‘लोकसत्ता’ दिवाळी अंकाने दरवर्षीप्रमाणे यंदाही वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक उद्बोधन आणि रंजकता यांची सांगड घालण्याचा आपला वसा कायम राखला आहे. गेल्या वर्षभरात देशातील उदारमतवादी सहिष्णु वातावरणाला लागलेले ग्रहण हा आज सार्वत्रिक चिंतेचा विषय आहे. याची दखल घेत ‘उदारमतवादाची पीछेहाट’ या चर्चेत डॉ. अरुण टिकेकर, गिरीश कुबेर, विनय सहस्रबुद्धे आणि अजित अभ्यंकर यांनी या संकल्पनेच्या विविध पैलूंचा परामर्ष घेतला आहे.
याच्याच जोडीने आणखी एका वेगळ्या विषयाकडे जाताना जगभरातील निरनिराळ्या शहरांची फुफ्फुसे असलेल्या जंगलांवर प्रकाश टाकला आहे- डॉ. उल्हास राणे, वैशाली करमरकर (जर्मनी), विश्वास अभ्यंकर (अॅमस्टरडॅम), डॉ. प्रियांका देवी-मारुलकर (पॅरिस) आणि प्रशांत सावंत (लंडन) यांनी. याच विषयाचे विस्तृत साहित्यरूप म्हणजे कवी गुलजार यांच्या झाडांवरील तरल कवितांचा खास विभाग!
यावर्षी पावसाने दगा दिल्याने देशातील अनेक राज्यांना अवर्षणास तोंड द्यावे लागत आहे. अमेरिकेसारख्या विकसित देशातील अवर्षणग्रस्त प्रदेशांत कशा तऱ्हेने त्याचे नियोजन केले जाते याचा साद्यन्त वृत्तान्त कथन केला आहे डॉ. संहिता जोशी यांनी.. ‘सुबत्तेच्या देशातला दुष्काळ’ लेखात!
ज्येष्ठ रंगकर्मी व चित्रपटकार सई परांजपे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला अभिनेते नासीरुद्दीन शाह यांच्या संघर्षकाळातील ‘बेबंद दिवसां’चे वर्णन करणारा त्यांच्या आत्मकथनातील अंश- हे या अंकाचे आणखीन एक वैशिष्टय़. अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी त्यांच्या अभिनय तसेच लेखकीय आयुष्याला वळण देण्यास निमित्त ठरलेल्या व्यक्तींवर लिहिलेला कृतज्ञता-लेख वाचकांचे कुतूहल जागवणारा आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘नष्टनीड’ या कादंबरीवर आधारित सत्यजित राय यांच्या ‘चारुलता’ या चित्रपटातील अव्यक्त प्रेमत्रिकोण प्रत्यक्षात रवींद्रनाथ आणि सत्यजित राय यांच्याही व्यक्तिगत आयुष्यात कसा निर्माण झाला होता, हे चितारणारा विजय पाडळकर यांचा विलक्षण उत्कट लेख संवेदनशीलांची जिज्ञासा जागृत करणारा ठरावा.
आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी जॉर्ज फर्नाडिस यांच्या पुढाकाराने योजलेल्या बडोदा डायनामाइट कटातील सहभागी डॉ. जी. जी. पारिख आणि बच्चूभाई शहा यांच्या आठवणींवर आधारीत लेख अंकाला वेगळे परिमाण देणारा आहे. आयसिसचा अक्राळविक्राळ दहशतवाद जगड्व्याळ रूप धारण करतो आहे. त्याची पाळेमुळे आणि त्यामागच्या कारणांचा शोध घेणारा विशाखा पाटील यांचा लेख, तसेच पानिपत युद्धात युद्धकैदी झालेल्या मराठय़ांचे पुढे काय झाले, त्यांचे वंशज आज काय करताहेत, याचा मागोवा घेणारा आनंद शिंदे यांचा शोधलेख वाचकांची तृष्णा भागवेल.
