अमृता सुभाष – response.lokprabha@expressindia.com
काही वर्षांपूर्वी मला पाठदुखीच्या त्रासाने अतिशय हैराण केलं होतं. त्या दरम्यानच्या काही सिनेमांमध्येही मी काहीशी लंगडत चालताना दिसत असेन; पण मला तेव्हा कळतच नव्हतं, की माझा हा त्रास नेमका कशामुळे आणि का आहे ते. मी नेमकं काय करायला हवं हेही समजत नव्हतं. एमआरआय काढला, जिममध्ये जाऊन व्यायाम करू लागले; पण काही केल्या दुखणं कमी होईना. कुठेही व्यवस्थित निदान होत नव्हतं. माझ्या नवऱ्याने म्हणजे संदेशने मला फिटनेस तज्ज्ञ शैलेश परुळेकर यांच्याकडे जाण्यासाठी सुचवलं.
मी त्यांना भेटून माझ्या दुखण्याबाबत सविस्तर माहिती दिली. माझं दुखणं समजून घेऊन त्यानुसार त्यांनी व्यायाम सांगितले. साधारणपणे जिममध्ये सगळ्यांना सरसकट एकच व्यायाम सांगितला जातो; पण परुळेकर सरांनी असं केलं नाही. झोपताना एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर कशी वळू हे विचारण्याइतपत माझं दुखणं गंभीर होतं; पण सरांनी सांगितलेल्या व्यायामाने थोडा फरक पडायला सुरुवात झाली. मी वांद्रे येथे राहते. जिम कांदिवलीमध्ये आहे. खरं तर मला ते लांब पडत होतं; पण माझ्या पाठदुखीवर परुळेकर सरांच्याच जिममध्ये इलाज होऊ शकतो याचा प्रत्यय मला आला. त्यामुळे मी आणि संदेश रोज पहाटे जिमसाठी कांदिवलीत जाऊ लागलो. तो व्यायाम काही महिने सलग केल्यानंतर मला बरं वाटू लागलं. माझी पाठदुखी कमी होत होती.
‘किल्ला’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानची एक आठवण सांगायला नक्की आवडेल. ‘किल्ला’ या सिनेमाचं शूटिंग सुरू होतं. त्यात एक प्रसंग होता- त्यानुसार मला सिलेंडर उचलून तो शेगडीला जोडून शेगडी सुरू करून पोळ्या करायच्या होत्या. माझी पाठदुखी टोकाला पोहोचली होती. मला जास्त वजन उचलता येत नव्हतं. फॉरवर्ड बेण्डिंगही जमत नव्हतं. माझ्या हालचालींवर बरेच र्निबध आले होते. चालतानाही त्रास व्हायचा. धावणं तर या जन्मात शक्य नाही असं वाटत होतं; पण व्यायामामुळे बराच फरक जाणवायला सुरुवात झाली होती. ‘किल्ला’ सिनेमातल्या त्या प्रसंगात सिलेंडर शेगडीला जोडून ती पेटवायची असल्यामुळे सिलेंडर भरलेला असणं गरजेचं होतं. भरलेला सिलेंडर साहजिकच जड असतो; पण पाठदुखीमुळे मी कित्येक महिने काहीच जड उचलू शकत नव्हते. त्यामुळे तो प्रसंग कसा शूट होईल याबद्दल मला शंकाच होती; पण शूटिंग सुरू झालं आणि मी तो प्रसंग चांगल्या प्रकारे शूट केला. त्या प्रसंगानंतर मी किती तरी वर्षांनी जड काही उचललं आहे असं वाटू लागलं. ते करताना मला अजिबात त्रास झाला नाही. ही बरं होण्याची सुरुवात आहे असं त्या वेळी वाटलं. गुहागरमध्ये ‘किल्ला’चं शूटिंग सुरू असताना सरांनी सांगितलेले सगळे व्यायाम मी करायचे. त्याचाही फायदाच झाला.
व्यायामात सातत्य ठेवल्याने माझी पाठ झपाटय़ाने बरी होऊ लागली. १०० किलोचं वजन पाठीवर ठेवून मी स्कॉट करू शकेन इतपत परुळेकर सरांनी माझी पाठ सशक्त बनवली. माझ्या शरीराला कोणत्या व्यायामाची गरज आहे हे जाणून घेऊन त्यांनी मला व्यायाम शिकवले. त्यात सातत्य ठेवणं ही माझी जबाबदारी होती. मीही ते व्यायाम त्यांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे करत होते. आजही करते. त्यामुळेच माझं पाठीचं दुखणं बरं होईल की नाही या मला असलेल्या शंकेपासून मी दूर गेले आणि माझं दुखणं नक्कीच बरं होऊ शकतं हा विश्वास वाटू लागला.
एका आगामी सिनेमात सोनाली कुलकर्णीसोबत माझं एक नृत्य आहे. सोनाली उत्कृष्ट नर्तिका आहे. ‘अप्सरा आली’ या गाण्यापासून तिचं नृत्यातलं प्रावीण्य प्रेक्षकांना माहीतच आहे. तिच्याबरोबर तालीम करताना मला ते नृत्य जमेल की नाही, अशी शंका वाटत होती. कारण नृत्य करताना लागणारी क्षमता, ताकद वेगळी असते. शिवाय सोबतीला सोनाली कुलकर्णी. तिच्या क्षमतेशी जुळवून घेण्याचं आव्हान होतं. त्या क्षणी मला वाटलं की, माझी पाठदुखी परत येतेय की काय; पण परुळेकर सरांनी त्याही काळात माझ्याकडून व्यायाम करून घेतला. त्या नृत्याची तालीम आणि शूटिंग दिवसभर सुरू होतं; पण तरी माझ्या पाठीला काही झालं नाही. मी पळूही शकणार नाही असं वाटत असतानाच सरांनी शिकवलेल्या व्यायामामुळे मी नाचूही शकले याचा प्रचंड आनंद आहे.
(शब्दांकन : चैताली जोशी)