|| विजया जांगळे
पट्टचित्रांची परंपरा जपणारं ओदिशामधील रघुराजपूर हे आर्टस्टि व्हिलेज फोनी या चक्रीवादळाच्या तडाख्यात उद्ध्वस्त झालं आहे. एरव्ही पर्यटकांनी आणि कलासाधकांनी गजबजलेल्या या छोटय़ाशा गावात सध्या भिजलेल्या चित्रांकडे, तुटलेल्या शिल्पांकडे पाहणारे हताश चेहरेच जागोजागी दिसत आहेत.
खूप वर्षांपूर्वी ओदिशातल्या साधारण जंगलासारख्या असलेल्या भागात बंगालमधून एक कलाकार आला. त्याने चुनखडी आणि इतर नसíगक साधनांच्या साहाय्याने आपल्या परीने जमेल तसे रंग तयार केले आणि जगन्नाथाची प्रतिमा रंगवली. आज आर्टस्टि व्हिलेज म्हणून जगभर ओळखल्या जाणाऱ्या रघुराजपूरमध्ये रुजलेल्या कलेची ती नांदी ठरली. आकर्षक रंगांत रंगवलेली लहानमोठी चित्रं, लाकडाची खेळणी, दगडात कोरलेल्या मूर्ती आज उद्ध्वस्त, भग्न होऊन पडल्या आहेत. फोनी चक्रीवादळाच्या तडाख्याने इथल्या कलाकारांची कित्येक महिन्यांची मेहनत अक्षरश: पाण्यात गेली आहे. कला हेच रघुराजपूरच्या रहिवाशांचं जीवन आहे. काल-परवापर्यंत इथल्या घरांच्या भिंतींवर आकर्षक रंगांत रंगवलेली अर्थपूर्ण चित्रं दिसत. घरांतून नृत्य-संगीताचे सूर उमटत. आज या घरांची पडझड झाली आहे आणि नृत्य-संगीताच्या उत्साही सुरांची जागा भयाण शांततेने घेतली आहे.
पूर्वी इथे महिला पट्टचित्रांसाठी कागद तयार करत आणि पुरुष तो पट पौराणिक कथांच्या चित्रांनी सजवत. आज अन्य क्षेत्रांप्रमाणेच यातही समानता आली आहे. महिलाही चित्र रंगवू लागल्या आहेत. पट्टचित्रे ही रघुराजपूरची मूळ ओळख असली तरी पामच्या झाडाच्या पानांवर साकारली जाणारी नाजूक नक्षी, टसरच्या रेशमावर केले जाणारे नजाकतदार रंगकाम, लाकूड आणि दगडातील शिल्पे, नृत्यकला अशा अन्यही अनेक कला इथे रुजल्या, फोफावल्या आहेत. या छोटय़ाशा गावात साधारण ३०० कलाकार आहेत आणि वर्षभर इथे पर्यटकांची विशेषत: परदेशी पर्यटकांची वर्दळ असते. ग्राहकांना आकर्षति करण्यासाठी घराच्या बाहेर दर्शनी भागात लहान-मोठय़ा कलावस्तू, खेळणी, चित्र काढून सजवलेले नारळ, रंगीत पेटय़ा मांडून ठेवलेल्या असतात. फोनी येऊन गेल्यापासून पर्यटक तर फिरकलेले नाहीतच आणि कलाकारही आपल्या भिजलेल्या, फाटलेल्या, मोडतोड झालेल्या मौल्यवान चित्रशिल्पांच्या चिंतेत आहेत.
सुरुवातीच्या काळात हेलन जेरी नावाच्या अमेरिकन महिलेने इथल्या कलेचं मोल ओळखलं. कलाकारांना प्रोत्साहन दिलं. तिने इथल्या कलाकृतींना ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि अनेक कलाकृती खरेदी करून परदेशात विकल्याच्या आठवणी इथले जुने जाणते कलाकार सांगतात. इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अॅण्ड कल्चरल हेरिटेजने १९९८ ते २००० या कालावधीत येथील कलांचा अभ्यास केला. त्यांची माहिती संकलित केली आणि त्याआधारे २००० साली रघुराजपूरला आर्टस्टि व्हिलेजचा दर्जा बहाल करण्यात आला. या दर्जामुळे ग्रामस्थांच्या आयुष्यात आणि गावाच्या स्थितीत बराच बदल घडला.
इथल्या रहिवाशांकडे अद्वितीय कला होती, पुरातन परंपरा होती. मात्र आपल्या कला, परंपरा, संस्कृती व्यावसायिकदृष्टय़ा जगासमोर मांडण्याची कौशल्ये त्यांना अवगत नव्हती. ती अवगत करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळू लागले. गावातील घरांच्या भिंती आकर्षक चित्रांनी उजळून निघाल्या. देश-विदेशांतील पर्यटक अभ्यासकांचा ओघ वाढला. त्यांना हेरिटेज वॉक घडविण्यासाठी रहिवाशांना प्रशिक्षण देण्यात येऊ लागले. काही कौशल्ये काळाच्या ओघात मागे पडली होती. ती पुन्हा आत्मसात करण्यासाठी नव्या पिढीला प्रोत्साहन दिले जाऊ लागले. स्थानिक उत्पादनांचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यांची विक्री करण्यासाठी प्रोत्साहित केले गेले. आज काही परदेशी कलाकार इथे पट्टचित्रांची कला अवगत करण्यासाठी येऊन राहू लागले आहेत. पर्यटनाचा एक नवा आदर्शच या गावाच्या रूपाने उभा राहिला आहे. मात्र सध्या फोनीने गावाचे पूर्ण रूपच पालटून टाकले आहे.