कन्नड साहित्याच्या अधिकारी अनुवादक डॉ. उमा कुलकर्णी यांनी सांगितलेले अनुवादाभव, स्वातंत्र्यपूर्व काळातील तिसरे आगाखान या आगळ्या व्यक्तिमत्त्वाची न्या. नरेंद्र चपळगावकरांनी करून दिलेली ओळख, नाटय़-समीक्षक माधव वझे यांनी फ्रान्समधील ‘अविन्यो’ या नाटकवेडय़ा गावाचा करून दिलेला परिचय, डॉ. रवी बापट यांनी आपल्या लेखनाची केलेली शल्यचिकित्सा, नाटय़-चित्रपट क्षेत्रांतील सौमित्र तथा किशोर कदम, मुक्ता बर्वे, गुरू ठाकूर, प्रसाद ओक आणि जितेंद्र जोशी यांच्या कवितांचा खास विभाग, तरुणाईच्या संगीताची चर्चा करणारे डॉ. आशुतोष जावडेकर, गंधार संगोराम आणि जसराज जोशी यांचे लेख, ‘आर्टुनिस्ट गोपुलु’ हा प्रशांत कुलकर्णीचा एका आगळ्या चित्रकाराचा परिचय करून देणारा लेख, तसेच व्हेनिसच्या बिएनालेची गोष्ट सांगणारा अभिजीत ताम्हणे यांचा लेख, प्राचीन ‘स्मार्ट सिटीज्’वर झोत टाकणारा रवि आमले यांचा लेख, साहित्य आणि जीवन यांचा जैविक संबंध उलगडून दाखवणारा आसाराम लोमटे यांचा लेख, विनायक पाटील यांनी जगावेगळ्या वृक्षाची सांगितलेली कहाणी, त्याचप्रमाणे ज्योतिर्विद आदित्य भारद्वाज यांचे वार्षिक राशिभविष्य अशा वैविध्यपूर्ण साहित्याची मेजवानी यंदाच्या ‘लोकसत्ता’ दिवाळी अंकात आहे.
लोकसत्ता, संपादक : गिरीश कुबेर, मूल्य : १४० रुपये
दर्जेदार, अभिरुचीपूर्ण दिवाळी अंकात साप्ताहिक साधनाच्या अंकाची नेहमी गणना होते. समकालीन वास्तवाचं अतिशय गांभीर्याने दखल घेणारा हा अंक वाचकांना दिवाळीत वैचारिक खाद्य पुरवतो. गेले काही महिने देशभरात विविध पुरस्कार परत करण्याचं सत्र सुरू असल्यामुळे या वर्षी अंकात साहित्य या विषयावर भर आहे. राज्यसत्तेसमोर नमायला नकार देऊन आपल्या म्हणण्यासाठी विषाचा प्याला सहजपणे ओठाला लावणारा सॉक्रेटिस या अंकात येणं त्यामुळे अगदीच स्वाभाविक आहे. नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेला सॉक्रेटिसचा मृत्यू हा लेख त्या अर्थाने वाचनीय आहे. पुरस्कार वापसीच्या संदर्भातल्या रामचंद्र गुहा यांच्या परिणाम लेखक करतात, पुरस्कार नाही या लेखातील प्रादेशिक भाषेत लिहिणाऱ्यांना धोका आहे, हा डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्यासंदर्भातला मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. रोमिला थापर यांनी वाढत्या असहिष्णुतेसंदर्भातलं आपलं चिंतन मुलाखतीतून मांडलं आहे. डॉ. अभय बंग यांनी गांधींसोबत अपॉइंटमेंट या लेखात तरुणांशी संवाद साधला आहे. माझ्या जगण्याचा मार्ग बदलणारा बिहार हा अनिल अवचट यांचा तेव्हाच्या बिहारचं दर्शन घडवणारा असला तरी लेखकाचं आत्मचिंतन वाचकांना नक्कीच आवडेल. द हिंदू या दैनिकातील केशव आणि सुरेंद्र या व्यंगचित्रकार जोडगोळीवरचा अतुल देऊळगावकर यांचा लेख अभ्यासपूर्ण आहे. भारतीय स्त्रीवादापुढील आव्हान हा लक्ष्मीकांत देशमुख यांचा लेख क्रीडा क्षेत्रातील महिलांना किती आणि काय काय सहन करावं लागतं यावर प्रकाश टाकतो. माझ्या भाषा मैत्रिणी हा विनय हर्डीकर यांचा भारतीय भाषांवरचा लेख अतिशय सुंदर आहे. याशिवाय हमीद दलवाई यांची कथा, गोविंद तळवलकर यांचा रवींद्रनाथ टागोरांवरचा तर डॉ. अरुण टिकेकर यांचा अँग्लो इंडियन कादंबरीकारांवरचा लेख असा भरगच्च मजकूर अंकात आहे.
