्तरकाशी व दक्षिणकाशी (करवीर) अशी दोन क्षेत्रे अनुक्रमे शिव आणि शक्ती यांच्यासाठी निर्माण केली. पुढे कधी तरी कोणते क्षेत्र अधिक श्रेष्ठ यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. तो वाद सोडवताना, विष्णूने तराजूच्या तागडीत घालून दोन्ही क्षेत्रे तोलली. तेव्हा दक्षिणकाशीचे पारडे जड झाले. त्यामुळे मूळ काशीपेक्षाही दक्षिणकाशी श्रेष्ठ आहे असा निर्वाळा विष्णूने दिला. समन्वयाची भूमिका घेणारा असला तरीही स्थलपुराणकाराचा वैष्णव कल अशा कथांमधून स्पष्ट दिसतो.

करवीरमाहात्म्यात न येणारी पण लोकधारणेत दृढ झालेली एक कथा कोल्हापूरच्या महालक्ष्मीला थेट तिरुपतीच्या वेंकटेशाशी जोडते. या कथेनुसार एकदा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांपैकी श्रेष्ठ कोण, असा प्रश्न सर्व ऋषींना पडला असता भृगु ऋषींवर याचा निर्णय देण्याची जबाबदारी आली. भृगु प्रथम ब्रह्मदेवाकडे गेले, परंतु ब्रह्मदेवाने त्यांच्याकडे पाहिलेसुद्धा नाही. मग तिथून ते कैलासावर गेले. शिव, पार्वतीबरोबर वार्तालाप करीत असल्याने त्यांनीही भृगुंकडे दुर्लक्षच केले. या दोन्ही अनुभवांवरून क्रोधित होऊन भृगु वैकुंठात पोहोचले तेव्हा विष्णू भगवन् विश्रांती घेत होते. भृगुंनी सरळ विष्णूच्या छातीत लाथ मारली; पण चिडण्याऐवजी विष्णूने उलट माझ्या कठोर छातीमुळे तुमच्या चरणकमलांना इजा तर झाली नाही ना? असा प्रश्न केला. या घटनेमुळे विष्णू सर्वश्रेष्ठ तर ठरला, परंतु विष्णूच्या हृदयात वास करणाऱ्या लक्ष्मीच्या रोषाला मात्र तो पात्र ठरला व रागावून ती त्याच्यापासून दूर कोल्हापूरला येऊन राहिली. दरवर्षी वेंकटेशाकडून त्याच्या या कोपलेल्या पत्नीला साडीचा मान पाठवला जातो. तिरुपतीचे दर्शन महालक्ष्मीच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही असाही काही भक्तांचा विश्वास आहे.

करवीर तसेच कोल्हापूर या नावाविषयीदेखील कथा प्रसिद्ध आहेत. गयासुर, लवणासुर आणि कोलासुर असे तीन राक्षस भाऊ होते. त्यापैकी लवणासुर व गयासुर यांना विष्णूने मृत्युपंथी धाडले. कोलासुराने मात्र कोलगिरी या क्षेत्री तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वज्रासारख्या कठीण शरीराचा वर मिळवला. त्याचे राज्य बळकावलेल्या सुकेशीचा पराभव करून कोलासुराने अनेक वर्षे उत्तम राज्य केले. त्यानंतर आपला ज्येष्ठ पुत्र करवीर याला राज्यावर बसवून कोलासुर स्वत: तपश्चर्येसाठी वनात गेला. करवीराला मात्र आपल्या काकांच्या मृत्यूचा प्रतिशोध घ्यायचा असल्याने त्याने सर्व देवांना त्रस्त करून सोडले. शेवटी रुद्राने त्याला मारले; परंतु त्याच्या पराक्रमावर खूश होऊन ही रणभूमी त्याच्या नावाने करवीर म्हणून प्रसिद्ध होईल असा वर दिला.

कोलासुराला मुलाच्या मृत्यूविषयी कळल्यानंतर त्याला अपार दु:ख झाले; परंतु महालक्ष्मीचा निवास जोवर करवीरक्षेत्री आहे तोवर आपण देवांना हरवू शकत नाही. म्हणून त्याने देवीला शंभर वर्षे करवीरक्षेत्राच्या बाहेर राहण्यास सांगितले. त्यानंतर कोलासुराने सर्व देवांना भयग्रस्त केले. शेवटी देवांच्या विनंतीवरून महालक्ष्मीने कोलासुराविरुद्ध युद्ध आरंभले. ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र या तिन्ही देवांच्या मदतीने देवी महालक्ष्मीने अखेरीस कोलासुराचा वध केला. मृत्यूपूर्वी त्याने असा वर मागितला की, त्याच्या नावावरून हे क्षेत्र कोलापूर म्हणून जाणले जावे. तसेच त्याच्या मृत्यूची आठवण म्हणून कुष्मांडभेदन म्हणजेच कोहळा फोडण्याचा विधी दरवर्षी करावा. या कथेमध्ये महालक्ष्मीचे सर्वशक्तिमान आदिशक्तीचे रूप स्पष्ट होते.