झाडे मोडून पडली आहेत. घरांची पडझड झाली आहे. विजेच्या तारा कुठे तुटून पडल्या आहेत तर कुठे एकमेकींत गुंतून पडल्या आहेत. या सर्वापेक्षाही येथील रहिवाशांसाठी वेदनादायक दृश्य आहे, ते म्हणजे भिजलेली, फाटलेली पट्टचित्रे आणि मोडून पडलेली सुंदर शिल्पे. प्रतिमा महाराणा यांनी जगन्नाथ मंदिरातील विविध विधींची चित्रे असलेल्या सुमारे ५० जात्रपट्टी साकारल्या होत्या. त्यापकी अवघ्या पाच पट्टी शिल्लक राहिल्या आहेत. काही कलाकारांनी सुमारे एक ते दोन लाखांच्या कलाकृती या वादळात गमावल्या आहेत. चित्रकारांची पाच-दहा फुटांची चित्रे भिजून गेली आहेत. पट्टचित्रांमध्ये इतकी नाजूक कलाकुसर असते की ती फाटली किंवा भिजली तर दुरुस्त करण्याचा पर्यायच नसतो. २०-३० हजारांचे चित्र क्षणात निरुपयोगी ठरते. अशी किती चित्रे या वादळाने गिळंकृत केली याची गणतीच नाही.
वादळात घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रहिवाशांनी आपल्या कलाकृती वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र वाऱ्याच्या वेगामुळे घरांचे दरवाजे उखडले गेले आणि पावसाचा मारा होऊ लागला. सोसाटय़ाच्या वाऱ्यात अनेक घरांचे छत उडाले. इथल्या काही घरांच्या छतांवर नक्षीकाम, कोरीव काम केलेले होते. अशा जुन्या वडिलोपार्जति घरांचे नुकसान तर कधीही भरून न निघणारे आहे. काही घरांचे तर केवळ स्तंभच शिल्लक राहिले आहेत. त्या वेळी कलाकृती वाचवण्याच्या विचारापेक्षा जीव जाण्याची भीती अधिक तीव्र असणे स्वाभाविक होते. सहा-सात महिने राबून साकारलेली सुंदर चित्रे भिजून फाटून गेली. रोज हाती ब्रश घेऊन कलासाधना करणारे सध्या आपल्याच घरांचा राडारोडा हटवत आहेत.
गेल्या काही महिन्यांच्या मेहनतीवर तर पाणी पडलेच आहे, पण भविष्याचीही काही शाश्वती नाही. येथील कलाकार कागद, नसíगक रंग वगरे साहित्य पुरीला जाऊन आणत. पण सध्या वादळामुळे पुरीमधील सर्व सेवा कोलमडून पडल्या आहेत. तिथे सर्व स्थिरस्थावर होत नाही तोवर चित्रांसाठी आवश्यक असणारा कच्चा माल येणार नाही आणि स्थिरस्थावर होण्यासाठी काही महिने लागतील, अशी चिन्हे सध्या तरी दिसत आहेत. इथे पामच्या पानांवर काढली जाणारी चित्रेही लोकप्रिय आहेत. मात्र वादळात पामच्या झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ही पाने मिळणे कठीण होईल आणि पानांच्या किमतीही वाढतील, अशी भीती कलाकारांना आहे. सगळे नीट होण्याची केवळ वाट पाहण्याशिवाय सध्या या कलाकारांच्या हाती काहीच उरलेले नाही.
रघुराजपूरमध्ये रोज सरासरी २००-३०० ग्राहक येत. हा ओघ पूर्ववत झाला तरी पर्यटकांना दाखवण्यासाठी, विकण्यासाठी कलाकृती तयार करायला किती वेळ लागेल, याची गणिते सध्या कलाकार जुळवत आहेत. जानेवारी २०१७ मध्ये हे गाव डिजिटल व्हिलेज म्हणून घोषित करण्यात आले होते. बँक ऑफ इंडियाने तिथे २० पीओएस (कार्ड स्वाइप करण्याची मशीन्स) सुविधा दिली होती आणि २०० ग्रामस्थांची बचत खाती उघडली होती. पण आज इथे कनेक्टिव्हिटी नाही, वीजही नाही. त्यामुळे ही सर्व व्यवस्था पुढचे काही दिवस तरी निष्फळच ठरणार आहे.
रघुराजपूरच्या शेजारीच वसुदेवपूर आहे. तिथे नारळाच्या काथ्यापासून विविध कलाकृती तयार केल्या जातात. तिथले कलाकार रोज साधारण आठ किमी सायकल हाकत सखीगोपाल या गावी जातात. तिथून ४० रुपये किलो दराने काथ्या घेऊन येतात आणि त्यापासून आकर्षक कलाकृती साकारतात. तिथल्या कलाकारांवरही असेच संकट ओढावले आहे. कित्येक वष्रे जपलेली, वाढवलेली नारळाची झाडे वादळात अक्षरश उन्मळून पडली आहेत. नारळ कमी म्हणजे काथ्याही कमी. अर्थातच त्याची किंमत वाढणार. त्यांच्या कच्च्या मालाचा पुरवठा पूर्ववत होण्यासाठी तर बराच काळ लागणार आहे. त्यामुळे वसुदेवपूरमधले कलाकारही चिंतेत आहेत.
कित्येक वर्षांपूर्वीच्या कलाकृती आणि कलाप्रकार मनापासून जपणाऱ्या या गावाला निसर्गाने फारच मोठा धक्का दिला आहे. अगदी अलीकडच्या काळात नावारूपाला आलेल्या या कलाकारांच्या गावापुढे आज अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. आज ना उद्या स्थिती पूर्ववत होईलच. पण सध्या तरी पर्यटक आणि कलाकृतींविना गाव ओकेबोके झाले आहे.