साप्ताहिक साधना, संपादक : विनोद शिरसाठ, मूल्य : १२० रुपये‘साप्ताहिक साधना’ गेल्या वर्षीपासून युवा दिवाळी अंक काढात केली आहे. या वर्षीच्या युवा अंकात हमीद दलवाईंची ‘दहा रुपयांची नोट’ ही सुंदर कथा आहे. ‘माझ्या हमीद असण्याचा अर्थ’ या लेखात डॉ. हमीद दाभोलकर यांनी केलेले चिंतन दिशादर्शक आहे. ज्येष्ठ सिनेनाटय़ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने- रिमाने आपल्या वडिलांना उद्देशून लिहिलेले पत्र अत्यंत संवादी आहे. आशुतोष कोतवाल या अमेरिकेत असणाऱ्या वैज्ञानिकाच्या आईने आपल्या मुलावर लिहिलेल्या पुस्तकातील प्रकरण अंकात आहे. अमेरिकेत भारताचे कॉन्सुल जनरल असलेल्या ज्ञानेश्वर मुळे यांनी न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्कवर एक लेख लेख लिहिला आहे. त्याशिवाय विवेक सावंत यांचा ‘विज्ञान आणि समाजजीवन’ हा लेख आवर्जून वाचावा असा आहे. कुमार संगकाराचे निवृत्तीचे भाषण वाचायला तरुणांना आवडेल असेच आहे.
सा. साधना युवा, संपादक : विनोद शिरसाठ, मूल्य : ३० रुपये
‘साप्ताहिक साधना’च्या ‘बालकुमार’ या पाचवी ते दहावी या वयोगटातल्या मुलांसाठीच्या दिवाळी अंकात मान्यवरांचे लहान मुलांसाठीचे लेखन असते. यंदाच्या अंकात अनिल अवचट, भारत सासणे, कृष्णात खोत, रघुराज मेटकरी, बी. केशर शिवम यांच्यासह कैलाश सत्यार्थी आणि मलाला यांची भाषणे आहेत. अनिल अवचट यांनी ‘सिग्नल’ या लेखात ट्रॅफिक सिग्नलवर भेटणाऱ्या वेगवेगळ्या मुलांविषयी लिहिले आहे. बी. केशर शिवम यांचा ‘बँडबाजावाला’ हा लेख आवर्जून वाचण्यासारखा. त्यांच्या लहानपणी जातिभेदाविषयीचा त्यांना आलेला दाहक अनुभव त्यांनी या लेखातून मांडला आहे. कृष्णात खोत यांची ‘इठ्ठा म्हातारीचा रेडिओ’ ही कथा, तर रघुराज मेटकरी यांचा ‘हरीश-गिरीश’ हा लेख मुलांना नक्कीच आवडेल. ‘वाघाला गणित कळत नसतं’ ही भारत सासणे यांची कथा वाचनीय आहे.
सा. साधना बालकुमार, संपादक : विनोद शिरसाठ, मूल्य : ३० रुपये
अंकात वेगवेगळे छोटेखानी, भरपूर लेख आहेत. दर्यावरील एक रात्र या लेखात अमोल सरतांडेल यांनी खवळलेल्या समुद्रात वादळाशी सामना करत काढलेल्या एका रात्रीचा अनुभव दिला आहे. मी अनुभवलेले चक्रीवादळ या लेखात डॉ. भा. वा. आठवले यांनी १९६५ साली देवगडला झालेल्या चक्रीवादळाचा अनुभव मांडला आहे. आज वेगवेगळ्या यंत्रणा सज्ज असतात, चक्रीवादळाची पूर्वसूचना मिळते. त्या काळातही पूर्वसूचना मिळायची, पण आजच्या इतक्या यंत्रणा नव्हत्या. अशा वेळी डॉक्टर या नात्याने त्यांनी अनुभवलेले चक्रीवादळ वाचण्यासारखे आहे. डॉ. सूर्यकांत येरागी आणि डॉ. सुप्रिया येरागी यांनी ‘निसर्गातील एक आश्चर्य’ या लेखात मोत्याची सर्वागीण माहिती दिली आहे. हरेश्वर मर्दे यांनी शार्क माशावर लेख लिहिला आहे. याशिवाय पंढरीनाथ तामोरे, पांडुरंग भाबल, जयवंत वैती, डॉ. का. अ. खासगीवाले, शं. रा. पेंडसे यांचे लेख तसंच सी. पु. वालावलकर, प्रकाश पोळ, विलास फडके, सुदेश जगताप इत्यादींच्या कविता अंकात आहेत.