याच कथासूत्रात पुढे लक्ष्मीची प्रियसखी त्र्यम्बुली किंवा टेम्बलाई हिचा वृत्तान्तदेखील येतो. कोल्हापुरातच महालक्ष्मी मंदिरापासून थोडय़ा अंतरावर टेम्बलाईचे मंदिर आहे. हिला महालक्ष्मीची आक्का मानली जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही देवी महालक्ष्मी मंदिराकडे पाठ करून आहे. ती महालक्ष्मीवर रुसलेली आहे. करवीरमाहात्म्यात ही कथा येते. त्र्यम्बुली ही पूर्वजन्मात कौण्डिन्य ऋषीची पत्नी सत्यव्रता होती. एकदा पतीचे पाय चेपत असताना, दारी याचक आला म्हणून ती उठली व त्यामुळे पतीने तिला दासी होण्याचा शाप दिला; परंतु तिच्या उठण्याचे खरे कारण समजताच ती महालक्ष्मीची दासी होईल असा उ:शाप तिला मिळाला आणि एका संतानहीन ब्राह्मण दांपत्याच्या पोटी ती जन्माला आली. व्रतानुसार तिला महालक्ष्मीच्या सेवेसाठी अर्पण करण्यात आले. तिन्ही त्रिकाळ पाण्यात राहून महालक्ष्मीसाठी सुवर्णकमळांचे रक्षण करणारी म्हणून तिचे नाव त्र्यम्बुली असे पडले असे करवीरमाहात्म्याचा लेखक म्हणतो. मूळ प्राकृत टेम्बलाईचे संस्कृत रूपांतर करून तिला लोकदैवतांच्या कक्षेतून अभिजात दैवतांच्या परिघात आणण्याचा हा प्रयत्न दिसतो.

पुढे या कथेत असा भाग येतो की, कामाक्ष हा कोलासुराचा द्वितीय पुत्र सुडाच्या भावनेने पछाडला गेला. पाताळातून योगदण्ड मिळवून त्याने व त्याची बहीण रक्ता हिने महालक्ष्मीसह सर्व देवदेवतांना शेळ्या व मेंढय़ांमध्ये रूपांतरित केले. त्र्यम्बुलीने मोठय़ा हिमतीने आणि चतुराईने रक्ता व कामाक्षाला ठार मारून योगदण्डाने सर्व देवदेवतांना त्यांचे मूळ स्वरूप प्राप्त करून दिले; परंतु अतिशय महत्त्वाच्या अशा कुष्माण्डभेदन विधीच्या वेळी सर्व जण तिला विसरले. त्यामुळे ती रागावून टेकडीवर गेली. महालक्ष्मीच्या हे लक्षात येताच तिने टेम्बलाईची समजूत घातली. दरवर्षी ललितापंचमीला ती स्वत: टेम्बलाईकडे येईल व टेम्बलाईच्याच मंदिरात कुष्माण्डभेदनाचा विधी होईल असे कबूल केले. आजही लक्ष्मी टेम्बलाईभेटीचा अतिशय सुंदर प्रसंग दरवर्षी साजरा होतो. कुष्माण्डभेदनाचा विधी हा बलीचे प्रतीक असल्याने या विधीचे मुख्य मंदिरातील स्थान हलवल्याचे काही विद्वानांचे मत आहे.

एकूणच या सर्व कथांमधून कोल्हापुरात झालेला विविध परंपरांचा मनोरम संगम दिसून येतो.

दरवर्षी नवरात्रोत्सव महालक्ष्मी मंदिरात अतिशय उत्साहाने व श्रद्धेने साजरा होतो. प्रतिपदेला घटस्थापना होऊन नऊ दिवस देवीची नऊ रूपे पाहावयाला मिळतात. ललितापंचमीला टेम्बलाई भेट व कुष्माण्डभेदनाचा सोहळा होतो. तर नवमीला होम संपन्न होतो. या काळात देवालयाची तसेच महालक्ष्मीच्या मूर्तीची शोभा अवर्णनीय असते. याशिवाय चैत्र कृष्ण प्रतिपदेला होणारा रथोत्सवही देवस्थानाचा महत्त्वाचा समारंभ आहे.

या आधुनिक काळातही सर्व समारंभांमध्ये अतिशय उत्साहाने सहभागी होणारे भक्त तसेच दररोजही दर्शनासाठी होणारी गर्दी ही महालक्ष्मीच्या लोकप्रियतेचे आणि लोकमान्यतेचे प्रतीक आहे. शतकानुशतके या आदिमायेने भक्तांवर घातलेली मायेची पाखर हेच या भक्तीचे कारण आहे. तिच्या या अगाध मायेला श्रद्धापूर्वक नमन!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Navratri 2021 lokprabha special issue devi vishesh mahalaxmi adishakti dd