दर्यावर्दी, संपादक : अमोल सरतांडेल, मूल्य : ७५ रुपये
आरोग्य क्षेत्रातील अनेक समस्यांचा आणि त्याचबरोबर अनेक उपक्रमांचा र्सवकष आढावा घेणारा असा हा दिवाळी अंक आवर्जून संग्रही ठेवावा असा आहे. महत्त्वाचं म्हणजे केवळ मार्गदर्शनपर असं यातील लेखांचं स्वरूप नाही. पत्रकार, अभ्यासक, कार्यकर्ते यांच्या अभ्यासूपणामुळे या सर्वच लेखांना विशेष महत्त्व आहे.
आरोग्य विषय प्रश्नांची सामाजिक, आर्थिक, वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडणी करणाऱ्या अनेक संघटनामध्ये कार्यरत असणारे डॉ. अनंत फडके यांच्या लेखातून जनआरोग्य क्षेत्राचा आवाका तर कळतोच, पण याच क्षेत्रातील कार्यकर्त्यांची जडणघडण दिसून येते. इतर उद्योगांप्रमाणेच आता आरोग्य क्षेत्रातदेखील गळेकापू स्पर्धेने जोर पकडला आहे. त्यातही औषध जगात तर माफियागिरीचाच प्रत्यय येत आहे. समीर कर्वे यांनी या सर्वाचा पत्रकारीय नजरेतून घेतलेला आढावा मूळातून वाचण्यासारखा आहे.
अवयव प्रत्यारोपणाची आजची गरज आणि अवयवदात्यांची कमतरता यामुळे हे प्रमाण व्यस्त आहे. या परिस्थितीवर प्राजक्ता कासले यांच्या लेखातून प्रकाश टाकण्यात आला आहे. स्त्री स्वास्थ्य या विभागातील सर्वच लेख अनेक वेगवेगळ्या समस्यांवर प्रकाश टाकणारे आहेत. स्त्रियांमधील व्यसनाधीनता, राइट टू पी, शारीरिक, मानसिक, आर्थिक, लैंगिक हिंसांचा स्त्रीच्या आरोग्यावर होणारा परिणाम दूर करण्यासाठीची समुपदेशनाची गरज अशा विषयांवरील सर्वच लेख उद्बोधक आहेत.
समलैंगिकांचे प्रश्न, इच्छामरणाची समस्या, समाजस्वास्थ्याचा प्रवास, ‘हॅलो’चा लोकल ते ग्लोबल प्रवास अशा अनेक लेखांनी अंकाची शान वाढवली आहे.
वसा, संपादक : प्रभाकर नारकर, मूल्य : १०० रुपये
या वर्षी माझे गाव, माझे जगणे अशी थीम घेऊन ऋतुरंगने दिवाळी विशेषांक काढला आहे. वाढत्या शहरीकरणाच्या प्रक्रियेत अनेकांच्या बाबतीत गावाचं अस्तित्व आता हळूहळू पुसट होत चाललं आहे. मुळात शहरात जन्माला येणाऱ्यांना गावच नसतं. पण ज्यांना गाव असतं, त्यांचे खूपदा त्या गावाशी घट्ट ऋणानुबंध असतात. गावाच्या आठवणी असतात, अनुभव असतात आणि त्यातून त्यांचं भावविश्व तयार होत गेलेलं असतं. या अनुभवांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भर घातलेली असते. अशा लोकांनी आपल्या गावाबद्दल जागवलेल्या आठवणी या अंकात वाचायला मिळतील. हिंदीतील ज्येष्ठ कवी, लेखक, दिग्दर्शक गुलजार यांचा जन्म पाकिस्तानातला. तिथलं दिना हे त्यांचं गाव त्यांच्या मनात अगदी अस्पष्ट रूपात आहे. ते गाव सुटलं पण ते या ना त्या रूपात शोधण्याचा आपला आयुष्यभर प्रयत्न राहिला असं म्हणत त्यांनी गाव, त्याचं माणसाच्या मनातलं स्थान, हिंदी सिनेमांमधून दाखवलं गेलेलं गाव याच्याशी संबंधित आठवणी लिहिल्या आहेत.
गिरीश कुबेर यांनी साताऱ्याजवळच्या त्यांच्या माहुली या आजोळच्या आठवणी लिहिल्या आहेत. जुन्या आठवणीतलं गाव मांडताना त्यांनी शेवटी आजच्या काळातलं त्याच गावातलं जगणं मांडून नेमका बदल सूचित केला आहे.
सुशीलकुमार शिंदे सोलापूरचे. त्यांनी सिद्धेश्वराच्या महायात्रेची तपशीलवार माहिती देऊन आपलं बालपण त्या यात्रेशी कसं जोडलेलं होतं ते सांगितलं आहे. अरुण साधू यांच्या परतवाडा आणि अचलापूरच्या आठवणी आपल्याला थेट त्या काळात घेऊन जातात. विश्वास पाटील यांनी त्यांच्या नेर्ले या गावाचं सुरेख चित्र रेखाटलं आहे. रंगनाथ पठारे, ना. धों. महानोर, मकरंद अनासपुरे यांनी रंगवलेल्या गावच्या आणि अर्थातच लहानपणच्या आठवणी वाचनीय आहेत. सयाजी शिंदे, शिरीष पै, इंद्रजित भालेराव, प्रभा गणोरकर, नागनाथ कोत्तापल्ले, अमृता सुभाष यांनी रहिमतपूर या त्यांच्या आजोळाबरोबरच शूटिंगच्या निमित्ताने कोकणातल्या गावी जडलेलं नातं उलगडून दाखवलं आहे. अशा अनेक मान्यवरांनी आपल्या गावाच्या ऋणानुबंधांबद्दल लिहिलं आहे.
ऋतुरंग, संपादक : अरुण शेवते, मूल्य : २०० रुपये
‘दशभुजा दामिनी’ हा अंक गुन्हे विशेष असल्याचे त्याच्या मुखपृष्ठावरच स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार अंकात वसंतलतिका यांनी शीना बोरा या अलीकडच्या काळातल्या बहुचर्चित प्रकरणाबरोबरच अशा गेल्या काही वर्षांमधल्या प्रकरणांचा तपशीलवार आढावा घेतला आहे. मुळात या प्रकरणामुळेच अंककर्त्यांनी गुन्हे विशेष अंक काढला असावा. दिलीप ठाकूर यांनी आपल्या लेखात बॉलीवूडमधल्या गुन्हेगारीपटांचा लेखाजोखा मांडला आहे तर हर्षदा वेदपाठक यांनी खलनायिका आणि गुन्हेगारीपट या लेखात बॉलीवूडमधल्या आजवरच्या व्हॅम्पची चर्चा केली आहे. मनोज अहिरे यांनी आरोग्यसेवेत वाढती गुन्हेगारी या लेखात आरोग्यव्यवस्थेतल्या गैरव्यवहारांची चांगली माहिती दिली आहे. याशिवाय या अंकात रशीद इनामदार, आदित्य जोशी, पल्लवी शेटय़े, शीतल करदेकर असे अनेकांचे लेख आहेत.
दशभुजा दामिनी, संपादक : शीतल करदेकर, मूल्य : ६० रुपये
‘सामना’चा दिवाळी अंक नेहमीप्रमाणे अनेक विषयांना वाव देणारा आहे. राजकारण, विनोदी कथा, सामाजिक भाष्य, दिवाळी साजरीकरणाचे बदल, दिवाळीच्या आठवणी, भाषाविषयक अभ्यासू आणि व्यंगात्मक लेख, ऐतिहासिक कथा, भटकंती अशा अनेक विषयांनी हा अंक सजला आहे.
सरकारी तसबिरीत नसलेले बाळासाहेब या लेखातून संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू काहीशा वेगळ्या दृष्टीने मांडले आहेत. जे काम सरकारी तसबिरींनी केलं नाही ते बाळासाहेबांनी केलं. त्यावरच प्रकाश टाकण्यात आला आहे. दिवाळी साजरीकरणाचा आत्ताच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. त्यानिमित्ताने ‘ते दिवस आता कुठे?’ हा अरुण म्हात्रे यांचा, ‘दिवा करजो भाताचा’ हा अरविंद पोहरकर यांचा आणि ‘दिवाळी भोकाच्या पैशाची’ हा अरविंद म्हापणकर यांचा स्मरणरंजनात्मक लेख वाचनीय आहे. नोकरी व्यवसायानिमित्ताने आज बऱ्याच प्रमाणात मराठी माणूस परदेशात आहे. अर्थात सारेच भारतीय सण तेथे साजरे होत असतात. अमेरिकेतली दिवाळीची माहिती रुपाली कदम-राणे यांच्या लेखातून मिळते.
अश्लील विनोद हा खुसखुशीत लेख शिरीष कणेकर यांनी लिहिला आहे. वेदाक्षरांवरील लेख अभ्यासपूर्ण आहे. अंकाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे इतर दिवाळी अंकात कविता वाचायला मिळतात येथे गजलांची मैफल सजली आहे.
सामना, का. संपादक : संजय राऊत, मूल्य : रु. ८०/-
‘प्रिय मैत्रीण’ अंकात यंदा सहजीवन आमचेही ही थीम घेण्यात आली असून सर्व लेख त्या थीमला अनुसरून आहेत. बॉलीवूड, तारेतारका आणि बॉलीवूडमधले सर्व प्रकारचे व्यवहार हा सामान्य माणसासाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे. याच कुतूहलाला अनुसरून ‘बॉलीवूडमधील विवाह’ या लेखात दिलीप कुमार-सायरा बानू, अमिताभ बच्चन-जया भादुरी, नबाब पतौडी- शर्मिला टागोर, ऋषी कपूर-नीतू सिंग यांच्या सहजीवनाचा उदयतारा नायर यांनी वेध घेतला आहे. त्याशिवाय रेणुका शहाणे-आशुतोष राणा, श्रेयस आणि दीप्ती तळपदे, रमेश आणि सीमा देव या जोडप्यांनी आपल्या सहजीवनाबद्दल सांगितले आहे. या लोकप्रिय लेखांबरोबरच राजन खान, डॉ. शुभा थत्ते, नीलिमा कानेटकर, वंदना सुधीर कुलकर्णी, डॉ. संदीप केळकर, स्मिता भागवत यांनी सहजीवनाबद्दल मांडणी केली आहे. साजशृंगार या विभागात श्वेता चिटणीस, रविप्रकाश कुलकर्णी, उत्तरा मोने यांचे लेख आहेत. त्याशिवाय रत्नाकर मतकरी, नलिनी बोरवणकर, मनीषा सोमण यांच्या कथा, प्रवीण दवणे, संदीप खरे, किशोर पाठक, अरुण म्हात्रे, इत्यादींच्या कथा अंकात आहेत.
प्रिय मैत्रीण, संपादक : वर्षां सत्पाळकर, मूल्य : १४० रुपये
देश विदेशातील उद्यानशिल्प, ध्यासपूर्ण पर्यटन, अंडरवॉटर म्युझियम व आकाशातला मुक्कामसारखे खास लेख, जलस्मारकांची सैर, अॅरोरा लाइट्सची नैसर्गिक उधळण अशा सर्वस्पर्शी भटकंतीने यंदाचा मस्त भटकंतीचा दिवाळी अंक सजला आहे.
कॅनडातले बुटचार्ट गार्डन्स, इंग्लंडमधील ‘कॉम्प्टन एकर्स’ ही उद्यान मालिका, चेरी ब्लॉसमची जपानी बाग, राजवाडे आणि मनमोहक कारंज्यांच्या अकरा बागा अशा विदेशातील बागांची सफर या अंकात उमा हर्डीकर, जयश्री कुलकर्णी, अनामिका बोरकर, पुष्पा जोशी, प्रकाश जाधव यांनी घडवली आहे. देशातील उद्यानशिल्पावर उज्ज्वला गोखले यांनी प्रकाश टाकला आहे. मेक्सिकन, कॅरिबियन समुद्राखालील संग्रहालयाचा चित्रमय सफर नंदा कदम यांनी केली आहे.
प्राचीन जलसंवर्धन आणि त्यानिमित्ताने बांधलेल्या वास्तू ही आपली जलस्मारकंच म्हणावी लागतील. या जलस्मारकांवर अतुल कुळकर्णी, मिलिंद आमडेकर, रजनीश जोशी यांनी विशेष प्रकाश टाकला आहे. बारवांचं सौदर्य, मुघलकालीन जलयोजना कुंडीभंडारा, देवी नदीची कथा यांचा यात समावेश आहे.
उंचावर डोंगरकडय़ावर, कातळावर हवेतच लटकवलेल्या तंबूतल्या अनोख्या कॅम्पिंगची माहिती या अंकात आपल्याला मिळते. मेघालयातील पातळगुहा आणि जंगलाचा एक अदिम अनुभव उष:प्रभा पागे यांच्या लेखात घेता येतो. तर सिक्किममधल्या घरात राहण्याची नवी पर्यटन संकल्पना मानसी आमडेकरांनी वर्णिली आहे. भर शहरात आंतरराष्ट्रीय न्यायालय २ आणि जंगल दोन्ही असणाऱ्या हेगची सफर नरेंद्र चित्रे यांच्या लेखात घडते. एकूणच भटकंतीची दिवाळीच असं वर्णन करावे लागले.
मस्त भटकंती, संपादक : वर्षां सत्पाळकर, मूल्य : रु. १४०/-
आपल्या आसपासच्या दुनियेत डोकावून बघितल्यावर जे अद्भुत दिसतं ते समजून घ्या, हे सुबोध जावडेकर यांचा लेख सांगतो. सध्या ते प्राण्यांची बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यास करीत आहेत. त्यानिमित्ताने या लेखात त्यांनी प्राणिविश्वाचा आढावा घेतला आहे. धरणं बांधणारा बिव्हरसारखा प्राणी, आपल्याच शरीराचा जिवंत तराफा बनून प्रवास करणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या मुंग्या, माणसाला मासेमारी करून नेणारे कामोरॅन्ट पक्षी या सगळ्यांबद्दलची माहिती अचंबित करणारी आहे. मुलांच्या आवडत्या डिझी, निंजा हातोरी, नॉडी अशा कार्टुन्सना आवाज देणाऱ्या मेघना एरंडेची मुलाखत घेतली आहे, अंजली कुलकर्णी यांनी. आवाजाच्या अंतरंगात या लेखात मुंबईतल्या बांद्रे येथील महात्मा गांधी विद्या मंदिरच्या मुलांनी रेकार्डिग स्टुडिओला भेट देऊन त्या भेटीचा वृत्तांत लिहिला आहे. त्याचं शब्दांकन क्रांती गोडबोले यांनी केलं आहे. एलिझाबेथ एकादशी या सिनेमात काम केलेल्या छोटय़ा कलाकारांशी अंजली कुलकर्णी यांनी मस्त गप्पा मारल्या आहेत. प्रवीण दवणे, दासू वैद्य यांच्या कविता, डॉ. बाळ फोंडके, डॉ. आनंद नाडकर्णी, अच्युत गोडबोले, किशोर दरक, भारत सासणे यांच्या लेख कथांनी अंक वाचनीय आहे.
वयम, संपादक : शुभदा चौकर, मूल्य : १०० रुपययंदाचा ‘गार्गी’ दिवाळी अंक म्हणजे अनेक वैविध्यपूर्ण कथांची मेजवानीच म्हणावी लागेल. अनेक प्रसिद्ध तसेच नवोदितांच्या कथांना या अंकातून स्थान मिळालं आहे. कौटुंबिक, विनोदी, प्रेमकथा, गुन्हेकथा अशा सर्वच कथाप्रकारातील तब्बल २२ कथांचा आनंद या अंकात घेता येईल. एका ज्येष्ठ गायकाच्या आयुष्याचा विलक्षण प्रवास मांडणारी प्रवीण दवणे आंदोलन कथा जरूर वाचावी अशी आहे. सुधीर सुखटणकरांची विनोदी कथा नेहमीप्रमाणेच खुसखुशीत आहे. अंकाचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे श्री छत्रपती स्मारक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या कथा स्पर्धेतील पारितोषकप्राप्त कथांमुळे नवीन लेखकांनादेखील दिवाळी अंकात स्थान मिळालं आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक-सामाजिक जडणघडणीत महत्त्वाचं स्थान असणाऱ्या शिवाजी मंदिराचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष. त्यानिमित्ताने सुर्वणमहोत्सवी कार्यक्रमाचा आढावा शशी भालेकर यांनी घेतला आहे. आघाडीची अभिनेत्री आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व असणाऱ्या स्पृहा जोशीच्या मुलाखतीवर आधारित माधुरी महाशब्दे यांचा लेख आवर्जून वाचावा असा आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मुलाखतीतून राज्यातील बदलत्या उद्योग वातावरणाची झलक दिसून येते.
आयुर्वेदाशी निगडित विषयांवर मान्यवर वैद्यांचे लेख हा या अंकाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणावा लागेल. उत्साही चाळिशीचे रहस्य, मधुमेह, बालरोग दमा, संधिवात अशा अनेक आजारांवरील या लेखांमुळे चांगलेच मार्गदर्शन होते.
गार्गी, संपादक : श्रीनिवास शिरसेकर, मूल्य : रु. १००/-
खिडकीचित्रे हे ‘आवाज’चे दर वर्षीचे वैशिष्टय़. या वर्षीही त्यांना पुरेपूर न्याय देण्यात आला आहे. अंकात विकास सबनीस, मंगेश तेंडुलकर यांची मोबाइलने नादावलिया, सुरेश सावंत यांची भाज्या जेव्हा महाग होतात, प्रभाकर वाईरकर यांची नातीगोती, श्रीनिवास प्रभूदेसाई यांची काही जिवंत भुते, गजू तावडे यांची तुम्हा तो मंगळ सुखकर, प्रशांत कुलकर्णी यांची फाशीच्या निमित्ताने, विजय पराडकर यांची साहेबायन, महेंद्र भावसार यांची जगावे नि सेल्फीरूपे उरावे, विवेक मेहेत्रे नाद सुटेना व्हॉट्सअॅपचा, संजय मिस्त्री यांची तोता मैना की कहानी, जयवंत काकडे यांची पार्टटाइम फुल टाईम या हास्यचित्रमालिका मस्त आहेत. त्याशिवाय अंकात डॉ. यशवंत पाठक, मुकुंद टाकसाळे यांची वटी ही कथा वाचनीय आहे. मराठी लेखक व्हावे कसे ही मंगला गोडबोले यांची कथा खुसखुशीत आहे. सुधीर सुखटणकर यांची एका पिशवीचे महाभारत ही कथा चांगली आहे. याशिवाय प्रणव सखदेव, अवधूत परळकर आणि इतरांनी लेखन केले आहे.
आवाज, संपादक : भारतभूषण पाटकर, मूल्य : १८० रुपये
‘आम्ही उद्योगिनी’ या छोटेखानी दिवाळी अंकात वेगवेगळ्या क्षेत्रात उद्योग व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांची माहिती देण्यात आली आहे. चकल्या, करंज्या, चॉकोलेट्स, वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवणाऱ्या उद्योजक स्त्रियांबद्दल वाचताना समाजातल्या छोटय़ा उद्योगांचं महत्त्व जाणवतं. आपल्याकडे असणाऱ्या पारंपरिक कौशल्याच्या आधारे महिला कशी वाट काढतात ते वाचण्यासारखे आहे.
आम्ही उद्योगिनी, संपादक : मीनल मोहाडीकर, मूल्य : ५० रुपये
प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com